Monday, December 1, 2014

१ डिसेंबर ‘रोझा पार्क्स डे’

अमेरिकेतील ‘समान नागरी अधिकार’ या चळवळीची आद्य प्रवर्तक समजली जाणारी रोझा पार्क्स.
   रोझानं जी ठिणगी चेतवली, तो धगधगता वन्ही बनला आणि त्याची परिणती १९६४ सालच्या सिव्हिल राइट्स अॅक्ट’मध्ये झाली. या कायद्यान्वये ‘वंश, वर्ण, धर्म किंवा मूळ देश’ यावर आधारित भेदभाव करण्यास कायद्यानं बंदी घालण्यात आली. एक तेवती मेणबत्ती इतर हजारो मेणबत्त्यांना प्रज्वलित करू शकते. रोझा ती आद्य मेणबत्ती आहे. तिला कैद करण्यात आलं, तो १ डिसेंबर ‘रोझा पार्क्स डे’ म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्तानं..
               तो दिवस होता गुरुवार, १ डिसेंबर १९५५. दिवसभर काम करून थकून गेलेली रोझा (पार्क्स) संध्याकाळी सहा वाजता माँटगोमेरी, अॅलाबामा येथील बसमध्ये चढली. पैसे भरून तिनं प्रवेश केला आणि कृष्णवर्णीयांसाठी राखीव भागातील पहिल्या रांगेतील एका रिकाम्या सीटवर जाऊन बसली. गोऱ्यांसाठीच्या दहा राखीव रांगांपाठची तिची सीट होती.
        नेहमीच्या मार्गानं बस जात असताना गोऱ्यांसाठीच्या साऱ्या राखीव जागा भरून गेल्या. एम्पायर-थिएटर- स्टॉपपाशी गोऱ्यांचा एक मोठा घोळका आत शिरला. दोन-तीन गोरे लोक उभे असलेले पाहून जेम्स ब्लेक या बसड्रायव्हरनं‘कृष्णवर्णीयांसाठी’ ही पाटी मागे हलवली आणि रोझासकट चार कृष्णवर्णीयांना उठून जागा मोकळी करून द्यायला फर्मावलं.
       वर्णद्वेष-वंशद्वेष यांनी बुजबुजलेल्या दक्षिणेकडच्या अॅलाबामा राज्यात जन्मलेल्या आणि वाढलेल्या रोझानं आजवर प्राक्तनाचा निमूटपणे स्वीकार केला होता. आज मात्र तिच्या सहनशक्तीचा कडेलोट झाला! तिचा अणू-रेणू संतापानं पेटून उठला. या अन्यायाविरुद्ध लढण्याचा निग्रह तिच्या ठायी कुठून संचारला कोण जाणे! ब्लेकच्या उर्मट फर्मानाला अजिबात दाद न देता रोझा ठामपणे तिथेच बसून राहिली. इतर तीन लोक उठून गेले, तरी रोझा तसूभरही हलली नाही. धमक्यांना ती जुमानत नाही हे पाहून, ब्लेकनं पोलिसांना बोलावलं आणि तिला कैद केलं . ती कुप्रसिद्ध बस, भेदभाव करणारी त्यातली सीट्सची आखणी आणि कैद झालेल्या रोझाचा फोटो पाहिला की, आजही आपलं मन संतापानं पेटून उठतं!
              कृष्णवर्णीयांविरुद्ध असा भेदभाव करणारा ठराव माँटगोमेरी शहरानं १९०० साली मंजूर करून घेतला होता. (या ठरावात मतदानाचा हक्क फक्त गोऱ्यांनाच दिलेला होता.) या ठरावानुसार, एकाच बसमधून प्रवास करणाऱ्या गौर आणि कृष्णवर्णीयांना वंशानुसार वेगळय़ा जागांवर बसणं सक्तीचं केलं गेलं. अशा जागा नेमून देण्याचे अधिकार बस-कंडक्टर्सना देण्यात आले. कालांतरानं जी प्रथा पडली, त्यानुसार माँटगोमेरीतील बसचालक गौरवर्णीयांसाठीच्या राखीव जागा भरून गेल्यावर कृष्णवर्णीयांना आपल्या जागेवरून उठायला लावू लागले. परंतु आज कुणी तरी धाडस करून या अन्यायाविरुद्ध बंड पुकारलं होतं!
    वर्णभेद आणि वंशभेद हा अमेरिकेवरचा काळाकुट्ट डाग होता. नागरी युद्धानंतर अमेरिकेच्या घटनेत तीन दुरुस्त्या करण्यात आल्या होत्या. क्रमांक तेराच्या घटना-दुरुस्तीन्वये ‘गुलामगिरी’ कायद्यानं रद्द करण्यात आली. क्रमांक चौदाच्या दुरुस्तीन्वये आफ्रिकन-
