Monday, April 7, 2014

अरे ला कारे!






च्यायला, लैच बुळे होतो आम्ही. आहोतही. पण आता कळतंय, असं कायम शेपूट घालून राहिलं की लोकं आपल्याला शेपटी वर करून चालूही देत नाही. आपल्यालाही आपली शेपटी वर करून चालता येतं, वाटलं तर भुंकता येतं, चावता येतं हे विसरूनच गेलो होतो आम्ही.
असं कायम खालमुंडी राहिलं, लोकांना आदरबिदर दाखवला की त्यांना वाटतं, आपल्याला कोणी सिरिअसली घेतच नाही. म्हणजे कोणाविषयी आदरबिदर दाखवायचाच नाही, असं मला म्हणायचं नाही, पण सरत्या वर्षानं हे आम्हाला बर्‍यापैकी शिकवलं, भावड्या, अरे, बाकीचे असतीलही थोर, पण काढ की तुझाही ‘आवाज’. दाखव, तुलाही मोठय़ानं बोलता येतं, ओरडता येतं, नसेल तुझ्याकडे जीममध्ये जाऊन कमावलेली बॉडी, पण अर्धा इंच का होईना, फुगवता येते ना तुला छाती, मग फुगव की. चाल की ताठ आणि सांग ओरडून, वेळ आली की खळ्ळ, खटॅक मलाही करता येतं.
‘ए हरामीऽऽ, हां, तूच, तुलाच सांगतोय, बस खाली. मी काय म्हणतो, ते अगोदर ऐकून घे, नंतर तुझी टकळी चालव.’ हा जो कॉन्फिडन्स आहे ना, तो दिला आम्हाला गेल्या वर्षानं.
केवळ राजकीय आणि सामाजिक कार्यासाठीच नाही, तर एखाद्यावर अन्याय झाला तरीही रस्त्यावर येण्याचं आणि जाब विचारण्याचं धाडसं ‘निर्भया’च्या निमित्तानं दिसलं होतं. वेगवेगळ्या निमित्तानं त्याची बर्‍यापैकी पुनरावृत्ती ठिकठिकाणी होताना तरुणांनी पुन्हा एकदा सांगितलं, ‘आम्हाला कमी लेखू नका.’
तुम्हाला आठवतं, भज्जीनं मागे श्रीसंतच्या कानाला ‘चटका’ दिला होता. तसेच चटके आता बॅटनं आपला विराट देतोय, शिखर धवन खुले आम बॅट फिरवत मिशांना ताव मारतोय, रोहित शर्मा छकडे कसे मारायचे ते दाखवतोय. जाता जाता सचिनही ‘शिस्तीत’ जगाला सुनावूून गेलाच. सचिनची जागा आता विराटनं घेतलीय. पण त्याची स्टाइल आणखीच वेगळी आहे. तो मैदानात येतो तेच खुन्नस देत. अंगावर आला की शिंगावरही घेतो. मैदानात आणि बाहेरही. आवडलं आपल्याला. तसाच शिखर धवन. मिशांना पीळ भरत शिखर येतो ना मस्तीत मैदानावर, अपुन तो भाई उसके दिवाने है.
सायना नेहवाल. ऑलिम्पिकनंतर तिनं फार काही पराक्रम दाखवला नाही, पण ‘बापा’ला येऊ द्या, ती तुटून पडते त्यांच्यावर. दात-ओठ चावत कचा कचा खाते एकेकाला. त्यात होतात काही वेळा चुका. होणारच, पण शेवटी तिनंच वळलं ना चीनचं गाठोडं? तशीच ती पी. सिंधू. शटलनं कशी उचलून फेकते एकेकाला. हरू द्या रे. हार-जीत होणारच, पण ‘बापा’ला खांद्यावर घेण्याची हिंमत तिनं दाखवली.
विश्‍वनाथन आनंद सलग पाच वर्षं चेसचा सम्राट बनून राहिला, आताही तो ‘लढला’, पण कमी पडलं त्याचं अँग्रेशन. नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसननं त्याला धू धू धुतला. इतकं वाईट त्याला आयुष्यात कोणीच कधी धुतलं नसेल. ज्या मस्तीत कार्लसनचं वारू उधळलं, आपल्याला तर जाम आवडलं.
कोणी का असू द्या, आपला नाहीतर बाहेरचा. दीपिका कुमारी, धोनी, अँँडी मरे, राफेल नदाल, सेरेना विल्यम्स, लिओनेल मेस्सी. सगळ्यांनी यंदा दाखवून दिलं, कोणीही येऊद्या, घ्या त्याला शिंगावर! मनानं, शरीरानं, तोंडानं नाहीतर एकत्रित कृतीनं. दाखवा तुमचं अँग्रेशन. शेपूट घालू नका, हिंमत दाखवा, खुन्नस द्या, फार तर काय होईल? नाही झेपणार, पडू खाली.
तरीही लोक सलामच करतील, ‘बॉस काय फाईट दिली!’
सरत्या वर्षानं फाईट देण्याचं हे स्पिरीट आणि हिंमत मला दिली.

No comments:

Post a Comment

माझे नवीन लेखन

खरा सुखी

 समाधान पैशावर अवलंबून नसतं, सुख पैशानं मोजता येत नसतं. पण, सुखासमाधानानं जगण्यासाठी पैशांची गरज पडत असतेच. फक्त ते पैसे किती असावेत ते आपल्...