Sunday, April 25, 2021

सायकलवाली आई

🚲 सायकलवाली आई 👩‍👦
➿➿➿➿➿➿➿➿
       तिला मी गेली चार वर्षे रोजच पहातेय ... ओळख अशी खास नाही पण ' ती ' साऱ्यांच्या उत्सुकतेचा केंद्रबिंदू. आम्ही सगळ्या आपापल्या मुलांना शाळेत सोडायला- आणायला जाणाऱ्या आई गॅंग मध्ये ' ती ' एकदम वेगळी ... एकमेव सायकलवर येणारी आई.     
          आजकाल status symbol म्हणून भारीचे ब्रॅंडेड कपडे घालून सायकल चालविण्याचे फॅड बोकाळले आहे ... ही त्यापैकी नव्हे. सायकल चालविणे हा  कदाचित तिचा नाईलाज असावा .  आमच्या स्कूटी किंवा कार मधून येणाऱ्या पोरांना हे अनपेक्षित होत . कुणाकडे गाडी नसते किंवा TV / Fridge नसतो हे त्यांना पटतच नाही. 
        ती सावळी आरस्पानी ... आनंद, समाधान ,आत्मविश्वासाने अक्षरशः ओथंबलेली.... साधीशी सिंथेटिक फुलांची साडी असायची ...... गळ्यात चार मणि हातात दोनच  काचेच्या बांगड्या. माझ्या गाडीच्या शेजारीच तिची सायकल पार्क करायची. मागच्या सिटवर तिचा मुलगा .... त्याला सायकलचे कॅरीयर टोचू नये म्हणून मस्त मउ ब्लॅंकेटची घडी घातलेली.... लहान असतांना ती त्याला पाठीशी बांधून आणित असे. लेक निटनेटका ... स्वच्छ कपडे ... बूटांना पॉलिश. तो पार वर्गात पोचेपर्यंत ती अनिमिष नेत्रांनी पहात असायची .... जणू त्याच शाळेत जाणं ती अनुभवतेय ... जगतेय.
              हळूहळू काहीबाही कळायच तिच्या बद्दल.... ती पोळ्या करायची लोकांकडे... फारतर दहावी शिकलेली असावी. नवरा हयात होता की नव्हता  कोण जाणे... पण तिच्या आईसोबत राहायची असे कळले . RTE ( right to education ) कोट्यातून तिच्या मुलाची admission झालीये एव्हढीच काय ती माहिती मिळाली. 
           एकदा माझ्या लेकीचा कुठल्याश्या स्पर्धेत दुसरा क्रमांक आला. तिला मी यथेच्छ झापत असतांना पार्किंग मध्ये सायकलवालीचा लेक दिसताच माझी कन्यका किंचाळली ...
" अग तो बघ तो first आला ना so मी  second आले ..." आणि मोठ्यांदा भोकाड पसरल. 
मी त्याची paper sheet पाहिली ... मोत्यासारख अक्षर ... अभावितपणे माझ्या लेकीला दाखवत म्हणाले " बघ बघ ... याला म्हणतात अक्षर ! किती मेहनत घेते मी तुझ्यासाठी .. आणि तू ??? " माझे डोळे संताप ओकत होते. त्याची आई शांतपणे म्हणाली " कुणीतरी पहिलं आलय म्हणून तुमची लेक दुसरी आल्याचा आनंद तुम्ही गमवताय ना! "  ..... सणसणीत चपराक. मी निरुत्तर. मी खोचकपणे विचारल  "कोणत्या क्लासला पाठवता याला? " ती म्हणाली
