Monday, June 11, 2018

आई कोणालाच कळत नाही

आई  तुला काही कळत नाही !
किती सहजपणे आपण हे वाक्य उच्चारतो⁉

खरच आई तुला काही कळत नाही

ज्या दिवसी पोटात बाळ असल्याची जाणीव होते , त्या दिवसापासून ती स्वतःसाठी जगायचे विसरून गेलेली असते ,
खरच आई तुला काही कळत नाही !

दिवसभर  घरातील सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडून दमलेली तू
रात्रीच्या रात्री आमच्यासाठी जागून काढते ,
लहान असताना आम्ही का रडतोय हे न कळाल्याने आणि
आम्ही मोठे असताना तुला का रडवतोय ? हे न कळाल्यामुळे ,
खरच आई तुला काही कळत नाही !

आमचा चेहरा कोणत्याही कारणाने पडला तर तुझ्या हातातला घास तोंडात न जाता ताटातच गळून पडतो , मग
तुला कितीही भूक लागलेली असली तरी ,
खरच आई तुला काही कळत नाही !

आमच्या चुकीला झाकताना प्रसंगी बापाच्या शिव्या खाऊन , काही वेळा मार खाऊनही
तू कधी चकार शब्द उच्चारला नाही ,
खरच आई तुला काही कळत नाही !

बाजारातून आणलेला खाऊ प्रत्येक घरात मर्यादित असतो , तुलाही तो आमच्याइतकाच आवडत असतो , पण
तुझ्या वाट्याला तो नेहमी सर्वांपेक्षा कमी येतो , तरीही आई तू आयुष्यात एकदासुध्दा तक्रार केली नाही ,
खरच आई तुला काही कळत नाही !

मुलावर कर्ज झाले तर बापाच्या परस्पर मागच्या हाताने आमच्यासाठीच ठेवलेले पैसे गुपचूप आम्हाला देते , वेळ आलीच तर स्वतःचे दागिनेही देते आणि
समारंभात खोटे दागिने घालून उसने हासू चेहऱ्यावर आणून मिरवते आणि आमचे कार्यक्रम राबराब राबून उत्साहाने पार पाडते ,
खरच आई तुला काही कळत नाही !

आमच्यावर कोणी चालून आला , तर
आपल्या जीवाची पर्वा न करता माणूसच काय ? तू नाग , वाघ आणि बिबट्यावरही धाऊन जाते ,
खरच आई तुला काही कळत नाही !

शेवटचा श्वास घेतानासुध्दा लेकराचाच विचार आणि काळजी करत तू प्राण सोडते ,
शेवटी देवाचे नाव मुखात यावे हे तुला माहीत असूनही तू लेकराचेच नाव घेते , आईला देवापेक्षाही लेकरू मोठे वाटते ,
खरच आई तुला काही कळत नाही !

म्हणून देवही तुझ्यापुढे खुजा आहे ,
पण तुला हे कधी समजलेच नाही ,
खरच आई तुला काही कळत नाही !

लेकुराचे हीत ।
वाहे माऊलीचे चित्त ।।
ऐसी कळवळ्याची जाती ।
करी लाभावीण प्रिती ।।
खरच आई तुला काही कळत नाही !
                    आणि
  आई कोणालाच कळत नाही !

No comments:

Post a Comment

माझे नवीन लेखन

खरा सुखी

 समाधान पैशावर अवलंबून नसतं, सुख पैशानं मोजता येत नसतं. पण, सुखासमाधानानं जगण्यासाठी पैशांची गरज पडत असतेच. फक्त ते पैसे किती असावेत ते आपल्...