अमेरिकन्सना अमेरिकेचं नागरिकत्व देण्यात आलं आणि पंधराव्या घटना दुरुस्तीन्वये फक्त कृष्णवर्णीय पुरुषांनाच मतदानाचे अधिकार देण्यात आले. १८७७ सालापर्यंत या घटना दुरुस्त्या कार्यान्वित करून देशाची पुनर्रचना करण्याचा जो प्रयत्न करण्यात आला, तेव्हाचा कालखंड मोठा खळबळजनक होता. या पुनर्रचनेसाठी मध्यवर्ती सरकारच्या प्रामाणिक प्रयत्नांना दक्षिणेकडच्या राज्यातील गोऱ्यांनी प्रचंड विरोध केला.
          त्यातूनच ‘कू क्लक्स क्लॅन’ किंवा फक्त ‘केकेके’ म्हणून परिचित असणाऱ्या बंडखोर चळवळींची आणि गटांची सुरुवात झाली आणि कृष्णवर्णीयांवर प्रचंड अत्याचार केले जाऊ लागले. गौरवर्णीयांचं वर्चस्व कायम ठेवू इच्छिणारे बलिष्ठ गट दक्षिणेकडच्या राज्यांमध्ये निर्माण झाले आणि ते कायद्याला धाब्यावर बसवू लागले. १८७६ च्या वादग्रस्त अध्यक्षीय निवडणुकीनंतर या पुनर्रचना अध्यायाची समाप्ती झाली. १८९० ते १९०८ या काळात, दक्षिणेकडच्या राज्यांत नवी घटना आणि कायदे संमत करून घेतले आणि कृष्णवर्णीयांचे नागरी हक्क काढून घ्यायला प्रारंभ केला. त्यांना वेगळं पाडायला, त्यांच्या मुलांना गौरवर्णीय मुलांच्या शाळेत प्रवेश न देता अत्यल्प सुविधा असलेल्या वेगळय़ा शाळांमध्ये पाठवायला प्रारंभ झाला.
             कोणत्या तरी सबबीखाली कृष्णवर्णीय पुरुषांची नावं मतदार यादीतून खोडली जाऊ लागली. मतदानाचा हक्क गमावल्यामुळे आपलं प्रतिनिधित्व करून आपलं हित जपणारे उमेदवार निवडून देणं त्यांना अशक्य झालं. गळचेपी करणाऱ्या अशा वर्ण-वंशद्वेष्टय़ा परिस्थितीतून बाहेर पडण्याचे कायदेशीर मार्ग त्यांच्यापुढे खुले नव्हते.
अशा परिस्थितीतच रोझा पार्क्स जन्मली आणि वाढली. ४ फेब्रुवारी १९१३ रोजी टस्कजी अॅलाबामा येथे तिचा जन्म झाला.तिच्या आई-वडिलांची फारकत झाल्यावर, ती तिची आई आणि भाऊ तिच्या आजोळी माँटगोमेरीच्या उपनगरात राहू लागले. बालपणी तिच्या घरावरून ‘केकेके’च्या समर्थकांचे मोर्चे जाताना हातात बंदूक घेऊन घराची राखण करणारे तिचे आजोबा तिच्या स्मृतीत कोरले गेले होते. सार्वजनिक सुविधांबद्दलचा भेदभाव, कृष्णवर्णीयांसाठीच्या निकृष्ट शाळा, फक्त गोऱ्या मुलांना स्कूल बसनं जाताना पाहणं आणि स्वत: मात्र तंगडतोड करून शाळेत जाणं हे प्राक्तन तिनं निमूटपणे स्वीकारलं होतं.
       १९३२ साली रोझानं रेमंड पार्क्स या माँटगोमेरीतील नाभिकाशी विवाह केला. त्याच्या उत्तेजनामुळे तिनं १९३३ साली अपूर्ण राहिलेलं आपलं शालेय शिक्षण पूर्ण केलं. भेदभाव करणाऱ्या कायद्यावर मात करून, तिसऱ्या प्रयत्नानंतर तिनं मतदार-यादीत आपलं नावही नोंदवलं. तिचे पती एनएएसीपी (नॅशनल असोसिएशन फॉर द अॅडव्हान्समेंट ऑफ कलर्ट पीपल) या संस्थेचे सक्रिय कार्यकर्ते होते. १९४३ साली रोझानंसुद्धा या संस्थेत जोमानं काम करायला प्रारंभ केला आणि त्या संस्थेची सचिव म्हणून ती निवडून आली. १९५७ सालापर्यंत तिनं ते पद सांभाळलं. हे पद सांभाळत असताना, रेसी टेलर या कृष्णवर्णीय स्त्रीवर केल्या गेलेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेचा तिनं चांगलाच पाठपुरावा केला आणि तिला न्याय मिळवून देण्यासाठी जोरदार मोहीम उघडली.
