Tuesday, September 22, 2020

आई कुठे काय करते

२०१७ साली झालेल्या ' Miss World ' contest  मधे  "हरियाणा" ची डाक्टर मानुषी छिल्लर हिने विजेते पद पटकाविले होते .
शेवटच्या  निर्णायक राऊंड मधे तिला प्रश्न विचारण्यात आला होता की सर्वात जास्त पगार कोणत्या क्षेत्रातील लोकांना मिळाला पाहिजे ?? तेंव्हा तिचे ' winning '  उत्तर हे होते की   "सर्वात जास्त पगार " आई " ला मिळाला पाहिजे ". आईच्या कामाचे मोल नाही.
तिच्या या उत्तराने  तिने ती स्पर्धा तर जिंकलीच .बरोबर, जगात  एक नवीन विषय चर्चेला  दिला .त्यानंतर  फोर्ब्स  व्दारे  संचालित वेब साईट ' Salary • com  'वर research सुरू झाला . की एक आई जेवढं काम करते ,त्या कामांसाठी जर वेगवेगळी माणसे ठेवली ,तर त्यांना किती पगार द्यावा लागेल  ?? तेंव्हा सर्व गोष्टी लक्षात घेता , एका आईचा पगार वर्षाला एक लाख पंधरा हजार डॉलर  ( ११५००० डॉलर  ) असायला  हवा. .हा निष्कर्ष निघाला . म्हणजे तिला महिन्याला अंदाजे  ९५०० / डॉलर  मिळायला हवा .म्हणजे  भारतीय आईला ९५००×७५= ७०,०००/ अंदाजे 
एवढा पगार मिळाला पाहिजे दरमहा.••••.
       तिच्या  उत्तराने जगात ही  गोष्ट फक्त उजागर झाली . जगासमोर भारतीय परिवार व त्यात  आईची  भूमिका समोर आली .   आदी काळापासून आई हेच  काम  करते आहे रोजच, वर्षानुवर्षे . न  थकता ,   न  थांबता  आनंदाने . कुठे ही उपकाराची भावना  नाही. अहंपणा नाही .कंटाळा नाही. ती सुखी  घराची  किल्ली आहे .एकाच वेळी ती  असंख्य  departments  सहज सांभाळते. सकाळ ते संध्याकाळ असंख्य काम सहज करते.अगदी काटेकोर पणे बिनबोभाट . ती घरची   Administrative officer  आहे. वेळ पडली तर डॉक्टर,  टीचर , counselor आहे . आणि कधी कधी हिटलर ही होते.  जवळ जवळ  सर्व मंत्रालय  तिच्या कडेच असतात . घराची गृहमंत्री , वित्त मंत्री  आहे  ती. थोडक्यात घराचा भक्कम आधारस्तंभ  आहे . 
       तज्ञ, कोणत्या तरी एकाच क्षेत्रात perfect असतात व त्यांच्या या expertise चे भरपूर पैसेही  मिळतात त्यांना .येथे प्रत्त्येक घरची आई प्रत्त्येक department किती कुशलतेने सांभाळते .
                  I   think she is The Best CEO in the world .
       जगाची रीतच आहे ही .  जून्या काळापासून चालत आलेली. कुठे न लिहीलेले नियमच आहेत ते .ही सर्व कामे करण्यात तिला आनंद आहे.  समाधान आहे .एखादं काम जरी नीट झालं नाही तर ती disturb होते‌ .म्हणजे  अगदी भरलेला डबा शाळेत जाताना मुलगा विसरला, तरी ती अस्वस्थ होते .माझी कुठे चूक झाली ?? याचा विचार करते .व पुन्हा असे होणे नाही .याची काळजीही  घेते.
       यासर्व कामाचा मला मोबदला मिळावा हा विचार तिच्या मनात ही येत नाही .
     "  प्रत्त्येक घरी देव पोहचू शकत नाही म्हणून आई असते. आईच्या पायाशी स्वर्ग आहे .  आईला केलेला नमस्कार देवाला  पोचतो " वगैरे वगैरे 
       हे मोठें , महान विचार पुस्तकात वाचायला मिळतात .काळ कितीही बदलू दे, आधुनिकता किती ही असू दे , "आई  "आईचं राहणार आहे .तशीच कर्तव्यदक्ष. आपल्या घराला घरपण देणारी,  जीव ओवाळून टाकणारी ,सांभाळणारी ती 
आई असते.

संग्रहित लेख

बाबा नेहमीच मागे का असतात.??? हे माहित नाही.

बाबा नेहमीच मागे का असतात.??? हे माहित नाही. 