" मी घरीच घेते करून जमेल तसं... .. मुलांना नेमक काय शिकवतात ते कळायला हवे ना आपल्याला. " तेव्हाच कळलं हे रसायन काहीतरी वेगळ आहे.
         हळूहळू तिच्याबद्दल माहिती कधी मिळू लागली तर कधी मिच मिळवू लागले. ती पाथर्डी गावातून यायची.... सकाळी सात तर संध्याकाळी आठ अश्या एकूण पंधरा घरी पोळ्या करायची. तिने स्वतः एका teacher कडे क्लास लावला होता ..बदल्यात ती त्यांच्या पोळ्यांचे पैसे घेत नसे. मी नतमस्तक झाले. मनोमन तिच्या जिद्दीला आणि मातृत्वाला सलाम केला .
          पहिल्या वर्गाचा result होता. ती खूपच आनंदात दिसली. चेहऱ्यावर भाव जणू पाच तोळ्याच्या पाटल्या केल्या असाव्यात .. मी अभिनंदन केले ... तेव्हा भरभरून म्हणाली. ....
 " टिचरने खूप कौतुक केले फार सुंदर पेपर लिहिलेत म्हणाल्या..फक्त थोडे बोलता येत नाहीत म्हणाल्या . त्याच्याशी घरी इंग्रजीत बोल म्हणाल्या. " मी तिच मनापासून ऐकू लागले ... 
" छोट्या गावात वाढले ताई.. वडील लहानपणी गेले ... अकरावीत असताना मामाने लग्न लावले... शिकायच राहूनच गेल .. फार इच्छा होती हो ! "... डोळ्यात पाणी प्रयासाने रोखून म्हणाली... " आता याची आई म्हणून कुठेच कमी पडणार नाही मी... एका teacher शी बोलणं झालय त्या मला इंग्रजी बोलायला शिकवणार म्हणाल्यात .... बारावीचा फॉर्म भरलाय ... उद्या याला मोठा झाल्यावर कमी शिकलेली आई म्हणून लाज वाटायला नको ." म्हणत खळखळून हसलीं. त्याला आज पोटभर पाणीपुरी खाऊ घालणार असल्याचे सांगून ती निघाली.
        मुलांना रेसचा घोडा समजणारी "रेस कोर्स मम्मा",  सकाळी सातच्या शाळेलाही मुलांना सोडताना  नुकतीच पार्लर मधून आलेली वाटणारी "मेकअप मम्मा" , दुसऱ्या मुलाच्या जन्मानंतर केवळ बारीक होण्यावर बोलणारी "फिटनेस मम्मा " स्वतः पोस्ट ग्रज्युवेट असूनही नर्सरीतच मुलांना हजारो रुपयांचे क्लासेस लावून मला कसा याचा अभ्यास घ्यायला वेळ नाही हे सांगणारी "बिझी मम्मा" किंवा मुले allrounder होण्यासाठी त्यांना मी कशी हिरा बनवून तासते हे सांगणारी 
" जोहरी मम्मा " ... ह्या आणि अश्याच अनेक मम्मी रोज भेटतात मला.........या मम्मी आणि मॉमच्या जंगलात आज खूप दिवसांनी मला एक " आई " भेटली. अशी आई जी एक स्त्री म्हणून.... माणूस म्हणून... आणि एक आई म्हणून खूप खंबीर आहे... कणखर आहे. फारच थोड्या नशीबवान स्त्रिया असतात ज्यांना जिजाऊ आणि सावित्रीबाई खऱ्या अर्थाने कळतात... सायकलवाली आई त्यातलीच एक ..... 🙏🏻
🔏©️ यशश्री रहाळकर
( लेख आवडल्यास नक्कीच forward करा पण कोणतीही काटछाट न करता मूळ लेखकाचे नावासह ही विनंती ... धन्यवाद! )

