"अश्वत्थाम्याची भळाळती जखम"....एक प्रेरक कथा . आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा .....
एका "बुजुर्ग" प्रवचनकार ताईंनी त्यांच्या एका प्रवचनांत "वांग्याच्या भाजीची" एक छान गोष्ट सांगितली. त्या कोणाकडे तरी जेवायला गेल्या होत्या तेव्हा वांग्याची भाजी केली होती, ती भाजी काही "तितकीशी" जमली नव्हती. त्याला काही विशेष "चव ढव" नव्हती.. आता ती तितकीशी जमली नव्हती ,हा विषय खरं तर तिथेच सोडून द्यायला हवा होता. पण तसं झालं नाही.. काही दिवसांनी त्या आणखी कोणाकडे तरी गेल्या, त्यांनीही वांग्याची भाजीच केली होती.. त्यांची भाजी मात्र "चांगली" झाली होती, ती भाजी खातानाही पुन्हा न जमलेली "ती" भाजीच त्यांना आठवली. काही दिवसांनी मंडईत कृष्णाकाठची ताजी वांगी पाहिल्यावर पुन्हा ती "न जमलेली भाजी" त्यांना आठवली.. या प्रसंगाचा शेवट करताना त्या म्हणाल्या, ‘‘जी गोष्ट चांगली झाली नाही ती स्मरणांत राहिली. त्यापूर्वी चांगल्या चवीची वांग्याची भाजी खाल्ली नव्हती का कधी? खाल्ली होती. पण ती लक्षांत राहिली नाही.. बिघडलेली मात्र लक्षांत राहिली.. आपलं मन असंच असतं.. जे लक्षांत ठेवायला हवं ते ठेवत नाही आणि "नको" ते धरून बसतं.’’
स्वत:ला नातसून आलेली आज्जे सासूबाई, तिच्या सासूबाई तिला पुरणपोळ्या नीट "जमल्या" नाहीत म्हणून जेवताना पानावर कसं "टाकून" बोलल्या, हे आजही डोळ्याला "पदर लावून" सांगत असतात , पण याच सासूबाईंनी तिच्या बाळंतपणांत तिची "सेवा" केली हे मात्र "विस्मृतीकोशांत" गेलेलं असतं. मानवी स्वभाव.. नको ते आठवत राहतं.
आमच्या घरी रोज श्लोक पाठ करून आजोबांना म्हणून दाखवण्याची शिस्त होती. कंटाळा यायचा कधी कधी, मग मी नाही पाठ करायचे. आजोबा रागवायचे, कधी कधी "अबोला" धरायचे. मग मी एका दिवसांत आठ श्लोक पाठ करून दाखवायचे. त्याचं कौतुक असायचं, पण "त्या" दिवशी पाठ केले नाहीत,हे ते विसरायचे नाहीत. मग आई नेहमीचं तिचं ठेवणीतलं वाक्य म्हणायची, "बूंद से गई वो हौद से नही आती" तो बूंद एकदा मनातून पडला ,की तोच लक्षात राहतो. नंतर कितीही मोठा हौद बांधला तरी.. काय म्हणायचं या मानवी स्वभावाला?
पाच वर्षांपूर्वी एखादा "प्रसंग" घडलेला असतो.. त्यातल्या व्यक्तींशी आपलं बोलणं, संभाषण "बंद" झालेलं असतं. जेव्हा जेव्हा ती व्यक्ती दिसते तेव्हा तेव्हा आपल्याला "तोच" प्रसंग आठवत राहतो.. कटू आठवण, अढी "अधिकच घट्ट" होत जाते.. पाच वर्षांनीही आपण सगळे तेच आणि तसेच आहोत असं मानूनच आपण वागत असतो.. या पाच वर्षांत माणसं बदललेली असू शकतात, हा विचार करण्याएवढे "उदार" आपण नसतो. त्या व्यक्तीने पुन्हा चांगल्या हेतूने नात्याचा हात पुढे केला तरी आपण धरून ठेवलेली ती "कटू" आठवण आपल्याला प्रतिसादाचा "हात" पुढे करू देत नाही.* म्हणून कटू आठवण जिथल्या तिथे सोडून देणं हाच उत्तम उपाय. ती "कुरवाळत" ठेवू नये. आपलं सुदैव की आपण खूप जुनी, "भळभळणारी जखम" वागवत फिरणारा "अश्वत्थामा" नाही.. जखम अंगावर, मनावर ताजी ठेवण्याचं "दु:ख" काय असतं ते त्यालाच माहीत. त्याला तो शाप आहे पण ,आपल्याला तर अशी "सक्ती" नाही, मग "अश्वत्थाम्याचंदु:ख" विनाकारण मागून का घ्यायचं?
मेमरी चिपवरून भूतकाळाच्या आठवणी हळूहळू "पुसून" टाकून चिपमध्ये नव्या आठवणींना "जागा" करून द्यायला हवी.. मनाला त्रास देणाऱ्या आठवणी तर "जाणीवपूर्वक" पुसून टाकायला हव्यात. त्यातून फक्त धडा घेऊन, कोणाहीबद्दल मनांत "गाठ" न ठेवता पुढे पाऊल टाकायला हवं आणि एखाद्या वळणावर भेटली पुन्हा तीच कटू आठवण, तर ‘तुझ्या कटुत्वामध्येही गोडवाच मी शोधणार आहे..’ असं तिलाच ठणकावून सांगावं. स्मृतिकोशांत काय ठेवायचं ? हे ज्याला समजलं तो "खरा" विवेकी! भूतकाळाला वर्तमानाची जागा "अडवू" देऊ नये..
‘कुंग फू पांडा’ या चित्रपटांत मास्टर उग्वे नावाचं एक कासव आहे. ते तीनशे वर्षांचं आहे. त्याच्या तोंडी एक "सुंदर वाक्य" आहे, ‘यस्टर्डे इज हिस्टरी, टुमारो इज मिस्टरी. टूडे इज अ गिफ्ट फ्रॉम द लॉर्ड, हेन्स इट इज कॉल्ड द प्रेझेंट.’ गम्मत म्हणजे तीनशे वर्षांचं असलं तरी ते ‘आमच्या वेळेला असं होतं’ असं न म्हणता ‘वर्तमान हीच "अमूल्य भेट" आहे’ असं सांगतं. रात्री झोपताना आपण "टोचणारे" अलंकार जसे काढून ठेवतो तशाच "टोचणाऱ्या" आठवणीही मनांतून "काढून" ठेवाव्यात.. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी फक्त "अलंकार" घालावेत..
सकाळी तन मोकळं, मन मोकळं आणि नवीन वांग्याच्या भाजीची "चव" चाखायला जीभही मोकळी.
जशी "पुराणातली" वांगी.. तशी ही "भूतकाळातली" वांगी
संग्रहित लेख
No comments:
Post a Comment