कंपन्यांच्या चार्टर्ड अकौंटन्ट मध्ये व्हिसल ब्लोअर कधी जन्माला येतील ?
(राजकारण, कॉर्पोरेट, बँकिंग क्षेत्रातील भ्रष्ट व्यक्तींना मध्यमवर्गातील विविध प्रोफेशनल्सनी साथ दिली नाही तर हि लोक काहीही करू शकणार नाहीत हे सत्य आहे).
कितीतरी मेडिकल डॉक्टर्स आहेत जे आपल्या प्रोफेशन मध्ये जे काही चालते त्याबद्दल नाराजच नाहीत तर त्याचा सार्वजनिक रित्या, पुस्तके लिहून निषेध करतात. एव्हढेच नव्हे तर पर्यायी, जनकेंद्री आरोग्य संस्था मध्ये काम करतात
कितीतरी पोलीस इन्स्पेक्टर आहेत ज्यांनी किमान निवृत्तीनंतर आपल्या खात्यातील अनेक अनिष्ट गोष्टींबाबत चिरफाड केली आहे
कितीतरी आयएएस अधिकारी व्हिसल ब्लोअर झाले आहेत. काही तरुण आयएएस अधिकारी शहीद झाले आहेत. काहींनी सरासरी वर्षाला एक अशी बदली “भोगली” आहे. आपल्या कौटुंबिक आयुष्याची वाताहत सहन केली आहे.
डझनांनी इंजिनियर्स स्वतः अनेक परिवर्तनवादी चळवळीत कार्यकर्ते आहेत
अर्थतज्ज्ञ, समाजशास्त्रज्ञ तर एकमेकांची डोकी फोडायचे बाकी असतात
मीडिया, प्रिंट व इलेक्ट्रॉनिक दोन्ही, मधील पत्रकार, शोध पत्रकारिता करून आपला जीव धोक्यात घालतात. आपल्या वर्तमानपत्राचा व चॅनेलचा मालक बदलला कि देशोधडीला लागतात.
कवी घ्या, नाटककार घ्या, साहित्यिक घ्या, सर्वच मध्यमवर्गीय प्रोफेशनल्स मध्ये आपल्याच व्यवसायबंधूंचे वाभाडे काढणारे लोक सापडतात.
मान्य. आपल्याच व्यवसाय बंधूंविरुद्ध काही एका तत्वावर आधारित बंडखोरी करणाऱ्यांची संख्या, एकूण व्यावसायिकांच्या पेक्षा कमी भरेल. मान्य. पण आहेत ते ठळक, डोळ्यात भरणारे आहेत. आपला पेशा नीट चालावा याची त्यांना कळकळ आहे. त्यासाठी ते किमती मोजत असतात.
पण कंपन्यांचे ऑडिट करणारे चार्टर्ड अकाउंटंट्स ?
तुम्ही एका तरी चार्टर्ड अकाउंटंटचे नाव ऐकले आहे का ? ज्याने आपल्या व्यवसायातीलअशा प्रथा व प्रॅक्टिसेस बद्दल, ज्या कायद्याला धरून असतील कदाचित, पण व्यावसायिक नीतिमत्तेला धरून नाहीत, ज्या सार्वजनिक हिताला बाधा आणणाऱ्या आहेत त्याबद्दल सार्वजनिक व्यासपीठांवर जाहीर नापसंती व्यक्त केली आहे ?
एक तरी व्हिसल ब्लोअर ?
कंपनी घ्या, बँक घ्या. एखादा घोटाळा ज्यावेळी उघडकीस येतो त्यावेळी तांत्रिक दृष्ट्या ती एक घटना असते. पण घटना म्हणजे अचानक ढगफुटी झाली, ज्याचा अंदाज येऊ शकला नव्हता,असे काही नसते. प्रत्यक्षात ते गैरव्यवहार अनेक दिवस सुरूच असतात. ते थेंबे थेंबे साचत जातात. मग एखादी अनपेक्षित घटना घडते आणि गळू फुटून घाण पु बाहेर यावा तसे सगळे डिटेल्स बाहेर येऊ लागतात.
