Sunday, August 10, 2014

‘साथी’ हाथ बढाना..

बर्ड फ्लू, स्वाईन फ्लू विस्मृतीत गेल्यानंतर
आता चर्चा सुरू झाली आहे
ती एबोला या आजाराची. चार
आफ्रिकी देशांत त्याचा फैलाव झाल्याचं
नक्की झालंय. या ठिकाणी मोठय़ा संख्येने
भारतीय असल्याने
आपल्यालाही काळजी घेण्याची सूचना अमेरिकेच्या पुढाकाराने
अनेकांनी केली आहे.
अशा आजारांच्या नवनव्या लाटा येतच
असतात. त्यातून एखाद्या
नव्या औषधाचा बोलबाला होईलही कदाचित..
बलाढय़ औषध कंपन्यांचे भले
करण्यासाठी !
आफ्रिकेतल्या तीन-चार देशांत
आता मोठय़ा प्रमाणावर माकडं, डुकरं
यांची कत्तल होईल.
एबोला नावाचा नवा आजार आलाय
ना आता. जवळपास हजार जण गेलेत
त्या साथीत. माकडं, डुकरं हे
या आजाराचे सर्वात मोठे विषाणूवाहक
असतात, पण एकदा का ते
माणसाच्या शरीरात शिरले की मग ते
शारीरिक संबंध, रक्त यांच्यातूनच
एकमेकांत पसरतात. एखाद्याच्या शरीरात
ते शिरले की लगेच तो आजार होतोच असं
नाही. साधारण दहा-
पंधरा दिवसांनी आजाराची लक्षणं दिसू
लागतात. साधीच असतात तशी ती. ताप.
अंगदुखी. अन्नावरची वासना जाणं.
कधी कधी उलटय़ा आणि फारच
तो बळावला तर थेट रक्ताच्याच उलटय़ा.
अगदी मग डोळय़ा-नाकातनंदेखील
रक्तस्राव. या आजाराची पंचाईत
अशी की सुरुवातीला त्याची सगळी लक्षणं
ही साधा हिवताप, पटकी वगैरेसारखीच
असतात. त्यामुळे या आजारापर्यंत
पोहोचण्यासाठी पहिल्यांदा इतर आजार
नाहीत ना.. हे नक्की करावं लागतं
आणि पंचाईत ही की हा आजार आहे हे
सिद्ध झालं तरी त्यावर म्हणून असा खास
काहीच उपाय नाही. सारखं
लिंबूपाणी पाजायचं,
या रुग्णाला इतरांपासून वेगळं ठेवायचं,
आराम करायला लावायचा.. इतकंच
आणि या रुग्णावर करायचे
नवनव्या औषधांचे प्रयोग.
चार आफ्रिकी देशांत त्याचा फैलाव
झाल्याचं नक्की झालंय. सिएरा लिओन,
लायबेरिया, पापुआ न्यू
गिनी आणि नायजेरिया. या देशांत
तो प्रामुख्यानं पसरलाय. या चार देशांत
मिळून जवळपास ४५ हजार भारतीय आहेत.
त्यामुळे
भारतानंही काळजी घ्यायला हवी असं
जागतिक आरोग्य संघटनेपासून अनेक
देशांनी बजावलंय. अमेरिका विशेष
आघाडीवर आहे हे धोक्याचे इशारे
देण्यात. साहजिकच आहे ते..
बरोबर नऊ वर्षांपूर्वी, म्हणजे २००५
साली, अमेरिकेचे तेव्हाचे थोरथोर अध्यक्ष
जॉर्ज बुश यांनी असंच
एका आजाराच्या साथीचं भाकीत वर्तवलं
होतं. २००१ सालचं ९/११ घडल्यानंतर बुश
यांना नाही म्हटलं तरी खर्च
करायची सवय झालीच होती. ९/११ नंतर
अफगाणिस्तानवर हल्ला. २००३
साली मार्च महिन्यात
इराकच्या सद्दामविरोधात चढाई.
अमेरिकेने आपली तिजोरी खुलीच
केली होती या सगळय़ासाठी आणि त्यानंतर
२००५ साली या नव्या आजार
प्रतिबंधाचा खर्च. किती रक्कम मंजूर
केली होती बुश
यांनी या नव्या आजाराच्या मुकाबल्यासाठी?
तब्बल ७१० कोटी डॉलर. खरं तर
हा आजारही तसा काही विशेष नव्हता.
ताप वगैरे नेहमीचंच.
आता एबोलाची लक्षणं आहेत तशीच
त्याचीही. फरक इतकाच
की एबोला माकडं, डुकरं यांच्यामार्फत
पसरतो. तर
त्या वेळच्या आजाराला पसरण्यासाठी कोंबडय़ा,
बदकं यांची गरज लागायची. या आजारानं
जगात हजारो जणं दगावतील
अशी भीती त्या वेळी अनेकांनी व्यक्त
केली होती. त्यामुळे रोखायलाच
हवा त्याचा प्रसार. ती ताकद
अमेरिकावगळता दुसऱ्या कोणाकडे
कशी काय असणार?
जगातल्या एकमेव महासत्तेचे प्रमुख म्हणून
जगाच्या आरोग्याची काळजीदेखील
अमेरिकी अध्यक्षांना वाहायची असते.
त्यामुळे
त्यांनी या आजाराला रोखणारी लस
तयार करायचा आदेश दिला.
एकच कंपनी तर होती या आजारावरचं
औषध बनवणारी. जिलाद लाइफ सायन्सेस
नावाची. फार काही काम नव्हतं
तिला २००५ सालापर्यंत. २००४
सालातली तिची एकूण उलाढाल
होती पंचवीसेक
कोटी डॉलरच्या आसपास.
या कंपनीच्या औषधाचं नाव टॅमी फ्लू. हे
एकच उत्पादन होतं या कंपनीचं. पण २००४
सालापर्यंत त्याला काही उठावच नव्हता.
कारण ते औषध लागू पडेल असा आजारच
नव्हता. मग कंपनीला हवा तो आजार
आला. त्याचं नाव बर्ड फ्लू. बुश
यांना दृष्टान्त झाल्यानुसार २००५
साली या कंपनीचं औषध घ्यावं लागेल
असा बर्ड फ्लू चांगलाच पसरला.