आई नऊ महिने ओझं वाहते, वडील २५ वर्षे ओझं वाहतात. दोघेही बरोबरीचे आहेत, तरीही... बाबा मागे का आहेत ???  हे माहित नाही. 

 आई कुटुंबासाठी मोबदला न घेता काम करते, बाबा कुटुंबासाठी सर्व पगारच खर्च करतात. दोघांचे प्रयत्न समान आहेत. तरीही... बाबा मागे का पडतात??? हे माहित नाही.

 आई आपल्याला पाहिजे ते शिजवते. बाबा आपल्याला पाहिजे ते खरेदी करतात. दोघांचे प्रेम समान आहे, परंतु आईचे प्रेम वरिष्ठ म्हणून दर्शवले जाते. बाबा मागे का पडतात???  हे माहित नाही.

 जेव्हा आपण फोन करतो तेव्हा आपल्याला आधी आईशीच बोलावेसे वाटते. दुखापत झाल्यास आपण ‘आई गं’ असेच ओरडतो. जेव्हा आपल्याला वडिलांची गरज असते तेव्हाच आपल्याला त्यांची आठवण होते. परंतु वडिलांना कधीच वाईट वाटले नाही, की इतर वेळी मुलांना आपण आठवत नाही. पिढ्यानपिढ्या मुलांचे प्रेम मिळवतांना आपण पाहतो, की बाबा नेहमीच मागे पडतात का...??? हे माहित नाही.

 कपाटांमध्ये रंगीबेरंगी साड्या आणि मुलांसाठी पुष्कळ कपडे भरलेले असतात, परंतु वडिलांकडे फारच कमी कपडे असतात. कुटुंबियांच्या गरजेपुढे त्यांना स्वतःच्या गरजेची काळजी नसते. तरी... बाबा अजूनही मागे का आहेत ??? हे माहित नाही.

 आईकडे सोन्याचे अनेक दागिने असतात, पण वडिलांकडे एकच रिंग असते, कदाचित ती ही नसते. तरीही आई कमी दागिन्यांची तक्रार करते, आणि बाबा कधीच करत नाहीत. तरी अजूनही बाबा मागे का आहेत ??? हे माहित नाही.

 आपल्या कुटुंबाचा सांभाळ करण्यासाठी बाबा आयुष्यभर खूप कष्ट करतात. पण घरातच जेव्हा जेव्हा ओळख मिळते, तेव्हा बाबा नेहमीच का मागे पडतात??? हे माहित नाही. 

 आई म्हणते, ह्या महिन्यात  मुलांची शिकवणी फी देण्याची गरज आहे. सणानिमित्त मला साडी घेऊ नका, परंतु वडिल स्वतःसाठी नव्या कपड्यांचा साधा विचारही करत नाही. तरीही... बाबा का मागे पडतात ???  हे माहित नाही.

आई-वडील म्हातारे झाल्यावर मुले म्हणतात, आई कमीत कमी घरातील कामात मदत करते, पण ते म्हणतात, बाबा निरुपयोगी आहेत. बाबा मागे का पडतात..??? हे माहित नाही.

वडील मागे, ‘मागच्या बाजूला’ आहेत. कारण ते कुटुंबाचा कणा आहेत. त्यांच्यामुळेच आपण सगळे उभे आहोत.
म्हणून तर ते... मागे आहेत.

  आई श्रेष्ठ आहे.  पण, म्हणून... बाबा कनिष्ठ नाहीत, एक गोष्ट निर्विवाद सत्य आहे की, ...
❤️...कुठलाही मोठेपणा न मिरवणारा बाबा आमचा भक्कम आधार आहे.

Saturday, September 19, 2020

"९०/१० तत्व "

विचार पचायला/अमलात आणायला कठीण आहेत.
पण विचार करायला लावणारे नक्की आहेत
"९०/१० तत्व "

फक्त १०% जीवन हे आपल्या सोबत काय घडलंय यावर आहे, आणि ९०% जीवन हे त्यावर आपल्या प्रतिक्रियावर अवलंबून आहे.

जे घडतंय त्या १०% वर आपला काहीही ताबा नसतो.
उदा. गाडी बंद पडणे, ट्रेन, विमान, बसला उशीर होणे, मुलांना यायला उशीर होणे, अचानक काहीतरी घडणे, आधीच उशीर झालाय आणि आपण जाण्या आधीच लाल सिग्नल पडणे वगैरे वगैरे.
या १०% गोष्टींसाठी आपण काहीही करू शकत नाही. पण आपण त्यावर कसे वागतो यावर पुढचं ९०% अवलंबून आहे.

