कॉन्फरन्स रूममध्ये, एचआर विभागामधली सर्वात अनुभवी ‘ती’ आणि कंपनीत आपल्या तंत्रज्ञानाच्या ज्ञानामुळे दबदबा असलेला ‘तो’ ‘एक्झिट इंटरव्ह्य़ू’साठी, म्हणजे राजीनामा देऊन कंपनीतून बाहेर पडण्यापूर्वी घेतल्या जाणाऱ्या मुलाखतीसाठी समोरासमोर बसले होते.
विषयाला थेट हात घालत ती म्हणाली, ‘‘कंपनीतल्या उत्तम ‘परफॉमन्स’ असणाऱ्या लोकांपैकी तू एक आहेस; पण शेवटी निर्णय तुझा आहे.. मात्र ‘तडजोडी’ची काहीही जरी शक्यता असली तर तुला दुसऱ्या कंपनीने दिलेली ‘ऑफर’ सांग. आम्ही ती ‘ऑफर’ आमच्याकडून देऊच.. पण त्याचबरोबर नवीन ऑफरच्या वीस टक्के रक्कम तुला ‘स्पेशल बोनस’ म्हणूनही देऊ.’’
त्यावर दीर्घ श्वास घेत तो म्हणाला, ‘‘मी हे अगोदरच सांगितलंय की, माझ्याकडे दुसरी कोणतीही ऑफर नाही. ‘नोकरी सोडणं’ इतकाच माझा उद्देश आहे. त्यामुळेच आपला ‘नोटीस पीरियड’ही मी कोणतंही कारण न देता पूर्ण केला. शिवाय माझी कंपनी किंवा कंपनीतल्या माणसांबद्दलही काही तक्रार नाही.’’
पण ती मागे हटणार नव्हती. आपली पुढची ‘ऑफर’ त्याच्यासमोर ठेवत म्हणाली, ‘‘तू अजून महिनाभर थांब. एक नवीन ‘प्रोजेक्ट’ येतोय. त्यासाठी वर्षभर तुला ‘ऑनसाइट’ला पाठवता येईल.’’ त्यावर तो म्हणाला, ‘‘कंपनीतल्या माझ्या आठ वर्षांत, जवळजवळ चार वर्ष मी ‘ऑनसाइट’ला होतो. ज्या देशांची नावंही कधी माहिती नव्हती असेही देश मी पाहून आलो. तेव्हा मला त्याचं काहीही आकर्षण नाही.’’
‘निगोसिएशन’साठी राखून ठेवलेल्या हुकमाच्या पत्त्यांचा उपयोग होत नाही म्हणल्यावर विषयाचा सांधा बदलत ती म्हणाली, ‘‘तू नोकरी सोडून ‘स्टार्ट-अप’ सुरू करणार असलास तर इतकंच सांगेन की, ‘लाखाचे बारा हजार करण्याचा’ यासारखा दुसरा उपाय नाही.’’ त्यावर नकारार्थी मान हलवत तो म्हणाला, ‘‘बिझनेस करणं हा माझा पिंड नाही हे मला माहिती आहे.’’ ते ऐकून ती वैतागून म्हणाली, ‘‘मग नोकरी सोडल्यावर, तू करणार तरी काय आहेस?’’
‘‘मी वर्षभर तरी काहीही करणार नाहीये.’’
‘‘म्हणजे?’’
‘‘म्हणजे इतकी वर्ष अंगवळणी पडलेलं ‘रुटीन’ बदलण्यासाठी, ‘लाइफस्टाइल’च्या नावाखाली लागलेल्या सवयी घालवण्यासाठी आणि एक तारखेला ‘सॅलरी क्रेडिटेड’ मेसेज येणार नाही याची सवय लावण्यासाठी स्वत:ला वेळ देणार आहे.’’
तिच्या कोणत्याच ‘लॉजिक’मध्ये त्याची ही उत्तरं बसत नव्हती; पण कुतूहल निर्माण करण्यासाठी ती पुरेशी होती. त्या कुतूहलातूनच तिनं विचारलं, ‘‘हे एकदम असं अचानक का?’’ त्यावर सुस्कारा सोडत तो म्हणाला, ‘‘मी आधी कोणाला याबद्दल काही बोललो नाही; पण सांगतो.. हा माझा निर्णय अचानक किंवा घाईत घेतलेला नाही. गेल्या वर्षभरापासून माझं याबद्दल नियोजन सुरू आहे. नेमकेपणाने सांगायचं झालं तर ज्या दिवशी ‘एम्प्लॉयी नंबर ४३७’चं काय झालं ते पाहिलं.. त्याच दिवसापासून.’’
