Wednesday, February 6, 2019

_Be the CEO of your own Life...._

              दोन दिवसांपूर्वीची गोष्ट… कुटुंबासह कुठल्यातरी मॉलमध्ये होतो. मुलगा ‘प्ले झोन’ मध्ये, सौ. (विन्डो) शॉपिंगमध्ये आणि मी एसी ची छान गार हवा अंगावर घेत एका कोपऱ्यात पेपर वाचत बसलो होतो.  पेपर खरं तर, नावाला, माणसं वाचत बसलो होतो. विविध चेहऱ्यांची, आकारांची माणसं जणू ‘आज जगाचा शेवटचा दिवस असावा’ असे भाव आणून शॉपिंग करत होती. (एवढ्या वस्तू विकत घेऊन माणसं त्या वस्तू घरात कुठे ठेवतात, हा मध्यमवर्गीय प्रश्न मला कायम सतावतो. असो.)


              माझं ‘माणसं-वाचन’ चालू असतानाच माझ्या शेजारी एक तरुण येऊन बसला. जेमतेम चाळीशीचा असावा. जीन्स आणि खोचलेला टी शर्ट. पायात बूट. हातात मराठी पुस्तक. खिशातला शुभ्र रुमाल काढून त्याने कपाळावरचा घाम पुसला. रुमालाची (होती तशी) व्यवस्थित घडी घातली आणि (त्याच) खिशात ठेवली. त्याच्या हालचाली शांत झाल्यावर त्याने पुस्तक उघडले. ते पुस्तक माझ्या आवडत्यांपैकी एक होतं.

न राहवून मी म्हटलं, ‘मस्त पुस्तक आहे.’ त्याने माझ्याकडे बघत हसून मान हलवली...
पाच एक मिनिटांनी तो माझ्याकडे वळून म्हणाला, ’वाचन आवडतं?’
‘प्रचंड. रीडिंग इज माय ‘फर्स्ट लव्ह’.
आजूबाजूला ‘सौ’ नाही हे बघत मी म्हटलं.
‘किती वाचता रोज?’
‘रोज असं नाही…अं... अं…काही खास ठरवलेलं नाही. इच्छा झाली की वाचतो.’ 
अनपेक्षित यॉर्करला कसंबसं खेळत मी म्हटलं.
‘खायला आवडतं?’
कॉन्जीक्युटीव्ह यॉर्कर.
‘प्रचंड. इटिंग इज माय ‘सेकंड लव्ह’.’
‘हो? मग रोज जेवता की इच्छा होईल तेव्हा….?’
‘नाही नाही…रोज दोन वेळा... आणि मधे-मधे काहीना काही खादाडी चालू असतेच...
हिट विकेट !
तो तरुण हसला. म्हणाला, ‘मी दिवसभरात एक तास वाचतो. वाचल्याशिवाय झोपत नाही. आंघोळ, जेवण... तसंच वाचन !’

‘बरा वेळ मिळतो तुम्हाला.’ दयनीय चेहरा करत मी म्हटलं...
‘वेळ मिळत नाही. मी काढतो. ‘वेळ’ ही जगातली सगळ्यात ‘टेकन फॉर ग्रान्टेड’ गोष्ट आहे असं मी मानतो... 
फॉर दॅट मॅटर, आयुष्यच घ्या ना ! फारच गृहीत धरतो आपण आयुष्याला ! मी रिटायर झाल्यावर भरपूर वाचन करणार आहे' असं कोणी म्हटलं नां! की माझी खात्री होते, नवज्योत सिंग सिद्धूसारखा रेड्यावर हात आपटत तो ‘यम’ त्याला हसत असेल !’
मी हसलो. तसा किंचित गंभीर होत त्याने विचारलं, ‘तुम्ही कधी पाहिलंय यमाला?’
मी आणखी हसू लागलो.

‘आय ऍम प्रीटी सिरीयस... तुम्ही पाहिलंय यमाला ? हो, मी पाहिलंय. दोन वर्षांपूर्वी. 
रस्ता क्रॉस करत होतो. समोरून भरधाव गाडी आली. त्या दिव्यांच्या प्रकाश झोतातही मी अंधार पाहिला. त्या दोन सेकंदात मला ‘मृत्यूने’ दर्शन दिलं. त्यानंतर जागा झालो तो हॉस्पिटलमध्येच. 