शेवटी महासत्ता प्रमुखाची इच्छा नियतीलादेखील
मानावीच लागते ना. मग
टॅमी फ्लूची मागणी इतकी वाढली,
इतकी वाढली की कंपनीला दिवसरात्र
काम करावं लागलं. साहजिकच
नफा धो धो मिळायला लागला.
त्या एकाच वर्षांत कंपनीचा महसूल चार
पटींनी वाढून १००
कोटी डॉलरचा टप्पा पार करून गेला.
तेव्हा अर्थातच
या कंपनीच्या संचालकांनीही बक्कळ
डॉलर कमावले.
या संचालकांचा म्होरक्या म्हणजे
अमेरिकेचे संरक्षणमंत्री डोनाल्ड
रम्सफेल्ड. बुश यांच्या या विश्वासू
सहकाऱ्याची जिलाद लाइफ सायन्सेसवर
मजबूत पकड होती. १९८८ पासून ते
या कंपनीशी संबंधित होते. पण
या नव्या आजारामुळे फायदा झालेले बुश
यांच्या मंत्रिमंडळातले ते काही एकटेच
मंत्री नव्हते. जॉर्ज शुल्ट्झ यांचं नाव
आठवतंय? अमेरिकेचे माजी परराष्ट्रमंत्री.
त्यांचीही मालकी होती या कंपनीत.
झालंच तर कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर पीट
विल्सन यांचाही वाटा होता त्यात.
तेव्हा इतका मोठा आजार यायला,
या कंपनीच्या उत्पादनाला प्रचंड
मागणी यायला आणि या सगळय़ांच्या नफ्यात
घसघशीत वाढ व्हायला.. हे सगळं एकाच
वेळी झालं. तो योगायोगच म्हणायचा.
मोठय़ांचे योगायोगही मोठेच असतात.
आपल्याकडे
नाही का सोनिया गांधी यांच्या जावयालाच
बरोबर एखादी कंपनी भूखंडच्या भूखंड
देते. तसंच हे. हे असं होतच असतं.
या एका आजारातनं रम्सफेल्ड
यांनी एकटय़ानी तब्बल अडीच
कोटी डॉलर कमावले. झालंच तर शुल्ट्झ
यांची कमाई होती ७० लाख डॉलर इतकी.
आणखी एक योगायोग यात खूप
महत्त्वाचा आहे. या दोघांनी उत्तम
फायदा कमावून झाल्यावर
या आजाराची तीव्रताही कमी झाली.
तोपर्यंत जगात इतकं भीतीचं वातावरण
होतं की गावोगाव कोंबडी मारली जात
होती, लोकतोंडावर फडकी गुंडाळून वावरू
लागली होती आणि गावोगावच्या औषधाच्या दुकानांतून
टॅमी फ्लूच्या गोळय़ा रग्गड खपत होत्या.
तेव्हा या कंपनीचा जीव फायद्यामुळे
गुदमरायची वेळ आली. भरपेट नफा कमावून
झाल्यावर
या आजाराची भीती संपली आणि आता तर
बर्ड फ्लूला कोणीही घाबरत नाही.
यात आणखी एक बाब महत्त्वाची आहे.
ती कळल्यावर धक्काच बसेल अनेकांना.
बर्ड फ्लू, स्वाइन फ्लू या आजारांवर दिलं
जाणारं टॅमी फ्लू हे औषध कशापासून
बनतं?
बडीशेप. आपल्याकडे जेवणानंतर
मुखशुद्धी म्हणून, पचनाला मदत म्हणून
सर्रास खाल्ली जाते त्या बडीशेपेपासनं हे
औषध बनतं. पण हे अर्थातच
भारतीयांना माहीत नव्हतं. त्यामुळे ते
बिचारे टॅमी फ्लू मिळावं यासाठी रात्र
रात्र रांगा लावत होते आणि कंपनीची धन
करत होते.
यातला पुढचा भाग हा त्याहून
महत्त्वाचा. तो असा की जगात
बडिशेपेच्या शास्त्रशुद्ध लागवडीवर एकाच
कंपनीची जवळपास ९० टक्के
इतकी मालकी आहे. ती कंपनी म्हणजे
रोश. तीच ती औषध
निर्मिती क्षेत्रातली बलाढय़ स्विस
कंपनी. टॅमी फ्लू या औषधावर नंतर तिचीच
मालकी झाली. हे झालं या औषध
कंपनीचं.
पण या नव्या आजाराबाबत एक
योगायोग महत्त्वाचा आहे. तो म्हणजे
बर्ड फ्लू, स्वाइन फ्लू
आणि हा नवा एबोला या तीनही आजारातली बरीचशी लक्षणं
सारखीच आहेत.
तेव्हा समजून घ्यायचं ते हेच
की या अशा आजारांच्या नवनव्या लाटा येतच
असतात. सिव्हिअर अॅक्युट
रेस्पिरेटरी सिंड्रोम म्हणजे सार्स
नावाचा असाच एक आजार
मध्यंतरी आला होता. गंमत
ही की त्याची प्राथमिक लक्षणं ही वर
उल्लेखलेल्या तीनही आजारांसारखीच
होती. तो आला तसाच गेलाही.
जाता जाता अर्थातच औषध कंपन्यांचं
भलं करून गेला.
हे असे आजार आले नाहीत तर
या बिचाऱ्या कंपन्यांना कोण विचारणार?
रस्त्यावरचे खड्डे जसे
कंत्राटदारांच्या पोटापाण्यासाठी आवश्यक
असतात तसंच नवनव्या साथींमुळे
आरोग्याला पडणारे खड्डे या बलाढय़
औषध कंपन्यांच्या आर्थिक
स्वास्थ्यासाठी गरजेचे असतात.
आता काहींना शंका येईल की रस्त्यावरचे
खड्डे पडावेत याची जशी एक
व्यवस्था असते तशीच
अशा वेगवेगळय़ा आजारांच्या साथी याव्यात
अशीपण व्यवस्था असते की काय?
या प्रश्नाचं उत्तर ज्यानं त्यानं समजून
घ्यायचं. म्हणून तर ‘साथी’ हाथ बढाना..
हे औषध कंपन्यांचं आवडतं गाणं असतं.

