Sunday, July 20, 2014

मराठा, मुसलमान मेळवावा

       स्वातंत्र्यापासून ज्या वर्गाच्या हाती सत्तेच्या राजकीय आणि आर्थिक चाव्या आहेत त्या वर्गाला स्वत:चा समावेश राखीव वर्गात व्हावा असे वाटत असेल तर यापेक्षा अधिक दुर्दैव ते कोणते? ही अशी अवस्था जेव्हा निर्माण होते तेव्हा ते त्या समाजाच्या राजकीय अपयशाचे निदर्शक असते.
            राखीव जागा आणि/किंवा कर्जमाफी केल्याखेरीज मतांची बेगमी होत नाही हे काही काँग्रेसच्या डोक्यातून अजूनही जाता जात नाही. वास्तविक निवडणुकीत इतके फटके।खाल्ल्यानंतरही आपले जुने समज काढून टाकण्याची गरज अद्यापही काँग्रेसला वाटत नसेल तर ते।त्या पक्षाच्या आंधळ्या नेतृत्वाचे निदर्शक म्हणावे लागेल. राजकीय यशाचा सोपा मार्ग राखीव जागांच्या अंगणातून जातो, असे तो पक्ष अजूनही मानतो. राष्ट्रवादी ही त्याच।पक्षाची राज्यस्तरीय पोटशाखा. त्यामुळे काँग्रेसच्या रक्तातील गुणदोष त्या पक्षातही उतरणे साहजिकच. अशा या काँग्रेस आणि राष्ट्रवादीने मराठा आणि मुसलमानांसाठी राखीव जागा जाहीर करून आपले मागासपण सिद्ध केले आहे. राजकीयदृष्टय़ा समर्थ अशा मराठा समाजास राखीव जागांच्या पंखांखाली घेताना काँग्रेस-राष्ट्रवादीने महाराष्ट्रातील मुसलमानांनाही राखीव जागांचे मधाचे बोट चाटवायचा प्रयत्न केला आहे.
            नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकांत काँग्रेस पक्ष केंद्रात आणि राजस्थान आदी राज्यांत सत्तेवर होता. त्या निवडणुकांत तेथील गुजर आणि अन्य समाजघटकांना राखीव जागांचा मोह दाखवत चुचकारण्याचा प्रयत्न सत्ताधारी काँग्रेसने केला. परंतु त्यामुळे मतदार जराही हुरळून गेले नाहीत. त्यांनी काँग्रेसला अनेक राज्यांत अक्षरश: कचऱ्याच्या डब्यात टाकले. महाराष्ट्र सरकारने यातून काहीही धडा घेतलेला नाही, असे दिसते. तसा तो घेतला असता तर या सरकारने मराठा आणि मुसलमानांसाठी स्वतंत्र राखीव जागा ठेवण्याचा निर्णय घेतला नसता. विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर घेतल्या गेलेल्या या निर्णयाचा फोलपणा दाखवून देणे त्यामुळे आवश्यक ठरते.
          ज्या मराठा समाजास राखीव जागा देण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीने जिवाचा आटापिटा चालवला होता त्याच मराठा समाजाच्या मराठा महासंघ या आद्य संघटनेने।बरोबर ३२ वर्षांपूर्वी, म्हणजे १९८२ साली, जातींवर आधारित राखीव जागांच्या संकल्पनेस ठाम विरोध दर्शवला होता, याची आठवण या प्रसंगी करून द्यावयास हवी. मराठा महासंघाचे अण्णासाहेब पाटील यांचा जातिआधारित राखीव जागांना विरोध होता. त्याचे कारण अर्थातच राजकीय होते. मराठा महासंघाचा दलितांना विरोध असल्यामुळे व्यापक दलितविरोधी भूमिकेचा भाग म्हणून जातिआधारित राखीव जागा नकोत असे त्यांचे मत होते. राखीव जागांमुळे दलितांना सत्तेत वाटेकरी करावे लागते आणि एकंदरच सत्तासंतुलन बिघडते हा विचार त्यामागे असावा. त्यामुळे राखीव जागा या आर्थिक निकषांवर दिल्या जाव्यात असे ते म्हणत. परंतु नंतर या राखीव जागांच्या व्यवस्थेचा लाभ मिळावा यासाठी संपूर्ण मराठा समाजालाच मागास जाहीर करावे अशीही मागणी पुढे येऊ लागली.
