Sunday, December 28, 2014

काबूलच्या मुली मुलांच्या वेशात

अफगाण समाज आत्यंतिक पुरुषसत्ताक आहे.
मुलगा झाला की अमाप
कौतुकसोहळा आणि मुलगी झाली की सुतकी मरणकळा,
अशा टोकाच्या भावनांवर हा समाज जगतो. अशा समाजात मुलांचे
कपडे परिधान करून मुलगा असल्याचे
भासवणाऱ्या मुलींना ‘बचापोश’ म्हटले जाते.
या परंपरेचा उगम का झाला असावा आणि तिचे परिणाम
याचा धांडोळा घेण्याचे काम हे पुस्तक करते. या पुस्तकातून
अफगाण मुली केवळ मुलांनाच मिळणारे स्वातंत्र्य
काही काळ का होईना कसे मिळवतात याचे दर्शन
घडते. आणि एकंदर अफगाण
स्त्रियांची घुसमटही.
अफगाणिस्तानातील तालिबानी राजवट सुमारे
पाच वर्षे टिकली. १९९६ ते २००१ या काळात
तालिबानी दहशतवाद्यांनी अफगाण
जनतेचा अनन्वित छळ केला. स्त्रियांवरील
अत्याचारांनी तर कळस गाठला होता. ट्विन
टॉवर्सवरील हल्ल्यानंतर अमेरिकेने
लष्करी कारवाई करत
तालिबानची अफगाणिस्तानातील राजवट
उलथवून टाकली. ‘न्यूयॉर्क टाइम्स’मध्ये युद्ध
वार्ताहर म्हणून काम
करणारी जेनी नॉर्डबर्ग या काळात
अफगाणिस्तानमध्येच कार्यरत होती. युद्धविषयक
बातम्या देण्याचे काम करतानाच
ती अफगाणी संस्कृतीच्या अंतरंगात
डोकावण्याचा प्रयत्न करत होती. अफगाण
संस्कृतीत कित्येक पिढय़ांपासून चालत
आलेल्या ‘बचापोश’ परंपरेने तिचे लक्ष वेधून घेतले.
या परंपरेचा तिने शब्दबद्ध केलेला धांडोळा म्हणजे ‘द अंडरग्राऊंड
गर्ल्स ऑफ काबूल’ हे पुस्तक होय. ‘बचापोश’
परंपरेवरील लिखाणासाठी तिला २००५मध्ये
पुलित्झर हे मानाचे पारितोषिकही मिळाले आहे.
मुलांचे कपडे परिधान करून मुलगा असल्याचे
भासवणाऱ्या मुलींना ‘बचापोश’ म्हटले जाते. अफगाण
समाज आत्यंतिक पुरुषसत्ताक आहे.
मुलगा झाला की अमाप
कौतुकसोहळा आणि मुलगी झाली की सुतकी मरणकळा,
अशा टोकाच्या भावनांवर हा समाज जगतो. अशा समाजात ‘बचापोश’
या परंपरेचा उगम का झाला असावा आणि तिचे परिणाम
याचा धांडोळा घेण्याचे काम जेनीचे पुस्तक करते.
बचापोश परंपरेविषयी केलेल्या लिखाणातून आणि बचापोश
व्यक्तींच्या मुलाखतींमधून
ती अफगाण महिलांच्या सद्य:स्थितीवर
आणि लैंगिक असमानतेमुळे उद्भवलेल्या भयावह समस्यांवर
प्रकाश टाकते. स्त्री-
स्वातंत्र्याच्या आणि सुरक्षेच्या बाबतीत अफगाणिस्तान
जागतिक क्रमवारीत तळाच्या स्थानावर आहे; परंतु
जेनीने अफगाण महिलांच्या हीन-
दीन परिस्थितीवर भाष्य करतानाच
काही महिला ‘बचापोश’ला स्वत:साठी स्वातंत्र्याची दारे
काही काळापुरती का होईना किलकिली करून
घेण्याचे माध्यम कशामुळे समजतात,
याचाही आढावा घेते. पुरुषांना जे स्वातंत्र्य
अनुभवायला मिळते, ते आपणही पुरुषासारखा पेहराव
करून अनुभवायचे, हा ते स्वातंत्र्य मिळवण्याचा मध्यममार्ग.
