Saturday, May 31, 2014

महार कोण होते?

       महार कोण होते? या प्रश्नाचे उत्तर देण्याआधी सर्वप्रथम महार समाज म्हणजे काय हे समजावून घ्यायला पाहिजे. जे सध्या माहीत आहे ते असे:
१. महार समाजाचे वास्तव्य गावकुसाबाहेर होते. 
२. महार समाज हा ग्रामरक्षणाचे कार्य करत होता. वेशीचे रक्षण हे त्याचे नुसते कर्तव्यच नव्हते तर जबाबदारी होती. गावात चोरी झाली तर चोराला शोधणे आणि सापडला नाही तर चोरी गेलेल्या मालाची नुकसान भरपाई महारांनाच द्यावी लागत असे.
३. चोरांचा माग काढणे, गावात येणाऱ्या जाणाऱ्याची नोंद घेणे, संशयितांना वेशीवरच अडवून ठेवणे हे त्यांचे काम होते.
४. शेतीच्या वा गावाच्या सीमांबाबत तंटे उद्भभवले तर महाराचीच साक्ष अंतिम मानली जात असे. 
५. महारांची स्वतंत्र चावडी असे व तिचा मान गाव-चावडीपेक्षा मोठा होता.
६. व्यापारी जेव्हा आपले तांडे घेऊन निघत तेव्हा त्यांच्या रक्षणासाठी महारांची पथके नियुक्त करत.
७. महार हे लढवय्ये (मार्शल रेस) आहेत ही नोंद ब्रिटिशांनी करून महार रेजिमेंटच बनवली. पेशवाईच्या अस्ताचा बहुमान महारांच्याच पराक्रमाकडे जातो. 
८. पेशव्यांनीही अंगरक्षक/ पहारेकरी म्हणून आधी महारांनाच प्राधान्य दिले होते. 
९. महार हे ग्राम/नगर/राज्य परिप्रेक्षात गुप्तहेराचे काम करत. काहीही संशयास्पद वाटले तर त्याची खबर पाटलाला वा नगराध्यक्षाला देत असत. एवढेच नव्हे तर भटक्या जातींचे लोक, उदा० नंदीवाले, गावाच्या परिसरात अल्पकाळासाठी वास्तव्यास आले तर त्यांची संपूर्ण माहिती घेणे व गाव पाटलास देणे हे त्यांचे कर्तव्य होते. 
१०. महार समाज अस्पृश्य गणला गेलेला होता. 
११. महारांवर शेतसारा/ खजिना योग्य ठिकाणी पोहोचवण्याची तसेच सरकारी आज्ञा संदेशादीं दळनवळनाचेही काम होते.
               सर्वप्रथम महार या शब्दाचा उगम पाहता यासाठी पूर्वी अनेक विद्वानांनी व इरावती कर्वेंसारख्या विदुषींनी महार या शब्दाची व्युत्पत्ती शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे. महार राहतात ते राष्ट्र ते महाराष्ट्र अशी व्याख्या महाराष्ट्राच्या नावाशी संबंधित आहे...महार या नावाच्या उगमाशी संबंधित नाही त्यामुळे तिचा येथे विचार करण्यात अर्थ नाही. मृताहारी" (म्हणजे मृत प्राण्यांचे मांस खाणारे म्हणून) या शब्दाचे महार या शब्दात परिवर्तन झाले असे इरावती कर्वेंचे म्हणणे आहे. ते मुळीच पटण्यासारखे नाही. बुद्ध धर्मात निसर्गत: मृत प्राण्याचे मांस खाण्यावर बंधन नव्हते. पण मग असे मृताहारी बुद्ध धर्माच्या इतिहासात अगणित झालेले असतील. त्यांना सर्वांनाच "महार"म्हटले जात नाही. केवळ महाराष्ट्रात व आसपासच्या प्रदेशात या नावाची जात आहे, म्हणजे महार शब्दाचे मूळ अन्यत्र शोधावे लागेल हे उघड आहे.
     महाआहारी (खूप खाणारे) असणाऱ्या लोकांना महार म्हणू लागले अशी व्युत्पत्ती दि महार फोल्क (रॉबर्टसन) मध्ये दिलेली आहे. ती अर्थातच पटण्यासारखी नाही. दुसरे असे की महार एक जात म्हणून कोनत्याही स्मृती/ पुराणांमध्ये उल्लेखिलेली नाही. अस्पृश्यांच्या यादीतही ही जात पुराणांनी व स्मृतींनी नोंदलेली नाही. मनुस्मृतीत निषाद, बेण, आयोमेद, आंध्र, चुंचु, धिग्वन या जातींचा उल्लेख आहे आणि त्यांनी गांवाबाहेर।रहावे असे म्हटलेले आहे, पण चांडाळ वगळता त्यांनाही अस्पृश्य म्हटलेले नाही. तैत्तिरीय ब्राह्मणानुसार व विष्णुस्मृतीनुसार फक्त चांडाल ही जात अस्पृश्य आहे. त्यामुळे मुळात जन्मभूत अस्पृश्यता भारतात नेमकी कधी आणि का आली हे सांगता येत नाही.
