एका ऑफिसमध्ये लेडीज रिसेप्शनिस्टची जागा भरायची असते. पेपरला जाहिरात देण्यात येते. कंपनी नामांकित असल्याने अर्जही खूप येतात. ठरलेल्या दिवशी मुलाखती सुरू होतात. बॉस स्वतःच मुलाखत घेत असतो. एकीची मुलाखत चालू असतानाच टेबलावरचा फोन वाजतो. डिस्टर्ब् झाल्याने बॉस त्रासून फोन उचलतो. मात्र तिकडून अतिशय गोड आवाज येतो.
"नमस्कार सर, मी स्वरदा बोलतेय."
फोनवरचा तो गोड आणि मंजुळ आवाज ऐकून बॉसचा वैताग कमी होतो.
बॉस : "बोला"
"काही नाही. तुमच्या ऑफिसमधील रिसेप्शनिस्टच्या जागेसाठी मलाही यायचंय."
बॉस : "मग प्रॉब्लेम काय आहे ? इथे मुलाखती सुरू आहेत. तुम्हीही येऊ शकता"
"तेच तर न सर, मलाही यायचंय पण ट्रॅफिक जाममध्ये अडकली आहे. पोचायला उशीर होतोय:"
बॉस : "ओके ओके, या तुम्ही"
इकडे मुलाखत सुरू राहते. अजून एकदोन मुलाखती होतात . पण बॉसच्या कानात त्या स्वरदाचा आवाज गुंजत असतो.
दहा पंधरा मिनिटांनी पुन्हा फोन येतो.
"सर, ट्रॅफिक कमी झालेय मी निघाली आहे. पण प्लिज सर उशीर झाला तर समजून घ्या"
बॉस : "हरकत नाही. या तुम्ही, पण शक्यतो वेळेत या"
पुन्हा तो आवाज ऐकून बॉस विचार करू लागतो. खरेच किती सौजन्यशील मुलगी आहे. फोनवरचा आवाज ऐकताना आपण मंत्रमुगध होतोय. हीच मुलगी परफेक्ट आहे रिसेप्शनिस्ट म्हणून !!
तरी इकडे अजून शिल्लक उमेदवाराच्या मुलाखती सुरूच असतात. पण बॉस आता या मुलाखती औपचारिकपणे घेत असतो. कारण त्याच्यासाठी "स्वरदा" फिक्स झालेली असते. इतक्यात अर्ध्या तासाने पुन्हा फोन येतो.
"सर, मी तुमच्या ऑफिसच्या इमारतीच्या पार्किंगमध्ये आहे. पण गाडी लावायला जागा नाहीये. मी बाहेर रस्त्यावर कुठे जागा मिळतेय का पाहून येतेय. सर प्लिज, त्यामुळे थोडा उशीर होतोय. प्लिज प्लिज"
बॉस : "हरकत नाही. या तुम्ही सावकाश"
आता बॉसला तिला भेटायची, पाहायची उत्सुकता लागून राहते. इतक्या मंजुळ आवाजाची मुलगी, नक्की कशी असेल ? म्यानर्स तर चांगले आहेत. नक्की हिलाच घेऊया.
अजून सात आठ उमेदवार शिल्लक असतानाच एक चिट्ठी घेऊन शिपाई केबिनमध्ये येतो. चिट्ठीवर लिहिलेले असते.
"सर, मी स्वरदा, आलेय तुमच्या ऑफिसमध्ये"
बॉस बाकी उमेदवाराची लिस्ट बाजूला ठेवूंन तिला लगेच आत बोलावतो.
स्वरदा आत येते. आणि sssssss
बॉस एकदम दचकतो. दारात एक सावळी (जवळपास डार्कच कलरची, थोडीशी ग्रामीण ढंग वाटावा अशी "स्वरदा" उभी असते. बॉसचा भ्रम निरास होतो. त्याच्या अपेक्षेत तिची प्रतिमा जरा वेगळीच (आणि सुंदर वगैरे) असते.
स्वरदा बोलू लागते.
"सर, मला माहीत आहे. तुम्ही मला पाहून निराश झाला असणार. तुमच्या अपेक्षे प्रमाणे मी दिसायला सुंदर नाही. ते मलाही माहीत आहे. पण सर, मी इथे येण्याआधी तुमच्या कंपनीची माहिती काढलीय. त्यानुसार इथे बाहेरून येणारे ग्राहक कोणीच नसतात. आपली सर्व कामे फोनवर चालतात. आणि सर फोनवर आवाज लागतो, सौंदर्य नाही. हे तुम्हालादेखील माहीत आहे. आणि अजून एक सर, केवळ सौंदर्य नाही म्हणून आजवर अनेक ठिकाणाचा नकार पचवलाय. यावेळी म्हणून मी थोडा वेगळा विचार केला. आणि ठरवून तुमच्याशी मुद्दाम आधीच तीनचार वेळा फोनवर बोलत राहिले. माझे जे मेन qualification आहे तो आवाज तुम्ही ऐकला. म्हणून तर बाकी उमेदवाराला बाजूला ठेवून तुम्ही आधी मला आत बोलावलेय. आता निर्णय तुम्ही घ्यायचाय सर"
दोन मिनिट निशब्द शांतता.
बॉस : "ते ठीक आहे. पण तरी इथे इतर स्टाफ वेगळ्या स्टाईलमध्ये राहणारा आहे. त्यांना तू आणि तुलाही ते ऑकवर्ड होईल. त्याचे काय ?"
स्वरदा : "मनासारखी अप्सरा तर कुणालाच मिळालेली नसते. तुमचे लग्न झाले असणारच. विचार करून पहा सर,. तुमच्या १००% अपेक्षेसारखी पत्नी आहे का ? पण तरी तुम्ही सुखी होताच न. कारण सहवासाने समोरच्यामधील एखादे वैगुण्य नंतर ते वैगुण्य वाटत नाही सर. तसेच इथल्याचे होईल"
तात्काळ बॉसने ड्रॉवरमधून अपॉईंटमेन्ट लेटर काढले, त्यावर सही केली आणि म्हणाला,
"उद्या सकाळी तू रिसेप्शन टेबलवर मला दिसली पाहिजेस. गुड लक"
आपल्यात उणीव आहे, किंवा आपण कशात तरी कमी आहोत, म्हणून निराश होण्याचे कारण नाही. दुसरा असा एकतरी गुण नक्की असेल जो तुम्हाला विजयी करेल. यशस्वी करेल. त्या "एका" गुणांचा शोध घ्या. नक्की सुखी व्हाल......
…… ✍ व.पु. काळे ---
…… कादंबरी ' स्वर '
No comments:
Post a Comment