आज भाजी मार्केट मध्ये एका शेतकरी दादाकडे काकडी घेत होतो..
किलोचा भाव फक्त १०/- रुपये होता..तितक्यात अजून एक गिऱ्हाईक तिथे येऊन थांबले..
दादा कशी दिली काकडी..??
शेतकरी..१०/- रूपये किलो लावली.... घ्या कोवळी काकडी आहे...
गिऱ्हाईक...पण कडू तर नाही ना...?
अस बोलून त्याने एक काकडी उचलली आणि खायला सुरवात केली..दुसरी एक काकडी उचलली आणि सोबत असलेल्या मुलाच्या हातात दिली...
खाऊन झाल्यावर दादा काकडी खुप गोड आहे हो...
१५/- ला दोन किलो दया ना...!!
बराच वेळ घासाघीस सुरू होती...
शेतकरी काकुळतीला येऊन त्याला सर्व खर्च किती झाला आणि नफा किती झाला हे पटवून सांगत होता.. तरीही हा भाऊ काहीच ऐकण्याच्या मनस्तिथीत नव्हता...
शेवटी न राहून मी त्या शेतकरी दादाला बोललो.. दादा देऊन टाका त्यांना २ किलो काकडी..१०/- रुपये त्यांच्या कडून घ्या राहिलेल्या एक किलोचे १०/- रुपये मी तुम्हाला देतो..
ते गिऱ्हाईक तिरक्या नजरेने माझ्या कडे बघून बोलल ...
काहो भाऊ तुम्ही का अस वाकड्यात बोलताय.. ?
म्हंटल आहो वाकड्यात नाही..सरळ सरळ बोलतोय ..घेऊन टाका तुम्ही काकडी मी देतो ना तुमचे पैसे..!
पण मी घेतलेल्या काकडीचे पैसे तुम्ही का देणार...??
मग मी त्याच्या डोळ्यावरची धुंदी उतरवली...अरे वेड्या माणसा..आल्या आल्या तू त्याच्या दोन काकड्या उचलल्या आणि खाऊन मोकळा झाला तरी तो शेतकरी दादा तुला काहीच बोलला नाही..
पहिलेच तू त्याची पावशेर काकडी फुकटात खाऊन बसला आणि वरतून १५/- रूपयात दोन किलो काकडी मागतोय...
जसे तुला पोर बाळ आहे तसेच त्या शेतकरी दादाला पण आहेच ना...??
एखाद्या किराणा दुकानात जाऊन बघ ... तुला तो दुकानदार चॉकलेटच्या बरणीत तरी हात घालू देईल का...??
जरा आपल्यावरून जग ओळखायला शिक की भल्या माणसा....
शेवटी त्या निर्लज्ज माणसाने खाली मान घालून 2 किलो काकडी घेतली...खिशातून २०/- रुपये काढले आणि शेतकऱ्याच्या हातात दिले...वरतून फुकटात खाल्लेल्या दोन काकड्या पिशवीतून काडून परत त्या शेतकरी दादाला परत केल्या आणि पुढच्या मार्गाला निघून गेला...
तो निघून गेल्यावर तो शेतकरी दादा माझ्याकडे बघून हसत हसत बोलला..साहेब तुम्ही लै भारी जिरवली हो त्या फुकट्याची...
मग त्या दादाने परत त्याची व्यथा सांगायला सुरुवात केली...
साहेब कालच्याला काकडी खुडाया तीन बाया लावलेल्या व्हत्या ७५०/- रुपये घेऊन गेल्या..
बाजारात गाडीत माल आणला गाडीवाला २००/- घेऊन गेला...
बाजार पावतीवाला आला २०/- रुपये घेऊन गेला…..
सकाळी कामाच्या गडबडीत बायकोने जेवण बनवल नाही म्हणून १ प्लेट भजी खाल्ली तो २०/- रुपये घेऊन गेला..
सकाळ पुन उन्हातान्हात इथं बसलोय माझा रोज ४००/- धरला म्हणजे सगळा खर्च झाला..१३९०/-
आणि समजा मी दिवसभर १००/- किलो काकडी विकली तर मला भेटणार १०००/- रुपये....
आता तुम्हीच सांगा हे सगळं करून हातात काय पडल...??
म्हणलं ठीक आहे रे दादा ह्यात नाही मिळाल तर दुसऱ्या पिकात मिळेल ...हिम्मत हारू नकोस...
"जान है तो शान है..."
तू फक्त लढ .....एक दिवस आपला पण येईल...
अक्षरशा डोळ्यात पाणी आल होत त्याच्या...
अन्नदाता सुखी भव:
No comments:
Post a Comment