देववेडी
लेखिका-गौरी ब्रह्मे.
आस्तिक माणसं असतात, नास्तिक असतात, धड ना सश्रद्ध, ना धड अश्रद्ध माणसं असतात, अंधश्रद्धाळू, देवभोळी माणसं असतात. पण देववेडी माणसं असतात का?
माझ्या सासूबाईंकडे पाहिलं की 'हो' असंच उत्तर द्यावं लागेल. त्यांच्या देवावरच्या श्रद्धेबद्दल लिहायचं म्हणलं तर एक छोटेखानी पुस्तक होईल. तूर्तास त्यांच्या नैवेद्यप्रेमाबद्दल....
सामान्य माणसाला प्रश्न पडतो, 'आज जेवायला काय?' माझ्या सासूबाईंना प्रश्न पडतो, 'आज नैवेद्याला काय?' दूधसाखर, खडीसाखर, गूळखोबरं, हे तर चिल्लेपिल्ले नैवेद्य झाले, पण घरात जो काही गोडाधोडाचा पदार्थ बनेल, फळं असतील, कोणताही उत्तम पदार्थ असेल, त्या आजतागायत एकदाही नैवेद्य दाखवल्याशिवाय जेवलेल्या नाहीत.
लहान मुलांना जसा खाऊ पाहिल्यावर आनंद होतो, तसा माझ्या सासूबाईंना देवासाठी बनवलेला नैवेद्य पाहिल्यावर होतो.
नैवेद्य दाखवताना त्यांच्या चेहऱ्याकडे पहावं फक्त. आई जसं प्रेमाने आपल्या लेकराला भरवते त्याच ममतेने, श्रद्धेने त्या नैवेद्य दाखवतात. मी त्यांची सून म्हणून कौतुक करते आहे असं नाही, मला स्वतःला ठरवून देखील इतकं सश्रद्ध होता येणार नाही. पण देवाबद्दल इतकं प्रेम की त्याला आपल्या अस्तित्वाचा एक भाग मानून, निरपेक्ष भावाने जीवन जगण्याचं गणित जे त्यांना जमलेलं आहे, ते माझ्या पिढीतल्यांसाठी खरोखरी आश्चर्यकारक आहे. केवळ 'तेच योग्य आहे आणि प्रत्येकाने असंच असावं' असं अजिबात नाही. पण देववेड्या माणसांना परमेश्वर अंमळ जास्त सुखी ठेवतो असं मला वाटतं, कारण त्यांची श्रद्धा त्यांना जास्त rooted (याला समांतर मराठी शब्द काय असावा याचा विचार करते आहे) ठेवते... बाकी अश्रद्ध माणसाची सुद्धा कशा न कशावर तरी श्रद्धा असतेच! तो देवच असेल असं नाही. पण कोणी मान्य करतं कोणी करत नाही.
गेली अनेक वर्ष माझ्या सासूबाई सकाळचा चहासुद्धा देवाला दाखवून मग पितायत. हा एखाद्याला वेडेपणा वाटेल, पण ज्याचं अस्तित्व एखाद्याशी घट्ट बांधलेलं असतं त्या माणसासाठी हे अगदी नॉर्मल आहे.
आम्ही बाहेर काही खरेदीला निघालो, की त्या आवर्जून सांगतात, "आमच्या देवाला काहीतरी आणा ग." हे म्हणजे असं झालं, की आमच्या बाळाला येताना काहीतरी खाऊ घेऊन या बरं का", इतकं ममत्व असतं त्यात. मग आपण लाडूपेढेमिठाई आणली तरी चालते किंवा अगदी तीन केळी आणली तरीही त्यांना चालतात. मुद्दा असा की देव उपाशी राहिला नाही पाहिजे. गोडाधोडाचं काही आणलं की त्या पहिलं देवाचं काढून ठेवणार, मग काय खायचंय ते खा म्हणणार. यातलं गमक इतकंच की आपण जे खातो पितो त्यातलं आधी 'त्याचं' थोडं मग आपलं. आवडते पदार्थ एकट्याने खाणं सोपं आहे, पण त्यातला थोडा भाग दुसऱ्यासाठी आधी काढून ठेवणं, मनावर संयम ठेवायला शिकवणारी यापेक्षा दुसरी अजून कोणती चांगली रीत असेल?