         वर्णसंकरातून अस्पृश्य जातींचा विकास झाला हे मनुस्मृतीचे मत मानव वंश शास्त्राने खोटे ठरवले आहे. मनुस्मृतीत वा अन्य कोणत्याही धर्मशास्त्रात महार, मातंग , धेड, परिया, चिरुमा, नामशूद्र, मेघवाल इत्यादी भारतात अस्पृश्य  मानल्या गेलेल्या जातींचा उल्लेखही नाही. याचाच अर्थ ९-१० व्या शतकानंतर (म्हणजे स्मृतिकाळ संपल्यानंतर) कधीतरी या जातींना अस्पृश्य बनवले गेलेले दिसते. मग प्रश्न असा उद्भवतो की "महार" ही मुळात जात होती काय? महार हे सगळेच नागवंशी वा सोमवंशी आहेत काय?
          महार समाजातील प्रमुख आडनावांमध्ये आढाव, आडसुळे, अहिरे, अवचट, भेडे, भिलंग, भिंगार, भोसले, कांबळे, साळवे, गायकवाड, पवार, कदम, शेळके, शिंदे इ. आडनावे आढळतात. या आडनावांवर नजर टाकली तर स्पष्टपणे हे लक्षात येते ते म्हणजे यातील बरीच आडनावे उच्चवर्णीयांतही (ओबीसींसह) प्रचलित आहेत. याचाच अर्थ हे सर्व समान आडनाव असणारे समाजघटक कधीतरी एकत्र होते आणि व्यवसायाच्या विभागण्या जसजशा होत गेल्या तसतशा वेगवेगळ्या जाती एकाच समाजघटकांतून कालौघात विभक्त झाल्या. जाती जन्माधारित बनत गेल्याने जातिधर्म आणि समाजधर्मात काहीसे।विभाजन झाले. त्यामुळे महार समाज हा सर्वस्वी स्वतंत्र वंशातून विकसित झाला आहे असे मानता येत नाही. 
         हा समाज मुख्य दैवतांना मानत आला आहे... (शिव/विष्णु/विट्ठल/ महालक्ष्मी इत्यादी). त्याचबरोबर या समाजाची स्वतंत्र अशी दैवतेही आहेत. पण यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. अस्पृश्यतेच्या काळात अन्य मंदिरात स्थान व प्रवेशच नसल्याने आपल्या धार्मिक कल्पनांनुसार लोकदैवते विकसित होतात हे आपण आज प्रतिष्ठा मिळालेल्यादैवतांबाबतही पाहू शकतो. धनगर समाजानेही ते अस्पृश्य नसले तरी स्वतंत्र दैवते निर्माण केलेली आहेत. म्हणजे महार जातीत सर्वच मानवघटकांतील लोक सामाविष्ट आहेत असे म्हणता येते. कोणतीही जात एकाएकी स्वतंत्रपणे उदयाला येत नाही. त्या त्या व्यवसाय- सेवाक्षेत्रांचा जसजसा विकास होऊ लागतो तसतसे त्यात अन्य समाजघटकांतील लोक आवडीने वा चरितार्थ प्रवेश करतात व त्यानुसार एक पेशा बनतो. भारतात त्यांना "जात" बनवले गेले.
        आता सर्वप्रथम आपण "महार" या शब्दाचा उगम शोधला पाहिजे. भारतातील बव्हंशी जातींची नावे ही व्यवसायाधारित आहेत. म्हणजेच महार शब्दाचा उगमही व्यवसायाधारित असला पाहिजे, असे म्हणण्यास प्रत्यवाय नसावा. त्यासाठी सुरुवातीलाच कथित केलेले महारांचे व्यवसाय पुन्हा एकदा तपासल्यास,
अ. महार हे ग्रामरक्षक होते...चोऱ्या-दरोडे व आक्रमणेही परतवण्यासाठी त्यांची नियुक्ती झालेली होती. गावाचे रक्षण करण्यासाठी त्यांना रात्रंदिवस वेशीबाहेर राहणे आवश्यकच बनले होते. त्यांच्यामुळेच वेशीआतचे लोक निर्घोर झोपू शकत होते. त्यामुळे गाव चावडीपेक्षा महार चावडीची महत्ता मोठी होती. त्यांनाच भूमिपुत्र मानले जात होते. कारण त्यांच्या साक्षीनेच जमीनींच्या तर सीमा ठरतच होत्या पण संरक्षितही रहात होत्या.