या पुस्तकाचा मुख्य रोख बचापोश परंपरेवर
असला तरी अफगाणिस्तानातील
महिलांची सद्य:स्थिती कशी आहे,
याची तपशीलवार नोंद हे पुस्तक घेते.
ज्या कुटुंबांमध्ये एकही मुलगा नाही,
अशा कुटुंबांमध्ये लहानपणीच
एखाद्या बालिकेला मुलगा म्हणून वाढवले जाते. मुलांचे कपडे परिधान
करणे, मुलांप्रमाणे वागणे-बोलणे
अशा गोष्टी या मुली करतात. केवळ
मुलगी असल्यामुळे अफगाण समाजात अप्राप्य
असणाऱ्या गोष्टी बचापोश बनल्यानंतर सहजसाध्य
होतात. केवळ मुलांनाच असणारे स्वातंत्र्य बचापोश बनल्यानंतर
अनुभवता येते; पण बालपण सरल्यानंतर मात्र
या बचापोशना पुन्हा मुलगी म्हणून उर्वरित आयुष्य
जगावे लागते. पुरुषीपणाचा बुरखा उतरवून ठेवल्यानंतर
घडणारे स्थित्यंतर या मुलींसाठी मानसिक
आणि सामाजिकदृष्टय़ा वेदनादायी असते. पुरुषप्रधान
अफगाण समाजाने बचापोश
परंपरा का स्वीकारली असावी,
याची अनेक कारणे जेनी या पुस्तकात
विशद करते. कुटुंबात मुलगा असणे, ही गोष्ट
अफगाण समाजात अतिशय
प्रतिष्ठेची समजली जाते. केवळ
मुली असणाऱ्या कुटुंबांना समाजात
तेवढी किंमत नसते. आपल्याच
एखाद्या मुलीला बचापोश म्हणून वाढवले, तर
भविष्यात मुलगा जन्माला येऊ शकतो,
अशी अंधश्रद्धाही तेथे प्रचलित आहे.
तसेच, आपल्याच एखाद्या मुलीला बचापोश म्हणून
वाढवले, तर समाज टोमणे तरी मारणार
नाही आणि सामाजिक इभ्रतही टिकून
राहील, असा विचारही केवळ
मुली असणारी अफगाण कुटुंबे करतात.
त्यामुळे पिढय़ान्पिढय़ा ही परंपरा अफगाण
संस्कृतीत मूळ धरून आहे.
या पुस्तकाची सुरुवात अझिता या अफगाण संसद
सदस्याच्या मुलाखतीपासून होते.
अफगाणिस्तानातील
लोकशाहीवादी सरकारने
महिला सबलीकरणासाठी पाऊल उचलत
महिलांसाठी २५ टक्के आरक्षण लागू केले आहे.
अझिता ही काबूलमधल्या सुधारकी विचारांच्या घरात
लहानाची मोठी झाली.
तिचा नवरा गरीब शेतकरी आहे.
अझिता चार लेकींची आई आहे. संसद
सदस्य म्हणून मिळणाऱ्या आपल्या सामाजिक प्रतिष्ठेला एकच
गालबोट
लागल्याची धारणा अझिता आणि तिच्या नवऱ्याची धारणा झाली,
ती म्हणजे कुटुंबात सगळ्या मुलीच
असल्याची. आपली सामाजिक
प्रतिष्ठा जपण्यासाठी हे दाम्पत्य त्यांच्या सगळ्यात
धाकटय़ा मुलीला बचापोश बनवण्याचा निर्णय घेते. खुद्द
अझितानेदेखील लग्न होईपर्यंतचा काळ बचापोश
म्हणून काढला होता. बचापोश म्हणून
वाढलेल्या आणि आता स्वत:च्या मुलीलाही तशाच
पद्धतीने मोठे करणाऱ्या अझिताला अफगाण
मुलींच्या शिक्षणासाठी मात्र
काही तरी भरीव काम
करायचे आहे. अफगाणिस्तानला स्त्रियांसाठी सुरक्षित
बनवायची तिची अच्छा आहे.
वेगवेगळ्या कारणांमुळे बचापोश बनलेल्यांच्या अनेक
मुलाखती या पुस्तकात आहेत. कुटुंबात
कमावणाऱ्यांची संख्या जास्त असावी,
म्हणूनही मुलींना बचापोश बनवले जाते.