            राज्याच्या लोकसंख्येत तब्बल ३२ टक्क्यांच्या आसपास असणाऱ्या, अनेक आर्थिक, सामाजिक संस्था चालवणाऱ्या मराठा समाजास मागास ठरवणे हे अन्य मागासांवर अन्याय करणारे ठरले असते. तसे न करण्याएवढे शहाणपण सुदैवाने राज्यकर्त्यांकडे शाबूत होते. वास्तविक ज्या समाजाचा राज्यातील सत्तेत सिंहाचा वाटा आहे, त्या समाजाला स्वत:ला मागास म्हणवून घ्यायची तहान लागत असेल तर ते काही निरोगी व्यवस्थेचे लक्षण मानता येणार नाही. ग्रामीण महाराष्ट्र असो वा नागरी, मराठा समाजाचे स्थान कायमच लक्षणीय राहिलेले आहे. गेल्या चार दशकांत राज्य विधानसभेत २४३० सदस्य होऊन गेले. त्यापैकी तब्बल १३३६ इतके मराठाच होते. हे प्रमाण ५५ टक्के इतके भरते. याचा अर्थ राज्यातील निम्म्यापेक्षा अधिक आमदार एकाच समाजाचे असतात. तो समाज म्हणजे मराठा. राज्यातील सर्वच्या सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, सहकारी संस्था, दुग्ध व्यवसाय आदी अनेक महत्त्वाच्या ठिकाणी प्राबल्य आहे ते मराठा समाजाचेच. तरीही तो समाज स्वत:स मागास समजत असेल तर हे असे समजणे हे त्या समाजाच्या मानसिक मागासपणाचे लक्षण मानावयास हवे. या निष्कर्षांप्रत येण्याचे आणखी एक कारण म्हणजे आपणास राखीव जागा मिळाव्यात यासाठी या पक्षाने गेले कित्येक दिवस जंग जंग पछाडले आहे. कुणबी ही मराठय़ांतील एक उपशाखा. तिचा समावेश मराठय़ांतील मागासांत होतो. हे पाहून कुणबी मराठा ही एक नवीन एक जात महाराष्ट्रात जन्माला घातली गेली. असे केल्याने आपोआप आपणास राखीव जागांचा लाभ मिळेल अशी ही अटकळ होती. पण ती फोल ठरली. कारण तसे करावयाचे तर अन्य मागासांच्या राखीव घासांतील वाटा घ्यावा लागला असता. तसे करणे म्हणजे नवीनच मोहोळ उठवून देण्यासारखे. 