त्या कंपनीतील व बँकेतील जे कर्मचारी, उच्चपदस्थ अधिकारी त्या गैरप्रकारात प्रत्यक्ष सामील असतात त्यांना तूर्तास बाजूला ठेवूया.
पण चार्टर्ड अकाउंटंट्स तर त्या कंपनीचे व बँकेचे अधिकारी नसतात. ते बाहेरचे असतात. त्यांना संवैधानिक अधिकार असतात. आणि सर्वात महत्वाचे ते व्यापक अर्थाने समाजातर्फे कंपनी व बँकेच्या आतमध्ये जे पैशाचे व्यवहार होतात ते कायद्याला धरून आहेत किंवा कसे यावर शिक्कामोर्तब करीत असतात.
कायद्याप्रमाणे त्या कंपनीत व बँकेत आलेला व गेलेला प्रत्येक रुपयाचा हिशोब ठेवणे हे बंधनकारक आहे. हे काम व्यवस्थापनाचे असते. पण ते काम पारदर्शीपणे, लेखांकनाच्या (अकाउंटन्सी) नियमाप्रमाणे काटेकोरपणे केले गेलेले आहे कि नाही हे पाहण्याची जबाबदारी चार्टर्ड अकाउंट ची असते.
कोणत्याही कंपनीची बॅलन्स शीट उघडून बघा. त्या कंपनीच्या चार्टर्ड अकाउंटंट नि “As per the information provided by the management” हे वाक्य अनेक वेळा आपल्या अहवालात लिहिलेले असते. पण कोणतीही अधिकची माहिती मागण्याचा अधिकार चार्टर्ड अकाउंटंटला असताना तो अधिकार गाजवला कि नाही याबद्दल चार्टर्ड अकाउंट गप्प बसतात. ना त्यांना जाब विचारणारी कोणती यंत्रणा अस्तित्वात आहे.
कंपनी किंवा बँकेचे जमाखर्च व ताळेबंद ज्यावेळी त्यांच्या स्टॅटयूटॉरी ऑडिटरने तपासून सही करून पब्लिश होतात त्यावेळी गुंतवणूकदार, बिझिनेस पार्टनर्स, कामगार, आयकर अधिकारी, नियामक मंडळाचे अधिकारी सर्वजण त्यातील प्रत्येक आकड्यावर विश्वास ठेवून आपापले निर्णय घेतात.
एव्हढी ताकद सीएच्या सही व शिक्यामध्ये आहे.
जे काही आर्थिक घोटाळे कॉर्पोरेट व बँकिंग क्षेत्रात होत आहेत त्याला बंद करण्याची नाही म्हणत मी, पण कमी करण्याची ताकद चार्टर्ड अकाउंटंट या पेशा मध्ये निश्चितच आहे. दुर्दैव हे आहे कि ते आपले समाजाप्रती असणारे कर्तव्य निभावत नाहीयेत.
तांत्रिक दृष्ट्या, कायदेशीर दृष्ट्या कोणत्याच चार्टर्ड अकाउंटंट ना घोटाळ्यासाठी जबाबदार धरता येईल कि नाही मला माहित नाही. मी त्या विषयातील एक्स्पर्ट नाही. माझा मुद्दा वेगळाच आहे. या चार्टर्ड अकाउंटंटची स्वतःची सद्सद्विवेक बुद्धी ? कॉन्शन्स ? काय बरोबर काय चूक हे वेगळे करण्याचा “नीरक्षीर” विवेक ? त्याचे काय ?
काही तरी गडबड आहे हे त्यांना कळलेले असून देखील ते ज्यावेळी बोटचेपेपणा करीत असतील त्यावेळी त्यांच्या मनात काय चालत असेल ? ते आपल्या बायको व प्रेयसी बरोबर असताना त्यांचे मन खात असेल ? आपल्याच मुलांबरोबर खेळतांना त्यांचे मन निर्मळ रहात असेल ? आपल्या म्हाताऱ्या आईला भेटताना तिच्या डोळ्याला डोळा ते देऊ शकत असतील ?
