Monday, December 3, 2018

ब्राझिलियन कवीची कविता

मारिओ दि अन्द्रादे (1893 - 1945) ब्राझिलियन कवीची कविता

आज मी माझी सरलेली वर्ष मोजली आणि अचानक लक्षात आलं ..अरेच्चा!
जेवढं जगून झालंय
त्यापेक्षा कमीच उरलंय की जगायचं..
मग एखाद्या लहान मुलाचं कसं होतं ना..
खूप आवडीचा खाऊ खाताना..
तसं झालं काहीसं...

सुरवातीला तो
आवडीने खाऊ खातोच पण जेंव्हा त्याच्या लक्षात येतं की आता
थोडासाच खाऊ उरलाय, तेंव्हा मात्र ते मुल खाऊ अधिकच चवीचवीने
आणि अगदी मन लावून खायला लागतं.
कुठल्याच संकेत,
नियम आणि कायदयांचं पालन होणार नाहीय हे पुरेपूर ठाऊक असताना..

केवळ त्यांचीच चर्चा करणाऱ्या प्रदीर्घ बैठकांसाठी आता माझ्याकडे वेळ नाही.

ज्यांची केवळ वयच वाढलीत.. बुद्धी नाही.. अशा मूर्ख लोकांना सहन करण्याचा संयम
आता माझ्यात अजिबात उरलेला नाही.

फार कमी वेळ उरलाय माझ्याकडे..
आता मला फक्त अर्क हवा आहे..
आत्मा घाईत आहे माझा..फार थोडा खाऊ शिल्लक आहे माझ्याजवळ आता..

मला माणसांच्या जवळ जगायचंय आता..
खऱ्याखुऱ्या माणसांच्या... ज्यांना माहीत आहे, आपल्या स्वतःच्या चुकांवर कसं हसायचं.
ती माणसं..
जी विजयाच्या गर्वाने फुगलेली नाहीत
आणि ती माणसं... जी त्यांनी केलेल्या कर्माची संपूर्ण जबाबदारी घेतात. खरंतर अशा प्रकारेच माणसाची प्रतिष्ठा अबाधित राहते आणि आपण कायम सत्य
आणि प्रमाणिकतेच्या मार्गावर राहतो.

आपलं आयुष्य कामी येणं उपयुक्त होणं हे अत्यंत महत्त्वाच.

मला अशी माणसं माझ्या अवतीभवती हवी आहेत की ज्यांना दुसऱ्यांच्या हृदयाला स्पर्श कसा करायचा हे चांगलंच ठाऊक आहे..
अशांच्या हृदयाला... ज्यांनी आयुष्याचे सणसणीत फटकारे झेललेत,
आत्म्याच्या पवित्र, मधुर स्पर्शाने ज्यांना तरीही
मोठं केलंय..

हो आहे मी घाईत..
मी आयुष्याला उत्कटतेने जगण्याच्या घाईत आहे..ती उत्कटता... जी केवळ प्रगल्भतेतून येते.
आता माझ्याकडे उरलेली जराशीही मिठाई
फुकट घालवायची माझी इच्छा नाहीय..

मला नक्की माहीत आहे की ही मिठाई अतिशय उत्तम आहे..
मी आत्तापर्यंत खाल्लेल्या खाऊपेक्षाही खूप सुग्रास.

माझं आता एकच ध्येय आहे..
माझ्या प्रेमीजनांसोबत आणि सद्सद्विवेकबुद्धीसोबत समाधानात आणि शांततेत अखेरचा क्षण गाठणं..बस.

आपल्याकडे बरं का दोस्तांनो ..
दोन आयुष्य असतात..आणि दुसरं आयुष्य सुरू होतं जेंव्हा लक्षात येतं की आपल्याकडे जगायला फक्त एकच आयुष्य आहे.!

मारिओ दि अन्द्रादे

No comments:

Post a Comment

माझे नवीन लेखन

खरा सुखी

 समाधान पैशावर अवलंबून नसतं, सुख पैशानं मोजता येत नसतं. पण, सुखासमाधानानं जगण्यासाठी पैशांची गरज पडत असतेच. फक्त ते पैसे किती असावेत ते आपल्...