‘एम्प्लॉयी नंबर ४३७’ हे शब्द कानावर पडताक्षणी तो भयंकर दिवस तिच्या डोळ्यासमोर उभा राहिला. त्या दिवशी, फक्त बेचाळीस वर्षांच्या एका हुशार अभियंत्याला कार्यालयामध्ये काम करताना हृदयविकाराचा झटका आला; पण हॉस्पिटलमध्ये पोचेपर्यंत सगळं संपलं होतं. हृदयरोगाची कोणतीही ‘मेडिकल हिस्ट्री’ नसतानाही असं झालं होतं. डॉक्टरांनी फक्त एका शब्दात कारण दिलं, ‘स्ट्रेस’. मग दोन दिवसांनी त्याचं डेस्क आणि ड्रॉवर मोकळं करण्यासाठी तीच ‘सपोर्ट स्टाफ’बरोबर गेली. तेव्हा संगणकामागच्या पिनबोर्डवर लावलेले त्याचे ‘फॅमिली फोटो’ उपसून काढताना तिला जे वाटलं होतं, ते कोणत्याही शब्दात मांडणं अशक्य होतं. ती तिथं रडली नाही इतकंच. आज त्या सगळ्या आठवणी, पुन्हा तिच्या डोळ्यासमोर आल्या.
‘‘रोजचा तीन-तीन तासांचा प्रवास, प्रोजेक्टचा ताण, कायम तणावाखाली राहाणं.. का? आणि कशासाठी? हाच विचार त्या दिवसापासून मी सतत करतोय.’’ त्याच्या बोलण्यामुळे ती भानावर आली. आता तिला त्याचं नोकरी सोडण्यामागचं कारण लक्षात यायला लागलं होतं; पण तिनं प्रयत्न सोडले नाहीत. ती शांतपणे म्हणाली, ‘‘पण शेवटी व्यवहार कोणाला चुकला आहे?’’
‘‘खरं आहे. व्यवहार कोणालाच चुकलेला नाही. फक्त एकच माफक अपेक्षा आहे, की त्या नादात कधीही भरून येणार नाही असं नुकसान मात्र होऊ नये.’’ त्याच्या उत्तरावर ‘हं!’ असं अस्पष्टपणे ती पुटपुटली. त्याच्यासमोर नेमकी काय ‘ऑफर’ ठेवावी? याची गणितं तिच्या मनात वेगानं सुरू होती.
पण तिचा विचार पूर्ण होण्याआधी तोच म्हणाला, ‘‘सहा महिन्यांपूर्वी आणखी एक गोष्ट घडली. एके दिवशी रात्री उशिरा, माझ्या मोठय़ा भावानं फोन करून मला त्याच्या घरी बोलावलं. त्याच्या घरी गेलो तर दादा-वहिनी डोक्याला हात लावून बसले होते. मी कारण विचारलं तर त्यांनी त्यांच्या चौदा वर्षांच्या मुलाचं दप्तर माझ्यासमोर धरलं. त्या दप्तराच्या मागच्या कप्प्यात ‘पोर्नोग्राफी’चं मटेरियल खच्चून भरलं होतं. चित्रविचित्र पुस्तकं, स्टिकर्स आणि काय काय.. कदाचित ते कमी होतं म्हणून त्यात एक कंडोमचं पाकीटही होतं.’’
‘‘अरे बापरे!’’ अगदी नकळत ती पुटपुटली. आपली दोन्ही मुलं टीनएजर असताना आपल्याला त्यांची किती काळजी असायची.. हेही तिला आठवून गेलं; पण सर्वात वाईट गोष्ट ही होती की, दादा-वहिनी मला म्हणाले, की तूच त्याच्याशी बोल. तो आमच्याशी बोलतच नाही. घरातल्या कोणाशी मोकळेपणाने बोलत असेल तर ते फक्त तुझ्याशीच. मी मनातल्या मनात म्हणालो, ‘कसं बोलणार? जन्मापासून तो पाळणाघरात आहे. तुमच्या करिअरच्या धावपळीत तो कधीच तुमच्यासाठी महत्त्वाचा नव्हता. त्यामुळेच आज त्याच्यासाठी तुम्ही महत्त्वाचे नाही आहात. तसंही घरात जेव्हा असता, तेव्हाही दोघं मोबाइलवर आपापल्या ‘सोशल प्रोफाइल्स’ सांभाळण्यात दंग असता. तिथे सर्वात आधी फोटो-व्हिडीओ शेअर करण्यासाठी तुमची धडपड असते. त्या नादात तुमच्या घरातला संवाद पूर्णपणे संपलाय हे तुम्हाला जाणवतही नाही. तुमच्या घरातलं ते लॅव्हिश इटालियन मार्बल काय थंड पडेल.. इतकी तुमची नाती थंड झाली आहेत.’
