Sunday, December 28, 2014

काबूलच्या मुली मुलांच्या वेशात

अफगाण समाज आत्यंतिक पुरुषसत्ताक आहे.
मुलगा झाला की अमाप
कौतुकसोहळा आणि मुलगी झाली की सुतकी मरणकळा,
अशा टोकाच्या भावनांवर हा समाज जगतो. अशा समाजात मुलांचे
कपडे परिधान करून मुलगा असल्याचे
भासवणाऱ्या मुलींना ‘बचापोश’ म्हटले जाते.
या परंपरेचा उगम का झाला असावा आणि तिचे परिणाम
याचा धांडोळा घेण्याचे काम हे पुस्तक करते. या पुस्तकातून
अफगाण मुली केवळ मुलांनाच मिळणारे स्वातंत्र्य
काही काळ का होईना कसे मिळवतात याचे दर्शन
घडते. आणि एकंदर अफगाण
स्त्रियांची घुसमटही.
अफगाणिस्तानातील तालिबानी राजवट सुमारे
पाच वर्षे टिकली. १९९६ ते २००१ या काळात
तालिबानी दहशतवाद्यांनी अफगाण
जनतेचा अनन्वित छळ केला. स्त्रियांवरील
अत्याचारांनी तर कळस गाठला होता. ट्विन
टॉवर्सवरील हल्ल्यानंतर अमेरिकेने
लष्करी कारवाई करत
तालिबानची अफगाणिस्तानातील राजवट
उलथवून टाकली. ‘न्यूयॉर्क टाइम्स’मध्ये युद्ध
वार्ताहर म्हणून काम
करणारी जेनी नॉर्डबर्ग या काळात
अफगाणिस्तानमध्येच कार्यरत होती. युद्धविषयक
बातम्या देण्याचे काम करतानाच
ती अफगाणी संस्कृतीच्या अंतरंगात
डोकावण्याचा प्रयत्न करत होती. अफगाण
संस्कृतीत कित्येक पिढय़ांपासून चालत
आलेल्या ‘बचापोश’ परंपरेने तिचे लक्ष वेधून घेतले.
या परंपरेचा तिने शब्दबद्ध केलेला धांडोळा म्हणजे ‘द अंडरग्राऊंड
गर्ल्स ऑफ काबूल’ हे पुस्तक होय. ‘बचापोश’
परंपरेवरील लिखाणासाठी तिला २००५मध्ये
पुलित्झर हे मानाचे पारितोषिकही मिळाले आहे.
मुलांचे कपडे परिधान करून मुलगा असल्याचे
भासवणाऱ्या मुलींना ‘बचापोश’ म्हटले जाते. अफगाण
समाज आत्यंतिक पुरुषसत्ताक आहे.
मुलगा झाला की अमाप
कौतुकसोहळा आणि मुलगी झाली की सुतकी मरणकळा,
अशा टोकाच्या भावनांवर हा समाज जगतो. अशा समाजात ‘बचापोश’
या परंपरेचा उगम का झाला असावा आणि तिचे परिणाम
याचा धांडोळा घेण्याचे काम जेनीचे पुस्तक करते.
बचापोश परंपरेविषयी केलेल्या लिखाणातून आणि बचापोश
व्यक्तींच्या मुलाखतींमधून
ती अफगाण महिलांच्या सद्य:स्थितीवर
आणि लैंगिक असमानतेमुळे उद्भवलेल्या भयावह समस्यांवर
प्रकाश टाकते. स्त्री-
स्वातंत्र्याच्या आणि सुरक्षेच्या बाबतीत अफगाणिस्तान
जागतिक क्रमवारीत तळाच्या स्थानावर आहे; परंतु
जेनीने अफगाण महिलांच्या हीन-
दीन परिस्थितीवर भाष्य करतानाच
काही महिला ‘बचापोश’ला स्वत:साठी स्वातंत्र्याची दारे
काही काळापुरती का होईना किलकिली करून
घेण्याचे माध्यम कशामुळे समजतात,
याचाही आढावा घेते. पुरुषांना जे स्वातंत्र्य
अनुभवायला मिळते, ते आपणही पुरुषासारखा पेहराव
करून अनुभवायचे, हा ते स्वातंत्र्य मिळवण्याचा मध्यममार्ग.
या पुस्तकाचा मुख्य रोख बचापोश परंपरेवर
असला तरी अफगाणिस्तानातील
महिलांची सद्य:स्थिती कशी आहे,
याची तपशीलवार नोंद हे पुस्तक घेते.
ज्या कुटुंबांमध्ये एकही मुलगा नाही,
अशा कुटुंबांमध्ये लहानपणीच
एखाद्या बालिकेला मुलगा म्हणून वाढवले जाते. मुलांचे कपडे परिधान
करणे, मुलांप्रमाणे वागणे-बोलणे
अशा गोष्टी या मुली करतात. केवळ
मुलगी असल्यामुळे अफगाण समाजात अप्राप्य
असणाऱ्या गोष्टी बचापोश बनल्यानंतर सहजसाध्य
होतात. केवळ मुलांनाच असणारे स्वातंत्र्य बचापोश बनल्यानंतर
अनुभवता येते; पण बालपण सरल्यानंतर मात्र
या बचापोशना पुन्हा मुलगी म्हणून उर्वरित आयुष्य
जगावे लागते. पुरुषीपणाचा बुरखा उतरवून ठेवल्यानंतर
घडणारे स्थित्यंतर या मुलींसाठी मानसिक
आणि सामाजिकदृष्टय़ा वेदनादायी असते. पुरुषप्रधान
अफगाण समाजाने बचापोश
परंपरा का स्वीकारली असावी,
याची अनेक कारणे जेनी या पुस्तकात
विशद करते. कुटुंबात मुलगा असणे, ही गोष्ट
अफगाण समाजात अतिशय
प्रतिष्ठेची समजली जाते. केवळ
मुली असणाऱ्या कुटुंबांना समाजात
तेवढी किंमत नसते. आपल्याच
एखाद्या मुलीला बचापोश म्हणून वाढवले, तर
भविष्यात मुलगा जन्माला येऊ शकतो,
अशी अंधश्रद्धाही तेथे प्रचलित आहे.
