Friday, September 12, 2014

पाकिस्तान पुनश्च लष्करशाहीचा शिकार

राज्यघटना ‘किस झाड की पत्ती’? ती केवळ दहा-
बारा पानांची पत्रावळ! मी ती फाडून टाकून आज
म्हणू शकतो, की आपण उद्यापासून एका वेगळ्याच
राज्यपद्धतीचा अवलंब करू.मला कोणी थांबवू
शकेल का? आज जनतेला मी जिथे घेऊन जाईन,
तिथे ती माझ्यामागे येईल. भुट्टोंसह हे सगळे
राजकारणी लोक आपल्या शेपट्या हलवीत माझं
ऐकतील.’’ केहान इंटरनॅशनल या नियतकालिकात
१८ सप्टेंबर १९७७ रोजी प्रसिद्ध
झालेली त्या वेळचे पाकिस्तानचे
लष्करशहा आणि राष्ट्राध्यक्ष झिया-उल-हक
यांची ही मखलाशी. आपलेच उपकारकर्ते झुल्फिकार
अली भुट्टो यांना ४ जुलै १९७७ रोजी ‘ऑपरेशन
फेअर प्ले’ नावाच्या लष्करी कवायतीकरवी पदच्युत
करून जनरल झिया यांनी सत्ता हस्तगत
केली आणि भुट्टोंना १८ मार्च १९७८ रोजी फासावर
लटकावले.
भारताच्या एक दिवस आधी स्वतंत्र
झालेल्या पाकिस्तानमधील
राज्यपद्धतीची ही न्यारी रीत. असेच काही नवाझ
शरीफांच्या बाबतीत घडले. भुट्टोंप्रमाणेच तीन
वरिष्ठ जनरलना डावलून पंतप्रधान नवाझ शरीफ
यांनी ऑक्टोबर १९९८ मध्ये लष्करप्रमुखाची माळ
जनरल परवेझ मुशर्रफ यांच्या गळ्यात घातली.
शरीफांच्या नकळत घडवलेले कारगिल कारस्थान
सपशेल फसल्यानंतर मुशर्रफांनीही सत्ता बळकावून
शरीफांना देशाबाहेर हद्दपार केले.
किंबहुना पाकिस्तानच्या आजतागायत
अस्तित्वापैकी अर्धा अधिक काळ तो देश
लष्करशाही- खाली पिचत राहिला आहे.
ख्रिस्तीना लँब या आंग्ल वृत्तपत्र लेखिकेने बेनझीर
भुट्टो सत्तेवर असताना, कराचीमध्ये
पाहिलेल्या भित्तीपत्रकाचा स्वारस्यपूर्ण संदर्भ
दिला आहे - ‘‘या हंगामी लोकशाही व्यत्ययाबद्दल
आम्हाला खेद आहे. शिरस्त्यानुसार लष्करी राजवट
लवकरच रुजू होईल. ’’ म्हणूनच की काय
गेल्या महिन्यापासून पाकिस्तानात जागतिक कीर्तीचे
वेगवान गोलंदाज इम्रान खान
यांनी माजवलेल्या ‘त्सुनामी’त ते शरीफांची ‘विकेट’
घेऊन बॅटिंग आणखी एका लष्करशहाला देण्यास
कारणीभूत होतात का, याकडे सर्वांचे डोळे लागले
आहेत. योगायोग असा, की पाकिस्तानचे नवीन
लष्करप्रमुख जनरल रहील शरीफ (नवाझ शरीफांचे
नातलग नव्हेत) यांनाही पंतप्रधांनांनी जनरल हरून
इस्लाम आणि रश्ताक मेहमूद या रहील
शरीफांपेक्षा वरिष्ठ अधिकार्यांना डावलून
लष्करप्रमुखपद बहाल केले आहे. पाकिस्तान पुनश्च
एका लष्करशाहीच्या उंबरठय़ावर उभा आहे
का अशी शंका सर्वत्र प्रकट होत आहे.
याला प्रमुख कारण म्हणजे पाकिस्तान तेहरीक-ए-
इन्साफ- पीटीआय (न्यायासाठी चळवळ) या राजकीय
पक्षाचे प्रमुख इम्रान खान आणि पाकिस्तान
अवामी तेहरीक- पीएटीच्या जनता चळवळीचे प्रणेते
डॉ. मोहम्मद तहिर-ऊल-काद्री हे दोघे
आपल्या अनुयायांसह