मुद्दा चार्टर्ड अकाउंटंटचा नाहीये दोस्तांनो !
मुद्दा खरेतर सर्वच मध्यमवर्गातील प्रोफेशनल्सचा आहे. ज्याची भली मोठी यादी वर केली आहे. कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणारे उच्चंपदस्थ अधिकारी, कॉर्पोरेट वकील, नोकरशहा, बँकर्स, सल्लागार, रेटिंग कंपन्या, गुंतवणूकदार कंपन्या, आंतरराष्ट्रीय व्यापाराचे तज्ज्ञ, कंपन्यांसाठी सर्व्हे करून देणारे समाजशास्त्रज्ञ व पर्यावरण सल्लागार इत्यादी ! या सगळ्यांची मिलीभगत असते असे म्हणणे अगदीच बालिशपणाचे होईल. पण त्यांचे व्यक्तिगत प्रोफेशनल आचरण ?
देशात, अर्थव्यवस्थेत घोटाळा, भष्टाचार उघडकीस आला कि त्यावेळी एकतर राजकीय नेत्यांची नावे घेतली जातात किंवा भांडवलदार, कारखानदार यांची. पण मध्यमवर्गातील विविध प्रोफेशनल्सनी त्यांना साथ दिली नाही तर भ्रष्टाचार करणारी हि मंडळी काहीही करू शकणार नाहीत हे सत्य आहे. मध्यमवर्गीय प्रोफेशनल्स त्यांना छोट्या गल्ली बोळ, कायद्यातील खाचाखोचा दाखवतात, काय केले म्हणजे काय होईल याचे सल्ले देतात. त्यांच्यासाठी कायद्याला धरून, भविष्यात कायद्यात कचाट्यात सापडू नये म्हणून सगळी कागदपत्रे व्यवस्थित बनवतात.
मध्यमवर्गातील सर्व प्रोफेशनल्सना आवाहन !
तुम्ही पैसे कमवण्याबद्दल सामान्य जनतेचे काहीच म्हणणे नाहीये हो. तो तुम्ही कमवा. पण पोट भरल्यावर तरी जे बरोबर नाहीये, ज्यातून सार्वजनिक हिताला नख लागणार आहे. राष्ट्राचे नुकसान होणार आहे, पुढील येणाऱ्या पिढ्यांचे नुकसान होणार आहे त्याबद्दल बोला, जमेल तसा त्याला अटकाव करा !
आज मध्यमवर्गातील शिकल्या सावरलेल्या विविध क्षेत्रातील प्रोफेशन्सनी (तांत्रिक व कायद्यातील तरतुदीमागे न लपता) आपल्या बायकोची, लहान मुलांची, आईची शपथ घेऊन आपल्या सद्सद्विवेक बुद्धीला स्मरून काम करायला सुरुवात केली तर या देशातील सामान्य नागरिकांसाठी, गरीब आया व त्यांच्या लहान मुलांसाठी तुम्ही खूप काही कराल दोस्तांनो !
कारण देशातील कोणत्याही भ्रष्टाचाराची अंतिम किंमत, जी हजारो किंवा लाखो कोटी रुपयांमध्ये असेल, देशातील सामान्य जनता मोजत असते. त्या कोट्यवधी गरीब लोकांचा तुम्हाला दुवा मिळेल. त्याची किंमत तुम्ही डोळेझाक करण्यासाठी जे काही पैसे कमवता ना त्यापेक्षा काही लाख पटींनी मोलाची असेल.
तुम्ही सगळे मध्यमवर्गीय प्रोफेशनल्स हुशार आहात, तज्ज्ञ आहात. जग फिरलेले आहात. इंटरनेट, गुगल, वर्तमानपत्र यातून जगाची खडानखडा माहिती ठेवणारे आहात. काय करा, काय करू नका हे आम्ही कोण सांगणार ? फक्त स्वतःशी प्रामाणिक रहा. बाकी सगळे “तुम्हारे हवाले” साथीयो !
संजीव चांदोरकर (२९ जुलै २०१८)
संग्रहित लेख
No comments:
Post a Comment