Tuesday, December 25, 2018

शुक्रतारा

"तुझ्यासारखे गाणे कोण गाऊ शकतो ?"

एका मित्राने स्ययंपाक घरात जाऊन आईला मी नापास झाल्याचे सांगितले, तशी तातडीने आई बाहेर आली.माझ्या डोळ्यांतील पाणी पाहून समजावू लागली.तसं मला अधिकच रडू येऊ लागले.तशी ती बाबांच्या खोलीत गेली-त्यांना बोलवायला.
कुणा तरी कलाकाराचे गाणे ऐकत बसले होते ते.भोवती १०-१२ माणसे होती.
आईने त्यांना आत बोलावले, तसे बाबा म्हणाले," अग थांब फार चांगली चीज बांधलीय यानं जरा ऐकून येतो."
त्यांनी लवकर यावे म्हणून आई दबलेल्या आवाजात म्हणाली, " अहो, अरु नापास झालाय."
ते म्हणाले, " मग होईल पुढच्या वर्षी पास !"
तेव्हा आई काकुळतीने म्हणाली, " तो रडतोय "
तेव्हा बाबा उठले व माझ्या खोलीत आले.मी म्हणालो," या पुढे मी इंजिनीरिंगचा अभ्यास सोडून देतो व गाणेही.गाण्यामुळे शिक्षण नीट होत नाही व शिक्षणा मुळे म्हणावं तसं गाणे जमत नाही.तेव्हा मी नोकरी करेन.
त्यांनी ओळखलं की निराश झाल्यामुळे मी तसं म्हणत आहे.तसं करेल सुद्धा.
ते म्हणाले," तुझं शिक्षण ही माझी जबाबदारी आहे.तेव्हा तू का रडतोस ? रडायचं असेल तर मी रडायला हवं ! मी तर आनंदात आहे.तू परवा ज्या दोन गझला गायलास त्या फार चांगल्या म्हटल्यास.इतक्या की तुझ्या नापास होण्याचे मला इतकं सुद्धा दुःख वाटत नाही.मला एक सांग तुझ्या वर्गात किती मुले आहेत ? त्यातली किती पास झाली ? मी म्हटलं २० मुले आहेत त्यातील १५-१६ तरी पास झाली असतील." त्यावर ते म्हणाले ," १९ पास झालीत व तू एकटा नापास झालास समजू .पण तुझ्यासारखे गाणे म्हणू शकतील असे किती आहेत ?" मी म्हणालो," त्यांच्यापैकी कोणीच गात नाहीत.ते सारे हुशार-अभ्यासू विद्यार्थी आहेत."
" हिंदुस्तानात इंजिनिअर्स, मॅनेजर्स किती आहेत ? आणि कुमार गंधर्व, किशोरी, लता किती आहेत ? 
उद्या तू चांगला गाऊ लागलास की सर्वत्र तुझे नाव ऐकू येईल.मॅनेजरला त्याची कंपनी सोडली तर एरवी कोण विचारतो ? तेव्हा १९ एकीकडे असले व दुसरीकडे तू एकटा असलास तरी नीट लक्षपूर्वक रियाझ कर.गुरूकडून शिक्षण घेऊन मोठा कलावंत होऊ शकलास, तर या सर्वांहून तू मोठा समजला जाशील.पुढच्या वर्षी तर पास होशीलच.तेव्हा शिक्षण व गाणे सोडण्याचा विचार सुद्धा करू नकोस.तुझी गाण्यातील प्रगती पाहून मी फार खुश आहे."
माझ्या मित्राला पैसे देऊन ते म्हणाले," जा मिठाई घेऊन ये आणि सर्वांना वाट.आमचा अरु काय सुंदर गझल गायला लागलाय. तेव्हा मिठाई हवीच...
डोळ्यांतील पाणी आवरत मी पाहतच राहिलो.असे आई-वडील लाभले , याहून जास्त देव काय देऊ शकला असता मला ? 
मी त्याच क्षणी निश्चय केला.
काहीही झालं तरी मी
इंजिनीअर होणारच आणि गायक सुद्धा !
आई-वडिलांना मनोमन दिलेले वचन पुरं केलं, ही माझ्या आयुष्यातील सर्वोच्च समाधानाची गोष्ट !

