“दोष हा कुणाचा?”
एका हाॅटेलमध्ये जेवायला गेलो होतो. शेजारच्या टेबलावर चार मुली बसल्या होत्या. त्यांचं जेवण आटोपलं, वेटर ने बडीशेपचा बाऊल समोर ठेवला. चारही मुलींनी टिश्यू पेपरमध्ये बचकभर बडीशेप भरून घेतली आणि ती पुरचुंडी पर्समध्ये टाकली. आजूबाजूच्या १०० माणसांमध्ये असूनही आणि चांगल्या कुटुंबातल्या असूनही असं करताना त्यांना काहीही वाटलं नाही.
अनेक काॅलेजवयीन विद्यार्थी-विद्यार्थिनींना मी हाॅटेल्समधून चमचे चोरतानाही पाहिलं आहे. विमानातून प्रवास करताना काही मंडळी अक्षरश: ओंजळी भरभरून चाॅकलेट्स किंवा टाॅफीज् घेतात. काही रेल्वे प्रवासात पाण्याच्या बाटल्या प्रवाशांना दिल्या जातात. अनेकजण दोन-दोन किंवा तीन-तीन बाटल्या सुद्धा घेतात. रेल्वे प्रवासात (केवळ त्या प्रवासापुरतेच मिळणारे) टर्किश नॅपकिन्स सर्रास बॅगेत भरतात. साॅस किंवा साखरेची ट्रॅव्हलिंग पाऊचेस न विचारता उचलणे, टीबॅग्ज उचलणे, टिश्यू पेपर्सचा गठ्ठाच उचलणे हे प्रकार माणसं अगदी बिनधास्त करतात.
एकदा एका ट्रेक ला गेलो होतो आणि एका रिसाॅर्टवर राहिलो. तिथं आलेल्या एकानं शॅम्पूचे सॅशे आणि साबणाच्या छोट्या वड्यांचा बाॅक्सच उचलून नेला. एका सुशिक्षित, जाणत्या बाईंनी लाॅबीमध्ये सहज म्हणून वाचण्याकरिता ठेवलेली दोन मॅगेझिन्स उचलली आणि पर्समध्ये घातली. हा प्रकार आजूबाजूची माणसं, हाॅटेल व्यवस्थापनातले कर्मचारी पाहत होते. पण कुणी काही विरोध केला नाही.
घराजवळच्या हाॅट चिप्स च्या दुकानात गेलो होतो. दोन मुली आल्या. त्यांनी सात-आठ प्रकारचे वेफर्स टेस्ट करून पाहिले आणि काहीही खरेदी न करता निघून गेल्या. दुकानाचा मालक म्हणाला, “ऐसे तो बहोत लोग आतें हैं , सब के सब पढें-लिखे और अच्छे घर के ही होतें हैं । पता नहीं, ऐसा क्यूॅं करतें हैं?”
रस्त्यावरच्या एखाद्या फळविक्रेत्याकडे गेलात आणि फळं खरेदी करायची असतील तर एखादं फळ चवीपुरतं चाखायला देतो. काहीजण स्वत:च हात पुढं करून सात-आठ फळं तर उभ्या-उभ्या सहजच मटकावतात. चणे विक्रेते किंवा चुरमुऱ्यांची भट्टी चालवणाऱ्यांना तर हा अनुभव दररोज शंभरदा येत असेल. माणसं अगदी स्वत:चा हक्क असल्यासारखा हात घालतात.
मंडईत गेलो होतो. कैऱ्या विकणाऱ्या एका वयस्कर विक्रेतीसमोर एक काकू उभ्या राहिल्या. विक्रेतीनं भाव सांगितला आणि कैरीची एक फोड कापून त्यांच्या हातावर ठेवली. कैरीची फोड खात-खात काकू एक अक्षरही न बोलता निघून गेल्या. आम्ही दोघेही शेजारीच उभे होतो. तो प्रसंग पाहून आम्हालाच कसंतरी झालं.
चांगली शिकली-सवरलेली माणसं अशी का वागत असतील? आपण परदेशातल्या लोकांकडून त्यांची भाषा, राहणीमान, कपडे, फॅशन्स हे सगळं घेतलं पण सार्वजनिक आयुष्यात ती माणसं किती संतुलितपणे वागतात,हे आपण नाही स्वीकारत..!
कॅरीबॅगसाठी दुकानदारांशी हुज्जत घालणारी सुशिक्षित जनता मी पाहतो, तेव्हा मला त्यांच्या सुशिक्षितपणाचाच अर्थ लागत नाही. नुसतंच बाह्यरूप पाॅश करून आपण सुशिक्षित असल्याचा आभास निर्माण करत राहण्याच्याच कृत्रिम देखाव्याच्या चक्रात माणसं अडकली आहेत का?
हा बिनबुडाचा सुशिक्षितपणा केवळ अशा चोऱ्या-माऱ्या आणि उचलाउचलीचे उद्योग करून थांबत नाही. उघडपणे सामाजिक नियम मोडण्यातही हा वर्ग आघाडीवर आहे.
पेट्रोलपंपावर मोबाईल फोनवर गप्पा मारणे, एटीएम सेंटरमध्ये गाॅगल्स, स्कार्फ किंवा टोपी घालून जाणे, सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर खुशाल धूम्रपान करणे, सार्वजनिक ठिकाणी भर रस्त्यात बिनदिक्कतपणे थुंकणे, या गोष्टी करून माणसं नक्की काय दाखवण्याचा प्रयत्न करत असतात?