ब. इसवी सनाच्या पहिल्या सहस्रांतापर्यंत प्रादेशिक व्यापार कराता, परक्या मुलुखातू जावे लागे. जाताना चोर- दरोडेखोरांचा उपद्रव टाळण्यासाठी महारांची रक्षक-पथके व्यापारी सोबत बाळगत असत. महारांची ख्याती ही नेहमीच इमानी व प्रामाणिक आणि लढवय्या अशी राहिलेली आहे. म्हणजेच गावाचे/व्यापाऱ्यांचे "रक्षण" हे त्यांचे आद्य कर्तव्य आणि कार्य होते. या दोन मुद्द्यांवरून स्पष्ट दिसते की "महार" हा शब्द "महारक्षक" (वा प्राकृत महारक्खित-महारक्ख) या शब्दाचा कालौघात झालेला संक्षेप आहे.
       जी सामाजिक कर्तव्ये महार समाज पार पाडत होता त्यावरून हीच व्युत्पत्ती महार या शब्दाचा उलगडा करते, अन्य कोणतीही नाही हे सिद्ध होते. ही कर्तव्ये तत्कालीन राजकीय अस्थिरता, धामधूम आणि कधी पूर्ण अराजकतेच्या स्थितीत अत्यंत महत्वाची होती.त्याशिवाय ग्रामाधारित समाजव्यवस्था जिवंत राहूच शकत नव्हती. 
महार समाजाचा उदय 
महार समाजाचा उदय कधी झाला याचे भौतिक/ लिखित पुरावे आज अस्तित्वात नाहीत. परंतु समाजेतिहासाचा अंदाज घेतला तर जेव्हा नागरी व्यवस्था आकाराला येते तेव्हाच हा समाज आपल्याच समाजातून लढवैय्या व्यक्तींना नागर रक्षणासाठी नियुक्त करतो. युद्धातील सैनिक आणि नगर रक्षक यांत मूलभूत फरक असतो. सैनिकाला फक्त युद्धकाळात शत्रुसैन्यावर तुटून पडण्याचे काम असते. परंतु ग्रामरक्षकाला मात्र तेच कार्य रात्रंदिवस करावे लागते. शत्रूरुच्या हल्ल्यांना तोंड देण्यासाठी गाव/ शहराभोवती कोट बांधण्याची प्रथा सिंधु काळापासूनची आहे. रात्री समजा कोटाची दारे जरी बंद केली तरी हल्ल्याची खबर, अगदी तटावरचे रक्षक असले तरी, उशिरा लागेल म्हणून केव्हातरी रक्षकांनी गाव/ शहराबाहेरच मुक्काम ठोकावा अशी रीत निर्माण झाली असावी. याचे कारण म्हणजे तत्कालीन अर्थव्यवस्था ही मुख्यत: कृषिप्रधान होती व शत्रूरु नगरांवर/गावांवर आक्रमण करतांना प्रथम शेते जाळतच येत असे. ही प्रथा अठराव्या शतकापर्यंत तरी भारतात होती हे तर सर्वविदित आहेच. त्यांना आधीच रोखण्याचा प्रयत्न करणे हे तर्कसुसंगत असल्याने वेशीबाहेर या बहाद्दर असणाऱ्या रक्षकांची वसती केली गेली असावी असे वाटते.
        सुरुवातीला तरी या पथकांचा प्रमुख "महारक्षक" पद भूषवीत असणे स्वाभाविक आहे, परंतु महारट्ठी (रट्ठांचे प्रमुख) जसे नंतर मराठा या एका जातीत परिवर्तित झाले तद्वतच महारक्षक हीच एक जात बनली व संक्षेपाने तीच जात महार म्हणून ओळखली जाऊ लागली असे दिसते. (मराठा जातीचाही कसलाही उल्लेख श्रुति-स्मृति- पुराणांत मिळत नाही त्याचे हेच कारण आहे.) महार ही एक मार्शल रेस आहे असे ब्रिटिशांनी का नोंदवून ठेवले असेल याचे हेच कारण आहे की परंपरागतच मुख्यत: संरक्षणाचेच कार्य ते करत असल्याने लढवैय्येपणा, चिकाटी हे मुलभुत गुणत्यांच्यात होते आणि वेळोवेळी ज्ञात इतिहासातही त्यांनी त्या गुणांचे प्रदर्शन केले आहे. ग्रामव्यवस्थेचे रक्षण करून त्यांनी हजारो वर्ष जे अतुलनीय कार्य केले आहे ते कसे हे खालील मुद्दे पाहिल्याखेरीज लक्षात येणार नाही.