         १९९३ साली स्थापन केल्या गेलेल्या न्या. आर. एम. बापट यांच्या अध्यक्षतेखालील राज्य मागासवर्ग आयोगाने असा प्रयत्न हाणून पाडला होता. खेरीज, तसे झाले असते तर सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेली ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडली जाण्याचा धोका होता. तेव्हा असे होऊ नये म्हणून महाराष्ट्र सरकारने या दोन्ही अडथळ्यांना वळसा घालत मराठय़ांना राखीव जागांची सवलत कशी देता येईल याची पाहणी करण्यासाठी नारायण राणे यांची समिती नेमली होती. बुधवारी राखीव जागांची घोषणा झाली ती याच राणे समितीच्या अहवालावर आधारित. तीनुसार सर्वोच्च न्यायालयाच्या र्निबधांना हात न लावता स्वतंत्रपणे शैक्षणिक व सामाजिक मागास हा नवाप्रवर्ग निर्माण करण्यात आला असून या नव्या वर्गवारीनुसार मराठा आणि मुसलमानांना राखीव जागांची सवलत दिली जाणार आहे. याचा अर्थ हा की सर्वोच्च न्यायालयाच्या र्निबधानुसार वेगवेगळ्या वर्गासाठी ५० टक्के राखीव जागा राहणारच आहेत. त्याखेरीज हा नवा घटक तयार करण्यात आला असून त्यामुळे सर्व राखीव जागांचे प्रमाण ७३ टक्के इतके होणार आहे. महाराष्ट्रासारख्या राज्याला हे शोभणारे नाही. स्वातंत्र्यापासून ज्या वर्गाच्या हाती सत्तेच्या राजकीय आणि आर्थिक चाव्या आहेत त्या वर्गाला स्वत:चा समावेश राखीव वर्गात व्हावा असे वाटत असेल तर यापेक्षा अधिक दुर्दैव ते कोणते? ही अशी अवस्था जेव्हा निर्माण होते तेव्हा ते त्या समाजाच्या राजकीय अपयशाचे निदर्शक असते. यामागील एक कारण आर्थिक आहे. राज्यातील मराठा समाजातील एक मोठा घटक हा अजूनही कृषी क्षेत्राशी निगडित आहे. तो कुणबी या नावाने ओळखला जातो. परंतु सर्वसामान्य मराठय़ास कुणबी म्हटलेले आवडत नाही. शेतीच्या घसरत्या टक्क्यामुळे हा वर्ग गेली काही वर्षे संकटात येत आहे. महाराष्ट्रात मुळात शेतीसाठी ओलिताखालच्या जमिनीचे प्रमाणच कमी. त्यात शेतीची सरासरी मालकीही घटत चाललेली. म्हणजे शेती नुकसानीत चाललेली, सहकार चळवळ बाराच्या भावात निघालेली आणि अन्य उद्योगधंद्यांच्या कौशल्याचा अभाव. यामुळे हा वर्ग मोठय़ा विवंचनेत होता. त्या सोडवण्याचा सोपा मार्ग म्हणून या राखीव जागांकडे पाहिले जाते. अशा परिस्थितीत सरकारी नोकऱ्या वा शिक्षणात आपणास विशेष संधी मिळावी असा त्या वर्गाचा आग्रह होता. ती या राखीव जागांमुळे मिळेल असे या वर्गास आणि त्यापेक्षा त्यांचे नेतृत्व करणाऱ्यांस वाटते. पण तेथेही फसवणूकच होण्याची शक्यता अधिक. याचे कारण असे की मुळात राज्य सरकारची तिजोरीच खपाटीला गेलेली असल्याने सरकार आता रोजगारसंधी उपलब्ध करू न देऊ शकत नाही. तेव्हा ही राखीव जागांची घोषणा म्हणजे आपली अकार्यक्षमता लपवण्यासाठी नेतृत्वाने केलेली निव्वळ धूळफेक आहे. ती निवडणुकीच्या निमित्ताने करण्यात आली आहे. परंतु या मराठा, मुसलमान मेळवावा धोरणाने काहीही साध्य होणार नाही. ना राजकीय फायदा ना त्या समाजांची प्रगती
.==============================================
From Editor's desk
जर तुमच्याकडे Hindi, english, किंवा marathi भाषेमध्ये काही article, स्टोरी, किंवा कविता असेल व जी तुम्हाला आमच्या सोबत share करायची आहे. तर कृपया ती माहिती आपल्या फोटोसोबत (फोटो नसला तरी चालेल) आम्हाला E-mail करा. आमचा email Id आहे : swapnwel@rediffmail.com    
       
आम्ही त्याला तुमच्या नाव व फोटोसहित या ब्लॉग वर PUBLISH करु.

तर मग आपले लेखन आम्हाला पाठवत आहात ना?आम्ही वाट पाहत आहोत. आम्ही सभ्य भाषेतील सर्व प्रतिसाद व लेखन या ब्लॉगवर प्रकाशित करतो प्रकाशित करतो.