Saturday, April 17, 2021

थँक्स बाबासाहेब

ती माझी कलीग, 
माझ्या पुढच्याच डेक्सवर काम करते...
मस्त स्माईल करत रोज मला गुड मॉर्निंग सर म्हणते...
रोज माझ्या रिप्लायमध्ये जोराचा जयभीम असतो...
तिला थोडं आॅकवर्ड फील होतं माझ्या अशा रिप्लायमुळे...
एक दिवस ती मला म्हणाली
माझं एका मुलावर प्रेम आहे, लग्न करायचं आहे
पण घरचे विरोध करत आहेत
मी म्हटलं संविधान आहे तुझ्यासोबत,  
बालिग झाली आहेस
तू निवड तुझा साथीदार बिनधास्त...
काही दिवसांनी ती मिठाई घेऊन आली
थँक्स सर, मी कोर्टात लग्न केलंय....
मी म्हटलं
एक वेळ म्हण थँक्स बाबासाहेब .....
नंतर काही दिवसांनी, आनंदानी ती आई होणार म्हटली
पण , ऑफिसच काय? 
मी म्हटलं तू का टेंशन घेतेस, 
टाक की , प्रेग्नेंसी रजा, फुल पगारी...
ती परत आनंदी होऊन थँक्स सर म्हटली..
मी म्हटलं
एक वेळा म्हण थँक्स बाबासाहेब...
एक दिवस , आश्चर्य चकित होऊन म्हटली
सर ,माझा भाऊ मला भेटायला आला, 
सर्व काही विसरून
त्याला आमची जमीन विकायची म्हणतो, 
वारस म्हणून  हात जोडून सही मागत होता.
तो सर्व विसरला, 
माझ्या लेकराला खेळणी आणला,
मी तर खूप खुश आहे म्हणत, 
हात जोडून देवाचे आभार मानत होती...
मी  म्हटलं, 
एक वेळा म्हण थँक्स बाबासाहेब...
तिला हळू हळू बाबासाहेब कळू लागले..
शिक्षण, नोकरी, बस-ट्रेनमधील आरक्षित तिकिटासाठी
या सर्वांसाठी, ती म्हणू लागली
थँक्स बाबासाहेब.....
ती आठवत होती तिच्या पूर्वजांना
सती गेलेल्या तिच्या आईच्या आईला..
केशवपन झालेल्या तिच्या बाबाच्या आईला...
चूल आणि मूल करत , नवऱ्याचा मार खाणाऱ्या
हालअपेष्टा सहन केलेल्या तिच्या स्वतःच्या आईला...
आणि तिच्या मनातून आवाज निघाला..
थँक्स बाबासाहेब.....
दुसऱ्यादिवशी मी जरा लवकरच गेलो ऑफिसमध्ये 
तर काय, 
तिच्या डेक्सवर खूप मोठी बाबासाहेबांची प्रतिमा आणि
खाली लिहलेलं थँक्स बाबासाहेब...
तेवढ्याच तिकडून तिचा आवाज आला
जयभीम सर...
ती सांगत होती, 
सर माझी मैत्रीण आमदार झाली आहे
ती, देवाला, पक्ष प्रमुखाला, नवऱ्याला जनतेला सर्वांना थँक्स म्हणत होती...
मी तिला म्हटलं, 
एक वेळा म्हण थँक्स बाबासाहेब...!
Copied 
     
                      कवी-  Mukesh Kamble सर
                      सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
                      मो.न. ९६२३९७१५९०

Wednesday, April 14, 2021

देववेडी

देववेडी

लेखिका-गौरी ब्रह्मे.