१. तत्कालीन स्थितील प्रत्त्येक गावाभोवती तटबंदी/कोट असत व रात्री मुख्य दरवाजा बंद केला जाई. याचे कारण म्हणजे सत्ता कोणाचीही असो, गावे सुरक्षित नसत. शिवाय  सातत्याने आक्रमणे/परकीय आक्रमणे वाटेत येतील त्या गावांत लुटालूट- जाळपोळ हा आक्रमकांचा (आणि दरोडेखोरांचाही) प्रमुख धंदाच होता. गावाच्या आत राहून गाव रक्षिले जाईल अशी सोय उत्तरोत्तर कमी होत गेली. महार मात्र जिवाचा धोका पत्करून उघड्यावर स्वत: व स्वत:चे कुटुंबे असुरक्षित ठेवत गावांचे रक्षण करत राहिली आहेत. सर्वच वेळी त्यांना यश मिळणे शक्य नव्हते...अशा वेळीस प्राणांचे बलिदान त्यांना द्यावे लागले असणार.
. २. महार समाज प्राय: गरीबच राहीला आहे. उघड्यावर रहात असल्याने संपत्तीसंचय करुनही त्यांना उपयोग नव्हताच. तसे पाहिले तर ज्या गावांचे रक्षण ते प्राण धोक्यात घालून करत तेच गाव त्यांना स्वत: लुटायची बुद्धी झाली असती तरी नवल वाटले नसते, पण तसा एकही अध्याय महार समाजाच्या बाबतीत ज्ञात इतिहासातही दिसत नाही.
३. जमीनीचे, हद्दींचे तंटे महाराच्याच साक्षीने निकाली निघत, एवढेया त्यांच्या साक्षीचे महत्त्व होते. परंतु (अगदी पेशवेकालीन निवाड्यांतही) महारांनी खोटी साक्ष दिल्याचे एकही उदाहरण नाही.
४. महारांवर गावातील जमा झालेला सारा मुख्य ठाण्यांवर जमा करण्याची जबाबदारी असे. त्यात त्यांनी कधीही तो सारा गायब केल्याचेही एकही उदाहरण नाही.
५. महार समाजावर अस्पृश्यता लादली गेली, अन्याय्य बंधने लादली गेली, पण हा समाज जात्याच लढवैय्या असूनही त्याने आपल्या गावाविरुद्ध/व्यवस्थेविरुद्ध शस्त्र उचलले नाही.
या काही मुद्द्यांवरुन अखिलसमाजाने महार समाजाबाबत किती कृतज्ञ असले पाहिजे हे लक्षात येईल. अवनती कशी व का झाली? महार समाजाला नेमके कधी अस्पृश्य ठरवले गेले याबाबत इतिहास मूक आहे. या समाजाची आर्थिक व सामाजिक अवनती कशी आणि नेमकी कधी झाली हे पुराव्यांअभावी ठरवता येणे अवघड आहे. परंतु तर्काने या प्रश्नांचा उलगडा होऊ शकतो.
१. गावाचे रक्षण करणाऱ्यांना, आणि जे आधी सर्वच समाजघटकांतून आले होते त्यांना आरंभापासून अस्पृश्य मानले गेले असण्याची शक्यता नाही.
२. ज्या काळात भारतांतर्गतचा व विदेशी व्यापारही भरात होता तेव्हा त्या व्यापारी तांड्यांचे रक्षण करनाऱ्या महाराष्ट्रातील महारांना अस्पृश्य मानले जात असण्याची शक्यता नाही. किंबहुना ८व्या शतकापर्यंतच्या स्मृतीही महारांचा अस्पृश्य म्हणून निर्देश करत नाहीत. असे असले तरी महार समाजाची हळूहळू सामाजिक पातळीवर अवनती होत गेली, त्यांच्या सर्व जबाबदाऱ्या पूर्ववत तर ठेवल्याच, पण त्यांत अमानुष वाढ केली गेली. त्यामुळे महारांचे कंबरडे मोडले नसले तरच नवल. यामागील कारणांचा वेधही घेणे अत्यावश्यक आहे.
१. अखिल समाजाची आर्थिक अवनती: पुराणांनी लागू केलेली समुद्रउल्लंघनबंदी. यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापार कोसळला. पर्यायाने ग्रामीण अर्थव्यवस्थाही संकुचित झाली. यादवकालापर्यंत तरी आपण तुलनेने बरे असलेले स्थैर्य पहातो. परंतु तरीही आंतरराज्यीय व्यापार मात्र उत्तरेकडील धामधुमीने संपत गेला. अस्थैर्याच्या कालात व्यापाराला फटका बसतोतसेच पर्यायाने तो स्थानिक अर्थव्यवस्थेलाही बसतो. उत्पादक घटक आपले उत्पादन सीमित करत नेतात. जेवढी मागणी तीही स्थानिक, वा परिसरातील, तेवढेच उत्पादन करू लागतात. सेवाक्षेत्रावर त्याचा पहिला आघात होत असतो. महार समाज हा सेवाघटक असल्याने त्यांच्यावर सर्वात आधी आघात होणे स्वाभाविक आहे.