( स्व.अरुण दाते यांच्या
" शुक्रतारा " या सुलभा 
तेरणीकरांनी शब्दबद्ध केलेल्या आत्मचरित्रपर पुस्तकातील अरुण दाते यांनी आपल्या वडिलांची सांगितलेली हृद्य आठवण - साभार )

Monday, December 17, 2018

संघर्ष

एका गावात एक शेतकरी देवावर खूप नाराज झाला.

नाराजीचे कारणही तसेच होते कारण कधी पाऊस जास्‍त पडत असे तर कधी पूर्ण दुष्‍काळ, कधी ऊन जास्‍त तर कधी ढगाळ वातावरण, कधी गारा पडून पीकाचे नुकसान होई तर कधी वा-याने उभे पीक आडवे होत असे.

एक दिवस वैतागून त्‍याने देवाला साद घातली व देवास सांगितले,''तुम्‍ही सर्वव्‍यापी प्रभू परमेश्‍वर असाल इतर सर्व गोष्‍टीतले तुम्‍हाला कळत असेल पण माझ्यामते तरी तुम्‍हाला शेतीतले काहीच कळत नाही. एक प्रार्थना तुम्‍हाला मी करतो तुम्‍ही फक्त एक वर्षभर निसर्ग माझ्या ताब्‍यात द्या मग बघा शेती कशी फुलते ते. घरोघरी मी धान्‍यांच्‍या राशी घालतो ते पहाच तुम्‍ही.''

देव हसला आणि म्‍हणाला,''तथास्‍तू, तुझ्या म्‍हणण्‍याप्रमाणे आज,आतापासून मी निसर्गाचा लहरीपणा बंद करून तो तुझ्या ताब्‍यात मी देत आहे. तू तुला जसा पाहिजे तसा ऋतु बनवून घे व शेती कर'' इतके बोलून देव निघून गेला.

शेतक-याने या वरदानाचा फायदा घेण्‍यासाठी गहू पेरले, जेव्‍हा त्‍याला जेवढे ऊन पाहिजे होते तेव्‍हा त्‍याने ऊन पाडले, जेव्‍हा त्‍याला पाणी द्यायचे होते तेव्‍हा त्‍याने पावसाचा वर्षाव केला.

प्रचंड ऊन, गारा,पूर, सोसाट्याचा वारा याचा स्‍पर्शही कधी त्‍याने आपल्‍या पीकांना होऊ दिला नाही.

काळ निघून गेला आणि त्‍याची शेती बहरून आली. शेतक-याला मोठा आनंद झाला. कधी नव्‍हे इतके पीक आले होते. शेतक-याने मनातल्‍या मनात विचार केला की आता देवाला कळेल की शेती कशी केली जाते, उगाचच तो शेतक-यांना कसा त्रास होईल ते वरून पाहत असतो.

पीक कापणीस आले आणि शेतकरी मोठ्या आनंदाने, गर्वात पीक कापणीसाठी शेतात गेला.

 पीकाला हात लावून पाहिला आणि तो बेशुद्ध होऊनच खाली पडला. कारण गव्‍हाच्‍या त्‍या लोंब्यांमध्‍ये एकही दाणा नव्‍हताच मुळी. पीक नुसते आलेले दिसत होते पण एकही गव्‍हाचा दाणा त्‍यात नव्‍हता.

थोड्यावेळाने तो शुद्धीवर आला आणि धाय मोकलून रडू लागला. त्‍याचे काळीज पिळवटणारे रूदन ऐकून परमात्‍मा परमेश्वर तेथे प्रकट झाला आणि म्‍हणाला,

'' अरे वेड्या तुला काय वाटले, तू तुझ्या इच्‍छेप्रमाणे जसा पाहिजे तसा वागला म्‍हणून पीक तसे येत नसते.

 त्‍या पिकाला तू कधीच संघर्ष करू दिला नाही. सोसाट्याच्‍या वा-यातच पिक उभे राहते तेव्‍हाच त्‍याच्‍यात बळ येते. प्रचंड उन्‍हातही त्‍याच्‍यात जगण्‍याची इच्‍छा बळावते. संकटाशी जोपर्यंत सामना करत नाही तोपर्यंत त्‍याला त्‍याची कुवत कळत नाही.

 सगळे जर मनाप्रमाणे घडले तर कोणत्‍याच गोष्‍टीची किंमत राहत नाही.

