Friday, September 11, 2020

अपूर्ण कविता

आज एक सुरेख कविता वाचनात आली. .  पुनित मातकर, गडचिरोली यांची. बर्‍याच दिवसांनी एखादी कविता वाचून डोळे भरुन आले. . कमाल कविता आहे. . पुनितजी 

अपूर्ण कविता

शाळा सुटल्याच्या दीर्घ घंटेचा
आवाज विरत नाही तोच
सुसाट वेगानं मी पोहोचायचो 
घराच्या दारात...

पाठीवरलं दप्तर फेकून
घोड्यागत उधळत
पोहोचायचो मैदानात,
मस्तवाल बैलासारखा
धूळमातीत बेभान होऊन 
मिरवत राहायचो स्वतःचं 
पुरूष असणं..

तीही यायची शाळेतून..
चार रांजण पाणी...
घरअंगणाची झाडलोट...
देव्हा-यातला दिवा लावून 
ती थापायची गोल भाक-या
अगदी मायसारखीच
अन् बसून राहायची उंब-यावर..
रानातून माय येईस्तोवर

ती चित्र काढायची..
रांगोळ्या रेखायची..
भुलाबाईची गाणी अन्
पुस्तकातल्या कविता 
गोड गळ्यानं गायची....
धुणंभांडी..सडा सारवण
उष्टं खरकटं..सारं मायवानीच करायची

मी पाय ताणून निजायचो,
ती पुस्तक घेऊन बसायची....
दिव्याच्या वातीत उशीरापर्यंत...

एकाच वर्गात असून मास्तर
माझा कान पिळायचे
कधीकधी हातानं....
कधी शब्दानं ...
"बहिणीसारखा होशील तर 
आयुष्य घडवशील..."म्हणायचे,
मग करायचो कागाळ्या
मायजवळ...

मॕट्रिकचा गड 
मी चढलो धापा टाकत..
तीनं कमावले मनाजोगते गुण,
बाप म्हणला 
दोघांचा खर्च नाही जमायचा
त्याला शिकु दे पुढं...
टचकन डोळ्यात आलेलं पाणी
तसच मागं परतवत
ती गुमान बाजुला झाली 
पाठच्या भावाच्या रस्त्यातून...

ती शेण गोव-या थापत राहिली..
मायसंग रानात रापत राहिली 
काटे तणकट वेचत राहिली...
बाईपण आत मुरवत राहिली

तिच्या वाट्याचा घास घेऊन 
मीही चालत राहिलो 
पुस्तकांची वाट...  
कळत गेलं
तसं सलत राहिलं 
तिनं डोळ्यातून परतवलेलं
पाणी...

तिला उजवून बाप 
मोकळा झाला..
मायला हायसं वाटलं..
मी मात्र गुदमरतो अजुनही 
अव्यक्तशा
ओझ्याखाली...

दिवाळी..रसाळी..राखीला
ती येत राहते
भरल्या मनानं..
पाठच्या भावाच्या वैभवानं हरखते..
बोटं मोडून काढते दृष्ट..
टचकन आणते डोळ्यात पाणी..
पाठच्या भावासाठी
जाताना पुन्हा सोडून जाते..
मनभरून आशीर्वाद...

ती गेल्यावर मी हूरहूरत राहतो 
ज्योतीसारखा
जिच्या उजेडात ती 
उशीरापर्यंत वाचायची पुस्तक,
पाठ करायची कविता...

जिची कविता राहिली माझ्यासाठी अपूर्ण....

                    पुनीत मातकर
                          गडचिरोली

No comments:

Post a Comment

माझे नवीन लेखन

खरा सुखी

 समाधान पैशावर अवलंबून नसतं, सुख पैशानं मोजता येत नसतं. पण, सुखासमाधानानं जगण्यासाठी पैशांची गरज पडत असतेच. फक्त ते पैसे किती असावेत ते आपल्...