एखाद्या दिवशी उपवास असेल तर त्या आवर्जून वरईचे तांदूळ, दाण्याची आमटी, थालीपीठ, खिचडी, जे काही केलं असेल ते आधी नैवेद्य दाखवणार मग स्वतः खाणार.
मी त्यांना मजेत विचारते, "आई, देवाला कसले उपवास करायला लावता?" तेव्हा त्या म्हणतात, "अग बिचारा गोड खाऊन कंटाळला असेल, त्याला पण खावंसं वाटतं ना अधेमधे जरा चमचमीत उपवासाचे पदार्थ. आपल्याला लागतो ना चेंज? मग त्यालाही नको का?" तात्पर्य काय, तर तो आपल्यातलाच एक आहे, फक्त जरा जास्त स्पेशल आहे, कारण त्याला आपली काळजी आहे.
नवरात्रात आमच्या देवीची जी काही चैन असते ती विचारू नका. त्यांची मुलं, सुना, देवीसाठी भरपूर मिठाई, फळफळावळ आणून देतात, पण याव्यतिरिक्त, नवरात्रात पूजा झाली, की त्या दररोज दुपारी कालवलेला दहीदूध सायभात असा नैवेद्य दाखवतात. यामागचा विचार काय? तर 'देवी नऊ दिवस लढाई करून दमली आहे ना, मग तिला शांत करणारं, शक्ती देणारं अन्न नको? म्हणून तिच्यासाठी हा छान कालवलेला भात.' त्यांचे स्वतःचे नऊ दिवस उपवास असतात, त्यामुळे हा नैवेद्याचा भात माझ्या वाट्याला येतो.
कॉलेजमधून दुपारी दमूनभागून आले की त्या नैवेद्याच्या भाताचा कुंडा माझ्या हातात आला की जणू स्वर्गसुख लाभतं! तो भात खाऊन इतकं तृप्त व्हायला होतं की दुसरं काही खावंसं वाटतंच नाही. मलादेखील ते अन्न शांतवतं, शक्ती देतं.
देवाच्या नैवेद्यात काय जादू असते समजत नाही! पण तो वेगळाच लागतो हे खरं. सत्यनारायणाचा प्रसाद मी केलेला चांगला होतो पण माझ्या सासूबाईंनी केलेला अतिशय चांगला होतो. असं का? मला नेहमी प्रश्न पडतो. त्यात त्यांच्या भक्तीची, देवावरच्या प्रेमाची चव उतरलेली असते की काय? असणारच.
त्या स्वतः निस्सीम श्रीकृष्णभक्त आहेत. दर पंधरा दिवसाला जेव्हा घरात लोणी निघतं, तेव्हा आमच्या श्रीकृष्णाची काय चंगळ असेल विचार करा. चांदीची वाटी भरून लोणीसाखरेचा नैवेद्य दाखवला जातो. या नैवेद्याची चव जगातल्या कोणत्याही चीज, बटर, आणि डीपला नाही बरं का!
इतका सगळा नैवेद्य दाखवून झाल्यावर आम्ही त्यांना कधीतरी चेष्टेत म्हणतो "अहो किती खायला घालताय तुमच्या देवाला. दमला तो खाऊन खाऊन. अजीर्ण होत असेल बिचाऱ्याला." त्यावर त्या रागावून म्हणतात, "काही अजीर्ण वगैरे होत नाही. ही काय मी घरी केलेली सुपारी पण ठेवते आहे की त्याच्यासमोर."! 😊
प्रश्न आस्तिकतेचा किंवा नास्तिकतेचा नसतो. तर तुम्ही तुमचं काम, कर्म, आचरण किती श्रद्धेने आणि विश्वासाने करता याचा असतो.
गौरी ब्रह्मे.
No comments:
Post a Comment