गंभीर इजा होऊन सुद्धा मी कसाबसा वाचलो होतो... हॉस्पिटलमधून घरी आलो तो नवा जन्म घेऊन... 
मी ‘देव’ पाहिला नव्हता पण ‘मृत्यू’ पाहिला होता. मृत्यू तुम्हाला खूप शिकवतो. 

माझी मृत्यूवर श्रद्धा जडली. आजूबाजूला रोज इतके मृत्यू दिसत असूनही ‘मी’ अमर राहणार असं ज्याला वाटतं, तो माणूस ! तुम्हाला माहितीय, माणूस मृत्यूला का घाबरतो?’

‘अर्थात! मृत्यूनंतर त्याचे सगे सोयरे कायमचे दुरावतात... मृत्यूमुळे माणसाच्या इच्छा अपूर्ण राहतात.’ मी म्हटलं...

‘साफ चूक'! माणूस यासाठी घाबरतो कारण मृत्यूनंतर ‘उद्या’ नसतो !’
‘मी समजलो नाही.’
‘प्रत्येक काम आपल्याला ‘उद्यावर’ टाकायची संवय असते.... 
वाचन, व्यायाम, संगीत ऐकणे…
गंमत म्हणजे, आहेत ते पैसे देखील आपण ‘आज’ उपभोगत नाही....
ते कुठेतरी गुंतवतो.... भविष्यात ‘डबल’ होऊन येतील म्हणून!

या ‘उद्या’ वर आपला फार भरवसा असतो... मग तो आपल्या जगण्याचा एक भाग बनतो...

आपण मृत्यूला घाबरतो कारण मृत्यू तुम्हाला हा ‘उद्या’ बघायची संधी देत नाही !

मृत्यू म्हणजे – आहोत तिथे, आहोत त्या क्षणी फुल स्टॉप !

खेळ ऐन रंगात आला असताना कुणीतरी येऊन तुम्हाला खेळाच्या बाहेर काढावं, तसा मृत्यू तुम्हाला या जगातून घेऊन जातो.

तुमच्यावरील या ‘अन्याया’ विरुद्ध आवाज उठवायला देखील तुम्ही उरत नाही...

माझ्या मृत्यूनंतर मी माझा लाडका ‘उद्या’ पाहू शकणार नाही, या हतबलतेला माणूस सगळ्यात जास्त घाबरतो...

म्हणून हॉस्पिटलमधून घरी आल्यावर ठरवलं, यापुढचं आयुष्य उघड्या डोळ्यांनी जगायचं....

इतके दिवस जेवण नुसतंच ‘गिळलं’, या पुढे एकेका घासाची मजा घ्यायची.... 
आयुष्याची ‘चव’ घेत जगायचं. ’
‘म्हणजे नक्की काय केलं?’ माझी उत्सुकता आता वाढली होती.

‘माझ्या आयुष्याची जबाबदारी मी स्वतःवर घेतली....
मी माझ्या आयुष्याचा Chief Executive Officer झालो !’

‘कंपनीचा सीईओ इतपत ठीक आहे. आयुष्याचा ‘सीईओ’ वगैरे… जरा जास्तच होत नाही का?’ मी विचारलं.
‘वेल… तुम्हाला काय वाटतं हे माझ्यासाठी महत्वाचं नाही...
आयुष्य कसं जगायचं याचे नियम मी ‘माझ्यापुरते केलेत त्यामुळे…’
‘मग... तुमच्या कंपनीत किती माणसं आहेत?’ त्याला मधेच तोडत, मस्करीच्या सुरात मी विचारलं.

‘म्हटलं तर खूप, म्हटलं तर कोणीच नाही.’ तो खांदे उडवत म्हणाला.
मला न कळल्याचं पाहून तो पुढे बोलू लागला...

‘मी फक्त माझ्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्स सोबत डील करतो...
दे व्हर्च्युअली कंट्रोल माय लाईफ.
माझ्या बोर्डवर विविध माणसे डायरेक्टर आहेत...