तसेच, आपल्याच एखाद्या मुलीला बचापोश म्हणून
वाढवले, तर समाज टोमणे तरी मारणार
नाही आणि सामाजिक इभ्रतही टिकून
राहील, असा विचारही केवळ
मुली असणारी अफगाण कुटुंबे करतात.
त्यामुळे पिढय़ान्पिढय़ा ही परंपरा अफगाण
संस्कृतीत मूळ धरून आहे.
या पुस्तकाची सुरुवात अझिता या अफगाण संसद
सदस्याच्या मुलाखतीपासून होते.
अफगाणिस्तानातील
लोकशाहीवादी सरकारने
महिला सबलीकरणासाठी पाऊल उचलत
महिलांसाठी २५ टक्के आरक्षण लागू केले आहे.
अझिता ही काबूलमधल्या सुधारकी विचारांच्या घरात
लहानाची मोठी झाली.
तिचा नवरा गरीब शेतकरी आहे.
अझिता चार लेकींची आई आहे. संसद
सदस्य म्हणून मिळणाऱ्या आपल्या सामाजिक प्रतिष्ठेला एकच
गालबोट
लागल्याची धारणा अझिता आणि तिच्या नवऱ्याची धारणा झाली,
ती म्हणजे कुटुंबात सगळ्या मुलीच
असल्याची. आपली सामाजिक
प्रतिष्ठा जपण्यासाठी हे दाम्पत्य त्यांच्या सगळ्यात
धाकटय़ा मुलीला बचापोश बनवण्याचा निर्णय घेते. खुद्द
अझितानेदेखील लग्न होईपर्यंतचा काळ बचापोश
म्हणून काढला होता. बचापोश म्हणून
वाढलेल्या आणि आता स्वत:च्या मुलीलाही तशाच
पद्धतीने मोठे करणाऱ्या अझिताला अफगाण
मुलींच्या शिक्षणासाठी मात्र
काही तरी भरीव काम
करायचे आहे. अफगाणिस्तानला स्त्रियांसाठी सुरक्षित
बनवायची तिची अच्छा आहे.
वेगवेगळ्या कारणांमुळे बचापोश बनलेल्यांच्या अनेक
मुलाखती या पुस्तकात आहेत. कुटुंबात
कमावणाऱ्यांची संख्या जास्त असावी,
म्हणूनही मुलींना बचापोश बनवले जाते.
अनेक मुली बचापोश म्हणून वाढताना अनुभवलेले
स्वातंत्र्य नंतर हिरावले जाऊ नये,
या भीतीपोटी पौगंडावस्थेत
प्रवेश केल्यानंतरदेखील मुलगा म्हणूनच राहणे
पसंत करू, अशी भावना या पुस्तकातून व्यक्त
करताना दिसतात. ही बाब अफगाण
समाजातील भयावह लैंगिक विषमता अधोरेखित
करणारी आहे.
कुणीही बचापोश म्हणून जन्माला येत
नाही. ते बनवले जातात.
तरीही बचापोश म्हणून
वाढवलेल्या मुलीला मुलगा बनून आयुष्य
कंठण्याची ओढ का लागून राहते, हा प्रश्न
अस्वस्थ करणारा आहे.
पुरुषी वर्चस्वाच्या वरवंटय़ाखाली पिचलेल्या अफगाण
स्त्रीची घुसमट या परंपरेतून व्यक्त
होते.
अमेरिकेने अफगाणिस्तानातून तालिबानचे सरकार उलथवून लावले,
तेव्हा आता तरी या मागास आणि डोंगराळ प्रदेशात
विकासाचे वारे वाहू लागतील
आणि स्त्रियांची अवस्था चांगली होईल,
अशी आशा व्यक्त करण्यात
आली होती. अफगाणिस्तानच्या मुख्य
भूमीतील रहिवाशांमध्ये
तालिबानच्या भीतीचे अदृश्य सावट
त्या काळातही होतेच; पण तेव्हापासून
अफगाणिस्तानात लोकशाहीवादी सरकार
अस्तित्वात आहे. स्त्री-स्वातंत्र्य
आणि सक्षमीकरणासाठी तोकडी का होईना,
पावले पडण्यास सुरुवात झाली आहे; परंतु सुमारे
तेरा वर्षे अफगाणिस्तानमध्ये तळ ठोकून राहिलेले अमेरिकन सैन्य
या आठवडय़ात माघारी जाईल. त्यानंतर
तालिबानचा उपद्रव परत
वाढण्याची भीती आहे.
उदारमतवादाची थोडीशी झुळूक
अनुभवलेल्या अफगाण समाजात जरा कुठे बदलाला सुरुवात
झालेली असताना, मुली पुन्हा शिक्षण
घेऊ लागलेल्या असताना तालिबानच्या रूपाने
मूलतत्त्ववादी शक्ती या प्रक्रियेला खीळ
घालण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
तालिबानी अत्याचारांचे प्रमुख लक्ष्य
ठरतील त्या अफगाण स्त्रिया! जेनीने
या संदर्भात अस्वस्थ करणारे अनेक प्रश्न या पुस्तकातून
उपस्थित केले आहेत. कमालीच्या पुरुषप्रधान
समाजामध्ये आपले स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अफगाण
स्त्रिया झगडत आहेत. बचापोश बनून
काही जणींनी हे स्वातंत्र्य
तात्पुरत्या काळासाठी अनुभवलेही असेल;
पण आपल्या समाजात स्त्री-पुरुष समता प्रस्थापित
होण्यासाठी अफगाणी स्त्रीला आणखी किती वर्षे
वाट पाहावी लागणार, या जेनीने उपस्थित
केलेल्या प्रश्नाचे उत्तर शोधणे
आता बदललेल्या राजकीय संदर्भामुळे
आणि मूलतत्त्ववादी शक्तींनी पुन्हा डोके
वर काढल्यामुळे आणखी जटिल होईल.
द अंडरग्राऊंड गर्ल्स ऑफ काबूल : जेनी नॉर्डबर्ग
विरागो पब्लिशर्स,
पाने : २८८, किंमत : २३९ रुपये.