आमीर खान : पी के फिल्म्चे न्यूड पोस्टर

आमीर जर इतका आदर्श आहे, मूल्यांची कास धरणारा आहे, इतका आमच्या त्याच्यावर विश्वास आहे, तर मग तो या एका दृश्याने अचानक इतका वाईट का ठरवला जातोय, जे त्याच्या तत्त्वांचा आत्यंतिक आदर करतात त्यांचा विश्वास इतका तकलादू कसा?
                 आता चक्क आमीर यू टू? असं विचारणं म्हणजे अत्यंत भाबडेपणाचं आहे. आमीर कुणी संत, महात्मा किंवा युगपुरुष नाही... आमीर खानचं 'पीके' या चित्रपटाच न्यूड पोस्टर प्रकाशित झालं अन् सगळीकडे नुसता गहजब माजला आहे. सध्या जिकडे बघावं तिकडे आमीर खानचं न्यूड पोस्टर आणि त्याचा 'पीके' चित्रपट यांच्याच चर्चेला पेव फुटला आहे.
        कोणी त्याचं कौतुक करतं आहे कोणी त्याला कडाडून विरोध करतं आहे, तर कोणी त्याची खिल्ली उडवीत आहे. वाद निर्माण झाले आहेत. जनहित याचिका दाखल झाली, वकील नेमला गेला, आता म्हणे पोस्टरवर बंदी घातली गेली आहे. हे सगळं बाजारीकरण आहे आणि एकुणात काय तर आम्ही अत्यंत भाबडेपणाने त्यांच्या या डावात फसत गेलो, आणि त्यांची योजना सफल झाली. 
             भारतीय जनमानस आमीरच्या या कृतीनं 'कोण होतास तू, काय झालास तू' असं निराशझालं आहे. पण आमीरच्या या न्यूड पोस्टरच्या निमित्ताने तितकेच महत्त्वाचे अनेक प्रश्नदेखील उपस्थित झाले आहेत. 'पीके' फिल्मचं हे पोस्टर मुळात पोर्तुगीजगायक व्कीम बॅरिरियोसच्या अल्बमवरील कव्हरची सही सही नक्कल आहे. हे चित्र या गायकाने १९७३ मध्ये काढलं होतं. त ेचित्र कॉपी केल्याचा आरोपदेखील आमीरवर आता होत आहे.
       आता प्रश्न पडतो तो या साऱ्याला विरोध करण्याचा. आमीर खानसारखा मूल्य-तत्त्वांची कास धरणारा आदर्श व्यक्ती न्युड पोस्टर देतो म्हणून हा हल्लाबोल. त्याने असे करायला नको होते, मग त्या ठिकाणी दुसऱ्याने असं केलं असतं तर ते आपल्याला चाललं असतं काय? म्हणजे लोकांना न्युडीटीबद्दल फार काही वाटत नाही म्हणजे ते त्यांना मान्य आहे. इतर कोणीही (नट) असं पोस्टरवर झळकलं असतं तर त्याचं फारसं काही वाटलं नसतं, मग हे दुसऱ्या कोणाचं न्युड असणंदेखील आपल्या संस्कृतीला घातक ठरलं नसतं काय, हाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोच.
          आमीर जर इतका आदर्श आहे,
मूल्यांची कास धरणारा आहे, इतका आमच्या त्याच्यावर विश्वास आहे, तर मग तो या एका दृश्याने अचानक इतका वाईट का ठरवला जातोय, त्याला त्याने आजवर निर्माण केलेल्या स्वत:च्या या आदर्श वगैरे
प्रतिमेची चिंता नाही काय? हा आमीर खान आहे म्हणजे निश्चित त्यामागे काहीतरी निराळा उद्देश आहे, कथानक
काय आहे हेही न जाणता हा त्याबद्दलचा विश्वास असा एका क्षणात धुऊन कसा काय निघू शकतो? जे त्याच्या तत्त्वांचा आत्यंतिक आदर करतात त्यांचा विश्वास
इतका तकलादू कसा? म्हणून आपण आमीरबद्दलच बोलू या.
           सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आमीर खान हा एक व्यावसायिक अभिनेता आहे. त्याने त्याच्या आजवरच्या चित्रपटांच्या कारकिर्दीत अनेक वेगवेगळ्या भूमिका केल्या आहेत. 'कयामत से कयामत तक'मधल्या चॉकलेटहिरोनंतर लगेच त्याने 'राख'
नावाच्या चित्रपटात अँग्री मॅनची भूमिका तितक्याच समर्थपणे बजावली. त्यानंतर त्याच्या विविध भूमिकांमुळे लक्षात राहिलेले त्याचे चित्रपट म्हणजे गजनी, धूम-थ्री, तलाश, मंगल पांडे, थ्री इडीयट्स इत्यादी. अशा अनेक चित्रपटांमधून त्याने त्याचे वेगळेपण प्रेक्षकांच्या मनावर अत्यंत प्रभावीपणे ठसवले आहे. तो कधीही एका विशिष्ट इमेजमध्ये अडकलेला नाही. त्यानंतर कलावंताची सामाजिक भूमिका निभावताना तो 'सत्यमेव जयते' या कार्यक्रमातून तर प्रत्येकच संवेदनशील
