Sunday, March 7, 2021

विसरलेले पाकीट!

*" विसरलेले पाकीट! "*

असाच एके दिवशी ऑफीसला निघालो. किल्ली, रूमाल, लॅपटॉप, टिफीन सगळं घेतलंय...
जाताना बायकोला एक फ्लाईंगही दिलाय. तीही नई नव्हेली दुल्हनसारखी लाजलीये... 🥰
दिवसाची लई भारी सुरवात...

गाडी सुरू केली. पेट्रोलच्या काट्यानं मान टाकलेली. पम्पम् करत गाडी पेट्रोल  पंपावर...

*" दोनशेचं टाक रे."*

त्यानं गाडीच्या टाकीत भुरूभुरू पेट्रोल ओतायला सुरवात केली. मी पँटच्या खिशात हात घातला. तिथली जागा रिकामी! आयला...

*पाकीट विसरलो.* 🙆🏻‍♂️

वरच्या खिशात हात घातला.
तो ही रिकामा...

आयला.... फोनही विसरलो. माझा चेहरा पार ऊतरला. आजूबाजूला पाहिलं कुणीही ओळखीचं दिसेना. प्रचंड लाज वाटायला लागली. तसा हा पंप ओळखीचा. घरापासून दीड किलो मीटरवर गेली वीस वर्ष इथंच पेट्रोल भरतोय...

*पण हे एकतर्फी प्रेमासारखं!*

आता पंप ओळख देईल, याची गॅरंटी वाटत नव्हती. दातओठ खावून निर्णय घेतला... ठरलं... गाडी इथंच लावायची. इथं साली रिक्षाही मिळत नाही. जाऊ दीड किलोमीटर चालत. घरनं फोन आणि पैसे घेऊ. बायको सोडेल इथपर्यंत...

प्रॉब्लेम एकच होता. पंधरा मिनटात क्लायंट ऑफिसला पोचणार होता. बॉस पेट्रोल शिवाय पेटला असता. माझं टेन्शन माझ्या चेहर्यावर  ओघळू लागलं. पंपावरचा माणूस खुदकन् हसला...

*" होतं साहेब असं कधी कधी.. ऊद्या द्या पैसे."*

माझ्या जीवात जीव. मी मनापासून त्याला थँक्स  म्हणलं. पुन्हा त्याला दिलसे थँक्स म्हणलं... 

ऑफीस गाठलं. मी पोचलो अन् पाचच मिनिटांत क्लायंट आला. दीड तास त्याच्याच सेवेत. तो पटला. गटला. मोठ्ठी ऑर्डर मिळाली. बॉसही हसला. त्याचं हसू म्हणजे मोनालीसाच्या हसण्यासारखं. गूढ आणि दुर्मिळ... 

चलो चाय हो जाए.. ऑफीसच्या खाली सद्रुची टपरी. ऑफीसपेक्षा मला त्याच्याकडचा चहा आवडतो. मनप्रसन्न काही घडलं की मी तिथला चहा घेतो. मी जिना ऊतरून खाली. मस्त अद्रकवाली चाय. घुटक घुटक संपवली. खिशात हात घातला...

*आपण पाकीट विसरलो हेही विसरलो*

सद्रूनं माझा चेहरा वाचला. सद्रूला काही म्हणणार...

*एवढ्यात त्यानंच माझ्या खिशात, शंभराच्या पाच नोटा कोंबल्या.*

काय बी बोलू नका साहेब. रोजच्या गणगणीत विसरतं माणूस...

अजून लागले तर सांगा. तुमास्नी ऑफीसमधी कुणीबी दिले आस्ते. पर तुमी कुणाला पैसे मागावे, मला नस्तं आवडलं. उद्या देतो, म्हणून मला तरास देवू नका. जावा बिगीबिगी. साहेब कावतील तुमचं...

मी चिडीचूप्प. हलक्या पावलानं ऑफीसला परतलो. वरच्या खिशाला पाचशेची ऊब होती...

*त्या पाचशे रूपयांनी मी अंबानीहून श्रीमंत झालेलो.*

दीड वाजत आला. लंचटाईम झाला. एवढ्यात बायको ऑफीसात. घामाघूम झालेली. तुम्हाला नाही, मलाच काळजी... पाकीट, फोन विसरलात...

*तसं तुमचं पैशावाचून काही अडणार नाही म्हणा. सगळी तुमचीच माणसं आहेत आजूबाजूला.*

पण मला खूप लागलं असतं. शक्यतो मागायची वेळ येवू नये, आपल्या माणसावर...
घ्या तुमची ईस्टेट, शंभर फोन येवून गेलेत त्याच्यावर...
अन् तुमच्या त्या 'बचपन की सहेली' चा सुद्धा. गेटटुगेदर आहे म्हणे. तुमच्या 91 च्या बॅचचं निस्तरा काय ते. मी चालले...

बायको पी.टी. उषापेक्षा जास्त वेगाने गायब. पाकीट खिशात ठेवलं...

*आता तर मी भलताच श्रीमंत झालेलो.*

 लंचटाईमनंतर बॉसच्या केबिनमधे. दार हलकेच लोटलं. केबिनमधे शिरणार तोच कानावर काही पडलं. बॉस बायकोशी बोलत होता...

*" जानू , तुझा ड्रेस आणला असता गं नक्की. आज नेमकं वॉलेट विसरलोय. तुला दिसलं नाही का घरी..?"*

ऊद्या नक्की. प्लीज. रागवू नकोस. मी केबिनबाहेर वेळ काढला. पावणेदोन मिनटात फोनवरचं बोलणं संपलं. नॉक करून आत गेलो...

*पाकीटातल्या दोन गुलाबी नोटा बॉसच्या हातात कोंबल्या.*

"थँक्स म्हणू नका सर.." पटकन् मागे फिरलो...

*बॉसच्या चेहर्यावरचा सुटकेचा आनंद, मी पाठीवरल्या डोळ्यांनी, डोळे भरून बघितला...*

माझं पाकीट पुन्हा रिकामं...

*तरीही मी डबलश्रीमंत...* ☺️

*साला श्रीमंतीचा माज करावा, तो रिकाम्या पाकिटांनी... भरल्या पाकीटात ती मजा नाही...*😜
*जरासे हलके फुलके, वेगळा विषय.*
➖➖🙏🏻🌹🌹🙏🏻➖➖
*(कॉपी पेस्ट)*

No comments:

Post a Comment

माझे नवीन लेखन

खरा सुखी

 समाधान पैशावर अवलंबून नसतं, सुख पैशानं मोजता येत नसतं. पण, सुखासमाधानानं जगण्यासाठी पैशांची गरज पडत असतेच. फक्त ते पैसे किती असावेत ते आपल्...