Thursday, December 4, 2014

’एक शुन्य मी’ धर्म, अंधश्रध्दा नि तुम्ही आम्ही -पु. ल. देशपांडे.

’एक शुन्य मी’
धर्म, अंधश्रध्दा नि तुम्ही आम्ही
-पु. ल. देशपांडे.
भारतीय समाजप्रबोधनाच्या बाबतीत
आपल्या देशातले नेते हे एक प्रकारच्या भ्रमातच
वावरत होते असे मला वाटते. निखळ वैज्ञानिक
दृष्टिकोनाचे एकूणच आपल्या देशातील
हिंदूंना आणि मुसलमानांना वावडे. बरे,
ज्या ख्रिस्ती लोकांशी संबंध आला, ते
पाद्री धर्मप्रसारक. शाळा-कॉलेजे त्यांनीच
चालवली. त्यांच्याही डोळ्यांना झापडे बांधलेली.
शिवाय आपल्या देशात शारीरिक श्रमाइतकाच
वैचारिक श्रमाचा तिटकारा.
बाबासाहेब आंबेडकरांनी एके ठिकाणी म्हटले आहे,
की ब्राम्हण इंग्रजी विद्या शिकले ते
कारकुनी नोकऱ्या मिळाव्यात म्हणून. लाखात
एखादा सोडला तर
ब्राम्हणांच्या घरातही पाठ्यपुस्तकापलीकडे
व्यासंगासाठी ग्रंथसंग्रह नव्हता. वेदांचा फक्त
अभिमान बाळगायचा; त्याला अक्कल लागत
नाही. पण वेद वाचून वेदांचा अभिमान बाळगणारे
शोधून सापडायचे नाहीत. सारे अभिमान आंधळे!
कुणी तरी भारतात सोन्याचा धूर निघत
होता म्हणायचे आणि इतरांना तो आपण
पाहिल्यासारखे वागायचे. आमचे इतिहाससंग्रह हे
जवळजवळ कल्पनारम्य पुराणासारखे. ऐतिहासिक
घटनांचे विश्लेषण नाही, आत्मपरीक्षण नाही. सदैव
वास्तव नाकारत जगायचे. कुठल्याही घटनांचे
कार्यकारणभाव लावण्याच्या फंदात पडायचे
नाही. सारा हवाला एक तर देवावर नाही तर
दैवावर.
न्यायमूर्ती रानड्यांसारखी माणसेदेखील
इंग्रजी राज्य हे Divine dispensation
मानताना पाहिली की आश्चर्य वाटते. आमचे
देवदेखील वरती हिंदुस्थानचा नकाशा घेऊन
जरा चार इंग्रज पाठवून भारतीयांना शहाणे करू
या म्हणत बसले होते.
स्वातंत्र्याच्या चळवळीच्या काळात जातिभेद नष्ट
झाल्याच्या भ्रमातच आपण सारे जण वावरत होतो.
जातीय संघटनांच्या शक्तीची जाणीव, मते पदरात
पाडून घ्यायला स्वातंत्र्यानंतर
जेव्हा व्हायला लागली तेव्हा सेक्युलर
भारताचा जयजयकार करणाऱ्या नेत्यांची गाळण
उडाली. लाखातला एखादा अपवाद वगळला तर
उमेदवारांच्या निवडीपासून ते प्रचारापर्यत सारे
काही जात, धर्म, पंथ
यांच्या दुराभिमानाला जागवतच चालत असत. मग
निवडणूक-प्रचाराचे नारळ तुळजाभवानीपुढे फुटतात,
दर्ग्यावर चादर चढते, देवळावर कळस चढतात.
तान्ही पोरे दुधावाचून तडफडत
असली तरी दगडी पुतळ्यावर
शेकडो दुधाच्या घागरी उपड्या होतात .
आपल्या देशात केवळ हिंदूच नव्हे तर मुसलमान,
ख्रिश्चन, बुध्द, जैन, शीख-
सगळ्यांची अस्मिता जात आणि पंथाधिष्ठितच
आहे. एखाद्या राजकीय किंवा भाषिक
चळवळीच्या प्रसंगी किंवा चीन-
पाकिस्तानसारख्या युध्दाच्या प्रसंगी माणसे
एकत्र आल्यासारखी वाटतात; पण लगेच
पुन्हा आपापल्या जातीच्या कळपात जातात.
मुसलमानांतले शिया आणि सुनी, आगाखानी,
कटियारी, मोमीन, खोजे, बोहरी वगैरे
लोकही एकमेकांपासून विधर्मीयांइतकेच दूर आहेत.
केरळातले सिरीयन ख्रिस्ती आणि मंगळूरचे
कॅथॉलिक किंवा महाराष्ट्रातले प्रोटेस्टंट
किंवा मेथॉडिक यांच्यात
वैमनस्याच्या भिंती उभ्या आहेत.
गोव्याच्या ख्रिस्ती लोकांत बामण खिरिस्तॉव
आहेत. आहिंसा परमो धर्म मानणाऱ्या श्वेतांबर
आणि दिगंबर
पंथांच्या जैनांच्या देवाच्या अलीकडील
घटना तुम्हाला ठाऊक असतीलच.
मनुष्यस्वभावात हा जा नावाचा व्हायरस
इतका घट्टपणे कसा रोवून घेऊन बसतो हे एक
विलक्षण कोडे आहे.
आर्थिक अभ्युदयाबरोबर
जातीच्या प्रश्नांची तीव्रता कमी होईल असे
वाटले होते. कामगार-चळवळीला जोर आल्यावर
सारे कामगार यापुढे ‘कामगार’ हीच जात मानतील,
असाही विश्वास होता. पण तेही खरे ठरले नाही.
