Monday, August 7, 2017

शाहूचरित्र ...काय शिकवते ?? ( भाग ६ )

" जसा राजा , तशी प्रजा " अशी म्हण आपल्या समाजात रुढ आहे. या म्हणीचा इतकाच अर्थ आपण घ्यायचा की नेतृत्व जशी मुल्ये अंगिकारते तशी मुल्य समाजात बहुतांशी रुढ होत असतात. म्हणून नेतृत्व हे दुरदृष्टी असणारे , विज्ञानवादी , सारासार विचार करणारे व आधुनिक मुल्ये अंगिकारणाने असले तर तो समाजही दोन पावले पुढे जात असतो. भारतीय समाजात असे विकसनशील व आधुनिक दृष्टी बाळगणारे नेतृत्व आपवादाने आढळते. या अपवादात राजर्षी शाहूजी राजे हे ठळकपणे उठून दिसतात. त्यांची एक प्रसिद्ध अशी गोष्ट पाहूया....

शाहूराजे...हे अंधश्रध्दा बाळगणारे खचितच नव्हते. त्यांची दृष्टी नेहमीच मागास मुल्यांना नाकारणारी व प्रगत मुल्ये स्विकारणारी होती. एकदा त्यांच्या राजवाड्यात एक ज्योतिषी आला. त्याने शिपायाकरवी वर्दी दिली की " मी राजेसाहेबांचे भविष्य सांगण्यास आलोय ". शिपायाने हा निरोप दरबारात बसलेल्या शाहूराजांना सांगितला. तात्काळ शाहूंनी त्या ज्योतिषाला अटक करून चार दिवस तुरुंगात ठेवण्याची आज्ञा केली. चार दिवसांनी त्या ज्योतिषीला दराबारात बोलवले तेव्हा तो ज्योतिषी महाराजांना गयावया करत विचारु लागला की " महाराज , मी काय गुन्हा केला की तुम्ही मला तुरुंगाची हवा खायला लावली ?". महाराज हसले आणि म्हणाले " अरे , तू माझ भविष्य सांगायला आला होतास ना , मग मला सांग तू इथ आल्यावर मी तुला तुरुंगात डांबणार आहे हे तुझे भविष्य तुला कसे कळले नाही ??" . ज्योतिषी मान खाली घालून उभा राहिला. शाहूराजांनी यातून कोणता धडा घालून दिला ?? माझ्या मते , ज्योतिषी सारख्या ऐतखाऊना कसे उघडे पाडायचे व त्यांना निरुत्तर करण्याचे उदाहरणच शाहूराजाने घालून दिले. ज्याचे मनं , मेंदू व मनगट खंबीर असते त्या कोणाही व्यक्तीला ज्योतिषी हा भ्रामक आधार लागत नाही. याउलट आमच्या आजकालच्या नेतृत्वकडे पाहिल्यावर काय दिसते हो ?? लोकप्रतिनिधी म्हणवणारे आमचे राज्यकर्ते हे निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरताना शुभवेळ व शुभमुहुर्त पाहण्यासाठी ज्योतिषी नावाच्या भ्रामकावर विसंबून असतात. निवडून आल्यावर आपल्या कार्यालयात केव्हा प्रवेश करायचा त्याचाही मुहुर्त शोधला जातो. कार्यालयात कोणत्या दिशेला आपण,बसावे याचा सल्ला ज्योतिषीला विचारला जातो. एकुण काय तर आमचे राज्यकर्ते हे ज्योतिषी नावाच्या खुंटाला कायमचे बांधलेले असतात. आता सांगा , नेतृत्वच जर इतके कमजोर व आत्मविश्वास नसणारे असेल तर मग समाजात चैतन्य कुठून येणार ? नवनिर्मिती कशी सुचणार ? आमचे राज्यकर्ते आपल्या जनतेला आदर्श घालून देण्यात बिनकामाचे ठरले आहेत एवढं नक्की. तो शाहूराजा हौता म्हणून भ्रामक गोष्टी सांगणाऱ्या ज्योतिषीला तुरुंगाची हवा खायला लागली ...आजकालचे आमचे राज्यकर्ते हे ज्योतिषीला पंख्याची हवा घालण्यात धन्यता मानतील अशा परिस्थिती आहे. शाहूराजा व आजकालचे राज्यकर्ते यांच्यातील हा एक महत्त्वाचा फरक आहे.