आव्‍हान मिळाले नाही म्‍हणून तुझ्या पीकात दाणे भरलेच नाहीत. वारा सुटतो, गारा पडतात तेव्‍हाच त्‍या पिकात जगण्‍याची उमेद निर्माण होते आणि ते संघर्ष करून नवीन जीवन निर्माण करण्‍याचा प्रयत्‍न करते.

तू हे कधीच होऊ दिले नाही म्‍हणून तुझे पीक हे पोकळ निघाले.

सोन्याला सुद्धा चकाकी येण्‍यासाठी आधी आगीतून जावे लागते तेव्‍हाच ते चकाकते.

हातोडीचे मार सोसावे लागतात तेव्‍हाच सोन्‍याचा उत्‍कृष्‍ट दागिना बनतो.''

आता शेतक-याला जीवनाचे सार उमगले होते.

तात्पर्य:-

- जीवनात जर संघर्षच नसेल तर, आव्‍हाने नसतील तर मनुष्‍य अगदी खिळखिळा बनून राहतो. त्‍याच्‍यात कोणतेच गुण येऊ शकत नाहीत. संकटेच माणसाला तलवार किंवा ढाल बनण्‍याची प्रेरणा देतात. कधी तलवार बनून वार करायचा आणि कधी ढाल बनून सामोरे जायचे हे संकटाकडूनच माणूस शिकतो. जीवनात जर कधी यशस्‍वी व्‍हायचे असेल तर संकटांपासून कधीच पळून चालणार नाही. संघर्ष केल्‍यानेच संकटे दूर होतात त्‍याच्‍यापासून दूर पळून नाही.

-स्पर्धा परीक्षेत तयारी करताना येणारी संकटे तुम्हाला अधिकारी बनल्यावर अथवा आयुष्यात लढायला ताकद देतात

-comfort झोनच्या बाहेर या

( संग्रहित कथा )

Thursday, December 6, 2018

अश्वत्थाम्याची भळाळती जखम

"अश्वत्थाम्याची भळाळती जखम"....एक प्रेरक कथा . आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा .....

एका "बुजुर्ग" प्रवचनकार ताईंनी त्यांच्या एका प्रवचनांत "वांग्याच्या भाजीची" एक छान गोष्ट सांगितली. त्या कोणाकडे तरी जेवायला गेल्या होत्या तेव्हा वांग्याची भाजी केली होती, ती भाजी काही "तितकीशी" जमली नव्हती. त्याला काही विशेष "चव ढव" नव्हती.. आता ती तितकीशी जमली नव्हती ,हा विषय खरं तर तिथेच सोडून द्यायला हवा होता. पण तसं झालं नाही.. काही दिवसांनी त्या आणखी कोणाकडे तरी गेल्या, त्यांनीही वांग्याची भाजीच केली होती.. त्यांची भाजी मात्र "चांगली" झाली होती, ती भाजी खातानाही पुन्हा न जमलेली "ती" भाजीच त्यांना आठवली. काही दिवसांनी मंडईत कृष्णाकाठची ताजी वांगी पाहिल्यावर पुन्हा ती "न जमलेली भाजी" त्यांना आठवली.. या प्रसंगाचा शेवट करताना त्या म्हणाल्या, ‘‘जी गोष्ट चांगली झाली नाही ती स्मरणांत राहिली. त्यापूर्वी चांगल्या चवीची वांग्याची भाजी खाल्ली नव्हती का कधी? खाल्ली होती. पण ती लक्षांत राहिली नाही.. बिघडलेली मात्र लक्षांत राहिली.. आपलं मन असंच असतं.. जे लक्षांत ठेवायला हवं ते ठेवत नाही आणि "नको" ते धरून बसतं.’’

स्वत:ला नातसून आलेली आज्जे सासूबाई, तिच्या सासूबाई तिला पुरणपोळ्या नीट "जमल्या" नाहीत म्हणून जेवताना पानावर कसं "टाकून" बोलल्या, हे आजही डोळ्याला "पदर लावून" सांगत असतात , पण याच सासूबाईंनी तिच्या बाळंतपणांत तिची "सेवा" केली हे मात्र "विस्मृतीकोशांत" गेलेलं असतं. मानवी स्वभाव.. नको ते आठवत राहतं.