त्या चळवळीच्या नेत्यांचे पितळ कामगार-
चळवळीच्या प्रारंभीच्या काळात सूत-
गिरण्यांतल्या अस्पृश्य
मानल्या गेलेल्या कामगारांना दूर ठेवण्यापासूनच
उघडे पडले होते. खुद्द कम्युनिस्ट
देशांतही पुन्हा एकदा राष्ट्रवादाने जोर
धरल्यासारखे दिसते. रशियन कामगार
आणि चिनी कामगार आता एकमेकांचे वैरी झालेले
दिसताहेत. ज्या चीनमध्ये माओचे रेड बुक म्हणजे रोज
सकाळी उठून भक्तिभावाने वाचायचा ग्रंथ
होता आणि ‘माओच्छिष्ठम् जगत् सर्वम्’
अशी परिस्थिती होती, तिथे इतिहासातून माओचे
नाव पुसून टाकायचा चंग बांधलेला दिसतो आहे. अरब
राष्ट्रांकडे पहावे तर अंधश्रद्धा, रूढी, धर्म-
दुराभिमान ही मध्ययुगीन भुते थैमान
घालताना दिसताहेत. खोमिनीच्या राज्यात
बायका पुन्हा एकदा घरातल्या अंधारात कोठड्यात
गेल्या. ही भुते उतरवण्याऐवजी त्यांचे सामर्थ्य
वाढीला लावण्यात येत असलेले दिसत आहे.
आपल्या देशात
पुरोगामी विचारांचा झेंडा मिरवणाऱ्या साम्यवाद्यांनी तर
बुद्धिप्रामाण्य
वाढीला लावण्यासाठी किंवा एकूणच
समाजप्रबोधनासाठी कुठलेही धाडसी पाऊल
टाकलेले नाही.
कम्युनिस्ट युनियनचे सभासद असलेले मुंबईतले गिरणी-
कामगार एकीकडून क्रांतीचा जयजयकार करतात
आणि दुसरीकडून देवीला कोंबडा मारून नवस
फेडतात.
आपल्या देशात एकाच काळात आदिमानव-
युगापासून apple-युगापर्यत सारे काही एकदम नांदत
असते. त्या वेळी तुम्ही कशालाही भारतीय
संस्कृती म्हणू शकता! फक्त ही वास्तवापासून
अधिक दूर असेल तितकी अधिक भारतीय.
जयप्रकाशजींचे नवनिर्माण-आंदोलन प्रचंड जोराने
करणाऱ्या गुजरातेत राखीव
जागाविरोधी आंदोलनही तितक्याच तीव्रतेने
होऊन हजारो दलिनांना उध्द्वस्त करण्यात येते.
मराठवाड्याची अस्मिता विद्यापीठाला बाबासाहेबांचे
नाव देण्याच्या बाबतीत इतकी जागी होती,
की शेकडो दलितांना आपल्या झोपड्या भस्मसात
होताना पाहाव्या लागतात. कसले प्रबोधन, कसले
फुले आणि कसले काय?
एक तर धर्म, ईश्वर, पूजा-पाठ ह्यात
मला कधीही रस वाटला नाही. शिल्पकारांचे
कौशल्य म्हणून मला मूर्ती पहायला आवडतात. समजू
लागलेल्या वयापासून
माझा कोणत्याही मूर्तीला नमस्कार
घडलेला नाही.
पूर्वजन्म, पुनर्जन्म वगैरे थोतांडावर माझा विश्वास
नाही . देव, धर्म या कल्पना धूर्त
सत्ताधाऱ्यांनी दहशतीसाठी वापरलेल्या आहेत,
याविषयी मला यत्किंचितही शंका नाही.
आपल्या देशात इतके संत
जन्माला यायच्याऐवजी ऐहिक
जीवनाला विज्ञानाचे अधिष्ठान देणारे
शास्त्रज्ञ जन्माला आले असते तर हा देश अधिक
सुखी झाला असता.
मला कुठल्याही संतापेक्षा अॅनेस्थेशियाचा शोध
लावून वैद्यकीय शस्त्रक्रिया वेदनाहीन
करणारा संशोधक हा अधिक मोठा वाटतो.
विज्ञान जन्मजात श्रेष्ठत्वकनिष्ठत्व मानत नाही.
सत्याचे दर्शन घडवणाऱ्या वैज्ञानिकांचा, देवाचे
नाव
घेणाऱ्या धर्मगुरूंनी आणि त्यांच्या दहशतीखाली असणाऱ्या अडाणी राजे
लोकांनी सगळ्यात अधिक छळ केला आहे.
धर्म धर्म करणाऱ्या लोकांइतके सत्याचे
आणि वास्तवाचे शत्रू नसतील. मग ते
बायकांना नवऱ्याच्या चितेवर जिवंत जाळतील,
नरबळी देऊन आपले राजमहाल आणि देवळे टिकाऊ
करतील, कुणाला अस्पृश्य म्हणतील,
कुणाला वाळीत टाकतील, काय वाटेल ते करतील.
धर्म आणि पंथाच्या दुरभिमानातून माणसाचे रक्त
सगळ्यात अधिक सांडलेले आहे;
आणि या साऱ्या खटाटोपातून शेवटी नवे
हुकूमशहाच उदयाला आलेले दिसतात.
पण आपला इतिहास हा मुख्यतः राजे
लोकांनी मुलूख
बळकावण्यासाठी केलेल्या लढायांचा,
जयापराजयाचा इतिहास आहे; आणि प्रत्येक
विजयी राजाच्या भाट-चारणांची ही प्राचीन
परंपरा आजही कशी टिकून आहे, ते आपण पाहतोच
आहो. विजयी राजाच्या भाट-
चारणांनी त्यातील सत्यावर
स्तुतिस्तोत्रांच्या इतक्या झुली पांघरल्या आहेत,
की भूतकाळातल्या त्या तसल्या व्यक्तींना झाकणारी शब्दांची आरास
म्हणजे इतिहास हीच आपली समजूत आहे.
संजय गांधीला बुध्द
आणि ख्रिस्ताच्या पंक्तीला नेऊन बसवणारे नेते (?)
निघाले. अशा ह्या देशात बुध्दीला आणि निश्चित
पुराव्याला साक्ष ठेवून काही लिहिणे
आणि बोलणे हा गुन्हा ठरतो.
त्यातून आपल्या देशात नाममहात्म्याला फार मोठे
स्थान आहे. नामस्मरणाने तरून जाता येते ही श्रद्धा.