अनेक मुली बचापोश म्हणून वाढताना अनुभवलेले
स्वातंत्र्य नंतर हिरावले जाऊ नये,
या भीतीपोटी पौगंडावस्थेत
प्रवेश केल्यानंतरदेखील मुलगा म्हणूनच राहणे
पसंत करू, अशी भावना या पुस्तकातून व्यक्त
करताना दिसतात. ही बाब अफगाण
समाजातील भयावह लैंगिक विषमता अधोरेखित
करणारी आहे.
कुणीही बचापोश म्हणून जन्माला येत
नाही. ते बनवले जातात.
तरीही बचापोश म्हणून
वाढवलेल्या मुलीला मुलगा बनून आयुष्य
कंठण्याची ओढ का लागून राहते, हा प्रश्न
अस्वस्थ करणारा आहे.
पुरुषी वर्चस्वाच्या वरवंटय़ाखाली पिचलेल्या अफगाण
स्त्रीची घुसमट या परंपरेतून व्यक्त
होते.
अमेरिकेने अफगाणिस्तानातून तालिबानचे सरकार उलथवून लावले,
तेव्हा आता तरी या मागास आणि डोंगराळ प्रदेशात
विकासाचे वारे वाहू लागतील
आणि स्त्रियांची अवस्था चांगली होईल,
अशी आशा व्यक्त करण्यात
आली होती. अफगाणिस्तानच्या मुख्य
भूमीतील रहिवाशांमध्ये
तालिबानच्या भीतीचे अदृश्य सावट
त्या काळातही होतेच; पण तेव्हापासून
अफगाणिस्तानात लोकशाहीवादी सरकार
अस्तित्वात आहे. स्त्री-स्वातंत्र्य
आणि सक्षमीकरणासाठी तोकडी का होईना,
पावले पडण्यास सुरुवात झाली आहे; परंतु सुमारे
तेरा वर्षे अफगाणिस्तानमध्ये तळ ठोकून राहिलेले अमेरिकन सैन्य
या आठवडय़ात माघारी जाईल. त्यानंतर
तालिबानचा उपद्रव परत
वाढण्याची भीती आहे.
उदारमतवादाची थोडीशी झुळूक
अनुभवलेल्या अफगाण समाजात जरा कुठे बदलाला सुरुवात
झालेली असताना, मुली पुन्हा शिक्षण
घेऊ लागलेल्या असताना तालिबानच्या रूपाने
मूलतत्त्ववादी शक्ती या प्रक्रियेला खीळ
घालण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
तालिबानी अत्याचारांचे प्रमुख लक्ष्य
ठरतील त्या अफगाण स्त्रिया! जेनीने
या संदर्भात अस्वस्थ करणारे अनेक प्रश्न या पुस्तकातून
उपस्थित केले आहेत. कमालीच्या पुरुषप्रधान
समाजामध्ये आपले स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अफगाण
स्त्रिया झगडत आहेत. बचापोश बनून
काही जणींनी हे स्वातंत्र्य
तात्पुरत्या काळासाठी अनुभवलेही असेल;
पण आपल्या समाजात स्त्री-पुरुष समता प्रस्थापित
होण्यासाठी अफगाणी स्त्रीला आणखी किती वर्षे
वाट पाहावी लागणार, या जेनीने उपस्थित
केलेल्या प्रश्नाचे उत्तर शोधणे
आता बदललेल्या राजकीय संदर्भामुळे
आणि मूलतत्त्ववादी शक्तींनी पुन्हा डोके
वर काढल्यामुळे आणखी जटिल होईल.
द अंडरग्राऊंड गर्ल्स ऑफ काबूल : जेनी नॉर्डबर्ग
विरागो पब्लिशर्स,
पाने : २८८, किंमत : २३९ रुपये.

No comments:

Post a Comment

माझे नवीन लेखन

खरा सुखी

 समाधान पैशावर अवलंबून नसतं, सुख पैशानं मोजता येत नसतं. पण, सुखासमाधानानं जगण्यासाठी पैशांची गरज पडत असतेच. फक्त ते पैसे किती असावेत ते आपल्...