. Thanks !

मराठा-राष्ट्रातील महादलित

तुह्या पोटात दुखत
अशिन
त आरक्षण तुले घे
तुह्यी जात मले दे
अन् माहि तुले घे
पोटाले पालू बांधून
उपाशी राहून पाह्य
दोन-चार दिवस बाबू
झोपडपट्टीत जाऊन पाह्य
आमच्यावानी डोक्श्यावर
आंबेडकर-फुले घे
तुह्यी जात मले दे
अन् माहि तुले घे
राज्य सरकारने अलीकडेच
मराठा समाजाला मागास ठरवून आरक्षण
देण्याचा निर्णय घेतल्याच्या पार्श्वभूमीवर
कवी आ. कि. सोनोने
यांची ही कविता मोजक्या शब्दांत खूप
काही सांगणारी. जागतिक कीर्तीचे राजकीय
विचारवंत ख्रिस्तोफ जेफरलॉट यांनी महाराष्ट्र
आता मराठा राष्ट्र होण्याच्या मार्गावर
असल्याचा इशारा दिला होता.
बहुमताच्या बळावर एखादा समाज
वा त्या समाजाचे नेते किती मनमानी करू
शकतात, त्याचे उदाहरण
मराठा आरक्षणाचा निर्णय म्हणता येईल.
सुमारे चार वर्षे सखोल अभ्यास करून व प्रत्यक्ष
पाहणी दौरे करून न्या. रमेश बापट
यांच्या नेतृत्वातील राज्य मागासवर्ग आयोगाने
मराठा समाजाचा समावेश इतर मागासवर्गात
करता येणार नाही, असा स्पष्ट अहवाल 25 जुलै
2008 रोजी दिला. न्या. बापट आयोगाने एकूण
11 समाजशास्त्रीय निकष लावून
मराठा समाजाला मागास मानण्यास नकार
दिला.
राज्य मागासवर्ग आयोगाच्या 2005
च्या कायद्यातील 9(2) या कलमानुसार
या आयोगाने
दिलेला सल्ला किंवा केलेली शिफारस राज्य
शासनावर सामान्यत: बंधनकारक असते. मात्र
तरीही राज्याच्या मंत्रिमंडळात
असलेल्या मराठा नेत्यांनी ठरवून राणे
समितीचा फार्स केला. या समितीवर 10 कोटी रु.
खर्चून आपल्याला हवा तसा अहवाल मिळवला.
गेल्या दोन वर्षांपूर्वी संसदीय कामकाज
मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा शासकीय
बंगला मराठा समाजातील महिलांनी ताब्यात
घेतला. यावरून खूप गहजब झाला. मात्र पाटील
अगदी निश्चिंत होते, सारे काही ठरवून
झाल्याप्रमाणे. मंत्रालयासमोर
असलेला मंत्र्याचा बंगला काही नि:शस्त्र
महिला येऊन ताब्यात घेऊ शकत नाहीत.
एरवी मंत्रालयासमोर निदर्शने करणार्या गरीब,
वंचित महिला-पुरुषांना बेदम मारहाण
करणार्या वा त्यांच्याविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल
करणार्या या सरकारने या महिलांना आर्जवे करून
घरातून बाहेर काढले आणि त्या महिला आहेत असे
सांगून त्यांच्याविरुद्ध कोणताही गुन्हा दाखल
केला नाही. मनुष्यवधाचा गंभीर आरोप
असूनही आणि अनेक दिवस तुरुंगात
घालवूनही पद्मसिंह पाटील यांना अत्यंत
सन्मानाने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वागवले जाते
आणि हरणाची शिकार केल्याचा आरोप
झालेल्या आणि हजारो वर्षे ज्यांचे पूर्वज
जंगलातच राहिले
त्या धर्मरावबाबा आत्रामांना मात्र वाळीत
टाकले जाते. दलितांवर अत्याचार करणारे,
सहकारी बँका वा साखर कारखाने लुटणारे
पांढरपेशे दरोडेखोर, गंभीर गुन्हे करणारे, शासनात
भ्रष्टाचार करणारे किंवा राजकारणात सतत
निष्ठा बदलणारे जर मराठा समाजाचे असतील तर
त्यांच्याबाबत मात्र बोटेचेपी मवाळ
भूमिका आणि या वर्गाच्या आर्थिक, राजकीय
सत्तेला आव्हान देणार्यांविरोधात
राष्ट्रद्रोहासारखे गंभीर गुन्हे इतक्या टोकाचे
वर्तन सध्या सत्ताधीश मराठे करू लागल्याने हे
राज्य आता मराठा राष्ट्र झाले आहे, हे
म्हणण्यावाचून पर्याय
नाही आणि या मराठा राष्ट्रात केवळ मूठभर
मराठे घराण्यांसाठीच सत्ता राबविली जातेय.