कुठे जाता येते आणि तरणे म्हणजे काय याचा विचार
नाही. अंधश्रद्ध समाजात कुठलीही घटना पारखून
घेण्याची शक्तीच उरत नाही. भाषेचा वापर मूठभर
लोकांच्या स्वार्थासाठी भरमसाट रीतीने
केला जातो. उच्चार आणि आचार यांच्यात मेळ
नसल्याचे कुणालाही दुःख नाही. ‘सहनाववतु
सहनौ भुनक्तु’ ही आमच्या वेदातील प्रार्थना,
त्यातल्या
मानवतेवेषयी गळा काढून बोलायचे
आणि ‘सहनाववतु’ म्हणताना “दूर हो. विटाळ
होईल.” म्हणून माणसाला दूर लोटायचे. पुन्हा वेद
श्रेष्ठ ते श्रेष्ठ, ते धडाधड पाठ म्हणणारे
त्याहूनही श्रेष्ठ. त्यांना शासनाच्या वतीने
शाली पांघरणारे आणखी श्रेष्ठ.
सकाळी रेडियो लावला की देव
दीनांचा वाली असल्याचे
कुणी ना कुणी तालासुरात सांगत असते;
आणि गॅलरीत आल्यावर
समोरच्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यात बेवारशी पोरे
शिळेपाके शोधून काढताना दिसत असतात.
त्या देवावर आणि सत्तेवर असलेल्या माणसांवर
विशेषणांची खैरात चालू असते. दुर्दैवाने
वास्तवाला विशेषणे मंजूर नसतात.
कल्पनारम्यतेला मात्र ती पोषक ठरतात.
अस्पृश्य मानल्या गेलेल्यांना ‘हरिजन’ म्हटले,
की जादूचा मंत्र म्हटल्यासारखी अस्पृश्यता नष्ट
होईल असे मानणे
किंवा स्त्रियांना देवता म्हटल्यानंतर
त्यांची गुलामी नष्ट होईल असे धरून चालणे, हे
ह्या असल्या वास्तवापासून दूर
असलेल्या कल्पनारम्यतेचे लक्षण आहे. पुण्याच्या फुले
मंडईत
त्या भिक्षुकशाहीविरोधी सत्यशोधकांच्या नावावर
टिच्चून सार्वजनिक सत्य
(?)नारायणाची पोथी वाचली जाते. लोक
तीर्थप्रसाद घेऊन धन्य होतात आणि दिवसेंदिवस
ह्या अंधश्रद्धेला शासनाकडून भरपूर खतपाणी घातले
जात आहे.
माझ्या वयाची साठ वर्ष मी ओलांडली पण
गेल्या काही वर्षांत
मी ही जी काही हिंदी सिनेमा नट-
नटींसारखी देवदेवता आणि बुवा-
माताजी मंडळींची चलती पाहतोय,
तशी माझ्या तरुणपणीही पाहिली नव्हती. देऊळ
बांधणे हा सत्तेवरच्या राजकीय पक्षात
जाण्याइतकाच किफायतशीर धंदा झाला आहे.
कधी कुठल्या शंकराचार्यांचे नावदेखील ऐकले नव्हते.
त्यांची दीड दीड हजार रुपये भरून
पाद्यपूजा करायला भक्तांचा क्यू लागतो.
आमच्या सेक्युलर भारताच्या पंतप्रधानबाई
त्यांच्या दर्शनाला जातात. चर्चेस्, मशिदी यांचे
उत्पन्न भरमसाट वाढते आहे. यातून आपण विशिष्ट
जातीचे किंवा पंथाचे अनुयायी या अहंकाराखेरीज
पदरात काहीही पडत नाही.
ह्या साऱ्या सामाजिक वास्तवाकडे पाहिले,
की प्रबोधन हा शब्दच निरर्थक वाटायला लागतो.
खुर्ची जाईल या भयाने ग्रस्त असलेले नेते,
श्रीमंती जाईल या भयाने अस्वस्थ असलेले धनिक
आणि असहायतेने निदान देव
तरी आपल्या मदतीला येतो की काय हे पाहू
या म्हणणारे दरिद्री लोक असाच
देखावा दिसतो अाहे. वैचारिक
आधुनिकतेचा समाजाला स्पर्शही झालेला दिसत
नाही. शेवटी हेच खरे आहे असे वाटायला लागते.
‘Justice is Simply the interest of the Stronger’.
मनाच्या निराश मूडमध्ये हे लिहिले आहे असे
तुम्हाला वाटेल. व्यक्तिगत जीवनात दुःख बाळगत
राहावे असे माझ्या बाबतीत काहीही नाही.
उद्या मला जेवायला मिळणार आहे
किंवा नाही आणि आज
रात्री झोपायला जागा सापडणार की नाही,
ह्या चिंता घेऊन ज्या देशात लाखो लोक जगताहेत,
तिथे माझ्यासारख्याने वैयक्तिक दुःख
हा शब्दही उच्चारू नये, ह्या जाणिवेने
मी कसलेही वैयक्तिक दुःख माझ्याभोवती रेंगाळू
देत नाही. साहित्य, संगीत, नाट्य असल्या कलांत
रमण्यात आणि थोडेफार इतरांना रमवण्यात आयुष्य
गेले. उर्दू शायराच्या ढंगात बोलायचे झाले तर आजवर
आयुष्याच्या वाटेत काट्यांपेक्षा फुलेच जास्त
लाभली. ‘उपरा’, ‘बलुतं’, ‘आठवणीचे पक्षी’
ह्या पुस्तकांसारखे काही वाचले, की आपले जगणे
सामाजिक दृष्ट्या असंबद्ध वाटायला लागते.
कुणी मोठेपणा द्यायला लागले
की ओशाळल्यासारखे वाटते.
(’एक शुन्य मी’ या पुस्तकातुन)

अमेरिकेतील ‘समान नागरी अधिकार’ या चळवळीची आद्य प्रवर्तक समजली जाणारी रोझा पार्क्स.