        १९४४ नंतर रोझानं मॅक्सवेल एअरफोर्स बेसवर काही काळ नोकरी केली. ही जागा मध्यवर्ती सरकारच्या अखत्यारीतली असल्यामुळे, तेथे वर्णभेदाला मज्जाव होता. ‘त्या अनुभवामुळे माझे डोळे उघडले!’ असं तिनं आपल्या आत्मचरित्रात नमूद केलं आहे. तिनं काही काळ क्लिफर्ड आणि व्हर्जिनिया डर या गौर दाम्पत्याच्या घरी हाऊसकीपर म्हणून काम केलं. हे अत्यंत उदार मतवारी राजकीय दृष्टिकोन राखणारं दाम्पत्य होतं. तिला कैद झाल्यावर तिची जामिनावर सुटका करण्यासाठी क्लिफर्ड डर आणि ‘एनएएसीपी’च्या एडगर निक्सन या अध्यक्षानं पुढाकार घेतला. रोझानं जुलमी कायद्यांना जो विरोध केला, त्यानंतर ‘एनएएसीपी’ या संस्थेनं पटापट निर्णय घेतले.  
        निक्सननं विमेन्स पॉलिटिकल काऊन्सिलबरोबर विचारविनिमय करून रातोरात ३४,००० पत्रकं छापवून घेतली आणि भेदभाव करणारे कायदे राबवणाऱ्या बसेसवर बेमुदत बहिष्कार टाकण्याचं आवाहन कृष्णवर्णीयांपुढे केलं. ७५ टक्के कृष्णवर्णीयच बसेसचे ग्राहक होते.
           ४ डिसेंबर १९५५ रोजी निक्सननं स्थानिक चर्चेमध्ये या बस-बहिष्काराची घोषणा केली. ‘माँटगोमेरी-अॅडव्हर्टायझर’ या पेपरनं पहिल्याच पानावर या बहिष्काराला ठळक प्रसिद्धी दिली. कृष्णवर्णीयांनी एकमुखानं या बहिष्काराला पाठिंबा दिला. त्यांना सौजन्याची वागणूक दिली जाईपर्यंत, कृष्णवर्णीय ड्रायव्हर्स नेमले जाईपर्यंत आणि बसच्या मध्यानंतरच्या सीट्स प्रथम प्रवेश करणाऱ्याला दिल्या जाईपर्यंत हा बहिष्कार चालू ठेवण्याचा निर्णय एकमुखानं घेण्यात आला. ३८१ दिवस हा बहिष्कार सुरू ठेवला गेला. अनेक वैयक्तिक अडचणी सोसून, वेळेला पावसाळय़ात वीस वीस मैल पायपीट करून कृष्णवर्णीयांनी निग्रहानं हा लढा दिला. अनेक महिने बसेस रिकाम्या राहिल्या. बस कंपन्यांचं प्रचंड आर्थिक नुकसान झालं. अखेरीस माँटगोमेरीमधला हा भेदभावाचा कायदा रद्द करण्यात आला.
         रोझाच्या निर्णायक कृतीमुळे अमेरिकेतील नागरी अधिकार चळवळीकडे साऱ्या जगाचं लक्ष वेधलं गेलं. या बस-बहिष्काराच्या वेळेस आणखी एक प्रभावी नेतृत्व उदयाला आलं- मार्टिन ल्यूथर किंग ज्युनियर!
आपल्या कृतीमुळे रोझाला आणि तिच्या पतीला आपली नोकरी गमावावी लागली. त्यांनी खूप हालअपेष्टा सोसूनही जागोजागी भाषणं करून समान नागरी अधिकारांसाठी जनजागृती केली. कालांतरानं त्यांनी डेट्रॉइट येथे स्थलांतर केले. १९६५ ते १९८८ या कालखंडात रोझानं जॉन कॉन्यर्स या कृष्णवर्णीय काँग्रेसमनची सेक्रेटरी म्हणून काम केलं. याच कॉन्यर्सनं रोझाचं वर्णन ‘अत्यंत शांत, अत्यंत प्रसन्न, अत्यंत असामान्य व्यक्ती अशी एकमेव रोझा पार्क्स’ अशा शब्दात केलं आहे.