राजधानी इस्लामाबादच्या अतिसुरक्षा भागात,
तथाकथित रेड झोनमध्ये, केवळ
एका उद्दिष्टासाठी ठाण मांडून बसले आहेत. ते
म्हणजे शरीफांना पंतप्रधानपदावरून खाली ओढणे.
वास्तविक इम्रान आणि काद्री यांच्यात
कोणताही अधिकृत राजकीय समेट झालेला नाही. १४
ऑगस्ट २0१४च्या स्वातंत्र्यदिनी जवळजवळ
दहा लाख लोकांचा मोर्चा लाहोरपासून ३६७
किलोमीटर असलेल्या इस्लामाबादला निघाला.
इम्रान खान आणि कादरी या दोघांचे जथे
वेगवेगळ्या मार्गाने इस्लामाबादला पोचले, इम्रान
खान यांचा ‘आझादी मार्च’ तर काद्रींचा ‘इन्किलाब
(क्रांती) मार्च.’
इम्रान खान यांच्या तेहरिक- ए- इन्साफ
पक्षाला जरी मे २0१३च्या निवडणुकीत नवाझ
शरीफ यांच्या पाकिस्तान मुस्लिम (नवाझ),
पी.एम.एल. (एन) पक्षाच्या खालोखाल मते
पडली असली, तरी त्यांना पाकिस्तान संसदेत फक्त
३४ जागाच मिळाल्या होत्या. नवाझ निर्णायक
बहुमताने निवडून आले होते. पंतप्रधानपदावर आरूढ
होण्याची नवाझांची ही तिसरी वेळ आहे. इम्रान खान
यांच्या तेहरीकने खैबर पख्तूूनख्वा प्रांतात मात्र
आपले सरकार आणले आहे. इम्रान खान
यांनी शरीफांवर निवडणुकीत अफरातफर- रिगिंग-
करण्याचा आरोप ठेवला आहे. गडगंज संपत्तीचे
मालक शरीफ आणि त्यांचे पंजाब प्रांताचे
मुख्यमंत्री शहाबाज हे बंधू. या दोघानी प्रचंड
लाचलुचपत केल्याचाही इम्रान यांचा दावा आहे.
इम्रान यांना लाचलुचपतविरोधी लढय़ात
तरुणाईचा भरघोस पाठिंबा आहे.
तहीर-उल काद्री हे मवाळ सूफी पंथाचे प्रचारक
आहेत. आत्मघाती दहशतवादाचे विरोधक आहेत.
‘सुइसाइड बॉम्बिंग’विरुद्ध
त्यांनी फतवा काढला आहे. सन १९८१मध्ये
त्यांनी तेहरीक-ए-मिन्हाज-उल कुरान
नावाची संस्था स्थापन केली. वेगवेगळ्या पंथांत
समभावासाठी ते झटतात
आणि त्यांच्या संस्थेच्या जवळजवळ ७0 देशांत
शाखा आहेत. ते शिया पंथीयांबद्दल आदर
बाळगतात. यामुळे पाश्चिमात्य देशांत त्यांचा प्रभाव
आहे आणि त्यांच्या अनुयायांची संख्या अमाप आहे.
ते कॅनडाचे रहिवासी आहेत, परंतु पाकिस्तान
आणि कॅनडाचे नागरिक आहेत. त्यांनी पाकिस्तान
अवामी तेहरीक या पक्षाची २00२ मध्ये
स्थापना केली; परंतु त्यांना निवडणुकांत फारसे यश
मिळालेले नाही. सन २0१३ मध्ये
निवडणुकांच्या आधी कडाक्याच्या थंडीत त्यांनी तीन
दिवसांचा हरताळ जाहीर
केला होता आणि त्या वेळी त्यांच्या इस्लामाबादवरील
‘मार्च’ला चांगला प्रतिसाद मिळाला होता. काद्री हे
लष्कराचे भाडोत्री तट्ट असल्याची दाट
शंका सर्वांना वाटते. इम्रान खानसुद्धा लष्कराच्याच
इशार्यावर चालतायेत असाही आरोप केला जातो.
एका नवृत्त आयएसआय प्रमुखाचे आणि इम्रान
यांच्या पक्षातील वरिष्ठ नेत्याचे
काही दिवसांपूर्वी गुफ्तगू झाल्याची सुद्धा दाट
वदंता आहे.
