Tuesday, May 4, 2021

पोक्तपणा

🌀🌀🌀🌀🌀🏵🌀🌀🌀🌀🌀
                   🔸पोक्तपणा.🔸

तसे तिचे वय आठ नऊ वर्षा पेक्षा  जास्त नसावं.. घंटी सोडून सगळे अवयव अगदी नीट आवाज करणाऱ्या  सायकलवर ती आली ...सायकलच्या मागच्या कॕरेज वर कापसाच  बुचकं  बांधलेल होतं ...

समोर एक छोटा मुलगा बसलेला होता बहुदा तिचा लहान भाऊ असावा.. वेदनेनं विव्हळत ... सायकल तिने भिंतीच्या आधारे टेकवली... कदाचित स्टँड नसाव आधारासाठी.

" सर माह्या भावाला ईच्चु चावला हितं,

"कधी चावला .."

" कव्हानाच चावला .?"

"मग लवकर  आणायचे ना ."

"पैसे नव्हते सर .... जरा थांबून ती परत म्हणाली.

"याला किती  ईजंक्शन द्याव लागल .."

"बघतो हं ..", असे बोलून मी त्या बाळाला टेबल वर झोपवले.

"घरात कुणी  मोठे माणूस  नाही का ग? "

"हाय कि ,..आई वडील अन एक मोठा भाऊ हाय ...

मी त्या मुलाला लोकल वैगैरे दिल ...वेदना सहन करण्याची उपजत कला त्याला अवगत असावी ...वेदना प्रचंड होत असूनही तोंडातून आवाज येत नव्हता.

सगळं झाल्यावर मागे वळून बघितले  तर ती मुलगी जागेवर नव्हती. ओपिडी बाहेर डोकावून बघितले.

समोरच्या कापसाच्या काट्यावर ती सोबत आणलेले ते बुचके घेऊन ऊभी होती.

परत आली तेव्हा तिच्या हातात काही पैसे होते.

"सर किती  पैसे झाले तुमचे ?"

मी न एकल्यासारख करून तिला म्हटलं " याने  काही खाल्ले आहे का.?"

नई..., आता आनते कि ..

लगबगीने ती बाजुच्या टपरीवर गेली आणि आपल्या लहान भावासाठी चहा आणि बिस्कीट चा पुडा घेऊन आली ...

" सर ईथ बसु आमी"

मी न बोलताच तिला हो अस खूणविले...

लहान भावाला ती अगदी  प्रेमान चहा मध्ये एक एक बिस्किट बुडवुन खाऊ घालत होती ... तिच्या गालावर सुखलेल्या अश्रुंचा खारटपनाचा ओघ जानवत होता...

" आई वडील कुठे ग तुझे...?"

"कापूस येचताय "

आणि भाऊ ?

" तो रोजंदारीन गेलाय पहाटीच ...सांनच्याला येतु ."

बोलण्यातुन समजलं.

ती ही कापुस वेचत होती शेतात .. आई वडीलांच्या सोबत. मध्येच  लहानग्याला विंचु चावला पण पदराला पैसे नसल्या कारणाने थोडासा कापूस तिने विकायला सोबत आणला होता.

परिस्थिती ने जघडून ठेवलेल्या कारणामुळे आई वडीलांना हलणे शक्य नव्हते. ह्या लहानग्या मूलीने आपल्या लहान भावाला दवाखान्यात सात- आठ  किलोमीटर सायकल वर बसवुन इथं  पर्यंत आणले होते.

खरंच परिस्थिती सगळं  शिकवायला भाग पाडते .. आपल्या पोटच्या गोळ्याला इतक्या वेदना होत असतानाही आपण त्याच्या सोबत  जाऊ शकत नाही असे वागताना त्या आईच्या ह्रदयाला कसला पीळ पडला असेल..?

खेळण्या बागडण्याच्या वयात त्या मुलीत आलेला समजदारपणा.. पोक्तपणा जबाबदारीची जाणीव बहीण भावात असलेले प्रेम हे सगळच गहिवरुन टाकणारे होतं.

"पैसे किती द्यायचे ?" .. जातान तिनं  विचारले ..

तिच्या मध्येच बोलल्याने मी माझ्या विचार चक्रातून बाहेर पडलो ..

मी तीला म्हटलं " राहू दे ".. तिचे डोळे पानावले ...म्हनाली..*

" तसं नई सर.. पूढल्या येळी यतानं लाज वाटल" " ...

हातात उरलेल चिल्लर पैसे टेबलावर ठेऊन ती बाहेर पडली ... पाठमोरी असतानाही तिचा हुंदका मला स्पष्ट ऐकू आला....!
                                  
©@डॉ .प्रविण तांबे, ७७०९५८६०८२

No comments:

Post a Comment

माझे नवीन लेखन

खरा सुखी

 समाधान पैशावर अवलंबून नसतं, सुख पैशानं मोजता येत नसतं. पण, सुखासमाधानानं जगण्यासाठी पैशांची गरज पडत असतेच. फक्त ते पैसे किती असावेत ते आपल्...