चित्रपट, मालिका यांमध्ये दाखवण्यात येणाऱ्या तसेच आजूबाजूला उपलब्ध असणाऱ्या सुखसुविधा आणि त्यांचा उपभोग घेणारी माणसे बघून आपल्या मनामध्ये त्या गोष्टी, सुखसुविधा आपल्याकडेही असाव्यात अशा सुप्त इच्छा निर्माण होतात.
फक्त त्या लोकांच्या चेहऱ्यावर त्या सुखसुविधा असल्यामुळे आलेला आनंद दिसतो. खरंतर त्यातील अनेक गोष्टींची आपल्याला अजिबातही गरज नसते किंवा त्या आपल्याला सूट सुद्धा होणार नसतात. परंतु फक्त त्यांच्याकडे आहे मग आपल्याकडे का नाही? अशा भावनेतून ते आपल्याकडेही असावे असे वाटू लागते. यातूनच आपले प्रयत्न त्या दिशेला होऊ लागतात. पण हे प्रयत्न करत असताना आपली पात्रता, क्षमता, कौशल्य त्यासाठी योग्य आहे का हे तपासून घेणे मात्र आपण विसरून जातो.
खरंतर प्रत्येक व्यक्तीला त्याची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्याचा अधिकार आहेत असे मला वाटते. परंतु ती इच्छा पूर्ण करण्यासाठी घ्यावे लागणारे कष्ट हे ही नजरेआड करून चालणार नाही. काहीतरी हवय, काहीतरी मिळवायचे म्हणून जिद्दीला पेटलेली लोक आजूबाजूला भरपूर भेटतात. पण यात सगळेच जण यशस्वी होतात का? जे यशस्वी होतात त्यांचे समाधान किती दिवस टिकते? की पुन्हा एकदा नवीन गोष्टीचा शोधात ते पुढे पुढे जातात.
जे अयशस्वी होतात ते हार मानून गप्प बसतात की आपण अयशस्वी का झालो? याची विशिष्ट कारणे देऊन स्वतःचे आणि इतरांचे समाधान करतात. पण हे समाधान सुद्धा वरवरचे असते. खोलवर दडलेल्या त्या सुप्त इच्छेला आपण पूर्ण करू शकलेलो नाही. याची पुसटशी जाणीव मनात सल बनून राहते..... टोचत....
खरंतर दुःख करत बसणे याचा आपल्याला आपल्या आयुष्यात विशेष असा काही फायदा असावा असे मला वाटत नाही. आपण का अपयशी ठरलेला आहोत? याचा योग्य आणि सत्य कारणांचा शोध घेऊन पुन्हा एकदा प्रयत्न केले जाऊ शकतात. दुःख करण्यापेक्षा पुन्हा प्रयत्न केल्याचा मात्र काहीतरी फायदा होऊ शकतो.
परंतु यात एक छोटीशी गोम आहे जेव्हा व्यक्ती भरपूर प्रयत्न करून हरतो तेव्हा त्याला पुन्हा प्रयत्न करण्याची इच्छा उरत नाही. कारण सुप्त अवस्थेत एक भीती निर्माण होते... पुन्हा असंच घडलं तर.... पुन्हा अपयश आले तर...
बस या निर्माण झालेल्या भीतीचे भरपूर लोक बळी ठरतात आणि विशेष म्हणजे अनेकांना त्याची जाणीव सुद्धा नसते. थोडे संकट आले किंवा थोडे प्रश्न निर्माण झाले तरीही आपण घाबरून जायला लागतो..अशाच सुप्त भीतीमुळे आपण आपल्या आयुष्यातील अनेक घटकांच्या ठिकाणी प्रयत्न करण्याचे धाडस देखील दाखवत नाही. अनेक संधी सोडून देतो...
यापेक्षाही बिकट अवस्था असेल तरीही आपण एकदा प्रयत्न करून पाहू शकतो फक्त मार्ग थोडा वेगळा वापरून थोडं पुढं जाऊ गड्या
- नवनाथ वाघ
Good
ReplyDelete