मनाच्या हृदयस्थानी जाऊन बसला. त्यातील प्रत्येक एपिसोडमधल्या त्याच्या अश्रू गाळण्याचीदेखील चर्चा होऊ लागली.आमीर आज काय तर आरोग्य
मंत्र्यांना भेटला, उद्या काय तरतमक्यांना भेटला, त्याला या सगळ्याच सामाजिक प्रश्नांबद्दल किती कळकळ आहे, हे चित्र प्रसार माध्यमांच्या, सामान्यजनांच्या मनावर अक्षरश: कोरले गेले.
          मग आमीर काय तर पुरस्कारांच्या सोहळ्याना उपस्थित राहात नाही, त्याला असल्या गोष्टींमध्ये रस नाही, त्याला अमकी चिल्लर गोष्ट आवडत नाही...करता करता या आमीर नावाच्या एका अत्यंत कुशल अभिनेत्याची इमेज आमच्या मनात एखाद्या आदर्शवाद्यासारखी अधोरेखित झाली.
'सत्यमेव' हीदेखील त्याची भूमिका होती आणि एक व्यवसायिक अभिनेता म्हणून त्याने त्याच्या प्रमोशनसाठी जीव ओतला.
तेवढ्या काळासाठी स्वत:ची तशी प्रतिमा निर्माण करण्यात तो कमालीचा यशस्वी झाला.
            'सत्यमेव' हा कार्यक्रम आमीर खानचा काही एकट्याचा कार्यक्रम नव्हता. (मुळात हा कार्यक्रमदेखील एका विदेशी कार्यक्रमाची ‌नक्कलच आहे) त्यासाठी एक रिसर्च टीम होती. या निमित्ताने तो वाहिनीच्या टीमसोबत फिरला असेल, त्याने व्यथा टिपल्या असतील. स्वत:ची एक संवेदनशील समाजसेवी म्हणून इमेज बनवण्यासाठी तो त्या- त्या वेळी त्या- त्या व्यासपीठांवरही उपस्थित राहिला.
(संदर्भ अण्णा हजारे) 'सत्यमेव'मध्येदेखील त्याने निवेदकाची एक व्यावसायिक भूमिकाच पार पाडलेली आहे.
          पण आम्ही मात्र त्याला आदर्शवादाच्या चौकटीत बसवीत देव मानून चक्क देव्हाऱ्यातच बसवून टाकलं.
म्हणूनच त्याच्याबद्दलच्या इतक्या दिवसांच्या प्रतिमेला असे क्षणातच तडेदेखील गेले. आता चक्क आमीर यू टू? असं विचारणं म्हणजे अत्यंत भाबडेपणाचं आहे.
             मालिकेत रामाची भूमिका करणाऱ्या नटाला राम समजून पाया पडायचे आणि मग तो सिगारेट पिताना दिसला तर संस्कृती बुडाली म्हणून छाती पिटायची, असंच आहे हे. आमीर कुणी संत, महात्मा किंवा युगपुरुष नाही. विधवा आणि परितक्त्यांच्या संदर्भात 'सत्यमेव'च्या एका भागात अश्रू ढाळणाऱ्या आमीरनंही एक बायको सोडून दुसरी केली आहे. (हे त्याचं अत्यंत
खासगी आयुष्य आहे आणि आम्हाला त्यातदखल देण्याची गरजही नाही.) मात्र
आम्हाला थोडं हटके दिसताच त्याला देवत्व बहाल करण्याची आदीम खोड आहे.
          आता 'पीके' आणि त्याच्या त्या न्यूड (की सेमी न्यूड?)पोस्टरबद्दल...थेटच सवाल हा की एक कुणी आमीर खान नावाचा नट नग्न झाल्यावर संस्कृती धोक्यात कशी येते आणि कथित संस्कृतीरक्षकांच्या अंगावर शहारे वगैरे कसे येतात? त्यामुळे आता घराघरातील तरुण पोरं नागवी होऊन रस्त्याने धावायला लागणार आहेत काय? की समस्त स्त्रियांचा विनयभंग झाला आहे?
मुळात त्या चित्रपटाचं कथानक काय आहे? त्यात हे दृश्य आवश्यक होतं का?
कलात्मकदृष्ट्याही एखादी गोष्ट आवश्यक असू शकते. १५ न्यूड सीन्सच्या चित्रपटांना आजवर ऑस्कर मिळालं आहे. 'मॉन्स्टर' नावाच्या चित्रपटात चार्लीज थेरॉन नावाच्या नटीनं एका वेश्येची भूमिका केली होती. वासनाविकृत गिऱ्हाईकांच्या ओबरडण्यानं सतत घायाळ असणाऱ्या तिला पुरुषांचाच किळस वाटू लागतो आणि मग ती एका तरुण स्त्रीच्या प्रेमात पडते. गिऱ्हाईकी (शी!)नसते तेव्हा ती आपल्या मैत्रिणीच्या बाहुपाशात विवस्त्र पहुडलेली असते...याला ऑस्कर