इ.स. १२-१३ व्या शतकाच्या काळात कधीतरी बलुतेदारी पद्धत सुरू झालेली दिसते. ती नवीन अर्थव्यवस्थेच्या परिप्रेक्षात अपरिहार्य मानली, आणि तिचा फटका सर्वच घटकांना बसला असला तरी सर्वाधिक फटका महारांना बसला हे उघड आहे. कारण वस्तु निर्मात्यांना किमान एक दृश्य अस्तित्व असते. ते भौतिक गरजांची पूर्ती करत असतात. म्हणजे शिंपी कपडे शिवतअसतो तर सुतार शेतीउपयोगी वस्तू निर्माण/ दुरुस्त करत असतो. परंतु ग्रामरक्षण ही अदृश्य सेवा असते. भरभराटीच्या काळात जेवढी या सेवेची गरज भासते तेवढी एकुणातीलच आर्थिक अवनतीच्या काळात भासणे असंभव होते. हे समाजमानसशास्त्र येथे समजावून घ्यायला हवे. त्यामुळे शेतीउत्पादनातील(जेही काही असेल ते) सर्वात कमी वाटा महारांना दिला जात असे हे अगदी बिदरच्या बादशहाने विठू महाराशी केलेल्या बावन हक्काच्या सनदेतूनही पाहु शकतो. (खरे तर ही सनद म्हणजे महारांच्या स्वातंत्र्याची नव्हे तर बेड्या घट्ट करणारी सनद होती हे नाइलाजाने म्हणावे लागते.)
        व्यापार थांबल्याने व्यापरी तांड्यांचे रक्षण आपसुक थांबले. म्हणजे तोही उत्पन्नाचा स्रोत संपला. म्हणजे अल्प बलुते, अन्य उत्पन्नाचा अभाव आणि अनउपजाऊ इनामी जमिनी यांतून होणारा एकत्रित परिणाम म्हणजे महार समाजाची आर्थिक स्थिती रसातळाला जाऊन पोहोचणे. बाकी अलुतेदार/ बलुतेदार यांची स्थिती जरा बरी असेल एवढेच पण महारांवर जो आर्थिक आघात झाला त्याचे समाजशास्त्रीय परिणाम येथे विचारात घेणे आवश्यक आहे. 
आरंभकाळ
१. चरितार्थासाठी आहे त्या जबाबदाऱ्या पार पाडत मिळेत त्या उत्पन्नात भागत नाही म्हणून अधिकची कामे मिळवणे हा प्रयत्न आजचा सुसंस्कृत माणूसही करतो. गावाच्या एकेक उत्पन्न घटकातून मिळणारा वाटाच कमी झाल्यानंतर अधिकची कामे मिळवणे भाग होते. अशा स्थितीत गाव पातळीवर कोणती कामे मिळनार? आधीच आपापल्या व्यवसायांत सुस्थिर असलेलल्या जातिघटकांच्या व्यवसायांत त्यांना वाटा मिळणे शक्यच नव्हते. इतर जातिघटकही पुरेशा उत्पन्नाअभावी अर्धवेळ शेतमजूर असल्याने तेथेही अपवाद वगळता व वर्षातला विशिष्ट काळ वगळता रोजगार मिळणे शक्य नव्हते.।ग्रामरक्षण हीच मुख्य जबाबदारी असल्याने सैन्यात सर्वच जण सहभाग घेण्यास जाऊ शकत नव्हते. यात दुसरी अडचण अशी होती की पगारी सैनिक हा प्रकार शिवाजीच्या काळाचा अपवाद सोडता अस्तित्वातही नव्हता.
पर्याय
१. गाव सोडून रोजगाराच्या शोधात अन्य प्रांतात जाणे. हा पर्याय मध्ययुगात महार व अन्य जातिघटकांनीही अवलंबिला आहे.
२. गावातच मिळेल ती, कमी प्रतीची का असेनात, कामे मिळविणे. हा पर्याय बहुसंख्य महारांना निवडावा लागला. ग्रामरक्षणाबरोबरच रस्ते स्वच्छ करणे, मृत जनावरांची विल्हेवाट लावणे, गावातीलमयतांची सरणे रचणे वा खड्डॆ खोदणे अशी कामे अन्य कोणीही करणे शक्य नव्हते आणि म्हणूनच करायला मिळाली ती क्रमश : स्वीकारत जाणे. महारांनी जगण्यासाठी हीसुद्धा कामे करायला सुरुवात केली.