   रोझानं जी ठिणगी चेतवली, तो धगधगता वन्ही बनला आणि त्याची परिणती १९६४ सालच्या सिव्हिल राइट्स अॅक्ट’मध्ये झाली. या कायद्यान्वये ‘वंश, वर्ण, धर्म किंवा मूळ देश’ यावर आधारित भेदभाव करण्यास कायद्यानं बंदी घालण्यात आली. एक तेवती मेणबत्ती इतर हजारो मेणबत्त्यांना प्रज्वलित करू शकते. रोझा ती आद्य मेणबत्ती आहे. तिला कैद करण्यात आलं, तो १ डिसेंबर ‘रोझा पार्क्स डे’ म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्तानं..
               तो दिवस होता गुरुवार, १ डिसेंबर १९५५. दिवसभर काम करून थकून गेलेली रोझा (पार्क्स) संध्याकाळी सहा वाजता माँटगोमेरी, अॅलाबामा येथील बसमध्ये चढली. पैसे भरून तिनं प्रवेश केला आणि कृष्णवर्णीयांसाठी राखीव भागातील पहिल्या रांगेतील एका रिकाम्या सीटवर जाऊन बसली. गोऱ्यांसाठीच्या दहा राखीव रांगांपाठची तिची सीट होती.
        नेहमीच्या मार्गानं बस जात असताना गोऱ्यांसाठीच्या साऱ्या राखीव जागा भरून गेल्या. एम्पायर-थिएटर- स्टॉपपाशी गोऱ्यांचा एक मोठा घोळका आत शिरला. दोन-तीन गोरे लोक उभे असलेले पाहून जेम्स ब्लेक या बसड्रायव्हरनं‘कृष्णवर्णीयांसाठी’ ही पाटी मागे हलवली आणि रोझासकट चार कृष्णवर्णीयांना उठून जागा मोकळी करून द्यायला फर्मावलं.
       वर्णद्वेष-वंशद्वेष यांनी बुजबुजलेल्या दक्षिणेकडच्या अॅलाबामा राज्यात जन्मलेल्या आणि वाढलेल्या रोझानं आजवर प्राक्तनाचा निमूटपणे स्वीकार केला होता. आज मात्र तिच्या सहनशक्तीचा कडेलोट झाला! तिचा अणू-रेणू संतापानं पेटून उठला. या अन्यायाविरुद्ध लढण्याचा निग्रह तिच्या ठायी कुठून संचारला कोण जाणे! ब्लेकच्या उर्मट फर्मानाला अजिबात दाद न देता रोझा ठामपणे तिथेच बसून राहिली. इतर तीन लोक उठून गेले, तरी रोझा तसूभरही हलली नाही. धमक्यांना ती जुमानत नाही हे पाहून, ब्लेकनं पोलिसांना बोलावलं आणि तिला कैद केलं . ती कुप्रसिद्ध बस, भेदभाव करणारी त्यातली सीट्सची आखणी आणि कैद झालेल्या रोझाचा फोटो पाहिला की, आजही आपलं मन संतापानं पेटून उठतं!
              कृष्णवर्णीयांविरुद्ध असा भेदभाव करणारा ठराव माँटगोमेरी शहरानं १९०० साली मंजूर करून घेतला होता. (या ठरावात मतदानाचा हक्क फक्त गोऱ्यांनाच दिलेला होता.) या ठरावानुसार, एकाच बसमधून प्रवास करणाऱ्या गौर आणि कृष्णवर्णीयांना वंशानुसार वेगळय़ा जागांवर बसणं सक्तीचं केलं गेलं. अशा जागा नेमून देण्याचे अधिकार बस-कंडक्टर्सना देण्यात आले. कालांतरानं जी प्रथा पडली, त्यानुसार माँटगोमेरीतील बसचालक गौरवर्णीयांसाठीच्या राखीव जागा भरून गेल्यावर कृष्णवर्णीयांना आपल्या जागेवरून उठायला लावू लागले. परंतु आज कुणी तरी धाडस करून या अन्यायाविरुद्ध बंड पुकारलं होतं!
    वर्णभेद आणि वंशभेद हा अमेरिकेवरचा काळाकुट्ट डाग होता. नागरी युद्धानंतर अमेरिकेच्या घटनेत तीन दुरुस्त्या करण्यात आल्या होत्या. क्रमांक तेराच्या घटना-दुरुस्तीन्वये ‘गुलामगिरी’ कायद्यानं रद्द करण्यात आली. क्रमांक चौदाच्या दुरुस्तीन्वये आफ्रिकन-
अमेरिकन्सना अमेरिकेचं नागरिकत्व देण्यात आलं आणि पंधराव्या घटना दुरुस्तीन्वये फक्त कृष्णवर्णीय पुरुषांनाच मतदानाचे अधिकार देण्यात आले. १८७७ सालापर्यंत या घटना दुरुस्त्या कार्यान्वित करून देशाची पुनर्रचना करण्याचा जो प्रयत्न करण्यात आला, तेव्हाचा कालखंड मोठा खळबळजनक होता. या पुनर्रचनेसाठी मध्यवर्ती सरकारच्या प्रामाणिक प्रयत्नांना दक्षिणेकडच्या राज्यातील गोऱ्यांनी प्रचंड विरोध केला.
          त्यातूनच ‘कू क्लक्स क्लॅन’ किंवा फक्त ‘केकेके’ म्हणून परिचित असणाऱ्या बंडखोर चळवळींची आणि गटांची सुरुवात झाली आणि कृष्णवर्णीयांवर प्रचंड अत्याचार केले जाऊ लागले. गौरवर्णीयांचं वर्चस्व कायम ठेवू इच्छिणारे बलिष्ठ गट दक्षिणेकडच्या राज्यांमध्ये निर्माण झाले आणि ते कायद्याला धाब्यावर बसवू लागले. १८७६ च्या वादग्रस्त अध्यक्षीय निवडणुकीनंतर या पुनर्रचना अध्यायाची समाप्ती झाली. १८९० ते १९०८ या काळात, दक्षिणेकडच्या राज्यांत नवी घटना आणि कायदे संमत करून घेतले आणि कृष्णवर्णीयांचे नागरी हक्क काढून घ्यायला प्रारंभ केला. त्यांना वेगळं पाडायला, त्यांच्या मुलांना गौरवर्णीय मुलांच्या शाळेत प्रवेश न देता अत्यल्प सुविधा असलेल्या वेगळय़ा शाळांमध्ये पाठवायला प्रारंभ झाला.