       आस्तिक माणसं असतात, नास्तिक असतात, धड ना सश्रद्ध, ना धड अश्रद्ध माणसं असतात, अंधश्रद्धाळू, देवभोळी माणसं असतात. पण देववेडी माणसं असतात का? 
        माझ्या सासूबाईंकडे पाहिलं की 'हो' असंच उत्तर द्यावं लागेल. त्यांच्या देवावरच्या श्रद्धेबद्दल लिहायचं म्हणलं तर एक छोटेखानी पुस्तक होईल. तूर्तास त्यांच्या नैवेद्यप्रेमाबद्दल....
        सामान्य माणसाला प्रश्न पडतो, 'आज जेवायला काय?' माझ्या सासूबाईंना प्रश्न पडतो, 'आज नैवेद्याला काय?' दूधसाखर, खडीसाखर, गूळखोबरं, हे तर चिल्लेपिल्ले नैवेद्य झाले, पण घरात जो काही गोडाधोडाचा पदार्थ बनेल, फळं असतील, कोणताही उत्तम पदार्थ असेल, त्या आजतागायत एकदाही नैवेद्य दाखवल्याशिवाय जेवलेल्या नाहीत. 
        लहान मुलांना जसा खाऊ पाहिल्यावर आनंद होतो, तसा माझ्या सासूबाईंना देवासाठी बनवलेला नैवेद्य पाहिल्यावर होतो. 
         नैवेद्य दाखवताना त्यांच्या चेहऱ्याकडे पहावं फक्त. आई जसं प्रेमाने आपल्या लेकराला भरवते त्याच ममतेने, श्रद्धेने त्या नैवेद्य दाखवतात. मी त्यांची सून म्हणून कौतुक करते आहे असं नाही, मला स्वतःला ठरवून देखील इतकं सश्रद्ध होता येणार नाही. पण देवाबद्दल इतकं प्रेम की त्याला आपल्या अस्तित्वाचा एक भाग मानून, निरपेक्ष भावाने जीवन जगण्याचं गणित जे त्यांना जमलेलं आहे, ते माझ्या पिढीतल्यांसाठी खरोखरी आश्चर्यकारक आहे. केवळ 'तेच योग्य आहे आणि प्रत्येकाने असंच असावं' असं अजिबात नाही. पण देववेड्या माणसांना परमेश्वर अंमळ जास्त सुखी ठेवतो असं मला वाटतं, कारण त्यांची श्रद्धा त्यांना जास्त rooted (याला समांतर मराठी शब्द काय असावा याचा विचार करते आहे) ठेवते... बाकी अश्रद्ध माणसाची सुद्धा कशा न कशावर तरी श्रद्धा असतेच! तो देवच असेल असं नाही. पण कोणी मान्य करतं कोणी करत नाही.
        गेली अनेक वर्ष माझ्या सासूबाई सकाळचा चहासुद्धा देवाला दाखवून मग पितायत. हा एखाद्याला वेडेपणा वाटेल, पण ज्याचं अस्तित्व एखाद्याशी घट्ट बांधलेलं असतं त्या माणसासाठी हे अगदी नॉर्मल आहे. 
        आम्ही बाहेर काही खरेदीला निघालो, की त्या आवर्जून सांगतात, "आमच्या देवाला काहीतरी आणा ग." हे म्हणजे असं झालं, की आमच्या बाळाला येताना काहीतरी खाऊ घेऊन या बरं का", इतकं ममत्व असतं त्यात. मग आपण लाडूपेढेमिठाई आणली तरी चालते किंवा अगदी तीन केळी आणली तरीही त्यांना चालतात. मुद्दा असा की देव उपाशी राहिला नाही पाहिजे. गोडाधोडाचं काही आणलं की त्या पहिलं देवाचं काढून ठेवणार, मग काय खायचंय ते खा म्हणणार. यातलं गमक इतकंच की आपण जे खातो पितो त्यातलं आधी 'त्याचं' थोडं मग आपलं. आवडते पदार्थ एकट्याने खाणं सोपं आहे, पण त्यातला थोडा भाग दुसऱ्यासाठी आधी काढून ठेवणं, मनावर संयम ठेवायला शिकवणारी यापेक्षा दुसरी अजून कोणती चांगली रीत असेल? 
