पुरातत्त्वशास्त्र आणि साहित्य यांचा जवळचा संबंध कमीच. पण डॉ. मधुकर ढवळीकर यांनी या शास्त्राचा अभ्यास करतानाच त्याचा आधार घेऊन संस्कृती आणि आपल्या परंपरेची माहिती सोप्या शब्दांत मराठीत सांगितली. आर्यांचा शोध असो, की गणेशाचं परदेशातील अस्तित्व असो, त्यांनी दिलेली माहिती थक्क
करणारी होती.
‘महाराष्ट्राची कुळकथा’ या पुस्तकात
त्यांनी दिलेला तपशीलवाचल्यावर आपल्या राज्याला असलेला समर्थ
वारसा लक्षात येतो. कोणे एके काळी सिंधू संस्कृती, आर्यांच्या शोधात,
महाराष्ट्राची कुळकथा, श्रीगणेश आशियाचे आराध्य दैवत यासारखी वेगळी पुस्तकं लिहिणारे पुरातत्त्वशास्त्राचे अभ्यासक डॉ. मधुकर ढवळीकर यांच्या लेखणीतून इतिहासात काय घडलं तेच फक्त कळत नाही तर अनेक नव्या गोष्टी उलगडत जातात.
शास्त्रीय पुरावे देत ढवळीकर जी माहिती देतात त्यामुळं वाचक थक्क होतो. एखाद्या विषयाला वाहून घेऊन काम कसं करायचं याचा आदर्श म्हणून
ढवळीकर यांच्याकडं पाहावं लागेल. पुरातत्त्वशास्त्रातील त्यांच्या योगदानाबद्दल दोन वर्षापूर्वी केंद्र सरकारच्या वतीनं त्यांना गौरवण्यात आलं. भारतातून केवळ
पाच जणांचा गौरव करण्यात आला होता.
त्यात ढवळीकर यांचा समावेश होता.
आजही ते या विषयावरील व्याख्यानं
आणि विविध संशोधन परिषदांत आपला पेपर सादर करण्यात मग्न असतात. वयाच्या ८४ व्या वर्षी एखाद्या तरुणाला लाजवेल अशा उत्साहानं ते काम करत आहेत. चर्चेला सुरवात झाल्यावर त्यांना विचारलं-
प्रश्न: मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या प्रयत्नांना बळ देईलअसा पुरावा पुरातत्त्वशास्त्राच्या दृष्टीने मिळू शकेल का?
उत्तर :नक्कीच.मराठी भाषेचं मूळ रूप म्हणजेमहाराष्ट्री. त्या वेळच्या प्राकृत भाषेतील काही शिलालेख उपलब्ध आहेत. नाणे घाटात मिळालेला एक मोठा शिलालेख त्या दृष्टीनं खूप महत्त्वाचा आहे. बुद्धाच्या काळात आपल्याकडं तीन भाषा बोलल्या जात. मागधी ही बिहार आणि त्या परिसरात; तर मथुरेच्या परिसरात शूरसेनी भाषा बोलली जात असे. आपल्या महाराष्ट्रात प्राकृत भाषा म्हणजे महाराष्ट्री बोलली जात असे. अनेक कोरीव लेखांत याचे पुरावे मिळतात.
प्रश्न : भाषा महत्त्वाची तशीचलिपीही महत्त्वाची. देवनागरी लिपी किती प्राचीन
आहे?
उत्तर भाषा आणि लिपी या दोन
गोष्टी आहेत. आपल्याकडच्या अनेक लिपी ब्राह्मी लिपीतून पुढे आलेल्या आहेत. मानवाचा विकास जसजसा झाला तशी लिपी विकसित होत गेली. विशेषतः व्यापार आणि राज्यकारभार जसा वाढला तसा लिपीचा जन्म झाला. व्यापार आणि राज्यकारभारात नोंदींची गरज भासते; त्यातूनच लिपीचा जन्म झाला. आपल्याकडे संस्कृत देवनागरीत लिहितात; दक्षिणेत.त्यांच्या लिपीतही संस्कृत.लेखन आहे.
प्रश्न: सिंधू लिपी कळत नाही. अशा किती लिपी अज्ञात आहेत?
उत्तर: सिंधू लिपी वाचण्यासाठी अनेकांचे
प्रयत्न सुरू आहेत. मात्र अद्याप ती लिपी वाचण्यात यश आलेलं नाही. सिंधू लिपी वाचण्यात जर यश आलं तर सगळा इतिहासच बदलेल. त्या लिपीत ४०० चिन्हे आहेत..कोणतीही लिपी वाचता कधी येते तर दोन भाषांत त्याचे संदर्भ मिळाले पाहिजेत; मग.त्या लिपीचा अर्थ लावता येतो..मात्र या लिपीचे संदर्भ
मिळत नाहीत.