‘‘मग?’’ तिनं न राहवून विचारलं.
‘‘मग काय? मीच बोललो त्याच्याशी.. आता दर आठवडय़ाला त्याला भेटतो आणि मग आम्ही काही तरी ‘अॅक्टिव्हिटी’ करतो. गोष्टी रुळावर यायला वेळ लागेल; पण मी त्या आणेन हे नक्की.’’
‘हं!’ असं अस्पष्टपणे ती म्हणाली. इतक्या नाजूक विषयावर प्रतिक्रिया तरी काय देणार? हाही प्रश्न होताच; पण त्याचं बोलणं संपलं नव्हतं.
तो म्हणाला, ‘‘दादाच्या घरी जे झालं ते माझ्या घरीही होऊ शकतं. कारण आमच्या दोघांचेही आई-वडील आपापल्या मूळ गावी आहेत. त्यात माझी बायकोही ‘आयटी’मध्येच आहे. त्यामुळे जास्त वेळ घराबाहेर कोण असतं आणि घरी आल्यावरही लॅपटॉपसमोर कोण बसतं यात आमची नेहमी स्पर्धा असते. काही महिन्यांपूर्वी आमच्या सोसायटीचं वार्षिक स्नेहसंमेलन झालं. त्यात माझ्या मुलीनं आणि तिच्या मित्रमत्रिणींनी एक ‘प्रोटेस्ट’ नावाचं विनोदी नाटक सादर केलं. नाटकाचा विषय होता की, आईवडील दिवसभर आपल्या फोन किंवा लॅपटॉपमध्ये डोकं घालून बसतात, त्यामुळे मुलांकडे होणारं दुर्लक्ष आणि त्याचा उपहासात्मक निषेध.’’
‘‘मुलं काही वेळा खूप खरं बोलून जातात.’’ तीही तिच्या अनुभवांना स्मरत म्हणाली; पण तो गंभीर होत म्हणाला, ‘‘मला वाटतं हेच इशारे ओळखायला हवेत नाही का? ‘डेडलाइन्स’च्या नावाखाली खूप वर्ष पळतोय; पण आता दमलोय. करिअरच्या प्रत्येक टप्प्यावर तीच न संपणारी धावपळ. कधी कधी वाटतं की, या सगळ्याला काहीही शेवट नाही. मग अचानक ‘एम्प्लॉयी नंबर ४३७’ची आठवण होते तेव्हा उगाचच वाटून जातं की, आपलंही त्याच्यासारखंच होईल आणि अनेक गोष्टी अपूर्ण राहतील. दिवसभर नवीन तंत्रज्ञान बनवण्यासाठी काम करायचं. मग दमल्यावर ‘रिलॅक्स’ होण्यासाठी पुन्हा तंत्रज्ञानाचाच आधार घ्यायचा. तेव्हा एक तर ‘ऑनलाइन शॉपिंग’ करायचं, गेम्स खेळायचे किंवा आभासी जगात रमायचं. एकीकडे मला माझी ‘स्पेस’ पाहिजे म्हणून सगळ्यापासून दूर व्हायचं आणि मग आपणच तोडलेल्या लोकांनी आपलं आभासी जग ‘लाइक’ करावं हा अट्टहास धरायचा. हा काय खेळ आहे? आणि त्याचा गुंता दिवसेंदिवस वाढतोच आहे.’’
त्यावर काही सेकंद विचार करून ती म्हणाली, ‘‘मग तू जरा ब्रेक घे. तुझ्या राहिलेल्या सुट्टय़ा आणि थोडी ‘अनपेड सुट्टी धरून सहा महिने विचार करण्यासाठी घे म्हणजे तुझी नोकरीही राहील.’’ तिच्या या ‘ऑफर’वर तो काही बोलणार तेवढय़ात कॉफी आली. मीटिंगसाठी येणारी कॉफी ही मशीनमधली नसल्यामुळे ती पिण्यात एक वेगळीच मजा असायची. मशीनची कॉफी पिऊन कंटाळलेला प्रत्येक जण त्या फ्रेश कॉफीची आतुरतेनं वाट पाहायचा. त्यामुळे दोघांनीही कप टेबलावर ठेवले जाण्याची वाट न पाहता ट्रेमधूनच उचलले. एसीमुळे कॉफीचा गंध क्षणात सगळ्या खोलीत पसरला.
‘वा!’ असं म्हणत त्यानं कॉफीचा पहिला घोट घेतला. ‘‘ही मुलाखत आजच संपवण्याचं आपल्याला कोणतंही बंधन नाही. तू दोन दिवस विचार कर. आपण पुन्हा भेटू. बाकी काही नाही तर कॉफीचा आणखी एक राऊंड नक्की होईल.. काय?’’ तिच्या बोलण्याचा रोख त्याला समजला. कोणत्याही परिस्थितीत त्याला राजीनामा मागे घ्यायला लावण्यासाठी तिच्यावर खूप ‘प्रेशर’ असेल हेही त्याला जाणवलं.
