Saturday, May 31, 2014

आमच्या मनासारखं वागायचं.

नमस्कार मंडळी , सुट्यांचा आनंद घेताय  सगळेजण? गावी जायचं, उन्हात फिरायचं, शेतातपळायचं, कैऱ्या, चिंचा खायच्या,आजारी पडायचं; पण बालपणात रमायचं आणि पुन्हा एकदा लहानपण जगून घ्यायचं, यापेक्षा सुट्यांचा अर्थ तो काय वेगळा ना? 
     पण एक-दोन दिवस बऱ्या वाटतातहो या बिनकामाच्या पण आळशी सुट्या. पण नंतर नंतर कंटाळा यायला लागतो आणि रोजची पळापळच बरी वाटायला लागते मग. आणि हे फक्त आपल्याच बाबतीत होतं असं नाही, पण मुलांचंसुद्धा असंच होतं ना हो? बिच्चारे शाळेच्या वेळेत तरी आयांच्या तावडीतून सुटत असतात. तेवढाच अभ्यास, तेवढाच दंगा,।मित्रांच्या खोड्या, भांडणे, मारामाऱ्या यात कसा छान वेळ जात असतो शाळेत त्यांचा. 
        पण घरी आहे म्हटलं की हे करू नको, असं करू नको, इथे खेळू नको, तिकडे जाऊ नको, हे खाऊ नको, ते पिऊ नको... दुपारची वेळ आहे, झोपू द्या जरा... दंगा करू नका...।कधी एकदा शाळा सुरू होते, कुणास ठाऊक... बाप रे! कित्त्ती सूचना त्या?
         त्यांना सुद्धा वाटायला लागतं मग, शाळा होती तेच बरं होतं आपलं...! नुकताच जे.ई.ई.चा निकाल।लागला आणि त्यापाठोपाठ बातम्या आल्या पेपरमध्ये की,।परीक्षेत अपेक्षित यश न मिळाल्याने ....ची आत्महत्या...! ...अरे अजून बारावीचा निकाल बाकी आहे तरी...? एवढ्यात कसली घाई ही मरणाची?
        यामध्ये मार्क्स कमी पडले।म्हणजे आयुष्य संपलं का? सध्या टीव्हीवर पिझ्झाची एक जाहिरात दाखवली जातेय. त्यातील।त्या छोट्या मुलाच्या प्रश्नांना खरंच उत्तरे नाहीत आपल्याकडे... "नेहमी पहिले आल्यानंतरच बक्षीस मिळते का?' "दुपारच्या वेळी दंगा न करता आजोबांना शांत झोपू दिलं, तर का मिळू नये बक्षीस?'..."दररोज होमवर्क पूर्ण केला तरी का नाही देत कुणी बक्षीस?'..."बाबांचं।एखादं काम हलकं केलं तरी नाही बक्षीस?' ...आपल्याच आसपासचे रोजचे प्रश्न आहेत हे, असं वाचताना, ऐकताना आपल्याला काही नाही वाटत?... फक्त आपण।तेव्हा चुचकारतो आणि पुन्हा ये रे माझ्या मागल्या. 
       पण याच छोट्या छोट्या प्रश्नांतून आपल्याला कळून जातं की आपण किती परीक्षामय झालो आहोत. आपण जे काही करत असतो, जे काही वाचत असतो ते काय फक्त परीक्षेसाठीच? यात आपल्या आनंदासाठी काहीच नसतं?... अर्रे, किती लहानपणापासून आपण या मुलांच्या मानगुटीवर परीक्षेचं भूत बसवलेलं असतं. शाळेच्या प्रवेशापासून जी सुरुवात होते, ती थांबतच नाही. तिची भूक वाढतच जाते. आणि तहान विसरली जाते. केवळ अभ्यास, अभ्यास आणि अभ्यासच...!
           आता तर सुट्या लागल्यात, आता तरी गप्प बसावं ना आपण? ...पण नाही... पुढच्या वर्षीची तयारी करून घेऊच आपण. शिवाय उन्हाळी शिबिरं तर असतातच, चित्रकलेचे क्लासेस आले, अक्षर सुधारण्यासाठीचे क्लासेस आले, इंग्लिश ग्रामर
आलं, स्पर्धा परीक्षेची तयारी आली... सगळं कसं टाईट... आणि शाळेत अजून जात नसेल मूल, अजून बोलायला पण जमत नसेल कदाचित पण र षीे रश्रिश आणि ल षीे लरश्रश्र हे हजारवेळा घोकून घेऊच त्याच्याकडून... अहो काय चाललंय हे?
        आपल्या शाळेला दिवाळी सुटी आणि मे सुटी असते, हेच ही मुलं विसरून गेलीत हल्ली... खूप वाईट वाटतं हो हे पाहून. बघा ना, लहान असताना या सुट्यांमध्ये आपण किती हुंदडायचो गल्लीबोळातून? हातात कधी पाटी-पुस्तक घेतलेलं आठवतंय सुटीत? मग आपण कसं वागत असतो हो हे? बरं, ही शाळेत द्यावी लागणारी परीक्षा झाली. पण चक्र हे इथेच संपत नाही. त्यापुढेही आहेच की. नोकरीसाठी दहा ठिकाणी परीक्षा द्या. त्यातून कुठे सिलेक्ट झालोच तर पुन्हा प्रमोशनसाठी परीक्षा.