देण्यात आला होता. प्रश्न 'न्युडीटी'चा नाही; त्यामागच्या भावनेचा आहे. आमीरच्या या चित्रपटात या दृश्याच्या मागचे नेमके संदर्भ काय, हे अद्याप माहिती नाही. हं हे मात्र खरे की आमरने हे पोस्टर आणून फुकटात चर्चा घडवून आणली आहे. मागे सचिन तेंडुलकरने म्हणे ठाण्यातल्या कुठल्यातरी नव्याने स्थापन झालेल्या सहकारी बँकेकडनू २० लाख रुपयांचे कर्ज घेतल्याची बातमी होती आणि ती साऱ्याच वृत्तपत्रांनी आवर्जून छापली होती. सचिनला खरेच २० लाख रुपयांचे कर्ज घ्यावे लागते यावर माझा तरी विश्वास नाही...जाहिराती अशाही असू शकतात. आपण का फसायचं हा सवाल आहे.
        वर्षाअखेरीस १९ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणाऱ्या 'पीके'चं कथानक कॉमेडीच्या अंगानं जाणारं अत्यंत सरळ पण विचारप्रवृत्त करणारं आहे, असं कळतं. त्यात मैत्री आणि शत्रुत्व आहे, पीकेला पडणारे अनेक प्रश्न आहेत...आमीर ज्या 'पीके'ची भूमिका करतो आहे, तो त्याचा एक प्रवास आहे. ती अत्यंत 'इनोसंट' अशी व्यक्ती आहे.
या 'इनोसन्सी'मध्ये तो अनेक मित्र जोडतो, शत्रूंनाही आपलंसं करतो, पण
जीवनाच्या प्रत्येक अंगाकडे पाहण्याचा त्याचा स्वत:चा एक स्वतंत्र आणि हटके विचार आहे. हा विचार तो कोणावर थोपवत नाही, पण तरीही त्याच्या या वेगळ्या विचरांनी आजूबाजूचे लोक प्रभावित होतात. त्यांच्यात परिवर्तन होऊ लागतं. त्याचं हे पोस्टरवरचं न्यूड रूपदेखील असेच काही प्रश्न घेऊन
समाजासमोर येणार असावं. त्याचं असं हे
नागवं रूप पाहून सुरुवातीला बालीश
अशा संस्कृतीरक्षकी थाटाच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
       'पीके'नं हा प्रश्न ‌विचारला असावा की न्यूडीटीबद्दल भारतीय सामजाची भूमिका काय? खरंतर चर्चा झडायच्याच असतील तर न्युडीटीवर झडायला हव्यात.
आता न्युडीटी आणि त्यावरच्या चर्चा नंतर
गंभीरपणे कदाचित 'पीके'च्या निमित्तानं
होतीलही. न्युडीटीचे प्रकार आहेत. खासगी, सार्वजनिक, बाल, शृंगारिक आणि अगदी धार्मिकदेखील. धार्मिक न्युडिटीकडे पूज्य भावाने पाहिले जाते.
त्यावर टीकाच कशाला साधी चर्चा करण्याचीही मोकळीक आपल्या समाजात नाही. तितकी दहशत तर आहेच! 'पीके' त्याच्या चित्रपटात वरवर हसविणारे पण नंतर खूप खोल असे 'दिलही मे खिचती है' थाटाचे प्रश्न विचारतो, असे कळते. 'पीके'च्या पोस्टरच्या निमित्ताने त्यानं हा प्रश्न विचारला असावा की नग्नता पचविण्याइतका तुमचा समाज प्रगल्भ झाला आहे का? आता राहता राहिला बाजारीकरण, बुद्धिवाद्यांची भूमिका आणि नैतिकतेचा सवाल. पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेला जाणार आहेत. त्यासाठी त्यांची वस्त्रसज्जा करण्याचे कंत्राट मनीष मल्होत्रा नामक आघाडीच्या फॅशन डिझायनरला देण्यात आले आहे. का कोण जाणे मला सतत प्रश्न पडतो आहे, अस्सल भारतीय आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक म्हणून त्यांनी भारतीय वेशातच का जाऊ नये? साधेपणा आणि राष्ट्रीयता का जोपासून नये? ही बाजारशरणता नाही का? नैतिकतेच्या पातळीवर या घटनेकडे पाहिले जाऊ शकत नाही का? वस्त्रात लपलेली अनैतिकता आम्ही पचवितो. भीषण म्हणजे आताशा ती पूज्यही मानली जायला लागली आहे. धर्म, देश, जात, पंथ, रीत, रिवाज, परंपरा या साऱ्यांच्या चौकटी मोडून आणि वस्त्रे उतरवून अचानक तुमच्या समोर येणाऱ्या नैतिकतेचा असा भारी चटका लागतो मग. सत्य हे नग्नच असते, त्याला वस्त्रांचंही लांछन लागलेल नसतं म्हणून त्याला नग्नसत्य म्हणण्याचा प्रघात पडला असावा. आम्हाला; सोयीच्या भूमिका घेण्याची सवय लागलेल्यांना नग्नसत्य पचत नाही अन् मग ते त्यावर हल्ले करीत सुटतात. संस्कृती आणि समाजरक्षणाचे
त्याला मुलामेही देतात. आमीरनं नग्न होऊन समाजासमोर एक प्रश्न टाकला असावा, उत्तर देण्याचं धाडस आहे का? की हे सत्यदेखील चिरडूनच टाकायचं आहे?