        एखाद्या दिवशी उपवास असेल तर त्या आवर्जून वरईचे तांदूळ, दाण्याची आमटी, थालीपीठ, खिचडी, जे काही केलं असेल ते आधी नैवेद्य दाखवणार मग स्वतः खाणार. 
        मी त्यांना मजेत विचारते, "आई, देवाला कसले उपवास करायला लावता?" तेव्हा त्या म्हणतात, "अग बिचारा गोड खाऊन कंटाळला असेल, त्याला पण खावंसं वाटतं ना अधेमधे जरा चमचमीत उपवासाचे पदार्थ. आपल्याला लागतो ना चेंज? मग त्यालाही नको का?" तात्पर्य काय, तर तो आपल्यातलाच एक आहे, फक्त जरा जास्त स्पेशल आहे, कारण त्याला आपली काळजी आहे.
         नवरात्रात आमच्या देवीची जी काही चैन असते ती विचारू नका. त्यांची मुलं, सुना, देवीसाठी भरपूर मिठाई, फळफळावळ आणून देतात, पण याव्यतिरिक्त, नवरात्रात पूजा झाली, की त्या दररोज दुपारी कालवलेला दहीदूध सायभात असा नैवेद्य दाखवतात. यामागचा विचार काय? तर 'देवी नऊ दिवस लढाई करून दमली आहे ना, मग तिला शांत करणारं, शक्ती देणारं अन्न नको? म्हणून तिच्यासाठी हा छान कालवलेला भात.' त्यांचे स्वतःचे नऊ दिवस उपवास असतात, त्यामुळे हा नैवेद्याचा भात माझ्या वाट्याला येतो. 
       कॉलेजमधून दुपारी दमूनभागून आले की त्या नैवेद्याच्या भाताचा कुंडा माझ्या हातात आला की जणू स्वर्गसुख लाभतं! तो भात खाऊन इतकं तृप्त व्हायला होतं की दुसरं काही खावंसं वाटतंच नाही. मलादेखील ते अन्न शांतवतं, शक्ती देतं.
        देवाच्या नैवेद्यात काय जादू असते समजत नाही! पण तो वेगळाच लागतो हे खरं. सत्यनारायणाचा प्रसाद मी केलेला चांगला होतो पण माझ्या सासूबाईंनी केलेला अतिशय चांगला होतो. असं का? मला नेहमी प्रश्न पडतो. त्यात त्यांच्या भक्तीची, देवावरच्या प्रेमाची चव उतरलेली असते की काय? असणारच. 
        त्या स्वतः निस्सीम श्रीकृष्णभक्त आहेत. दर पंधरा दिवसाला जेव्हा घरात लोणी निघतं, तेव्हा आमच्या श्रीकृष्णाची काय चंगळ असेल विचार करा. चांदीची वाटी भरून लोणीसाखरेचा नैवेद्य दाखवला जातो. या नैवेद्याची चव जगातल्या कोणत्याही चीज, बटर, आणि डीपला नाही बरं का!
        इतका सगळा नैवेद्य दाखवून झाल्यावर आम्ही त्यांना कधीतरी चेष्टेत म्हणतो "अहो किती खायला घालताय तुमच्या देवाला. दमला तो खाऊन खाऊन. अजीर्ण होत असेल बिचाऱ्याला." त्यावर त्या रागावून म्हणतात, "काही अजीर्ण वगैरे होत नाही. ही काय मी घरी केलेली सुपारी पण ठेवते आहे की त्याच्यासमोर."! 😊
        प्रश्न आस्तिकतेचा किंवा नास्तिकतेचा नसतो. तर तुम्ही तुमचं काम, कर्म, आचरण किती श्रद्धेने आणि विश्वासाने करता याचा असतो.
गौरी ब्रह्मे.