        रोझानं जी ठिणगी चेतवली, तो धगधगता वन्ही बनला आणि त्याची परिणती १९६४ सालच्या ‘सिव्हिल राइट्स अॅक्ट’मध्ये झाली. या कायद्यान्वये ‘वंश, वर्ण, धर्म किंवा मूळ देश’ यावर आधारित भेदभाव करण्यास कायद्यानं बंदी घालण्यात आली. नोकरी किंवा जागेसंदर्भात असा भेदभाव करणं बेकायदा समजलं जाऊ लागलं. १९६५ सालच्या ‘व्होटिंग राइट्स अॅक्ट’मुळे सर्वाना मतदानाचा हक्क लाभला आहे. त्याच वर्षी मंजूर झालेल्या ‘इमिग्रेशन अॅक्ट’मुळे जगभरातील सर्वाना अमेरिकेत स्थलांतर करण्याची मोकळीक मिळाली आहे. तोवर प्रामुख्यानं युरोपमधले लोकच स्वीकारले जात होते.
        रोझानं जे इवलं बीज लावलं, त्याचा वेलू गगनावेरी गेलेला तिला पाहता आला. १९७७ साली सर्व निकटचे आप्त निवर्तल्यावर रोझानं स्वत:ला पूर्णवेळ समाजकार्याला वाहून घेतलं. भाषणं करून जमवलेले सर्व पैसे तिनं या कार्यासाठी देऊन टाकले. अनेक समाजसेवी संस्था स्थापन केल्या. तिच्या या अविरत कार्याची देशानं दखल घेतली आणि तिला असंख्य पुरस्कारांनी सन्मानित केलं.
         २४ ऑक्टोबर २००५ रोजी, वयाच्या ९२व्या वर्षी वृद्धापकाळानं तिला मृत्यू आला. तिची शवपेटिका काही काळ इतमामानं माँटगोमेरीत ठेवण्यात आली. तिला श्रद्धांजली वाहताना, अमेरिकेची तत्कालीन कृष्णवर्णीय परराष्ट्रमंत्री काँडोलिसा राइस, हिनं म्हटलं, ‘रोझा पार्क्सनं हे कार्य केलं नसतं, तर मी कधीही हे उच्च पद मिळवू शकले नसते!’ तेथून रोझाची शवपेटिका यू.एस.कॅपिटॉलच्या गोलघुमटाच्या खोलीत सन्मानपूर्वक ठेवण्यात आली. अमेरिकी सरकारची कर्मचारी नसताना हा बहुमान मिळवणारी ती पहिलीच स्त्री होती. तेथून तिचा देह डिट्रॉइट येथे नेण्यात आला. तेथे लक्षावधी लोकांनी तिचं अन्त्यदर्शन घेतलं.
       २ नोव्हेंबर २००५ रोजी तिची शवपेटिका अमेरिकी राष्ट्रध्वजात गुंडाळून शहरभरात तिची मिरवणूक काढण्यात आली. तिच्या आई आणि पतीजवळच तिचं दफन करण्यात आलं. ते दफनस्थान जिथे होतं, तेथील ख्रिस्ती चॅपल्ला ‘रोझा पार्क्स फ्रीडम चॅपल्’ हे नाव देऊन तिची स्मृती चिरंतन रूपात जपण्यात आली आहे. ४ फेब्रुवारी हा तिचा जन्मदिवस आणि तिला कैद करण्यात आलं, तो १ डिसेंबरचा दिवस ओहयो आणि कॅलिफोर्नियामध्ये ‘रोझा पार्क्स डे’ म्हणून साजरा केला जातो. ‘एक तेवती मेणबत्ती इतर हजारो मेणबत्त्यांना प्रज्वलित करू शकते आणि तसं केल्यानं मूळ मेणबत्तीचं आयुष्य उणावत नसतं,’ अशा अर्थाची एक चिनी म्हण आहे. रोझा ती आद्य मेणबत्ती आहे. तिनं भेदभावाचा अंधकार नामशेष केला, माणसाचं माणूसपण टिकवलं!
=============================================================================           जर तुमच्याकडे Hindi, english, किंवा marathi भाषेमध्ये काही article,  स्टोरी, किंवा कविता जी तुम्हाला share करायची आहे. तर कृपया ती माहिती आपल्या फोटोसोबत (फोटो नसला तरी चालेल) आम्हाला email करा  E-mail करा.
        आमचा email Id आहे : rohit.shelake7@gmail.com    आम्ही त्याला तुमच्या नाव व फोटोसहित या ब्लॉग वर PUBLISH करु.
Thanks !

No comments:

Post a Comment

माझे नवीन लेखन

खरा सुखी

 समाधान पैशावर अवलंबून नसतं, सुख पैशानं मोजता येत नसतं. पण, सुखासमाधानानं जगण्यासाठी पैशांची गरज पडत असतेच. फक्त ते पैसे किती असावेत ते आपल्...