२५ जुलै २0१४ रोजी पाकिस्तानी सरकारने घटनेचे
२४५ कलम लागू करून
राजधानीच्या सुरक्षिततेची जबाबदारी लष्करावर
सोपवली. दहशतवादी हल्ल्याची दाट
शक्यता असल्यामुळे हे पाऊल उचलल्याची सरकारने
घोषणा केली; परंतु त्यायोगे इम्रान खान
आणि काद्री या दोन्ही नेत्यांकरवी लष्करानेच
सरकारवर दबाव टाकण्याची संधी लाभली असे
पाकिस्तानात सर्वसाधारण मत आहे. नवाझ
शरीफांना लष्कराबद्दल तिरस्कार असणे स्वाभाविक
आहे, त्याचबरोबर लष्करालाही पंतप्रधानांबद्दल
फारशी आपुलकी नाही. त्याला अनेक कारणे आहेत.
त्यात अव्वल क्रमांकावर आहे ते नवाझ
शरीफांचा भारताबरोबर संबंध सुधारण्याचा मनोदय.
पंतप्रधान मोदी यांच्या शपथग्रहाणावेळी नवाझ
शरीफांनी आवर्जून
नोंदवलेली उपस्थिती ही लष्कराच्या पथ्याला पडणे
कदापि शक्य नाही. विशेषकरून लष्कराचे नवे प्रमुख
जनरल रहील शरीफ यांना भारताबद्दल
आस्था असणे सोडाच परंतु त्यांच्या मनात
कमालीची कटुता असणे शक्य आहे. रहील शरीफ यांचे
ज्येष्ठ बंधू मेजर शब्बीर शरीफ हे १९७१ मध्ये
पंजाबमधील गुरमेरखेडा पुलावरील चकमकीत ठार
झाले होते. त्यांना निशान-ए-हैदर या पाकिस्तानातील
सर्वोच्च शौर्य पदकाने सन्मानित केले गेले. रहील
शरीफ यांनी राजपूत रूढीनुसार शब्बीर शरीफ
यांच्या पत्नीशी विवाह केला. एवढेच नव्हे तर लष्कर
प्रमुखांचे मामा मेजर राझा अझीझ भट्ट
यांनाही १९६५च्या भारत-पाकिस्तान युद्धात
अत्युच्च शौर्यासाठी निशान-ए-हैदर बहाल करण्यात
आला. तसे पाकिस्तानी लष्कर
भारताशी कोणतीही सलगी करण्याच्या विरुद्ध आहे.
त्यात आता पाकिस्तानच्या १५व्या लष्कर
प्रमुखाच्या भारतविरोधी ग्रहाची भर पडणे शक्य
आहे. त्याचबरोबर २0१५ मध्ये
अमेरिकी सैन्याच्या अफगाणिस्तानातून
प्रस्थानानंतर तिथे कोणतीही ढवळाढवळ न
करण्याच्या शरीफांच्या धोरणासही लष्कराचा विरोध
आहे. त्याशिवाय अफगाणिस्तानात
भारताला कोणताही चंचूप्रवेश करू न
देण्याचाही पाकिस्तानी लष्कराचा निर्धार आहे.
अमेरिकेने अफगाणिस्तानात प्रवेश केल्यानंतर
पाकिस्तानी लष्कराला भारताविरुद्ध
हवी असलेली सामारिक प्रगल्भता (स्ट्रॅटेजिक
डेफ्थ) त्यांनी गमावली होती. ती लवकरात लवकर
पुनश्च हस्तगत
करण्याच्या पाकिस्तानी लष्कराच्या प्रयत्नात
नवाझांच्या भारताप्रत नवनिर्मित जिव्हाळ्यामुळे
अडकाठी  येऊ शकते याची त्याला चिंता आहे.
उत्तर वझिरीस्तानात
पाकिस्तानी तालीबानला खच्ची करण्यासाठीलष्कराने
नुकतीच झर्ब-ए-अझब ही मोहीम उभारली होती.
त्यात अनेक लोक बेघर झाले आहेत आणि निष्पाप
जनतेचे हाल झाले आहेत. नवाझ शरीफ यांची त्यामुळे
राजकीय कोंडी झाली आहे आणि त्याचा दोष ते
पाकिस्तानी लष्करावर टाकत आहेत. परवेझ
मुशर्रफांविरुद्ध पाकिस्तान सरकारने केलेल्या कठोर
