याच रस्त्याने जायचं ठरवलं आहे.
अनेक आले कमवून गेले
काहींनी जमिनी तर काही
साहित्यकार म्हणून प्रसिध्द झाले
पण या रस्त्याने जाताना
दिसणारा समाज आहे तिथेच
नव्हे हातात होते ते गमावलेला
संस्कृती विनाश डोळ्यासमोर
धर्म कर्मकांड पाड्यात घुसलेले
आता या रस्त्यावर आहेत काटे
तरी मी आशेचा किरण घेवुन
डोंगराची वाट दगडाची साथ
याच रस्त्याने जायचं ठरवलं आहे.
उगवणा-या सुर्याची किरणे
आता धूसर वाटत आहेत
प्रत्येक संकटात साथ देणारा
निसर्ग हरवत चालला आहे
दगड फोडून खाणी वाढत
जगण्याचे रस्ते गिळत आहेत
आता आकाशाला गवसणी
मी तरी का घालावी कुणासाठी
डोंगराची वाट दगडाची साथ
याच रस्त्याने जायचं ठरवलं आहे.
क्षणाचा भरोसा नाही
वर्तमानात जगत आहे
दगडफूलागत कहानी बनुन
जीवनाची चव चाखायची आहे
नेहमी प्रकाशाशी गप्पा मारून
इथे आशेचे किरण पोहचवायचे आहेत
आता निसर्गाचे चक्र बदलले आहे
जगण्याचा अंकुर संघर्ष करत आहे
डोंगराची वाट दगडाची साथ
याच रस्त्याने जायचं ठरवलं आहे.
अस्तित्वाची लढाई इथे आता
माझी माझ्याबरोबरच आहे
प्रवाहाच्या विरोधात जावून
संस्कृतीचे गीत गायचे आहे
अनेक लढाया खरेतर मी
फक्त पुस्तकात वाचल्या आहेत
रणांगणात लढताना मला
ध्येयाची साथ फक्त आहे
गुदमरलेला श्वास या मायाजालात
आता मला मोकळीक हवी आहे
डोंगराची वाट दगडाची साथ
याच रस्त्याने जायचं ठरवलं आहे.
हातात ताकद असुनही
लाजरेपणात खुप काही गमावले आहे
माझ्या पूर्वजांच्या इतिहासाची
ती जीर्ण पाने लिहायची आहेत
जगाच्या उध्दारातली भूमिका
आदिम संस्कृती जगायची आहे
डोंगराची वाट दगडाची साथ
याच रस्त्याने जायचं ठरवलं आहे.
संग्रहित कविता
No comments:
Post a Comment