वस्तुतः कोणत्याही विषयासंबंधी विचार करण्यासाठी माणसाला बुध्दी मिळाली आहे. ती बुध्दी योग्य व विधायक कामाकरता वापरण्यासाठी आधी पहिल्यांदा वर्षानुवर्षे साठलेला " मागास विचारांचा कचरा " प्रयत्नपूर्वक काढायचा असतो. ती जागा रिकामी झाली तरच नवा विचार तिथे रुजवाता येतो. शाहूचरित्र ...दुसरे काय नवे सांगते ?

!! भ्रामक आधार घेऊन उभे राहता येत नाही ...ही जाणीव असूदे !!

उमेश सूर्यवंशी ९९२२७८४०६५

शाहूचरित्र ...काय शिकवते ?? या लेखमालिकेतील सर्व लेख फक्त एका क्लिक वर .

शाहू चरित्र ...काय शिकवते ?? ( भाग १ )

शाहू चरित्र ...काय शिकवते ?? ( भाग २)

शाहू चरित्र ...काय शिकवते ?? ( भाग ३)

शाहू चरित्र ...काय शिकवते ?? ( भाग ४ )

शाहू चरित्र ...काय शिकवते ?? ( भाग ५ )

==============================================

From Editor's desk

जर तुमच्याकडे Hindi, english, किंवा marathi भाषेमध्ये काही article, स्टोरी, किंवा कविता असेल व जी तुम्हाला आमच्या सोबत share करायची आहे. तर कृपया ती माहिती आपल्या फोटोसोबत (फोटो नसला तरी चालेल) आम्हाला E-mail करा. आमचा email Id आहे : swapnwel@rediffmail.com    
       
आम्ही त्याला तुमच्या नाव व फोटोसहित या ब्लॉग वर PUBLISH करु.

तर मग आपले लेखन आम्हाला पाठवत आहात ना?आम्ही वाट पाहत आहोत. आम्ही सभ्य भाषेतील सर्व प्रतिसाद व लेखन या ब्लॉगवर प्रकाशित करतो प्रकाशित करतो.

. Thanks !

Saturday, August 5, 2017

शाहूचरित्र ...काय शिकवते ? ( भाग ५ )

कोणताही राज्यकर्ता अथवा आजकालचे सरकार हे जो खर्च करत असतै तो खर्च लोकांच्या कर रुपातून खजिन्यात जमा होत असतो. या खजिन्यातूनच राज्यकर्ते आपला खर्च चालवत असल्याने या खजिन्याप्रती त्यांच्या भावना कोणत्या प्रकारच्या आहेत यावर त्या राज्याचे व राज्यातील जनतेचे भविष्य दडलेले असते. राजा म्हटल की चैन व विलास यांची गोळाबेरीज होऊन निर्माण झालेले प्रतिक असा समज आहे व अपवाद वगळता तो सत्य आहे. ह्या कररुपी जनतेच्या पैशाचा वापर अत्यंत योग्यरित्या करणे हे राज्यकर्ते म्हणून फारच महत्त्वाचे असते. याबाबतीत शाहूराजाचे धोरण कसे होते ते पाहूया...

