Monday, January 6, 2014

फाटलेल्या, दोन तुकडे झालेल्या, क्रमांक नसलेल्या नोटांनाही आहे मूल्य


ज्या नोटांवर लिहिलेलं आहे, लिहून, चित्रं काढून खराब केलेल्या आहेत अशा नोटा १ जानेवारी २0१४ पासून बॅँका स्वीकारणार नाहीत, अशी आवई उठली आणि ठिकठिकाणी बॅँकांमध्येही त्यासंदर्भात विचारणा सुरू झाली. शेवटी रिझर्व्ह बॅँकेनेच यासंदर्भात एक परिपत्रक काढलं आणि सार्‍या शंका-कुशंकांना पूर्णविराम दिला. रिझर्व्ह बॅँकेच्या खुलाशानुसार सर्व बॅँकांना आता लिहिलेल्या, खराब झालेल्या नोटा स्वीकारणं बंधनकारक आहे. अशा नोटा जर नागरिकांकडे असतील तर त्या बॅँकांनी बदलूनही दिल्या पाहिजेत. मात्र कोणत्या नोटा बदलून मिळतील? त्याचं किती मूल्य मिळेल याचेही निर्देश रिझर्व्ह बॅँकेने दिलेले आहेत. 

कोणत्या नोटा बदलून मिळतील?
१) सर्वसाधारणपणे चार प्रकारच्या खराब नोटा पाहायला मिळतात.
लिहिलेल्या, बर्‍यापैकी चुरगळलेल्या नोटा, खूपच चिरखडलेल्या, डाग, ढब्बे पडलेल्या नोटा, फाटलेल्या, नोटांवरील महत्त्वाचा मजकूर, वॉटर मार्कही व्यवस्थित नसलेल्या नोटा आणि जळालेल्या, खूपच फाटलेल्या नोटा.
२) यातल्या बहुतांश नोटा त्याच दर्शनी मूल्यावर बॅँकांनी नागरिकांना बदलून दिल्या पाहिजेत. म्हणजे शंभर रुपयांची चिरखडलेली नोट नागरिकांनी दिली, तर त्याच मूल्याची म्हणजे शंभर रुपयांचीच दुसरी नोट त्यांना मिळेल.
३) काही नोटा जर अगदीच खराब असतील तर त्या नोटेच्या मूल्याच्या पन्नास टक्के रक्कम बॅँक नागरिकांना परत देते.

कोणती नोट स्वीकारलीच जात नाही?
ज्या नोटांवर कोणत्याही धर्माविषयी अवमानकारक लिहिलं असेल, जातिवाचक शिवीगाळ केलेली असेल, दाढी, मिशा काढलेल्या असतील, कुठल्या राजकीय पक्षांबद्दल अवमानकारक लिखाण केलेलं असेल, जाणूनबुजून नोट जाळली असेल, ब्लेडने किंवा इतर धारदार हत्याराने मुद्दाम कापली असेल, नोट खरी की खोटी याविषयी कुठलीच ओळख पटत नसेल तर या नोटा बदलून मिळत नाहीत. कोणतीही बॅँक अशा नोटा स्वीकारत नाही आणि बॅँकेच्या दृष्टीनं आणि व्यवहारातही अशा नोटांचं मूल्य शून्य समजलं जातं.

नोटा कुठे बदलून मिळतील?
रिझर्व्ह बॅँकेच्या नियमानुसार राष्ट्रीयीकृत, सहकारी सर्वच बॅँकांनी नागरिकांना खराब नोटा बदलून दिल्या पाहिजेत.

कोणत्या नोटेचे किती पैसे मिळतील?

> हजाराची नोट- ही नोट सर्वसाधारणपणे ८४ टक्के चांगली असेल तर बदलून मिळताना, पूर्ण म्हणजे हजाराचे हजार रुपये मिळतील. ५२ टक्के चांगली असेल तर हजाराचे पाचशेच मिळतील.
> पाचशेची नोट - ८0 टक्के चांगली असेल तर पूर्ण पैसे मिळतील, मात्र ४९ टक्केच चांगली असेल तर २५0 रुपये मिळतील.
> शंभराची नोट - ७५ टक्के चांगली असेल संपूर्ण पैसे मिळतील, ४६ टक्केच चांगली असेल तर पन्नासच रुपये मिळतील.
> पन्नासची नोट- ७0 टक्के चांगली असेल तर पूर्ण रक्कम परत मिळेल. ४३ टक्केच चांगली असेल तर फक्त २५ रुपये मिळतील.
> एक ते वीस रुपये- या नोटांना ‘हाफ व्हॅल्यू’ नाही. चांगल्या स्थितीत असल्यास त्या पूर्णपणे बदलून दिल्या जातात.

नोटा बदलून मिळण्याची प्रक्रिया

> सर्वसामान्यपणे कुठल्याही बॅँकेच्या कॅश काऊंटरवर खराब नोट बदलून मिळाली पाहिजे. 
> त्यासाठी कुठलाही अर्ज वगैरे भरून देण्याची आवश्यकता नाही. 
> नोट थोडी जास्त खराब असेल तर त्यासाठी बॅँकेला अर्ज भरून द्यावा लागतो. 
> या दोन्ही प्रकारात खराब नोटेचं पूर्ण मूल्य नागरिकांना मिळेल. 
> नोट जर खूप खराब असेल तर त्या नोटेच्या दर्शनी मूल्याच्या पन्नास टक्के रक्कम नागरिकांना परत मिळते. 
> जळालेल्या, तुकडे पडलेल्या नोटा, कुठल्याही प्रकारे चलनात वापरता येऊ न शकणार्‍या नोटा मात्र थेट रिझर्व्ह बॅँकेतच द्याव्या लागतात.
> केवळ ‘त्या’ बॅँकेच्या खातेदारालाच नव्हे, तर खातेदार नसलेल्या कुठल्याही नागरिकाला कुठल्याही बॅँकेतून आपली नोट बदलून मिळू शकते. 
> दोन तुकडे झालेल्या आणि नोटेवर क्रमांक नसलेल्या नोटाही बदलून मिळू शकतात, मात्र त्या किती प्रमाणात चांगल्या आहेत त्यानुसार त्यांची किंमत मिळते.

फाटक्या नोटांवर बंदी नाही; परंतु आपल्या नोटांची काळजीही घ्यावी. कोणीही त्यावर लिहू नये. खुद्द बॅँक कर्मचारीही नोटांवर लिहित असल्याचं अनुभवास आलं आहे. त्यांनीही विशेष काळजी घ्यावी.- अल्पना किलावाला, प्रिन्सिपल चीफ जनरल मॅनेजर, रिझर्व्ह बॅँक

नोटांवर काही लिहिलेले असले तरी त्या चलनात राहतील आणि बॅँकांनीही त्या स्वीकारणं बंधनकारक आहे. आपल्याकडे आलेल्या खराब नोटा बॅँका मात्र पुन्हा चलनात आणणार नाहीत. - बाबूलाल बंब, क्षेत्रीय व्यवस्थापक, स्टेट बॅँक, नाशिक

=======================================
From Editor's desk

If you have any article, story, or poem in Hindi, english or Marathi, which you want to share. Please email us with that information with your photo. Our email address is: swapnwel@rediffmail.com
We'll PUBLISH this blog with your name and photo
. Thanks!

माझे नवीन लेखन

खरा सुखी

 समाधान पैशावर अवलंबून नसतं, सुख पैशानं मोजता येत नसतं. पण, सुखासमाधानानं जगण्यासाठी पैशांची गरज पडत असतेच. फक्त ते पैसे किती असावेत ते आपल्...