             कोणत्या तरी सबबीखाली कृष्णवर्णीय पुरुषांची नावं मतदार यादीतून खोडली जाऊ लागली. मतदानाचा हक्क गमावल्यामुळे आपलं प्रतिनिधित्व करून आपलं हित जपणारे उमेदवार निवडून देणं त्यांना अशक्य झालं. गळचेपी करणाऱ्या अशा वर्ण-वंशद्वेष्टय़ा परिस्थितीतून बाहेर पडण्याचे कायदेशीर मार्ग त्यांच्यापुढे खुले नव्हते.
अशा परिस्थितीतच रोझा पार्क्स जन्मली आणि वाढली. ४ फेब्रुवारी १९१३ रोजी टस्कजी अॅलाबामा येथे तिचा जन्म झाला.तिच्या आई-वडिलांची फारकत झाल्यावर, ती तिची आई आणि भाऊ तिच्या आजोळी माँटगोमेरीच्या उपनगरात राहू लागले. बालपणी तिच्या घरावरून ‘केकेके’च्या समर्थकांचे मोर्चे जाताना हातात बंदूक घेऊन घराची राखण करणारे तिचे आजोबा तिच्या स्मृतीत कोरले गेले होते. सार्वजनिक सुविधांबद्दलचा भेदभाव, कृष्णवर्णीयांसाठीच्या निकृष्ट शाळा, फक्त गोऱ्या मुलांना स्कूल बसनं जाताना पाहणं आणि स्वत: मात्र तंगडतोड करून शाळेत जाणं हे प्राक्तन तिनं निमूटपणे स्वीकारलं होतं.
       १९३२ साली रोझानं रेमंड पार्क्स या माँटगोमेरीतील नाभिकाशी विवाह केला. त्याच्या उत्तेजनामुळे तिनं १९३३ साली अपूर्ण राहिलेलं आपलं शालेय शिक्षण पूर्ण केलं. भेदभाव करणाऱ्या कायद्यावर मात करून, तिसऱ्या प्रयत्नानंतर तिनं मतदार-यादीत आपलं नावही नोंदवलं. तिचे पती एनएएसीपी (नॅशनल असोसिएशन फॉर द अॅडव्हान्समेंट ऑफ कलर्ट पीपल) या संस्थेचे सक्रिय कार्यकर्ते होते. १९४३ साली रोझानंसुद्धा या संस्थेत जोमानं काम करायला प्रारंभ केला आणि त्या संस्थेची सचिव म्हणून ती निवडून आली. १९५७ सालापर्यंत तिनं ते पद सांभाळलं. हे पद सांभाळत असताना, रेसी टेलर या कृष्णवर्णीय स्त्रीवर केल्या गेलेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेचा तिनं चांगलाच पाठपुरावा केला आणि तिला न्याय मिळवून देण्यासाठी जोरदार मोहीम उघडली.
        १९४४ नंतर रोझानं मॅक्सवेल एअरफोर्स बेसवर काही काळ नोकरी केली. ही जागा मध्यवर्ती सरकारच्या अखत्यारीतली असल्यामुळे, तेथे वर्णभेदाला मज्जाव होता. ‘त्या अनुभवामुळे माझे डोळे उघडले!’ असं तिनं आपल्या आत्मचरित्रात नमूद केलं आहे. तिनं काही काळ क्लिफर्ड आणि व्हर्जिनिया डर या गौर दाम्पत्याच्या घरी हाऊसकीपर म्हणून काम केलं. हे अत्यंत उदार मतवारी राजकीय दृष्टिकोन राखणारं दाम्पत्य होतं. तिला कैद झाल्यावर तिची जामिनावर सुटका करण्यासाठी क्लिफर्ड डर आणि ‘एनएएसीपी’च्या एडगर निक्सन या अध्यक्षानं पुढाकार घेतला. रोझानं जुलमी कायद्यांना जो विरोध केला, त्यानंतर ‘एनएएसीपी’ या संस्थेनं पटापट निर्णय घेतले.  
        निक्सननं विमेन्स पॉलिटिकल काऊन्सिलबरोबर विचारविनिमय करून रातोरात ३४,००० पत्रकं छापवून घेतली आणि भेदभाव करणारे कायदे राबवणाऱ्या बसेसवर बेमुदत बहिष्कार टाकण्याचं आवाहन कृष्णवर्णीयांपुढे केलं. ७५ टक्के कृष्णवर्णीयच बसेसचे ग्राहक होते.
           ४ डिसेंबर १९५५ रोजी निक्सननं स्थानिक चर्चेमध्ये या बस-बहिष्काराची घोषणा केली. ‘माँटगोमेरी-अॅडव्हर्टायझर’ या पेपरनं पहिल्याच पानावर या बहिष्काराला ठळक प्रसिद्धी दिली. कृष्णवर्णीयांनी एकमुखानं या बहिष्काराला पाठिंबा दिला. त्यांना सौजन्याची वागणूक दिली जाईपर्यंत, कृष्णवर्णीय ड्रायव्हर्स नेमले जाईपर्यंत आणि बसच्या मध्यानंतरच्या सीट्स प्रथम प्रवेश करणाऱ्याला दिल्या जाईपर्यंत हा बहिष्कार चालू ठेवण्याचा निर्णय एकमुखानं घेण्यात आला. ३८१ दिवस हा बहिष्कार सुरू ठेवला गेला. अनेक वैयक्तिक अडचणी सोसून, वेळेला पावसाळय़ात वीस वीस मैल पायपीट करून कृष्णवर्णीयांनी निग्रहानं हा लढा दिला. अनेक महिने बसेस रिकाम्या राहिल्या. बस कंपन्यांचं प्रचंड आर्थिक नुकसान झालं. अखेरीस माँटगोमेरीमधला हा भेदभावाचा कायदा रद्द करण्यात आला.