आमच्या घरी रोज श्लोक पाठ करून आजोबांना म्हणून दाखवण्याची शिस्त होती. कंटाळा यायचा कधी कधी, मग मी नाही पाठ करायचे. आजोबा रागवायचे, कधी कधी "अबोला" धरायचे. मग मी एका दिवसांत आठ श्लोक पाठ करून दाखवायचे. त्याचं कौतुक असायचं, पण "त्या" दिवशी पाठ केले नाहीत,हे ते विसरायचे नाहीत. मग आई नेहमीचं तिचं ठेवणीतलं वाक्य म्हणायची, "बूंद से गई वो हौद से नही आती" तो बूंद एकदा मनातून पडला ,की तोच लक्षात राहतो. नंतर कितीही मोठा हौद बांधला तरी.. काय म्हणायचं या मानवी स्वभावाला?

पाच वर्षांपूर्वी एखादा "प्रसंग" घडलेला असतो.. त्यातल्या व्यक्तींशी आपलं बोलणं, संभाषण "बंद" झालेलं असतं. जेव्हा जेव्हा ती व्यक्ती दिसते तेव्हा तेव्हा आपल्याला "तोच" प्रसंग आठवत राहतो.. कटू आठवण, अढी "अधिकच घट्ट" होत जाते.. पाच वर्षांनीही आपण सगळे तेच आणि तसेच आहोत असं मानूनच आपण वागत असतो.. या पाच वर्षांत माणसं बदललेली असू शकतात, हा विचार करण्याएवढे "उदार" आपण नसतो. त्या व्यक्तीने पुन्हा चांगल्या हेतूने नात्याचा हात पुढे केला तरी आपण धरून ठेवलेली ती "कटू" आठवण आपल्याला प्रतिसादाचा "हात" पुढे करू देत नाही.* म्हणून कटू आठवण जिथल्या तिथे सोडून देणं हाच उत्तम उपाय. ती "कुरवाळत" ठेवू नये. आपलं सुदैव की आपण खूप जुनी, "भळभळणारी जखम" वागवत फिरणारा "अश्वत्थामा" नाही.. जखम अंगावर, मनावर ताजी ठेवण्याचं "दु:ख" काय असतं ते त्यालाच माहीत. त्याला तो शाप आहे पण ,आपल्याला तर अशी "सक्ती" नाही, मग "अश्वत्थाम्याचंदु:ख" विनाकारण मागून का घ्यायचं?

मेमरी चिपवरून भूतकाळाच्या आठवणी हळूहळू "पुसून" टाकून चिपमध्ये नव्या आठवणींना "जागा" करून द्यायला हवी.. मनाला त्रास देणाऱ्या आठवणी तर "जाणीवपूर्वक" पुसून टाकायला हव्यात. त्यातून फक्त धडा घेऊन, कोणाहीबद्दल मनांत "गाठ" न ठेवता पुढे पाऊल टाकायला हवं आणि एखाद्या वळणावर भेटली पुन्हा तीच कटू आठवण, तर ‘तुझ्या कटुत्वामध्येही गोडवाच मी शोधणार आहे..’ असं तिलाच ठणकावून सांगावं. स्मृतिकोशांत काय ठेवायचं ? हे ज्याला समजलं तो "खरा" विवेकी! भूतकाळाला वर्तमानाची जागा "अडवू" देऊ नये..

‘कुंग फू पांडा’ या चित्रपटांत मास्टर उग्वे नावाचं एक कासव आहे. ते तीनशे वर्षांचं आहे. त्याच्या तोंडी एक "सुंदर वाक्य" आहे, ‘यस्टर्डे इज हिस्टरी, टुमारो इज मिस्टरी. टूडे इज अ गिफ्ट फ्रॉम द लॉर्ड, हेन्स इट इज कॉल्ड द प्रेझेंट.’ गम्मत म्हणजे तीनशे वर्षांचं असलं तरी ते ‘आमच्या वेळेला असं होतं’ असं न म्हणता ‘वर्तमान हीच "अमूल्य भेट" आहे’ असं सांगतं. रात्री झोपताना आपण "टोचणारे" अलंकार जसे काढून ठेवतो तशाच "टोचणाऱ्या" आठवणीही मनांतून "काढून" ठेवाव्यात.. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी फक्त "अलंकार" घालावेत.. 
सकाळी तन मोकळं, मन मोकळं आणि नवीन वांग्याच्या भाजीची "चव" चाखायला जीभही मोकळी.