उदाहरण द्यायचे तर, तुम्ही कामावर जाण्यासाठी पेहराव करून बसलात आणि चहा देण्यासाठी कन्या आतून आली, तिला ठेच लागली आणि कपातला चहा तुमच्या शर्टावर सांडला. 
हे फक्त १०% झालं.
यावर तुमची प्रतिक्रिया काय असेल यावर पुढचं ९०% रामायण अवलंबून आहे.

तुम्ही चिडलात, तिला ओरडलात, ती दुःखी झाली, रडायला लागली. आता तुम्ही तुमचा मोर्चा पत्नीकडे वळवलात, "हे सगळं तुझ्या लाडामुळे झालंय, मुलांना अजिबात वळण लावलं नाहीस" असं म्हणून पत्नीलाही ओरडलात. तसंच घसरणारा ट्रे विकत आणतांना लक्ष दिलं नाही म्हणून तिला ऐकवलेत.
तुम्ही बेडरूम मध्ये जाऊन कपडे बदललेत. नंतर परत हॉल मध्ये आलात तर, मुलगी अजूनही रडतेच आहे. आत्तापर्यंत तिने न्याहारी करून शाळेला जाण्यासाठी तयार व्हायला हवे होते. उशीर झाल्यामुळे तिची स्कुलबस निघून गेली. 
तुमच्या पत्नीलाही ताबडतोब कामावर जायला हवे.
तुम्ही कार बाहेर काढलीत आणि मुलीला शाळेत सोडायला गेलात. उशीर झाल्यामुळे तुम्ही गाडी वेगात चालवताय. नियम तोडल्यामुळे पोलिसांना दंड देऊन तुम्ही १५ मिनिटे उशिरा शाळेत पोहोचलात.
तुमची मुलगी तुम्हाला टाटा न करताच शाळेत पळत गेली.
२० मिनिटे उशिराने ऑफिसला पोहोचल्यावर बॅग घरीच विसरल्याचं तुमच्या लक्षात आलं.
तुमचा दिवस असा ताण तणावाने सुरू झाला.
दिवसभरात अशाच अजून काही घटना घडल्या आणि त्यामुळे  संध्याकाळ पर्यंत वातावरण अजून वाईट झाले.

आता तुम्ही घरी आलात. घरात आल्यावर एक गोष्ट तुमच्या लक्षात आली, ती म्हणजे तुमच्या पत्नीशी आणि मुलीशी असलेल्या नात्यात थोडी दरी निर्माण झालीय.

का ?

कारण तुमचा सकाळचा प्रतिसाद.

तुमचा दिवस वाईट का गेला?
• त्याला कारण कॉफी होती?
• त्याला कारण मुलगी होती?
• त्याला कारण पोलीस होते?
• त्याला कारण तुम्ही स्वतः होता?

उत्तर

_तुम्ही स्वतः_

कॉफीचं काय झालं यावर तुमचं कसलंही नियंत्रण नव्हतं.
त्या ५ सेकंदात तुमचा जो प्रतिसाद होता त्यामुळे तुमचा दिवस खराब गेला.

काय करायला हवे होते ?

कॉफी तुमच्या शर्टावर सांडली, तुमची मुलगी घाबरून रडू लागली.
तुम्ही म्हणाला असतात "बेटा, आत्ता असुदेत. पुढच्या वेळी असं होऊनये यासाठी लक्ष दे"
आणि तुम्ही शर्ट बदलला असतात तर, तुमच्या मुलीला शाळेत जातांना हसतमुखाने तुम्हाला निरोप देता आला असता.
मुलीनेही नेहमीप्रमाणे हसतमुखाने निरोप घेतला असता.
तुम्हीही ५ मिनिटे आधी ऑफिसला पोहोचला असतात.

फरक पहा....

दोन वेगवेगळे प्रसंग. दोन्ही एकाच गोष्टी मुळे सुरू झाले. शेवट मात्र वेगवेगळा.

खरच, काय घडतंय त्या १०% प्रसंगांवर आपला काहीही ताबा नसतो.
उरलेलं ९०% मात्र आपण त्यावर काय प्रतिसाद देतो त्यावर अवलंबून असतं.

९०/१० तत्वज्ञान कसे वापरावे ?

• जर कुणी तुमच्याबद्दल वाईट बोललं तर तुम्ही ते मनावर घेऊ नका, 
पालथ्या पातेल्यावर पाणी पडले तर काय होते, त्याप्रमाणे वागा. 
त्यांच्या वाईट बोलण्याचा तुमच्या मनावर परिणाम होऊ देऊ नका.
तुम्ही चांगला प्रतिसाद देऊन तुमचा दिवस चांगला जाऊ द्या.