फरहान अख्तर, 
शिवाजी महाराज, 
अब्दुल कलाम, 
डॉ. बी. आर. आंबेडकर
चार्ली चॅप्लीन, 
महात्मा गांधीजी, 
अमिताभ, 
हेलन केलर, 
जे आर डी टाटा
इत्यादी इत्यादी’...
माझ्या चेहऱ्यावरील बदलत जाणारे भाव न्याहाळत त्याने आणखी काही नावे घेतली.
‘या लोकांबद्दल वाचलं तेव्हा एक लक्षात आलं, या प्रत्येकामध्ये काहीना काही वैशिष्ट्य आहे. 
काही क्वालिटीजमुळे मला ही माणसं ग्रेट वाटतात.
मी काय करतो… अं… उदाहरण देतो…
समजा खोटं बोलण्यावाचून पर्याय नाही अशा परिस्थितीत सापडलो की माझे ‘एथिक्स डायरेक्टर’ गांधीजींना विचारतो, 
काय करू?

मग ते सांगतील ते करतो.
व्यायाम करायला जाताना सकाळी उठायचा कंटाळा आला तर माझे ‘हेल्थ डायरेक्टर’ फरहान अख्तर मला काय म्हणतील, या विचाराने मी उठून बसतो आणि व्यायाम करायला जातो.
कधीतरी काहीतरी घडतं आणि खूप निराश वाटतं.
मग माझ्या ‘इन्स्पीरेशन डायरेक्टर’ हेलन केलरना पाचारण करतो. त्यांना भेटून आपल्या अडचणी फारच मामुली वाटू लागतात.
कधी दुःखी झालो तर ‘इंटरटेनमेंट डायरेक्टर’ चार्ली चॅप्लीन भेटायला येतात…’
माझ्या चेहऱ्यावरील विस्मयचकित भाव पाहून तो म्हणाला...
’मला माहितीय की ऐकायला हे सगळं विचित्र वाटत असेल'.

पण एक गोष्ट सांगतो. आयुष्य जगणं ही जर परीक्षा असेल, तर प्रत्येक माणसाने स्वतःचा ‘सीलॅबस’ बनवावा हे उत्तम !

आपण अनेकदा ‘इतरांप्रमाणे’ आयुष्य जगायचा प्रयत्न करतो आणि तिथेच फसतो...
जगायचं कसं? या प्रश्नावर चिंतन करणारी लाखो पुस्तके आज बाजारात आहेत.
हजारो वर्षे माणूस या प्रश्नाचं उत्तर शोधतोय...

गौतम बुद्धांनी मात्र फक्त चार शब्दांत उत्तर दिलं - Be your own light...
मला तर वाटतं, याहून सोपं आणि याहून कठीण स्टेटमेंट जगात दुसरं नसेल !’
मी त्या तरुणाला नाव विचारलं, त्याने लगेच सांगितलं. आम्ही एकमेकांचा निरोप घेतला.
चार पावलं चालून गेल्यावर तो तरुण पुन्हा वळून माझ्याकडे आला. म्हणाला, 
‘सगळ्यात महत्वाचं सांगायचं राहिलं,
मी एका ऍक्सिडेंटमध्ये वाचलो आणि इतकं काही शिकलो.
तुम्ही…प्लीज... कुठल्या ऍक्सिडेंटची वाट पाहू नका !’ आम्ही दोघेही हसलो.
अपघात फक्त वाहनांमुळेच होतात, असं थोडीच आहे? 
ओळखपाळख नसलेला तो तरुणही अपघातानेच भेटला की!

घरी जायला आम्ही रिक्षात बसलो. ‘प्ले झोन’ मध्ये खेळून पोरगं आधीच दमलं होतं...
वाऱ्याची झुळूक रिक्षात येऊ लागली...
मांडीवर बसल्या बसल्या मुलगा झोपून गेला होता...
त्याच्या मऊ मऊ केसांमधून हात फिरवताना संध्याकाळच्या गप्पा आठवत होत्या.
मनात आलं, ‘आपल्या पोराने जर असे ‘बोर्ड ऑफ डायरेक्टर्स’ नेमले, तर त्यात ‘त्याचा बाप’ असेल का?’
परवाच्या रात्री बराच वेळ जागा राहिलो.
कोण जाणे, कदाचित हाच प्रश्न यापुढील आयुष्य ‘चवीने’ जगत राहायची उर्जा देत राहील !

प्रत्येकाने वाचावा असा हा अप्रतिम लेख....
....परत परत नक्की वाचा....

( संग्रहित लेख )

No comments:

Post a Comment

माझे नवीन लेखन

खरा सुखी

 समाधान पैशावर अवलंबून नसतं, सुख पैशानं मोजता येत नसतं. पण, सुखासमाधानानं जगण्यासाठी पैशांची गरज पडत असतेच. फक्त ते पैसे किती असावेत ते आपल्...