नोव्हेंबर 1994 ला शरद पवार हे राज्याचे
मुख्यमंत्री असताना नागपूर येथील
हिवाळी अधिवेशनावर गोवारी समाजाने
मोर्चा काढला. आपला समावेश अनुसूचित
जमातीत व्हावा, अशी त्यांची मागणी होती.
या मोर्चाला सामोरे जाण्याऐवजी पवार
सरकारने त्यांच्यावर लाठीचार्ज
केला आणि यामुळे झालेल्या चेंगराचेंगरीत 110
गोवारी आंदोलक महिला, मुले व पुरुष मारले गेले.
यानंतर पवारांनी विशेष मागास प्रवर्ग
नावाचा एक नवा मागास वर्ग निर्माण
केला आणि या वर्गाला 2 टक्के आरक्षण
देण्यात आले. ओबीसीत असलेल्या अन्य
जातींपेक्षाही ज्या जाती खूप मागास आहेत
आणि ज्यांचा समावेश लगेच एससी,
वा एसटी या वर्गात करणे शक्य नाही,
अशा ओबीसीतील गोवारी, साळी, पद्मशाली,
कोष्टी, कोळी अशा जातींचा समावेश यात
करण्यात आला. राज्यातील
सत्ताधार्यांनी यापूर्वी वंजारा वा धनगर
अशा एकेकट्या जातींना दोन टक्क्यांच्या वर
आरक्षण दिली आहेत.
या दोन्ही जातींपेक्षा कितीतरी मागास
असलेल्या 40 जातींना 2 टक्क्यात कोंबण्यात
आले. या आरक्षणामुळे राज्यात
आरक्षणाची मर्यादा 50
टक्क्यांनी ओलांडली गेली.
या आरक्षणाला न्यायालयात आव्हान दिले गेले
आणि न्यायालयाने शैक्षणिक
प्रवेशाला स्थगिती दिली. 2007 पर्यंत उच्च
शिक्षण आणि 2010 पर्यंत वैद्यकीय शिक्षण
क्षेत्रातील प्रवेशांना ही स्थगिती होती.
त्यामुळे 1995 मध्ये विशेष मागास प्रवर्गाचे
आरक्षण मिळूनही या समाजाला केवळ
नोकर्यांमध्ये आरक्षण मिळत होते. मात्र
शैक्षणिक प्रवेशावरील स्थगिती हटून अनुक्रमे
सात वा चार वर्षे होऊनही अद्याप राज्य
सरकारने आपल्या कागदपत्रात
या आरक्षणाला न्यायालयीन
स्थगिती असल्याचा उल्लेख हेतुपुरस्सरपणे ठेवून
या अतिमागास जातींना आरक्षणच नाकारले. हे
आरक्षण अमलात यावे यासाठी विशेष
मागासवर्गीयांचे नेते सुरेश पद्मशाली हे
गेल्या 15 वर्षांपासून संघर्ष करत आहेत. अनेक
उपोषणे वा आंदोलने त्यांनी केली. मात्र या 40
जातींची लोकसंख्या अन्य जातींच्या तुलनेत खूप
कमी आणि विखुरलेली असल्याने राज्यातील
मराठा नेतृत्व त्यांना कवडीचीही किंमत
द्यायला तयार नाही.