चुकीचा प्रतिसाद दिल्यास शब्दाला शब्द वाढेल आणि त्यामुळे  मित्र किंवा जवळची व्यक्ती गमावू शकते.

• रस्त्यात कुणी आपल्या गाडीच्या आडवी गाडी मारली किंवा कट मारला किंवा चालतांना तुमच्या पुढे कुणी गेले किंवा तुमच्या कुणी आडवे गेले तर तुम्ही काय करता?
तुम्हाला राग येतो?
तुम्ही दात ओठ खाता?
स्टीअरिंग वर जोरजोरात हात आपटता?
मुठी आवळता?
भांडायला जाता?
तुमचा श्वासोश्वास वाढतो?

तुम्ही २-५ मिनिटे उशिरा पोहोचलात तर काय फरक पडणार आहे ?

९०/१० तत्वज्ञान आठवा आणि सोडून द्या. त्या प्रसंगा आधी जसे होतात तसेच आनंदी रहा.

तुम्ही उद्यापासून येऊ नका असे बॉसने तुम्हाला सांगितले, किंवा तुमची हक्काचे काम तुम्हाला न मिळता दुसऱ्याला दिले आहे असे तुम्हाला कळले तर ?

• मन अशांत करून झोपमोड करून घेऊ नका
• तुमची काळजी घेणारी शक्ती कामाला लावा आणि तिचा दुसरे काम शोधण्यासाठी वापर करा.

*बस, कॅब, विमान, रेल्वे उशिराने येणार आहे असे तुम्हाला कळले तर ?

• संबंधित कर्मचाऱ्यांना ओरडून काहीही होणार नाही कारण जे घडलंय त्यावर ते काहीही करू शकत नाहीत.
•  पण तुमच्या दिवसाच्या नियोजनात त्यानुसार बदल करता येणार आहे

• वाट पाहण्यातला वेळ वाचनात, महत्वाची कामं फोनवर करण्यात घालवा
• आजूबाजूला असलेल्या माणसांच्या ओळखी करण्यात घालवा.

मित्रांनो ९०/१० तत्वाचा वापर करून आपण आपले जीवन ताणतणाव मुक्त जगुया 

Wednesday, September 16, 2020

मनाचा दवाखाना

एक मास्क असं असावं...
की ते मनालाही लावता यावं,
मनाला लोभणारे विचार, 
अगदी फिल्टर करूनच, 
आत यावेत.....

प्रत्येक विचारात 
एक ऑक्सिजन पातळी असते....
की ते,
मनाच्या फुफ्फुसाला
अन हृदयाला 
वेळोवेळी प्रसन्न ठेवते.
मनातील आँक्सिमिटरने, 
त्या विचारातील 
आँँक्सिजन पातळी ,
वेळोवेळी चेक करणे गरजेचे असते.

दिवसभर 
वेगवेगळ्या विषयांचा 
अन विचारांचा भडिमार झालेल्या,
थकलेल्या मनाला, 
आपुलकीचं आणि प्रेमाचं 
सॅनिटाजर लावणं 
गरजेचं असतं, 
तेंव्हाच 
कुठे तरी मनावरील,
ताणतणावाचे विषाणू निघून जातात. 

कधीतरी...
स्वतःला स्वतःसाठी ,
मनाच्या स्वास्थ्यासाठी 
मौन धारण करून
लाॅकडाऊन करून घ्यावं,
यामुळे मनःशांती मिळतेच मिळते,
त्याबरोबर  ....
मनातील प्रदूषणही निघून जाते.

आस्था, 
प्रेम, माया,आपुलकी 
अन मैत्री...
यांना मनातल्या कप्प्यात,
कायमचच स्थान असावं...
त्यांना अक्षरशः 
मनातल्या कप्प्यात, 
कायमचं क्वारान्टाईन
करून ठेवावं....

तापदायक विचाराला, 
मनातील थर्मामीटरने 
वेळोवेळी चेक करा,
विचारांचा 
पारा चढला असेल,
मनाला त्रासदायक असेल,
तर...
त्याला प्रवेश 
देऊ नका, 
नाहीतर योग्य उपचार करा....

राग, द्वेष,मोह,मत्सर...
यांना मनातून अन्लाॅक करून, 
कायमचं हद्पार करून टाकावं...