या लिपीतीलकाही शिलालेख आणि अन्य साधने खूप लहान आहेत. त्यामुळं ही लिपी समजण्यास अवघड झाली आहे.
अशीच माया लिपी वाचली गेली नव्हती; मात्र नंतर ती लिपी वाचण्यात
अभ्यासकांना यश मिळालं.
प्रश्न.गणेशाच्या भारताबाहेरच्या स्थानांबद्दल.तुम्ही तुमच्या पुस्तकात लिहिलं आहे. त्याचं रूप बाहेर कसं बदलत गेलं?
ऊत्तर गणेशाची भक्ती केवळ भारतात आहे असे नाही. बौद्ध धर्मीयांनी हे दैवत बाहेर नेलं. त्या काळात प्रवास करताना दरोडे आणि लुटालुटीची खूपच भीती होती. त्या वेळी बौद्ध साधकांनी आपल्याबरोबर गणेशाची मूर्ती विघ्ननाशक म्हणून नेली.
प्रारंभी बौद्ध धर्मातील मंडळींनी हे दैवत स्वीकारलं नव्हतं. काही काळानं त्यांनी हे दैवत स्वीकारलं. परदेशात त्याचं
गजरूप कायम राहिलं.काही ठिकाणी त्याची सोंड सरळ आहे.
प्रश्न आज जेवढ्या भाषा आहेत आणि लिपी आहेत तेवढं वैविध्य आपल्याकडं
किती वर्षं आहे?
उत्तर भाषा आणि लिपी हळूहळू बदलत जाते. आर्य या भागात जेव्हा आले तेव्हा इथं द्रविड आणि मुंडा भाषा होत्या.
त्या वेळच्या भाषांना ऑस्ट्रेनेशियन भाषा म्हणत. विविध मानवी समूहांच्या संपर्कातून भाषेत बदल होतात. ऋग्वेदातसुद्धा द्रविड भाषेतून
आलेला ‘ळ’ हा शब्द आहे. मुंडा भाषेतून नांगर हा शब्द संस्कृतमध्ये आला. मुळात
त्या काळातील आर्यांच्या भाषेला संस्कृत न म्हणता वैदिक भाषा म्हणत. पाणिनीने तिच्यावर संस्कार केल्यावर संस्कृत हे नाव पडलं. भाषा लगेच तयार होत नाही.
पन्नास ते साठ हजार वर्षांपूर्वी भाषा तयार झाल्या. त्यापूर्वी लोक केवळ
वेगवेगळे आवाज काढून एकमेकांशी संवाद साधत असत. त्या वेळी मानवाचं
स्वरयंत्रही भाषा बोलण्यासाठी सक्षम
नव्हतं. पुढं मानवाच्या विकासाबरोबरच
स्वरयंत्राचा विकास झाला. मग उत्तर
अश्म युगात भाषा आली, त्यानंतर
लिपी आली.
प्रश्न ‘आर्यांच्या शोधात’ तुमचं पुस्तक आहे. आर्य नेमके कुठून आले?
उत्तर याबद्दल वेगवेगळी मतं आहेत. मात्र या संदर्भात लोकमान्य टिळकांनी त्यांच्या ग्रंथात जी मतं मांडली आहेतती खूप महत्त्वाची आहेत. दुर्दैवानं त्याकडं फारसं
कुणी लक्ष दिलं नाही. पण आर्यांच्या उगमस्थानाबद्दल त्यातून महत्त्वाची माहिती मिळते. आर्यांचा प्रदेश हा सप्तसिंधूचा होता असं मानता येईल.
मुळात त्या काळत अनेक टोळ्याचं
स्थलांतर होत असे. आजच्या काळाची भौगोलिक स्थानांची सीमा त्याला लावणं
चुकीचं आहे. सर्व जगात माणसं स्थलांतरित झाली आहेत.
प्रश्न महाराष्ट्राच्या प्राचीनकालखंडाचा वेध घेतला तर पाण्याची स्थिती नेमकी कशी होती? त्याबाबतीतील आपलं नियोजन चुकतच आहे का?