कॉफीचा घोट घेत तो म्हणाला, ‘‘आपण गप्पा मारायला, कॉफी प्यायला नक्की भेटू; पण मुलाखत आजच संपवू या. माझा निर्णय पक्का आहे.’’ पण पुन्हा आपलाच मुद्दा रेटत ती म्हणाली, ‘‘पण थोडा शांतपणे विचार करण्यासाठी ब्रेक घ्यायला काय हरकत आहे? नोकरी तर तू सहा महिन्यांनीही सोडू शकतोस. कंपनीतून बाहेर पडल्यावरचं आयुष्य वाटतं तेवढं सोपं नसतं हेही तुला त्या दरम्यान जाणवेल.’’
कॉफी संपवून कप टेबलावर ठेवत तो म्हणाला, ‘‘पण या ऑफरमुळे माझा उद्देश साध्य होत नाही.’’
‘‘म्हणजे?’’ त्याचं बोलणं न समजून ती म्हणाली, ‘‘म्हणजे नोकरी नसताना आपलं आयुष्य कसं असेल, हे अनुभवण्यासाठी खरोखर नोकरी पूर्णपणे सोडणं गरजेचं आहे. त्याशिवाय मला इतर पर्याय शोधताच येणार नाहीत. मी कायम हाच विचार करत राहीन, की काहीही झालं तरी आपली नोकरी सुरक्षित आहे. कदाचित त्यामुळे नवीन पर्याय शोधण्यासाठी म्हणावी तेवढी मेहनत मी घेणारही नाही.’’
‘‘मला नाही वाटत तसं. जर तू पर्याय शोधायचं ठरवलं आहेस तर तू पूर्ण प्रयत्न करशीलच.’’ त्याचं म्हणणं खोडत ती म्हणाली. ते ऐकून तो खळखळून हसला आणि म्हणाला, ‘‘मला माझा स्वभाव माहीत आहे. नवीन वाट शोधायची असेल तर सर्वात आधी मला माझा ‘कम्फर्ट झोन’ सोडावाच लागेल. तसेही जुने विषय पूर्णपणे बंद केल्याशिवाय नवीन विषय सुरू करता येत नाहीत.’’
त्याच्या बोलण्यातलं तथ्य तिला जाणवलं. तेवढय़ात तोच पुढे म्हणाला, ‘‘मला पूर्ण कल्पना आहे, की माझा हा निर्णय कदाचित व्यवहाराच्या कसोटय़ांवर चुकीचा ठरेल; पण एक नक्की आहे, आयुष्य जगण्यासाठी नोकरी असते. नोकरी करण्यासाठी आयुष्य नसतं. खूप गोष्टी विखुरल्या गेल्यात. त्यातल्या काही पुन्हा पहिल्या जागी कधी येणारही नाहीत हे मला माहीत आहे; पण तरीही मला एक प्रयत्न करायचा आहे. नोकरी नसल्यावर काय? ही भीतीही आहे; पण मनात असलेल्या अनेक प्रश्नांचा गुंता मला सोडवायचा आहे. तंत्रज्ञानाच्या प्रभावातून जरा बाहेर पडायचं आहे. कदाचित अपयशही येईल.. पण प्रामाणिक प्रयत्न केल्याचं समाधान मला निश्चित मिळेल. हा ‘एक्झिट इंटरव्ह्य़ू’ माझ्यासाठी प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रवासाचा ‘एंट्री पॉइंट’ आहे. तेव्हा मला वाटतं, आपण इथेच थांबू या.’’
आता काहीही ‘ऑफर’ दिली तरी त्याला फरक पडणार नाही हे तिच्या लक्षात आलं होतं. तिनं त्याच्याकडे पाहिलं आणि हसून त्याला म्हणाली, ‘‘सगळ्यांनाच आयुष्याच्या एका टप्प्यावर असा निर्णय घ्यावासा वाटत असतो; पण तो निर्णय घेण्याची हिंमत मोजकेच लोक दाखवतात. ऑल द बेस्ट.’’ एवढं बोलून तिनं शेक-हँड करण्यासाठी हात पुढे केला. ‘‘थँक यू’’ म्हणत त्याने तिला शेक-हँड केला आणि तो तिथून बाहेर पडला.
त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे ती पाहात राहिली.. आणि बहुतेक पहिल्यांदाच, आपली बोलणी यशस्वी झाली नाहीत, याचं तिला मनापासून समाधान वाटलं.
संग्रहित लेख