३. इस्लामी आक्रमणानंतर ज्या होत्या त्याही उरल्या -सुरल्या ग्रामीण अर्थव्यवस्थांवर गंडांतरे कोसळू लागली होतीच. त्यांची तीव्रता पाच शाह्यांच्या निर्मितीमुळे व सततच्या आपसी संघर्षांमुळे वाढू लागली. त्यात अवर्षणांनीही भर घातली होती, हे आपल्याला तुकाराम महाराजांच्या काही अभंगांवरून कळते. भल्या भल्यांना आपल्या पोरी कुणबिणी/बटक्या म्हणून विकायची वेळ आली होती. गावेच्या गावे ओस पडण्याच्या स्थित्या तर नित्यश: झाल्या होत्या. अशा स्थितीत जर पोशिंदेच पळाले वा दिवाळखोर झाले तर केवळ सेवा हाच व्यवसाय असणाऱ्या  त्या महारांनी जगण्यासाठी मृताहार सुरु केला असेल तर त्यात कसलेही आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. महारांच्या मृताहाराचे कारण त्यांच्या संस्कृतीत नव्हे तर तत्कालीन अर्थव्यवस्थेत व राज्यव्यवस्थेत आणि मानवाच्या जगण्याच्या अविरत संघर्षात आहे हे येथे लक्षात घ्यायला हवे. त्यामुळे महारांनी ग्रामरक्षण आणि सरकारी कामांसोबतच शेतकामे, रस्ते साफ करणे, मढी उचलणे, त्यांची विल्हेवाट लावणे, उकिरडे साफ करणे, अशी हलकी (तरी समाजोपयोगी) कामे त्यांना स्वीकारावी लागली कारण अन्य पर्यायच उपलब्ध नव्हते. जेव्हा अन्नाचीच ददात पडली असेल तेव्हा मृत मांस खाणे त्यांना भाग पडले असेल. कारण अखिल समाजच जेंव्हा दारिद्ऱ्याच्या खाईत लोटला जातो तेव्हा तो अधिकाधिक कृपण होत जातो आणि आपल्या उत्पन्नातला न्याय्य वाटा इतरांना देण्यात कुचराई करू लागतो हे एक वास्तव आहे. दुष्काळ पडला म्हणुन धान्याची कोठारे राजाज्ञा टाळत भुकेल्यांसाठी खुले करणारा दामाजीपंत जेव्हा एखादाच असतो तेव्हा तशाच दामाजीपंताला राजक्रोधापासून वाचवून।त्याच्या सुटकेसाठी दंड।भरणारा एखादाच वि्ठू।महार असतो.
       एरवीची स्थिती ही जीवो जीवस्य जीवनम अशी बनून जाते. परंतु या काळातच धर्मसंस्था सर्वच मानवी जीवन व्यापून उरायला लागली होती. पैठण , काशीच्या ब्राह्मण सभांनी धर्माचे पुरेपुर अपहरण करून स्वार्थप्रेरित धर्मरचना सुरू केली. ज्या बाबी मूळ धर्मात कोठेही निर्दिष्टच नव्हत्या त्या लादायला सुरुवात केली. एका परीने एक ब्राह्मणनिष्ठ नवाच धर्म या काळात नव्याने निर्माण झाला. या काळात पूर्वीच्या राजसत्ता मुस्लिम शासकांच्या चाकर बनलेल्या होत्याच. सरदारकी, पाटिलकी, सरंजामे, देशमुखी इ. ची स्वार्थप्रणित प्राप्ती करण्याची चढाओढ जेंव्हा लागली तेव्हा ब्राह्मण तरी का म्हणून मागे राहतील? परकीय चाकरांना आपल्या समाजाशीच घेणे-देणे राहिले नाही. जहागीर मोगलाईत मिळो की आदिलशाहीत की निजामशाहीत...त्यांना जहागिऱ्यांशीच मतलब उरले. त्यांचा पराक्रम हा आपल्याच लोकांना लुटण्यात सहभागी झाला. सर्वच मुस्लिमांना यासाठी दोष देता येत नाही. अशा स्थितीत, जो समाज एवढा हवालदिल झालेला, आर्थिक दृष्ट्या पूर्णपणे नागवला जाऊनही त्याच जबाबदाऱ्या झेलणारा... त्याची काय अवस्था झाली असेल?