उत्तर आपण पाण्याच्या बाबतीत एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे आपलं सगळं नियोजन मॉन्सूनवर अवलंबून आहे. महाराष्ट्रात पाण्याची परिस्थिती नेहमीच चांगली होती असं नाही. भारतातच सर्वत्र हा प्रश्न होता. आपल्याकडं दुष्काळ बारा- बारा वर्षं पडला आहे. त्याला दुर्गादेवीचा दुष्काळ
म्हणत. आपल्याकडं दुष्काळामुळं लोकांचे झालेले हाल बाहेरून आलेल्या प्रवाशांच्या लेखनात सापडतात. भारतातील मॉन्सूनच्या वाटचालीबद्दल
एक महत्त्वाचा घागा असा आहे,
की नाईल नदीच्या हालचालीवर
आपल्याकडील मॉन्सून कसा असेल ते ठरतं. तिथं जर नाईल नदी पातळीपेक्षाखाली गेली तर आपल्याकडं पाऊस कमी पडतो. नाईल
नदीला जर पूर आला तर इथं पाऊस चांगला होतो. नाईल नदीच्या नोंदी तीन हजार वर्षांच्या आहेत. इ.पू. ६२० ते इ.स. १५०० पर्यंत म्हणजे नऊशे वर्षांचं हे रेकॉर्ड आहे. त्यावरून आपल्या येथील पावसाबद्दल काही अंदाज काढता येतात. अलेक्झांडर जेव्हा आपल्याकडे आला तेव्हा त्यानं त्या अभ्यासावरच सिंधू नदीला पूर आलेला असेल याचा अंदाज केला होता. भारतात पावसाचा अभ्यास झाला नाही असं नाही. कौटिल्यानं त्या वेळी पाऊस मोजण्याचं तंत्र विकसित केलं होतं. आज राजस्थानमध्ये वाळवंट असलं तरी त्या भागात एके काळी २४ इंच पाऊस पडत होता. पावसाची अनिश्चितता कायम आहे. महाराष्ट्रालाही दुष्काळाच्या समस्येनं ग्रासलं होतंच. सातवाहन राज्याचा कालखंड महाराष्ट्रसाठी सर्वात चांगला होता. तो काळ खऱ्या अर्थानं सुवर्णकाळ होता.
प्रश्न वाङ्मय आणि पुरातत्त्वशास्त्राची सांगड कशी घालता येईल? त्यातून काही साहित्यनिर्मिती झाली आहे का?
उत्तर आपल्याकडं कमी आहे. परदेशात जेम्स मिचेलर यानं ‘सोअर्स’ हे
पुस्तक लिहिलं आहे. बाराशे पानांचं हे पुस्तक वेगळं आहे. त्यात त्यानं ज्यूंचा इतिहास असा दोन्ही पद्धतीनं अभ्यास करून मांडला आहे.
प्रश्न: सध्या कोणत्या प्रकल्पावर काम करत आहात?
उत्तर: मला मिळालेल्या टागोर फेलोशिपच्या अंतर्गत मी जे काम केलं त्यावर आता मुंबईचा सांस्कृतिक वारसा सांगणारं पुस्तक इंग्रजीत येईल. इतके दिवस त्या कामात मी व्यस्त होतो. त्यानंतर ते मराठीतही येईल. याबरोबरच व्याख्यानं सुरू असतात.
इंग्रजीत २७ पुस्तकं, तर मराठीत आठ पुस्तकं आणि अनेक संशोधन परिषदांमध्ये सादर केलेल्या पेपर्सची संख्या लक्षात घेतली तर ढवळीकर यांनी केलेलं काम किती मोठं आहे याची कल्पना येईल. केंद्र सरकारकडून त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे. आजही विविध संशोधन संस्थांत मार्गदर्शन करणाऱ्या ढवळीकर यांनी शिरूरजवळ इनामगावात केलेलं संशोधन वेगळ्या पातळीवरचं आणि देश पातळीवर दखलपात्र होतं.
पुरातत्त्वशास्त्रातील संशोधनातून त्यांनी खूप मोठ्या काळाची माहिती मराठीत रंजकपणे दिली आहे. इतिहास उभा करणारी ही माहिती केवळ कल्पनाविष्कार नाही, तर तिला सत्याचा आधार आहे.
============================================================================= जर तुमच्याकडे Hindi, english, किंवा marathi भाषेमध्ये काही article, स्टोरी, किंवा कविता जी तुम्हाला share करायची आहे. तर कृपया ती माहिती आपल्या फोटोसोबत (फोटो नसला तरी चालेल) आम्हाला email करा E-mail करा.
आमचा email Id आहे : rohit.shelake7@gmail.com आम्ही त्याला तुमच्या नाव व फोटोसहित या ब्लॉग वर PUBLISH करु.
Thanks !
No comments:
Post a Comment