एखाद्या मनाची 
मैत्री...
अशी असावी की...
मनातील स्टेथोस्कोपने
त्याचा ...
प्रत्येक श्वास अन धडकी
हे पहाताच क्षणी 
दूरूनच कळावी....

नात्यातही मैत्रीने
वास केला,
तर त्या मनाला,
औषधांची अन
बाहेरील कृत्रिमरीत्या 
तयार केलेल्या 
ऑक्सिजनची
आणि 
व्हेंटीलेटरचीही
कधीही गरजच लागणार नाही ....

एक मनाचा दवाखाना-
 आंतरजालावरून साभार


(मा.कवीचे नाव माहीत असल्यास कळवावे कविता त्यांच्या नावानिशी प्रसिद्ध केली जाईल)

Friday, September 11, 2020

अपूर्ण कविता

आज एक सुरेख कविता वाचनात आली. .  पुनित मातकर, गडचिरोली यांची. बर्‍याच दिवसांनी एखादी कविता वाचून डोळे भरुन आले. . कमाल कविता आहे. . पुनितजी 

अपूर्ण कविता

शाळा सुटल्याच्या दीर्घ घंटेचा
आवाज विरत नाही तोच
सुसाट वेगानं मी पोहोचायचो 
घराच्या दारात...

पाठीवरलं दप्तर फेकून
घोड्यागत उधळत
पोहोचायचो मैदानात,
मस्तवाल बैलासारखा
धूळमातीत बेभान होऊन 
मिरवत राहायचो स्वतःचं 
पुरूष असणं..

तीही यायची शाळेतून..
चार रांजण पाणी...
घरअंगणाची झाडलोट...
देव्हा-यातला दिवा लावून 
ती थापायची गोल भाक-या
अगदी मायसारखीच
अन् बसून राहायची उंब-यावर..
रानातून माय येईस्तोवर

ती चित्र काढायची..
रांगोळ्या रेखायची..
भुलाबाईची गाणी अन्
पुस्तकातल्या कविता 
गोड गळ्यानं गायची....
धुणंभांडी..सडा सारवण
उष्टं खरकटं..सारं मायवानीच करायची

मी पाय ताणून निजायचो,
ती पुस्तक घेऊन बसायची....
दिव्याच्या वातीत उशीरापर्यंत...

एकाच वर्गात असून मास्तर
माझा कान पिळायचे
कधीकधी हातानं....
कधी शब्दानं ...
"बहिणीसारखा होशील तर 
आयुष्य घडवशील..."म्हणायचे,
मग करायचो कागाळ्या
मायजवळ...

मॕट्रिकचा गड 
मी चढलो धापा टाकत..
तीनं कमावले मनाजोगते गुण,
बाप म्हणला 
दोघांचा खर्च नाही जमायचा
त्याला शिकु दे पुढं...
टचकन डोळ्यात आलेलं पाणी
तसच मागं परतवत
ती गुमान बाजुला झाली 
पाठच्या भावाच्या रस्त्यातून...

ती शेण गोव-या थापत राहिली..
मायसंग रानात रापत राहिली 
काटे तणकट वेचत राहिली...
बाईपण आत मुरवत राहिली

तिच्या वाट्याचा घास घेऊन 
मीही चालत राहिलो 
पुस्तकांची वाट...  
कळत गेलं
तसं सलत राहिलं 
तिनं डोळ्यातून परतवलेलं
पाणी...

तिला उजवून बाप 
मोकळा झाला..
मायला हायसं वाटलं..
मी मात्र गुदमरतो अजुनही 
अव्यक्तशा
ओझ्याखाली...

दिवाळी..रसाळी..राखीला
ती येत राहते
भरल्या मनानं..
पाठच्या भावाच्या वैभवानं हरखते..
बोटं मोडून काढते दृष्ट..
टचकन आणते डोळ्यात पाणी..
पाठच्या भावासाठी
जाताना पुन्हा सोडून जाते..
मनभरून आशीर्वाद...

ती गेल्यावर मी हूरहूरत राहतो 
ज्योतीसारखा
जिच्या उजेडात ती 
उशीरापर्यंत वाचायची पुस्तक,
पाठ करायची कविता...

जिची कविता राहिली माझ्यासाठी अपूर्ण....

                    पुनीत मातकर
                          गडचिरोली

माझे नवीन लेखन

खरा सुखी

 समाधान पैशावर अवलंबून नसतं, सुख पैशानं मोजता येत नसतं. पण, सुखासमाधानानं जगण्यासाठी पैशांची गरज पडत असतेच. फक्त ते पैसे किती असावेत ते आपल्...