कारवाईबद्दल लष्कर नाराज आहे आणि त्यांच्यावर
ठेवलेल्या देशद्रोहाच्या आरोपाशी ते सहमत नाहीत.
त्याशिवाय लष्कराचे
पाकिस्तानच्या निर्णयप्रणालीतील स्थान नवाझ
शरीफांच्या संसदेतील बलसंख्येमुळे घटत जात आहे,
अशीही लष्कराची धारणा होत चालली आहे.
या सर्व कारणांमुळे लष्करात अस्वस्थता आहे.
तिची जाणीव झाल्यामुळेच की काय नवाझ
शरीफांनी स्वातंत्र्यदिनाच्या राष्ट्राला उद्देशून
केलेल्या भाषणात सेनादलांवर अवास्तव स्तुतिसुमने
उधळली.
३१ ऑगस्टला इस्लामाबादमधील
परिस्थिती जेव्हा चिघळली तेव्हा जनरल रहील शरीफ
यांनी पंतप्रधान नवाझ शरीफांना सत्तेवरून निदान
हंगामी कालावधीसाठी तरी पायउतार होऊन इम्रान
खान आणि काद्री हे मागणी करत
असलेल्या न्यायालयीन लवादाकडून रिगिंग
आणि लाचलुचपतीच्या आरोपाच्या चौकशीला वाव
द्यावा, असा सल्ला दिल्याच्या वावड्या सर्वत्र
उडत होत्या. नवाझ शरीफ तो स्वीकारणे
कदापि शक्य नसल्याने लष्कर ब्रह्मस्त्र बाहेर
काढील याची दाट शक्यता निर्माण झाली होती.
परंतु नवाझ शरीफांच्या सुदैवाने गेल्या दोन-तीन
दिवसांत वातावरण बरेचसे निवळले आहे. याचे प्रमुख
कारण म्हणजे २
सप्टेंबरच्या पाकिस्तानी संसदेच्या बैठकीत
विरोधी पक्ष धरून सर्वांचा पंतप्रधान शरीफ
यांना भरघोस पाठिंबा लाभला. पाकिस्तान पीपल्स
पार्टीचे नेते ऐतिझाझ एहसान यांनी तर
शरीफांनी दबावाखाली राजीनामा देऊ नये, असा खंबीर
सल्ला दिला. त्यातच इम्रान खान यांच्या पक्षाचेच
वरिष्ठ नेते जावेद हाश्मी यांचे इम्रान
यांच्याशी मतभेद झाले, एवढेच नव्हे, तर
त्यांनी या सर्व अराजकाला लष्कर
आणि आयएसआय यांची गुप्त फूस
असल्याचा संसदेत आरोप केला. त्यामुळे इम्रान
आणि काद्री आता एकटे पडले आहेत. सन
२0१३च्या मे मध्ये पाकिस्तानमध्ये
घेतलेल्या निवडणुका त्या देशाच्या इतिहासात
कोणत्याही लोकशाही सरकारने पाच
वर्षांचा कालावधी पूर्ण केल्यानंतर पहिल्यांदाच होत
होत्या. या पश्चात निर्णायक बहुमताने निवडून
आलेले शरीफ यांचे सरकार आता त्यावर
शिक्कामोर्तब करेल आणि पाकिस्तानात, वेळाने
का होईना, लोकशाहीने मूळ धरेल, असा निष्कर्ष
काढणार्यांचा गेल्या पंधरवड्यातील घटनांमुळे
अपेक्षाभंग होण्याची चिन्हे दिसत
होती आणि पाकिस्तान पुनश्च लष्करशाहीचा शिकार
होणार असे वाटू लागले होते; हे मळभ
सध्यातरी निवळल्यासारखे वाटते. परंतु
एका गोष्टीची खात्री देता येत नसेल, तर
ती पाकिस्तानातील लष्कराच्या लहरीची!

No comments:

Post a Comment

माझे नवीन लेखन

खरा सुखी

 समाधान पैशावर अवलंबून नसतं, सुख पैशानं मोजता येत नसतं. पण, सुखासमाधानानं जगण्यासाठी पैशांची गरज पडत असतेच. फक्त ते पैसे किती असावेत ते आपल्...