         १३व्या ते १५व्या शतकाच्या दरम्यान त्यांना क्रमश: अस्पृश्य ठरवण्यात आले असावे असे उपलब्ध पुराव्यांवरुन अंदाजिता येते. उदा. चोखामेळा या महान संतास विट्ठल मंदिर प्रवेश नाकारला गेला असला तरी तो केवळ आडमुठ्या ब्राह्मण बडव्यांमुळे. पण संत नामदेव त्याला मात्र अस्पृश्य मानत नव्हते आणि अगदी ज्ञानेश्वरांचेही असे अस्पष्ट का होईना संकेत मिळतात. महारांना ५२ हक्कांची सनद १४७५।साली बेदरचा बहामनी।बादशहा महंमदशहा (दुसरा)।याने दामाजीपंत, पाटील कुलकर्णी, देशमुख, देशपांडे।वतनदार व १२ बलुतेदारांच्या साक्षीने।विठ्या महार यासपातशहाच्या व दामाजीपंतांच्या कामी पडला म्हणून लिहून दिली. (पूर्ण सनदेसाठी पहा-"शिवकाळ व पेशवाईतील महारांचा इतिहास, ले.अनिल कोठारे.) हिंदु धर्मांधांनी एक महार ब्राह्मण दामाजीच्या कामी आला हे नाकारण्यासाठी "झाला महार पंढरीनाथ"चा घोषा लावला पण ते अनैतिहासिक आहे.या सनदेत महार अस्पृश्य आहेत असा उल्लेख नाही हे सर्वात महत्त्वाचे आहे. पण या सनदेत महारांना जे अधिकचे हक्क मागितले व दिले गेलेले आहेत ते मात्र सर्व महार समाजाचे आहेत. त्या स्थितीतील उपजीविका तरी कायदेशीरपणे टिकून रहावी यासाठी आहे. या सनदीमुळे, आहेऱ्यांचे तात्कालिक स्थितीत हित झाले असेल, पण दूरच्या काळात मात्र हीच सनद त्यांच्या पायातील बेडी बनली हे मी आधीच म्हटलेले आहे. या सनदेची पार्श्वभूमी मुळात पराकोटीचा दुष्काळ आहे हे आधी लक्षात घ्यायला हवे. आजच्याही राजकीय मागण्या या वर्तमानातील प्रश्नांशी संबंधित असतात...भविष्यात मंगळावरून कोणी हल्ला केला तर आताच त्याला प्रत्युतर देण्याची मागणी कोणी करत नाही...केली तरी त्याला वेडगळ म्हटले जाते. उद्या आपल्याला तीन मजली शेती करावी लागेल असे जेव्हा कोणी म्हणतो तेव्हा त्याला मूर्खातच काढले जाते.
       पण कोणत्याही मागण्या या त्या कालसापेक्षच असतात हेच काय ते वास्तव आहे. या सनदेनुसार गावातील मृत प्राण्यावरचा पहिला आणि एकमेव हक्क महारांचा. कातडीवरील मांगांचा. (मातंग समाज कातडी कमावून स्वतंत्र उपजीविका करतच होते.) बाकी हक्क बलुत्यातील वाट्याबद्दलही आहेत. ते हक्क फारसे पाळले गेलेच नाहीत हे वेगळे. पण मृत प्राण्यावरील हक्क महारांचा अधिकृत आणि राजाज्ञेप्रमाणे झाल्याने एक वेगळी सामाजिक व धार्मिक घटना घडली, ती म्हणजे महार समाज अस्पृश्य ठरवण्यात आला. तत्पूर्वी, अगदी बेदरच्या बादशहाने सनद देईपर्यंत महार हा अस्पृश्य आहे अशी नोंद नाही. कोणत्याही (अगदी १४व्या शतकात लिहिल्या गेलेल्या) स्थलपुराणांतही महार अस्पृश्य आहेत याची नोंद नाही. अंत्यज म्हणजे महार नव्हेत. परंतु दुर्दैवाने वंशपरंपरागत व्यवसाय पोट भरण्यास अक्षम ठरल्याने आणि अन्य पर्यायांच्या अभावात हीण वाटणाऱ्या सेवा कराव्या लागल्याने ब्राह्मणी धर्मसंस्थांनी महारांना अस्पृश्य ठरवले आणि त्यांचा सामाजिक आणि धार्मिक दर्जाच नष्ट करून टाकला.
              तो अमान्य करण्याच्या अवस्थेत तेव्हा महार होते काय? याचे उत्तर दुर्दैवाने नाही असेच येते. तेच काय अन्य काही अस्पृश्य मानल्या गेलेल्या जातीही त्या विद्रोहाच्या अवस्थेत नव्हत्या. कारण त्याला प्रतिरोध करण्यासाठी जी आर्थिक, मानसिक स्थिती लागते त्या स्थितीत हा समाज होता काय? त्यांच्या लढवैय्या परंपरांचा राजकीय उपयोग करून घेण्यात या काळातील राजसत्ता निरुपयोगी ठरल्या. शिवाजी महाराजांचा अल्प काळ एवढाच अपवाद करता येतो...आणि तोच थोड्या प्रमाणात महार समाजाला आत्मभान देणारा ठरला. परंतु महार समाजाला (आणि अन्य खालच्या मानल्या गेलेल्या जातींना) वेठबिगारी हीही एक नव्य गुलामी ठरली. चोखा मेळ्याचा अंत हा तो वेठीवर वेशीचे काम करत असतांनाच झाला हे सर्वज्ञात आहेच. शिवाजी महाराज ते राजाराम महाराजांच्या काळातच, आणि तीही स्वराज्याच्या कक्षेत, वेठबिगारी बंद होती. अन्यत्र ती कायम राहिली आणि नंतर कथित स्वराज्यातही कायम झाली. वेठबिगारी ही राज्यसंस्थांच्या आधी आर्थिक भिकारपणातून तसेच नंतर उद्दामतेतूनही निर्माण झालेली अत्यंत शोषक पद्धत. ही तर काही ब्राह्मणांनी निर्माण केली नाही. ती केली तत्कालीन शासक समाजांनी. पण वेठीमुळे जो समाज आधीच गांजला गेलेला होता त्याची अजूनच अवनती घडत गेली. हे महाराष्ट्रीय समाजव्यवस्थेचे एक भीषण अध:पतन आहे.