Saturday, August 2, 2014

सिंधू लिपी कळल्यास इतिहास बदलेल!

पुरातत्त्वशास्त्र आणि साहित्य यांचा जवळचा संबंध कमीच. पण डॉ. मधुकर ढवळीकर यांनी या शास्त्राचा अभ्यास करतानाच त्याचा आधार घेऊन संस्कृती आणि आपल्या परंपरेची माहिती सोप्या शब्दांत मराठीत सांगितली. आर्यांचा शोध असो, की गणेशाचं परदेशातील अस्तित्व असो, त्यांनी दिलेली माहिती थक्क
करणारी होती.
     ‘महाराष्ट्राची कुळकथा’ या पुस्तकात
त्यांनी दिलेला तपशीलवाचल्यावर आपल्या राज्याला असलेला समर्थ
वारसा लक्षात येतो. कोणे एके काळी सिंधू संस्कृती, आर्यांच्या शोधात,
महाराष्ट्राची कुळकथा, श्रीगणेश आशियाचे आराध्य दैवत यासारखी वेगळी पुस्तकं लिहिणारे पुरातत्त्वशास्त्राचे अभ्यासक डॉ. मधुकर ढवळीकर यांच्या लेखणीतून इतिहासात काय घडलं तेच फक्त कळत नाही तर अनेक नव्या गोष्टी उलगडत जातात.
       शास्त्रीय पुरावे देत ढवळीकर जी माहिती देतात त्यामुळं वाचक थक्क होतो. एखाद्या विषयाला वाहून घेऊन काम कसं करायचं याचा आदर्श म्हणून
ढवळीकर यांच्याकडं पाहावं लागेल. पुरातत्त्वशास्त्रातील त्यांच्या योगदानाबद्दल दोन वर्षापूर्वी केंद्र सरकारच्या वतीनं त्यांना गौरवण्यात आलं. भारतातून केवळ
पाच जणांचा गौरव करण्यात आला होता.
त्यात ढवळीकर यांचा समावेश होता.
     आजही ते या विषयावरील व्याख्यानं
आणि विविध संशोधन परिषदांत आपला पेपर सादर करण्यात मग्न असतात. वयाच्या ८४ व्या वर्षी एखाद्या तरुणाला लाजवेल अशा उत्साहानं ते काम करत आहेत. चर्चेला सुरवात झाल्यावर त्यांना विचारलं-
प्रश्न: मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या प्रयत्नांना बळ देईलअसा पुरावा पुरातत्त्वशास्त्राच्या दृष्टीने मिळू शकेल का?
उत्तर :नक्कीच.मराठी भाषेचं मूळ रूप म्हणजेमहाराष्ट्री. त्या वेळच्या प्राकृत भाषेतील काही शिलालेख उपलब्ध आहेत. नाणे घाटात मिळालेला एक मोठा शिलालेख त्या दृष्टीनं खूप महत्त्वाचा आहे. बुद्धाच्या काळात आपल्याकडं तीन भाषा बोलल्या जात. मागधी ही बिहार आणि त्या परिसरात; तर मथुरेच्या परिसरात शूरसेनी भाषा बोलली जात असे. आपल्या महाराष्ट्रात प्राकृत भाषा म्हणजे महाराष्ट्री बोलली जात असे. अनेक कोरीव लेखांत याचे पुरावे मिळतात.

