Tuesday, April 13, 2021

#भीमोत्सव_२०२१

#भीमोत्सव_२०२१
💙   #बा_भीमा...
मला कळत ही नव्हतं 
तेव्हापासून अगदी तेव्हापासून 
मी तुला माझ्या घरच्या भिंतीवर पाहतोय.....

ज्या घरात कोणाला नेटके कपडे घालयचीही माहिती नव्हती 
त्या घरात तू कायम कोट घालून,
खिशाला पेन लावून,
हातात मोठ्ठालं जाड पुस्तक घेऊन 
तू मला रोज दिसायचास.....

तुझ्या शेजारचा #बुद्ध
 कायम डोळे बंद करुन बसलेला असायचा.....

तू नक्की कोण आहेस ? 
आमच्या घरात का  आहेस ?
हे कोणाला तसं नीट संगता आलं नव्हत.....

तू पहिल्यांदा भेटलास तो बालभारतीच्या पुस्तकात 
आणि कुणास ठावूक का पण उर भरून आलं.....

असं वाटलं की जणू आपल्याच घरातलं 
आपलच कोणीतरी पुस्तकात छापून  आलय.....
 
"विद्यार्थ्यानो जागे व्हा" 
अश्या नावाच्या त्या धड्यात 
तू म्हणालास की 
आजचा विद्यार्थी 
उद्याच्या देशाचं भवितव्य आहे.....
 
म्हणून अजुन वाचत गेलो 
पण ते लगेच संपलं.....

वाटलं की तुला अजुन खुप काही बोलायचय,
म्हणून मी तुला मग 
शाळेच्या सर्व पुस्तकात शोधू लागलो.....

पण तू काही पुन्हा तिथे सापडला नाहीस.....

शाळा संपली,
आता तुला भेटायचं म्हणून 
मी तू स्थापन केलेल्या कॉलेजात प्रवेश घेतला.....
आणि माझा शोध संपला.....

तू अंशा अंशाने,
विखुरलेला होतास, 
हजारएक स्क्वेअरफुट च्या लायब्ररीत.....

मग टप्प्या टप्प्याने मी तुला जमवत गेलो.....

एखादं लहान मूल जसं आवडीने  जिग सॉ खेळतं 
तसं तुला जोड़त गेलो 
तेव्हा मला सापडली 
एक विचारधारा.....

एका विचाराची वंशावळ
जी हजारो वर्षांपासून अबाधित आहे.....

आणि आणखी करोडो वर्षे अबाधित राहिल.....

आता माझ्या जगण्याला 
खऱ्या अर्थाने दिशा मिळाली होती.....
 
माझ्या घरातला #बुद्ध 
आता डोळे मिटून ध्यान लावत नाही 
तो आता 
#सम्यक_सम्बुद्ध झालाय,
अर्हत झालाय,
आणि तो आता उभा राहून चालू लागलाय 
जगाला दुःखमुक्तीचा मार्ग सांगत.....

माझ्या घरात आता 
सत्याचा शोध घेणारे #महात्मा_फुले आलेत 
फुलेंसोबत शिक्षणाचा प्रसार करायला #सावित्रीमाई इथेही त्यांच्यासोबत आल्यात,
सर्वांना समान संधी आणि न्याय देण्यासाठी #छत्रपति #शाहू_महाराज सुद्धा आलेत,
आणि या सर्वाना सोबत घेऊन स्वतःचं राज्य निर्माण कर असं सांगायला #शिवाजी_महाराजही आलेत.....

#बा_भीमा
तूझ्या सोबतच तू मला 
या सगळ्यांशी भेटवलस.....

स्वभिमानाने जगायला 
मला तू शिकवलस.....

भिंतीवरचा तू 
आता थेट हृदयात उतरलायस.....

मेंदुतुन भिनला जाऊन 
थेट रक्तात मिसळलायस.....

आता एकवेळ 
मी संपेन 
पण माझ्यातला 
तुझा अंश
कायम चेतवीत राहील 
अनेक "माणसांना"
जसं तू चेतवलंस मला.....

 #जय_भीम

No comments:

Post a Comment

माझे नवीन लेखन

खरा सुखी

 समाधान पैशावर अवलंबून नसतं, सुख पैशानं मोजता येत नसतं. पण, सुखासमाधानानं जगण्यासाठी पैशांची गरज पडत असतेच. फक्त ते पैसे किती असावेत ते आपल्...