         रोझाच्या निर्णायक कृतीमुळे अमेरिकेतील नागरी अधिकार चळवळीकडे साऱ्या जगाचं लक्ष वेधलं गेलं. या बस-बहिष्काराच्या वेळेस आणखी एक प्रभावी नेतृत्व उदयाला आलं- मार्टिन ल्यूथर किंग ज्युनियर!
आपल्या कृतीमुळे रोझाला आणि तिच्या पतीला आपली नोकरी गमावावी लागली. त्यांनी खूप हालअपेष्टा सोसूनही जागोजागी भाषणं करून समान नागरी अधिकारांसाठी जनजागृती केली. कालांतरानं त्यांनी डेट्रॉइट येथे स्थलांतर केले. १९६५ ते १९८८ या कालखंडात रोझानं जॉन कॉन्यर्स या कृष्णवर्णीय काँग्रेसमनची सेक्रेटरी म्हणून काम केलं. याच कॉन्यर्सनं रोझाचं वर्णन ‘अत्यंत शांत, अत्यंत प्रसन्न, अत्यंत असामान्य व्यक्ती अशी एकमेव रोझा पार्क्स’ अशा शब्दात केलं आहे.
        रोझानं जी ठिणगी चेतवली, तो धगधगता वन्ही बनला आणि त्याची परिणती १९६४ सालच्या ‘सिव्हिल राइट्स अॅक्ट’मध्ये झाली. या कायद्यान्वये ‘वंश, वर्ण, धर्म किंवा मूळ देश’ यावर आधारित भेदभाव करण्यास कायद्यानं बंदी घालण्यात आली. नोकरी किंवा जागेसंदर्भात असा भेदभाव करणं बेकायदा समजलं जाऊ लागलं. १९६५ सालच्या ‘व्होटिंग राइट्स अॅक्ट’मुळे सर्वाना मतदानाचा हक्क लाभला आहे. त्याच वर्षी मंजूर झालेल्या ‘इमिग्रेशन अॅक्ट’मुळे जगभरातील सर्वाना अमेरिकेत स्थलांतर करण्याची मोकळीक मिळाली आहे. तोवर प्रामुख्यानं युरोपमधले लोकच स्वीकारले जात होते.
        रोझानं जे इवलं बीज लावलं, त्याचा वेलू गगनावेरी गेलेला तिला पाहता आला. १९७७ साली सर्व निकटचे आप्त निवर्तल्यावर रोझानं स्वत:ला पूर्णवेळ समाजकार्याला वाहून घेतलं. भाषणं करून जमवलेले सर्व पैसे तिनं या कार्यासाठी देऊन टाकले. अनेक समाजसेवी संस्था स्थापन केल्या. तिच्या या अविरत कार्याची देशानं दखल घेतली आणि तिला असंख्य पुरस्कारांनी सन्मानित केलं.
         २४ ऑक्टोबर २००५ रोजी, वयाच्या ९२व्या वर्षी वृद्धापकाळानं तिला मृत्यू आला. तिची शवपेटिका काही काळ इतमामानं माँटगोमेरीत ठेवण्यात आली. तिला श्रद्धांजली वाहताना, अमेरिकेची तत्कालीन कृष्णवर्णीय परराष्ट्रमंत्री काँडोलिसा राइस, हिनं म्हटलं, ‘रोझा पार्क्सनं हे कार्य केलं नसतं, तर मी कधीही हे उच्च पद मिळवू शकले नसते!’ तेथून रोझाची शवपेटिका यू.एस.कॅपिटॉलच्या गोलघुमटाच्या खोलीत सन्मानपूर्वक ठेवण्यात आली. अमेरिकी सरकारची कर्मचारी नसताना हा बहुमान मिळवणारी ती पहिलीच स्त्री होती. तेथून तिचा देह डिट्रॉइट येथे नेण्यात आला. तेथे लक्षावधी लोकांनी तिचं अन्त्यदर्शन घेतलं.
       २ नोव्हेंबर २००५ रोजी तिची शवपेटिका अमेरिकी राष्ट्रध्वजात गुंडाळून शहरभरात तिची मिरवणूक काढण्यात आली. तिच्या आई आणि पतीजवळच तिचं दफन करण्यात आलं. ते दफनस्थान जिथे होतं, तेथील ख्रिस्ती चॅपल्ला ‘रोझा पार्क्स फ्रीडम चॅपल्’ हे नाव देऊन तिची स्मृती चिरंतन रूपात जपण्यात आली आहे. ४ फेब्रुवारी हा तिचा जन्मदिवस आणि तिला कैद करण्यात आलं, तो १ डिसेंबरचा दिवस ओहयो आणि कॅलिफोर्नियामध्ये ‘रोझा पार्क्स डे’ म्हणून साजरा केला जातो. ‘एक तेवती मेणबत्ती इतर हजारो मेणबत्त्यांना प्रज्वलित करू शकते आणि तसं केल्यानं मूळ मेणबत्तीचं आयुष्य उणावत नसतं,’ अशा अर्थाची एक चिनी म्हण आहे. रोझा ती आद्य मेणबत्ती आहे. तिनं भेदभावाचा अंधकार नामशेष केला, माणसाचं माणूसपण टिकवलं!

=============================================================================           जर तुमच्याकडे Hindi, english, किंवा marathi भाषेमध्ये काही article,  स्टोरी, किंवा कविता जी तुम्हाला share करायची आहे. तर कृपया ती माहिती आपल्या फोटोसोबत (फोटो नसला तरी चालेल) आम्हाला email करा  E-mail करा.
        आमचा email Id आहे : rohit.shelake7@gmail.com    आम्ही त्याला तुमच्या नाव व फोटोसहित या ब्लॉग वर PUBLISH करु.
Thanks !

माझे नवीन लेखन

खरा सुखी

 समाधान पैशावर अवलंबून नसतं, सुख पैशानं मोजता येत नसतं. पण, सुखासमाधानानं जगण्यासाठी पैशांची गरज पडत असतेच. फक्त ते पैसे किती असावेत ते आपल्...