कैलाश गोरंट्यालसारखे जालना जिल्ह्यातील
पद्मशाली समाजाचे आमदार
या वर्गाच्या पाठीशी खंबीरपणे यासाठी उभे
राहायला तयार नाहीत. कारण
त्यांना भीती वाटते की, असे केल्यास
मराठा समाज नाराज होईल. सोलापूर जिल्ह्यात
हा समाज मोठ्या प्रमाणावर असला तरी आणि
नरसय्या आडाम हे स्वत: पद्मशाली असले
तरी कम्युनिस्ट विचारधारेत
जातीच्या आंदोलनांना आम्ही फारसे महत्त्व देत
नाही, असे म्हणत त्यांनीही हात झटकले. त्यामुळे
आजही ओबीसींसाठीच्या अभियांत्रिकीतील
जागा उरल्या (या जागा कोणत्या महाविद्यालयांमध्ये
उरत असतील याचा अंदाज आपण करू शकतो)
तरच एसबीसींना प्रवेश मिळतो. त्यामुळे
ओबीसींपेक्षाही मागासलेले असून या 40
जातींना खुल्या प्रवर्गात
स्पर्धा करावी लागतेय
आणि शिक्षणासाठी मिळणारी शिष्यवृत्ती वा फीमाफी हे
लाभही त्यांना नाकारले जात आहेत. हे
लिहिण्याचा उद्देश एवढाच की, केवळ
मर्यादेपेक्षा 2 टक्के आरक्षण जादा दिल्यावर
ही स्थिती झाली असेल तर मराठ्यांना 16 व
मुस्लिमांना 5 टक्के आरक्षण दिल्याने
या समाजाला हे आरक्षण प्रत्यक्ष मिळेल,
अशी शक्यता जवळपास नाहीच. ओबीसीत 346
जातींना 19 टक्के तर अनूसूचित जाती (दलित)
प्रवर्गातील 59 जातींना 13 टक्के आरक्षण
आहे. राज्यात पाचशे प्रमुख जाती आहेत,
त्यातील किमान 400 जाती ओबीसी व एससीत
येतात.
या दोन्हींचे एकत्रित 32 टक्के आरक्षण
विचारात घेतले तर राज्यात 80 टक्के
लोकसंख्या असलेल्या सुमारे 400
जातींना केवळ 0.08 टक्के आरक्षण आणि राणे
समितीच्या दाव्यानुसार 32 टक्के
लोकसंख्या असलेल्या एकाच जातीला तब्बल 16
टक्के आरक्षण देऊन या सरकारने
राज्याची सत्ता कुणाच्या हितासाठी वापरली जातेय,
हे दाखवून दिलेय. दलितांच्या 13
टक्क्यांपेक्षाही मराठ्यांना जादा आरक्षण
मिळाल्याने मराठे हे दलितांपेक्षाही मागासलेले
असल्याचे राज्य सरकारला वाटते, असा अर्थ
काढायला हरकत नाही. त्यामुळे
बिहारच्या धर्तीवर आता मराठ्यांना महादलित
आणि पृथ्वीराज चव्हाणांना महाराष्ट्राचे
जितनराम मांझी म्हणायलाही हरकत नसावी !
संदर्भ-
1) मराठा आरक्षण -भूमिका व वास्तव- संपादक
- व्यंकटेश पाटील
2) मराठा ओबीसीकरण- संपादक - अशोक
बुद्धिवंत
प्रमोद चुंचूवार
पोलिटिकल ब्युरो हेड, दिव्य मराठी

माझे नवीन लेखन

खरा सुखी

 समाधान पैशावर अवलंबून नसतं, सुख पैशानं मोजता येत नसतं. पण, सुखासमाधानानं जगण्यासाठी पैशांची गरज पडत असतेच. फक्त ते पैसे किती असावेत ते आपल्...