*पन्हाळा लाँज....हे मुंबई येथील शाहूराजाचे निवासस्थान . महाराज जेव्हा मुंबईला जात तेव्हा ते इथेच राहत. या ठिकाणाहून फोर्टला जाणे सोईस्कर होते. त्या काळात महाराज वाहन म्हणून व्हिक्टोरिया ( एका घोड्याची गाडी ) वापरत. भाडे देऊन प्रवास करत असत. एकदा महाराजांना फोर्टला जायचे होते. त्यांनी व्हिक्टैरीया बोलवली. गाडीमालकाने भाडे म्हणून दोन रुपये सांगितले. महाराज मात्र एक रुपया देईन असे म्हणू लागले. चांगले पंधरा वीस मिनिट ही हुज्जत अर्थात ठरवाठरवी चालली होती. शेवटी सव्वारुपयाचा सौदा ठरला आणि महाराज गाडीत बसले. काम करून परतलेवर महाराजांच्या साथीदारानी विचारले की महाराज , एक रुपया वाचवण्यासाठी एवढे कशाला धरून बसलात ". तेव्हा शाहूराजे बोलले " अरे , काटकसर केली नाही तर माझ्या राज्याच्या खजिन्याचे दिवाळे निघेल." ....ही गोष्ट ऐकल्यावर आपणांस काय जाणवते ?? शाहूराजे हे खजिन्याचे मालक म्हणून नव्हे तर विश्वस्त म्हणून व्यवहार करत होते. काटकसर अंगी बाणवून योग्य खर्च करणे हे शहाण्या माणसाचे सर्वोच्च लक्षण आहे. याउलट ....याउलट आमचे आजचे राज्यकर्ते कसे वागतात ?? राज्यकर्ते वर्गाचा आजचा डामडौल पाहिला तर खरेच आपण स्वतंत्र भारतात राहतो का असा प्रश्न पडावा असा थाट आहे. गोरे साहेब गेले आणि उरावर हे काळे साहेब अक्षरशः गोरे साहेबाशी मिळतेजुळते वर्तन करु लागले. ज्या करदात्यांचा पैशातून ह्यांचा खर्च चालतो त्यांच्याप्रती हे राज्यकर्ते कृतज्ञ असायला हवेत पण तसे दृश्य दिसत नाही. उलट जनताच यांना सेवकाचे साहेब करुन टाकते आणि मग यांचा साहेबी थाट सुरु होतो. आज आपल्या देशावर असणाऱ्या कर्जाचा मोठा हिस्सा अशाच " साहेबी उधवपट्टीने " आपल्या माथ्यावर बसून राहिलाय. काटकसर या शब्दाला पूर्ण दांडी मारून " कसलीच कसर " सध्याचे राज्यकर्ते आपल्या छानछौकीकरता राखत नाहीत हेच आजचे वास्तव आहे.*

आवश्यक व योग्य ठिकाणी कितीही खर्च होवो , पर्वा नाही. पण वैयक्तिक मानमरातबासाठी खजिना मुक्तहस्ते लाटणे हा अपराधच आहे. अशाने देशाचे लौकरच वाटोळे होईल हा शाहूसंदेश आमच्या राज्यकर्त्यांच्या डोक्यात जलदीने शिरो ..इतकीच अपेक्षा.

!! मालक म्हणून नव्हे , तर विश्वस्त बनून आर्थिक व्यवहार व्हावा...काटकसरीने !!

उमेश सूर्यवंशी ९९२२७८४०६५

शाहूचरित्र ...काय शिकवते ?? या लेखमालिकेतील सर्व लेख फक्त एका क्लिक वर .
शाहू चरित्र ....काय शिकवते ? ( भाग १ )

शाहू चरित्र ....काय शिकवते ? ( भाग २ )

शाहू चरित्र ....काय शिकवते ? ( भाग ३ )

शाहू चरित्र ....काय शिकवते ? ( भाग ४ )

==============================================

From Editor's desk

जर तुमच्याकडे Hindi, english, किंवा marathi भाषेमध्ये काही article, स्टोरी, किंवा कविता असेल व जी तुम्हाला आमच्या सोबत share करायची आहे. तर कृपया ती माहिती आपल्या फोटोसोबत (फोटो नसला तरी चालेल) आम्हाला E-mail करा. आमचा email Id आहे : swapnwel@rediffmail.com    
       
आम्ही त्याला तुमच्या नाव व फोटोसहित या ब्लॉग वर PUBLISH करु.

तर मग आपले लेखन आम्हाला पाठवत आहात ना?आम्ही वाट पाहत आहोत. आम्ही सभ्य भाषेतील सर्व प्रतिसाद व लेखन या ब्लॉगवर प्रकाशित करतो प्रकाशित करतो.

. Thanks !

माझे नवीन लेखन

खरा सुखी

 समाधान पैशावर अवलंबून नसतं, सुख पैशानं मोजता येत नसतं. पण, सुखासमाधानानं जगण्यासाठी पैशांची गरज पडत असतेच. फक्त ते पैसे किती असावेत ते आपल्...