           या काही शतकातच बदललेल्या स्थितीमुळे जो समाज फक्त रक्षण आणि रक्षण हा मंत्र जोपासत एकुणातील समाजाचा, गावांचा, शहरांचा आजच्या पोलिसांप्रमाणे कार्यरत होता, त्याला ढासळलेल्या सामाजिक/आर्थिक स्थितीमुळे हीण दर्जाची कामे करायला भाग पडले. धर्ममार्तंडांनी त्यांच्यावर अस्पृश्यतेचा शिक्का मारून अमानवी धर्माचे एक जागतीक उदाहरण घालून दिले. एक पराक्रमी, लढवैय्या समाज रसातळाला नेऊन पोहोचवला. याला स्थिती जशी कारण आहे तशीच सामाजिक मानसिकताही. आज तरी जे गाव-खेडे जतन करून आहेत त्यांने तरी त्यांना मानाचे अभिवादन करावे...]
महार समाजातील मान्यवर व्यक्ती
संत - चोखोबा
समाज सुधारक - डॉ बाबासाहेब आंबेडकर , दादासाहेब गायकवाड
लेखक - यशवंत मनोहर
कवी - नामदेव ढसाळ
राजकारणी - रामदास आठवले
लोकशाहीर वामनदादा कर्डक
धर्म
 सुरुवातीला हिंदु धर्मातील अस्पृश्य असणारा हा समाज १४ ऑक्टोबर १९५६ सालानंतर बहुतांश बौद्ध धर्मीय झाला. आज ह्या समाजातील बहुतांश लोक बौद्ध धर्माच्या प्रभावाखाली आहेत.
बौद्ध धर्म आणी महार समाज परंपरेने हा समाज भारतीय जातिव्यवस्थेत कमी लेखला जातो. हा समाज अनुसूचित जातींमध्ये येतो, हिंदु धर्मातील जातिव्यवस्थेत हा समाज सर्वात खालच्या जातींपैकी होता. विसाव्या शतकाच्या मध्यात ह्या समाजाने बौद्ध धर्माचा स्वीविकार केला त्यामुळे त्या लोकांना नवबौद्ध असेही म्हणतात.
ह्या समाजातील सर्वात महत्त्वाची व्यक्ती म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर. पूर्वी अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या ह्या समाजाची जी काही आज स्थिती आहे, ती फक्त बाबासाहेब आंबेडकरांमुळे. महार नावाच्या अस्पृश्य समाजातून येऊन परदेशी जाऊन शिक्षण घेऊन येणारे बाबासाहेब पहिली व्यक्ती आहेत. त्यांच्यामुळेच हा समाज बौद्ध झाला. भाषा मुख्यत: महाराष्ट्रात रहात असल्याने महारांची मातृभाषा मराठी आहे. महाराष्ट्राबाहेर महार अल्पसंख्य आहेत.
संदर्भ 
1. ↑ The Tribes and Castes ofthe Central Provinces of India -Volume IV of IV
2.↑http://ketkardnyankosh.com/index.php/2012-09-06-10-44-50/12528-2013-03-13-06-52-19
3.↑ ले.संजय सोनावणी http://navshakti.co.in/aisee-akshare/75585/
==============================================
From Editor's desk
जर तुमच्याकडे Hindi, english, किंवा marathi भाषेमध्ये काही article, स्टोरी, किंवा कविता असेल व जी तुम्हाला आमच्या सोबत share करायची आहे. तर कृपया ती माहिती आपल्या फोटोसोबत (फोटो नसला तरी चालेल) आम्हाला E-mail करा. आमचा email Id आहे : swapnwel@rediffmail.com    
       आम्ही त्याला तुमच्या नाव व फोटोसहित या ब्लॉग वर PUBLISH करु.
तर मग आपले लेखन आम्हाला पाठवत आहात ना?आम्ही वाट पाहत आहोत. आम्ही सभ्य भाषेतील सर्व प्रतिसाद व लेखन या ब्लॉगवर प्रकाशित करतो प्रकाशित करतो.
. Thanks ! !

No comments:

Post a Comment

माझे नवीन लेखन

खरा सुखी

 समाधान पैशावर अवलंबून नसतं, सुख पैशानं मोजता येत नसतं. पण, सुखासमाधानानं जगण्यासाठी पैशांची गरज पडत असतेच. फक्त ते पैसे किती असावेत ते आपल्...