नामवंत काॅलेजेसमध्ये शिकणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी पार्किंग आणि नो पार्किंगमधला फरकही ओळखू शकत नाहीत का? सुशिक्षित माणसं मुद्दामच झेब्रा क्राॅसिंगवरच का थांबतात? शिकली-सवरलेली माणसं बसस्टाॅप सोडून भर रस्त्यावर गर्दी करून बसची वाट का पाहतात? खिशात पैसे असूनही बस कंडक्टर ला फसवून विनातिकीट प्रवास का करतात?
लक्ष्मी रस्ता हा जसा बाजारपेठेचा रस्ता आहे तसं ते माणसांच्या अतरंगीपणाची लक्षणं पाहण्याचंही एक ठिकाण आहे. माणसं रस्त्यातच आपली भलीमोठी चारचाकी गाडी थांबवून दुकानासमोर उतरतात आणि ड्रायव्हर ती गाडी रस्त्यातच उभी करून , काचा वर करून, आतमध्ये एसी लावून बसलेला असतो. बाकीची वाहतूक कोलमडून जाऊन याच्या नावानं शंख करत असते, पण हा एकदम कूल..!
माणसं कुल्फी घेतील आणि काड्या रस्त्यावरच टाकतील. मक्याचं कणीस घेतील, उरलेला भाग रस्त्यावरच टाकतील. प्लास्टिकच्या ग्लासात काॅर्नभेळ घेतील, रिकामा ग्लास रस्त्यावरच टाकून मोकळे.. याच रस्त्यावर मोबाईल फोनवर बोलत रस्ता क्राॅस करणारे अनेकजण दिसतील. नो एण्ट्री तून वाहने चालवणारे अनेकजण दिसतील. ही सगळी मंडळी लौकिकार्थानं किमान ग्रॅज्युएट तरी निश्चित असतात. पण, सार्वजनिक ठिकाणी कसं वागावं आणि कसं वागू नये, असा कुठला पेपर त्यांच्या कोर्समध्ये नसतो, त्यामुळे त्या विषयाचा त्यांना गंध नसतो. त्यामुळे, सार्वजनिक जीवनात सगळे नापास!
अनेक ठिकाणी खाऊगल्ल्या आहेत, तिथले खाद्यपदार्थ विक्रेते संध्याकाळी व्यवसाय संपला की, सांडपाणी थेट रस्त्यावर टाकून देतात. त्यामुळे तो रस्ता अस्वच्छ, चिकट होतो, माशा घोंगावतात. पण सार्वजनिक ठिकाणचं त्यांचं हे वागणं आपण कुणीही मनावर घेत नाही.
भर रात्री बारा वाजता झोपलेल्या जगाला जागं करून वाढदिवस साजरा करणारा एक नवीन वर्ग तयार झाला आहे. ही मंडळीसुद्धा सुशिक्षित असतात. अनेकदा काॅलेजात शिकत असतात. पण, भर रात्री केकच्या दुकानाबाहेरच टोळकं जमवून ज्याचा वाढदिवस आहे अशा उत्सवमूर्तीच्यातोंडाला, डोक्याला येथेच्छ केक फासून, त्याला दारू पाजून लाथाबुक्क्यांनी बदडून काढणे, त्याच्या डोक्यात अंडी फोडणे असे प्रकार करतात. हे सगळं चांगलं वागणं आहे का? आणि एकविसाव्या शतकातल्या समाजाला हे शोभतं का?
ही मंडळी असं का वागतात, याला काहीही उत्तर नसतं.अशी कितीतरी लोकोत्तर व्यक्तिमत्त्वं आपल्याला ठायीठायी दिसतील. ही माणसं उघडपणे चोऱ्या करतात, गरिबांना नाडतात, त्यांना त्रास देतात, स्वत:च्या वागणुकीनं इतरांचं सार्वजनिक आयुष्यही पार खराब करून टाकतात.
आपण यावर कधी आक्षेप घेतला आहे का?
लोकांना दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसेल पण स्वत:च्या ताटातलं मुसळ दिसणार नाही.
गाय दूध देते तेव्हा ते चांगलंच असतं. पण, आपण ते नीट तापवलं नाही तर ते नासणारच. म्हणून, मग आपण गायीला दोष देणार का? तांब्याच्या भांड्यात ठेवलेलं दही कळकलं तर दोष दह्याचा नसतो आणि भांड्याचाही नसतो, दोष दही तांब्याच्या भांड्यात ठेवणाऱ्याचा असतो.
आपण नेहमी प्रशासनाकडे, सरकारकडेच बोटं दाखवत राहू, आरोप करत राहू. सरकारकडून आपल्या अपेक्षा फार मोठ्या असतात, पण साध्या साध्या गोष्टी जपण्यातही आपण स्वत: कमी पडतो. स्वत:ला पारखलं आणि स्वत:च्या वागण्यातले दोष दूर करायचं ठरवलं तर प्रगतीला सुरूवात होईल..सगळं मळभ जाऊन आभाळ स्वच्छ होईल..!
समाजाने स्वत: पुढाकार घेऊन या साध्या साध्या गोष्टी सुधारल्या तर चांगले दिवस नक्कीच येतील...!
संग्रहित लेख
No comments:
Post a Comment