जशी "पुराणातली" वांगी.. तशी ही "भूतकाळातली" वांगी

संग्रहित लेख

Monday, December 3, 2018

ब्राझिलियन कवीची कविता

मारिओ दि अन्द्रादे (1893 - 1945) ब्राझिलियन कवीची कविता

आज मी माझी सरलेली वर्ष मोजली आणि अचानक लक्षात आलं ..अरेच्चा!
जेवढं जगून झालंय
त्यापेक्षा कमीच उरलंय की जगायचं..
मग एखाद्या लहान मुलाचं कसं होतं ना..
खूप आवडीचा खाऊ खाताना..
तसं झालं काहीसं...

सुरवातीला तो
आवडीने खाऊ खातोच पण जेंव्हा त्याच्या लक्षात येतं की आता
थोडासाच खाऊ उरलाय, तेंव्हा मात्र ते मुल खाऊ अधिकच चवीचवीने
आणि अगदी मन लावून खायला लागतं.
कुठल्याच संकेत,
नियम आणि कायदयांचं पालन होणार नाहीय हे पुरेपूर ठाऊक असताना..

केवळ त्यांचीच चर्चा करणाऱ्या प्रदीर्घ बैठकांसाठी आता माझ्याकडे वेळ नाही.

ज्यांची केवळ वयच वाढलीत.. बुद्धी नाही.. अशा मूर्ख लोकांना सहन करण्याचा संयम
आता माझ्यात अजिबात उरलेला नाही.

फार कमी वेळ उरलाय माझ्याकडे..
आता मला फक्त अर्क हवा आहे..
आत्मा घाईत आहे माझा..फार थोडा खाऊ शिल्लक आहे माझ्याजवळ आता..

मला माणसांच्या जवळ जगायचंय आता..
खऱ्याखुऱ्या माणसांच्या... ज्यांना माहीत आहे, आपल्या स्वतःच्या चुकांवर कसं हसायचं.
ती माणसं..
जी विजयाच्या गर्वाने फुगलेली नाहीत
आणि ती माणसं... जी त्यांनी केलेल्या कर्माची संपूर्ण जबाबदारी घेतात. खरंतर अशा प्रकारेच माणसाची प्रतिष्ठा अबाधित राहते आणि आपण कायम सत्य
आणि प्रमाणिकतेच्या मार्गावर राहतो.

आपलं आयुष्य कामी येणं उपयुक्त होणं हे अत्यंत महत्त्वाच.

मला अशी माणसं माझ्या अवतीभवती हवी आहेत की ज्यांना दुसऱ्यांच्या हृदयाला स्पर्श कसा करायचा हे चांगलंच ठाऊक आहे..
अशांच्या हृदयाला... ज्यांनी आयुष्याचे सणसणीत फटकारे झेललेत,
आत्म्याच्या पवित्र, मधुर स्पर्शाने ज्यांना तरीही
मोठं केलंय..

हो आहे मी घाईत..
मी आयुष्याला उत्कटतेने जगण्याच्या घाईत आहे..ती उत्कटता... जी केवळ प्रगल्भतेतून येते.
आता माझ्याकडे उरलेली जराशीही मिठाई
फुकट घालवायची माझी इच्छा नाहीय..

मला नक्की माहीत आहे की ही मिठाई अतिशय उत्तम आहे..
मी आत्तापर्यंत खाल्लेल्या खाऊपेक्षाही खूप सुग्रास.

माझं आता एकच ध्येय आहे..
माझ्या प्रेमीजनांसोबत आणि सद्सद्विवेकबुद्धीसोबत समाधानात आणि शांततेत अखेरचा क्षण गाठणं..बस.

आपल्याकडे बरं का दोस्तांनो ..
दोन आयुष्य असतात..आणि दुसरं आयुष्य सुरू होतं जेंव्हा लक्षात येतं की आपल्याकडे जगायला फक्त एकच आयुष्य आहे.!

मारिओ दि अन्द्रादे

माझे नवीन लेखन

खरा सुखी

 समाधान पैशावर अवलंबून नसतं, सुख पैशानं मोजता येत नसतं. पण, सुखासमाधानानं जगण्यासाठी पैशांची गरज पडत असतेच. फक्त ते पैसे किती असावेत ते आपल्...