प्रश्न : भाषा महत्त्वाची तशीचलिपीही महत्त्वाची. देवनागरी लिपी किती प्राचीन
आहे?
उत्तर भाषा आणि लिपी या दोन
गोष्टी आहेत. आपल्याकडच्या अनेक लिपी ब्राह्मी लिपीतून पुढे आलेल्या आहेत. मानवाचा विकास जसजसा झाला तशी लिपी विकसित होत गेली. विशेषतः व्यापार आणि राज्यकारभार जसा वाढला तसा लिपीचा जन्म झाला. व्यापार आणि राज्यकारभारात नोंदींची गरज भासते; त्यातूनच लिपीचा जन्म झाला.    आपल्याकडे संस्कृत देवनागरीत लिहितात; दक्षिणेत.त्यांच्या लिपीतही संस्कृत.लेखन आहे.
प्रश्न:  सिंधू लिपी कळत नाही. अशा किती लिपी अज्ञात आहेत?
उत्तर: सिंधू लिपी वाचण्यासाठी अनेकांचे
प्रयत्न सुरू आहेत. मात्र अद्याप ती लिपी वाचण्यात यश आलेलं नाही. सिंधू लिपी वाचण्यात जर यश आलं तर सगळा इतिहासच बदलेल. त्या लिपीत ४०० चिन्हे आहेत..कोणतीही लिपी वाचता कधी येते तर दोन भाषांत त्याचे संदर्भ मिळाले पाहिजेत; मग.त्या लिपीचा अर्थ लावता येतो..मात्र या लिपीचे संदर्भ
मिळत नाहीत.
      या लिपीतीलकाही शिलालेख आणि अन्य साधने खूप लहान आहेत. त्यामुळं ही लिपी समजण्यास अवघड झाली आहे.
अशीच माया लिपी वाचली गेली नव्हती; मात्र नंतर ती लिपी वाचण्यात
अभ्यासकांना यश मिळालं.
प्रश्न.गणेशाच्या भारताबाहेरच्या स्थानांबद्दल.तुम्ही तुमच्या पुस्तकात लिहिलं आहे. त्याचं रूप बाहेर कसं बदलत गेलं?
ऊत्तर गणेशाची भक्ती केवळ भारतात आहे असे नाही. बौद्ध धर्मीयांनी हे दैवत बाहेर नेलं. त्या काळात प्रवास करताना दरोडे आणि लुटालुटीची खूपच भीती होती. त्या वेळी बौद्ध साधकांनी आपल्याबरोबर गणेशाची मूर्ती विघ्ननाशक म्हणून नेली.
प्रारंभी बौद्ध धर्मातील मंडळींनी हे दैवत स्वीकारलं नव्हतं. काही काळानं त्यांनी हे दैवत स्वीकारलं. परदेशात त्याचं
गजरूप कायम राहिलं.काही ठिकाणी त्याची सोंड सरळ आहे.

प्रश्न आज जेवढ्या भाषा आहेत आणि लिपी आहेत तेवढं वैविध्य आपल्याकडं
किती वर्षं आहे?
उत्तर भाषा आणि लिपी हळूहळू बदलत जाते. आर्य या भागात जेव्हा आले तेव्हा इथं द्रविड आणि मुंडा भाषा होत्या.
त्या वेळच्या भाषांना ऑस्ट्रेनेशियन भाषा म्हणत. विविध मानवी समूहांच्या संपर्कातून भाषेत बदल होतात. ऋग्वेदातसुद्धा द्रविड भाषेतून
आलेला ‘ळ’ हा शब्द आहे. मुंडा भाषेतून नांगर हा शब्द संस्कृतमध्ये आला. मुळात
त्या काळातील आर्यांच्या भाषेला संस्कृत न म्हणता वैदिक भाषा म्हणत. पाणिनीने तिच्यावर संस्कार केल्यावर संस्कृत हे नाव पडलं. भाषा लगेच तयार होत नाही.
पन्नास ते साठ हजार वर्षांपूर्वी भाषा तयार झाल्या. त्यापूर्वी लोक केवळ
वेगवेगळे आवाज काढून एकमेकांशी संवाद साधत असत. त्या वेळी मानवाचं
स्वरयंत्रही भाषा बोलण्यासाठी सक्षम
नव्हतं. पुढं मानवाच्या विकासाबरोबरच
स्वरयंत्राचा विकास झाला. मग उत्तर
अश्म युगात भाषा आली, त्यानंतर
लिपी आली.

प्रश्न ‘आर्यांच्या शोधात’ तुमचं पुस्तक आहे. आर्य नेमके कुठून आले?
उत्तर याबद्दल वेगवेगळी मतं आहेत. मात्र या संदर्भात लोकमान्य टिळकांनी त्यांच्या ग्रंथात जी मतं मांडली आहेतती खूप महत्त्वाची आहेत. दुर्दैवानं त्याकडं फारसं
कुणी लक्ष दिलं नाही. पण आर्यांच्या उगमस्थानाबद्दल त्यातून महत्त्वाची माहिती मिळते. आर्यांचा प्रदेश हा सप्तसिंधूचा होता असं मानता येईल.
मुळात त्या काळत अनेक टोळ्याचं
स्थलांतर होत असे. आजच्या काळाची भौगोलिक स्थानांची सीमा त्याला लावणं
चुकीचं आहे. सर्व जगात माणसं स्थलांतरित झाली आहेत.