Tuesday, April 13, 2021

#भीमोत्सव_२०२१

#भीमोत्सव_२०२१
💙   #बा_भीमा...
मला कळत ही नव्हतं 
तेव्हापासून अगदी तेव्हापासून 
मी तुला माझ्या घरच्या भिंतीवर पाहतोय.....

ज्या घरात कोणाला नेटके कपडे घालयचीही माहिती नव्हती 
त्या घरात तू कायम कोट घालून,
खिशाला पेन लावून,
हातात मोठ्ठालं जाड पुस्तक घेऊन 
तू मला रोज दिसायचास.....

तुझ्या शेजारचा #बुद्ध
 कायम डोळे बंद करुन बसलेला असायचा.....

तू नक्की कोण आहेस ? 
आमच्या घरात का  आहेस ?
हे कोणाला तसं नीट संगता आलं नव्हत.....

तू पहिल्यांदा भेटलास तो बालभारतीच्या पुस्तकात 
आणि कुणास ठावूक का पण उर भरून आलं.....

असं वाटलं की जणू आपल्याच घरातलं 
आपलच कोणीतरी पुस्तकात छापून  आलय.....
 
"विद्यार्थ्यानो जागे व्हा" 
अश्या नावाच्या त्या धड्यात 
तू म्हणालास की 
आजचा विद्यार्थी 
उद्याच्या देशाचं भवितव्य आहे.....
 
म्हणून अजुन वाचत गेलो 
पण ते लगेच संपलं.....

वाटलं की तुला अजुन खुप काही बोलायचय,
म्हणून मी तुला मग 
शाळेच्या सर्व पुस्तकात शोधू लागलो.....

पण तू काही पुन्हा तिथे सापडला नाहीस.....

शाळा संपली,
आता तुला भेटायचं म्हणून 
मी तू स्थापन केलेल्या कॉलेजात प्रवेश घेतला.....
आणि माझा शोध संपला.....

तू अंशा अंशाने,
विखुरलेला होतास, 
हजारएक स्क्वेअरफुट च्या लायब्ररीत.....

मग टप्प्या टप्प्याने मी तुला जमवत गेलो.....

एखादं लहान मूल जसं आवडीने  जिग सॉ खेळतं 
तसं तुला जोड़त गेलो 
तेव्हा मला सापडली 
एक विचारधारा.....

एका विचाराची वंशावळ
जी हजारो वर्षांपासून अबाधित आहे.....

आणि आणखी करोडो वर्षे अबाधित राहिल.....

आता माझ्या जगण्याला 
खऱ्या अर्थाने दिशा मिळाली होती.....
 
माझ्या घरातला #बुद्ध 
आता डोळे मिटून ध्यान लावत नाही 
तो आता 
#सम्यक_सम्बुद्ध झालाय,
अर्हत झालाय,
आणि तो आता उभा राहून चालू लागलाय 
जगाला दुःखमुक्तीचा मार्ग सांगत.....

माझ्या घरात आता 
सत्याचा शोध घेणारे #महात्मा_फुले आलेत 
फुलेंसोबत शिक्षणाचा प्रसार करायला #सावित्रीमाई इथेही त्यांच्यासोबत आल्यात,
सर्वांना समान संधी आणि न्याय देण्यासाठी #छत्रपति #शाहू_महाराज सुद्धा आलेत,
आणि या सर्वाना सोबत घेऊन स्वतःचं राज्य निर्माण कर असं सांगायला #शिवाजी_महाराजही आलेत.....

#बा_भीमा
तूझ्या सोबतच तू मला 
या सगळ्यांशी भेटवलस.....

स्वभिमानाने जगायला 
मला तू शिकवलस.....

भिंतीवरचा तू 
आता थेट हृदयात उतरलायस.....

मेंदुतुन भिनला जाऊन 
थेट रक्तात मिसळलायस.....

आता एकवेळ 
मी संपेन 
पण माझ्यातला 
तुझा अंश
कायम चेतवीत राहील 
अनेक "माणसांना"
जसं तू चेतवलंस मला.....

 #जय_भीम

माझे नवीन लेखन

खरा सुखी

 समाधान पैशावर अवलंबून नसतं, सुख पैशानं मोजता येत नसतं. पण, सुखासमाधानानं जगण्यासाठी पैशांची गरज पडत असतेच. फक्त ते पैसे किती असावेत ते आपल्...