"कस्तुरीमृग"
गुरुवार 22 तारखेपासून कोल्हापुरात पावसामुळे पाण्याची पातळी वाढू लागली. समस्त कोल्हापुरवासियांना चिंता वाटू लागली .आम्हीही त्यापैकी एक होतो . शुक्रवारी सकाळी आमच्या एका जवळच्या स्नेह्यांच्या घरी पुराचं पाणी यायला सुरुवात झाली. त्यामुळे त्यांचं स्थलांतर करणं अत्यावश्यक होतं. ते होतंय न होतंय तोच दुपारी आमच्या घराच्या अलीकडे भरपूर पाणी आलं आणि आपल्या घराच्या खाली पाणी येणार याची खात्री झाली. लाईट गेले.. पाणीपुरवठा खंडीत झाला. त्याच वेळी आमच्याकडे फरशी पुसणारी 'कस्तुरी' कामाला आली होती .दुसरीकडे राहायला जाण्यासाठी सामान भरण्याची आमची गडबड सुरू होती. कस्तुरी म्हणाली, "उद्या जर पुराचं पाणी फार वाढलं तर मी कामाला येणार नाही".
तिला म्हटलं.."अगं आम्हीच चाललोय दुसरीकडे रहायला!" आम्ही सगळे गडबडीने नातेवाईकांकडे राहायला गेलो.
काल दि.26 रोजी रात्री आमची 'घरवापसी' झाली. आज सकाळी आमचा नेहमीचा जीवनक्रम सुरू झाला. नेहमीच्या वेळेला कस्तुरी आली. मी तिला विचारले "काय गं शुक्रवारी कामाला आली होतीस का?" आपल्या कानडी ढंगामध्ये मला ती म्हणाली ,"पाणी लै आलं व्हतं म्हनुन मी आलो नाही, आमचा काशा(तिचा मुलगा) म्हणला आज घरीच हाईस तर थोडा भात करून दे! पाच किलोचा मसालेभात करून दिला बघ मामी !" (सगळ्यांना ती मामीच म्हणते).
हे ऐकून आम्ही घरातले सगळे अवाक् झालो. मी विचारलं, "एवढा भात कशासाठी केलास तू ?" त्यावर ती उत्तरली, "तावडे हॉटेलकडं पुरात जी माणसं अडकली आहेत त्यांच्यासाठी 'काशा' भात घेऊन गेला!" हे ऐकून आम्हाला सगळ्यांना फार गहिवरुन आलं. सध्या फेसबुक ,व्हॉट्सॲप यावरून पूरग्रस्तांना केल्या जाणाऱ्या मदतीचे फोटो आणि व्हिडिओ बघण्यात येत आहेत. पण आपली आर्थिक परिस्थिती चांगली नसताना कस्तुरीनं केलेली ही मदत लाख-मोलाची आहे.2019 साली सुद्धा हायवेवर अडकलेल्या ट्रक ड्रायव्हर ना 'दीडशे भाकरी आणि दोन कुकर भात' हिने पुरवला होता .याच कस्तुरीला दोन वर्षापूर्वी एका भिशीचालकाने एक लाखाला गंडा घातला होता .पण ते सर्व मागं टाकून आपल्या परीनं पूरग्रस्तांना ती मदत करते ही गोष्ट थक्क करणारी आहे.
.. आणि हे आम्हाला सांगत असताना, तिच्या चेहऱ्यावर आणि बोलण्यात, 'आपण काहीतरी विशेष करत आहोत' असा कोणताही आविर्भाव नव्हता. 'कस्तुरीमृगाला' तरी आपल्यापाशी असलेल्या सुगंधाची जाणीव कुठे असते?
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
सौ.मृदुला कुरणे
कोल्हापूर
No comments:
Post a Comment