          एवढ्यात नोकरी लागते ना लागते तोच वधू-परीक्षा, वर-परीक्षा... वैताग येतो हो कधी कधी. त्यानंतर आणि लगेच मूल झालं तर बरं, नाहीतर...? नाहीतर आणखी पुढच्या परीक्षा...! तर मंडळी, याला जीवन ऐसे नाव. पण सगळं रांकेला लागल्यावर तरी संपाव्यात ना या परीक्षा आणि मिळावी सुटी? पण नाही! प्रत्येक पावलावर आपल्याला नवीन कसोट्यांना सामोरे जावं लागतं. मिळवेपर्यंतच्या परीक्षा वेगळ्या, नंतर त्या पचवण्यासाठीच्या वेगळ्या, मुलांच्या वेगळ्या,मुलींच्या वेगळ्या, पुरुषांच्या वेगळ्या, स्त्रियांच्या वेगळ्या आणि यापुढे जाऊन म्हातारपणातल्या, मरण येईपर्यंतच्या वेगळ्याच परीक्षा...!
        तुम्ही म्हणाल आयुष्य आहे, चालायचंच. पण किती आणि कुठंवर चालायचं ना? पाय इतके गळून जातात की पायात काटे टोचले तरी त्याची जाणीव होत नाही, मन इतकं बोथट होऊन जातं की त्याला संवेदनेचा अर्थच कळत नाही. प्रत्येक गोष्टीत नुसता विचार. सरळ विचारच करू शकत नाही आपण... समोर छान धबधबा कोसळत असतो आणि आपला वैज्ञानिक मेंदू विचार करू लागतो, किती पाणी वाया जातंय नाही?... आभाळ आलेलं असतं डोक्यावर, छान वातावरण असतं, काही सुचावं ना छान लिहायला? पण आपण विचार करू लागतो, कोणकोणत्या फळांवर या वातावरणाचा परिणाम होईल आता? किती नुकसान होईल?... मस्त पाऊस कोसळतोय. भिजावं ना? पण नाही. खिडक्या बंद करा, दारे लावून घ्या. मग घरच्यांना फोन करा, तुम्ही कुठे आहात? भिजला नाहीत ना? सर्दी होईल, ताप येईल... अर्रे, घ्या ना भिजण्याचा आनंद थोडा वेळ आणि इतरांनाही घेऊ द्या!
       खूप छोटं आहे हो जीवन. आता आहे तर आता नाही. फुलपाखराला तर अवघ्या काही तासांचं आयुष्य असतं. पण बघा कसं ते मनसोक्त जगून घेतं. आपणही आनंदी होतं आणि दुसऱ्यालाही आनंदी करतं. त्याच्यासारखं जगायला जमलं पाहिजे. परीक्षा, कसोट्या, संकटं तर येतच असतात, पास तर होणारच असतो त्यात. एखाद्या वेळी अपयश येईलही. पण म्हणून जीवन संपवणं हा पर्याय नाही त्यावर. आलेल्या अपयशापेक्षाही कित्येक सुंदर गोष्टी आपल्या अवती भोवती आहेत. त्यांचा का आपण विरस करायचा? त्यांचा आनंद घेऊन त्यांनाही आनंद द्यायचा. कुठल्याही गोष्टीकडे सतत तिरकस आणि शंकेने बघत राहिलात तर लोक आपल्यालाच कावीळ झालीय असं समजतील.     
         त्यापेक्षा जे समोर आहे त्याचा चांगलाच विचार करूया आणि या सुटीचा आनंद खऱ्या अर्थाने घेऊन जीवनाचे गीत गाऊया... हे जीवन सुंदर आहे!!! तेव्हा मंडळी आता या उरलेल्या सुटीत, अभ्यासाचं नाव नाही काढायचं, कोणत्याही क्लासमध्ये नाव नाही द्यायचं, मस्त आम्हाला कसं हिंड-फिरू द्यायचं, वाऱ्यावर बसूनआभाळाशी गप्पा मारू द्यायचं... आलाच पाऊस मधून तर भिजू आम्हा द्यायचं, पडल्याच गारा तरी खाऊ आम्हा द्यायचं..दमून जातो हो आम्ही वर्षभर, आम्हाला आता पुस्तक नाही उघडायचं, घडीभर आम्हालाही आहे, आमच्या मनासारखं वागायचं...!
=============================================================================           जर तुमच्याकडे Hindi, english, किंवा marathi भाषेमध्ये काही article,  स्टोरी, किंवा कविता जी तुम्हाला share करायची आहे. तर कृपया ती माहिती आपल्या फोटोसोबत (फोटो नसला तरी चालेल) आम्हाला email करा  E-mail करा. 
        आमचा email Id आहे : rohit.shelake7@gmail.com    आम्ही त्याला तुमच्या नाव व फोटोसहित या ब्लॉग वर PUBLISH करु. 
Thanks !


No comments:

Post a Comment

माझे नवीन लेखन

खरा सुखी

 समाधान पैशावर अवलंबून नसतं, सुख पैशानं मोजता येत नसतं. पण, सुखासमाधानानं जगण्यासाठी पैशांची गरज पडत असतेच. फक्त ते पैसे किती असावेत ते आपल्...