प्रश्न महाराष्ट्राच्या प्राचीनकालखंडाचा वेध घेतला तर पाण्याची स्थिती नेमकी कशी होती? त्याबाबतीतील आपलं नियोजन चुकतच आहे का?
उत्तर आपण पाण्याच्या बाबतीत एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे आपलं सगळं नियोजन मॉन्सूनवर अवलंबून आहे. महाराष्ट्रात पाण्याची परिस्थिती नेहमीच चांगली होती असं नाही. भारतातच सर्वत्र हा प्रश्न होता. आपल्याकडं दुष्काळ बारा- बारा वर्षं पडला आहे. त्याला दुर्गादेवीचा दुष्काळ
म्हणत. आपल्याकडं दुष्काळामुळं लोकांचे झालेले हाल बाहेरून आलेल्या प्रवाशांच्या लेखनात सापडतात. भारतातील मॉन्सूनच्या वाटचालीबद्दल
एक महत्त्वाचा घागा असा आहे,
की नाईल नदीच्या हालचालीवर
आपल्याकडील मॉन्सून कसा असेल ते ठरतं. तिथं जर नाईल नदी पातळीपेक्षाखाली गेली तर आपल्याकडं पाऊस कमी पडतो. नाईल
नदीला जर पूर आला तर इथं पाऊस चांगला होतो. नाईल नदीच्या नोंदी तीन हजार वर्षांच्या आहेत. इ.पू. ६२० ते इ.स. १५०० पर्यंत म्हणजे नऊशे वर्षांचं हे रेकॉर्ड आहे. त्यावरून आपल्या येथील पावसाबद्दल काही अंदाज काढता येतात. अलेक्झांडर जेव्हा आपल्याकडे आला तेव्हा त्यानं त्या अभ्यासावरच सिंधू नदीला पूर आलेला असेल याचा अंदाज केला होता. भारतात पावसाचा अभ्यास झाला नाही असं नाही. कौटिल्यानं त्या वेळी पाऊस मोजण्याचं तंत्र विकसित केलं होतं. आज राजस्थानमध्ये वाळवंट असलं तरी त्या भागात एके काळी २४ इंच पाऊस पडत होता. पावसाची अनिश्चितता कायम आहे. महाराष्ट्रालाही दुष्काळाच्या समस्येनं ग्रासलं होतंच. सातवाहन राज्याचा कालखंड महाराष्ट्रसाठी सर्वात चांगला होता. तो काळ खऱ्या अर्थानं सुवर्णकाळ होता.

प्रश्न वाङ्मय आणि पुरातत्त्वशास्त्राची सांगड कशी घालता येईल? त्यातून काही साहित्यनिर्मिती झाली आहे का?
उत्तर आपल्याकडं कमी आहे. परदेशात जेम्स मिचेलर यानं ‘सोअर्स’ हे
पुस्तक लिहिलं आहे. बाराशे पानांचं हे पुस्तक वेगळं आहे. त्यात त्यानं ज्यूंचा इतिहास असा दोन्ही पद्धतीनं अभ्यास करून मांडला आहे.

प्रश्न: सध्या कोणत्या प्रकल्पावर काम करत आहात?
उत्तर: मला मिळालेल्या टागोर फेलोशिपच्या अंतर्गत मी जे काम केलं त्यावर आता मुंबईचा सांस्कृतिक वारसा सांगणारं पुस्तक इंग्रजीत येईल. इतके दिवस त्या कामात मी व्यस्त होतो. त्यानंतर ते मराठीतही येईल. याबरोबरच व्याख्यानं सुरू असतात.
         
             इंग्रजीत २७ पुस्तकं, तर मराठीत आठ पुस्तकं आणि अनेक संशोधन परिषदांमध्ये सादर केलेल्या पेपर्सची संख्या लक्षात घेतली तर ढवळीकर यांनी केलेलं काम किती मोठं आहे याची कल्पना येईल. केंद्र सरकारकडून त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे. आजही विविध संशोधन संस्थांत मार्गदर्शन करणाऱ्या ढवळीकर यांनी शिरूरजवळ इनामगावात केलेलं संशोधन वेगळ्या पातळीवरचं आणि देश पातळीवर दखलपात्र होतं.
      पुरातत्त्वशास्त्रातील संशोधनातून त्यांनी खूप मोठ्या काळाची माहिती मराठीत रंजकपणे दिली आहे. इतिहास उभा करणारी ही माहिती केवळ कल्पनाविष्कार नाही, तर तिला सत्याचा आधार आहे.

=============================================================================           जर तुमच्याकडे Hindi, english, किंवा marathi भाषेमध्ये काही article,  स्टोरी, किंवा कविता जी तुम्हाला share करायची आहे. तर कृपया ती माहिती आपल्या फोटोसोबत (फोटो नसला तरी चालेल) आम्हाला email करा  E-mail करा.
        आमचा email Id आहे : rohit.shelake7@gmail.com    आम्ही त्याला तुमच्या नाव व फोटोसहित या ब्लॉग वर PUBLISH करु.
Thanks !

माझे नवीन लेखन

खरा सुखी

 समाधान पैशावर अवलंबून नसतं, सुख पैशानं मोजता येत नसतं. पण, सुखासमाधानानं जगण्यासाठी पैशांची गरज पडत असतेच. फक्त ते पैसे किती असावेत ते आपल्...