Friday, May 3, 2019

"क्षमा"

एक हृदयस्पर्शी खरी गोष्ट संपूर्ण वाचा

पुण्याच्या आसपासचं गाव. कुटुंब ठिकठाक. एक आजोबा वयोमानामुळे घरीच बसुन. साहजीकच सुनेवर सर्व भार. आधी किरकोळ कुरबुर. मग बाचाबाची. त्यानंतर कडाक्याची भांडणं. सुनेचं म्हणणं. घरी बसुन ऐद्यासारखं खावु नका. काम करुन हातभार लावा संसाराला. पण बाबा थकलेले. शेवटी सुनेचे टोमणे खाण्यापेक्षा घर सोडायचं त्यांनी ठरवलं. मुलानेही अडवलं नाही.

आले पुण्यात. कुणी म्हातारा म्हणुन काम देईना आणि भुक जगु देईना. भिक मागण्यावाचुन पर्याय उरला नाही.

बाहेरच मुलाला भेटुन, लाज टाकुन
बाबा विचारायचे, येवु का रे बाळा घरी रहायला.?

"बाळ" म्हणायचे, मला काही त्रास नाही बाबा,
पण "हिला" विचारुन सांगतो.

पण. या बाबा घरी, असा निरोप बाळाकडुन कधी आलाच नाही.!

आता बाबा अट्टल भिकारी झाले.
झाले कि त्यांना केलं गेलं.?

अशीच भिक मागताना एके दिवशी
माझी न् त्यांची भेट झाली.

बोलताना बाबा म्हणायचे, डाॕक्टर म्हातारपण म्हणजे नाजुक वेल हो. वेलीवरच्या सुंदर फुलांकडे सगळ्यांचं लक्ष जातं, पण या फुलांना अंगाखांद्यावर खेळवणाऱ्या वेलीकडे कुणाचंच लक्ष नसतं. वेल बघा नेहमी झुकलेली आणि वाकलेलीच असते. कुणाचाच आधार नसतो म्हणुन. तसंच हे म्हातारपण. झुकलेलं आणि वाकलेलं. निष्प्राण वेलीसारखं.!

बाबांची वाक्य ऐकुन काटा यायचा अंगावर माझ्याही.!

नाव, पत्ता, पिनकोड सहीत टाकुन पत्र पत्त्यावर पोचत नाहीत डाॕक्टर, त्याला पोस्टाचं तिकिट लावलं तरच ते पत्त्यावर पोचतं. नाहितर वर्षानुवर्षे पडुन राहतं धुळ खात पोस्टातच. तसंच आमचं आयुष्य.! नाव पत्ता सग्गळं बरोबर पण देव आमच्यावर तिकिट लावायला विसरला, म्हणुन आम्ही इथं पडलेले.

असं बोलुन ते हसायला लागतात.

त्यांचं ते कळवळणारं हसु आपल्यालाच
पिळ पाडुन जातं.

मी म्हणायचो, बाबा हसताय तुम्ही. पण हे हसु खोटं आहे तुमचं. तर म्हणायचे. आयुष्यभर सुखी असल्याचं ढोंग केलं. हसण्याचं नाटकच केलं. आता या वयात तरी खरं हसु कुठुन उसनं आणु.?

मी निरुत्तर.!

वाळलेल्या सुकलेल्या पालापाचोळ्यासारखं आयुष्य झालंय. कुणीतरी येतं आणि आम्हाला गोळा करतं. टोपलीत ठेवतं. वाटतं चला, कुणाला तरी आपली दया आली. नंतर कळतं कि सुकलेले आहोत म्हणुन जाळण्यासाठी,  शेकोटी पेटवण्यासाठी आपल्याला टोपलीत ठेवलंय. सुकलेल्या पालापाचोळ्याचा नाहीतरी दुसरा वापर काय होणार म्हणा.?

बाबांच बोलणं ऐकुन मीच आतुन तुटुन जायचो.

काहीतरी काम करा बाबा, असं सांगुन मी त्यांना विनवायचो, पण आता उमेद गेली होती. बाबा कामाला तयार नव्हते.!

म्हणायचे, आज आहे मातीवर, उद्या मातीखाली जायचं. किती दिवस राहिलेत आता.? आज कुणी विचारत नाही, पण उद्या मेल्यावर हेच लोक अंत्यदर्शनाला येवुन पाया पडतील. श्राद्धाला जेवताना चांगला होता हो बिचारा असं म्हणतील.

नाटक असतं हो सगळं आयुष्यच. प्रत्येकजण आपापली भुमिका पार पाडत असतं इतकंच.!

इतकं असुनही एके दिवशी मी बाबांना कामाला तयार केलंच. बॕटऱ्या विकण्यासाठी त्यांना मदत केली. शे पाचशे रुपये रोज कमावतात बाबा आता. भिक  मागत नाहीत.

मागच्या महिन्यात मला मिळालेला पुरस्कार याच बाबांना मी समर्पित करुन स्टेजवर यांचा सत्कारही करायला लावला होता.!

आज हे आठवायचं कारण म्हणजे, आज मला हे बॕटऱ्या विकताना रस्त्यावर भेटले. मला जरा बाजुला घेवुन गेले. म्हणाले, एक गंमत सांगायचीय डाॕक्टर.
सुनेला कळलंय माझ्या, मी दहा पंधरा हजार कमावतो. तर मला शोधत माझा मुलगा आला होता पुण्यात आणि म्हणाला, "हिने" तुम्हाला घरी बोलवलंय, झालं गेलं जावु दे म्हणते. पाया पडुन माफी मागायला तयार आहे. बाबा, मला पण तुमच्या धंद्यात घ्या, एकत्र मिळुन करु."

मी स्तिमित झालो, तीन वर्षं आपल्या बापाला/सासऱ्याला  भिक मागायला लावली. आता पैसा दिसायला लागल्यावर सगळी नाती जवळ यायला लागली.?

डाॕक्टर काय करु सल्ला द्या.

साहजीकच मी बोललो, ज्यांनी तुमच्यावर हि वेळ आणली त्यांना थारा देण्याचा प्रश्नच नाही, त्यांना तुम्ही नाही पैसा हवाय तुमचा, आता त्यांना जवळ नका करु.!

बाबा म्हणाले, डाॕक्टर मला कळतंय हे सगळं, पण एक सांगु.? आज मी माझ्या पोराला हात दिला नाही तर उद्या माझ्या जागेवर माझा पोरगा दिसंल भिक मागताना. चालेल तुम्हाला.?

मी माझ्या माघारी त्याला भिकारी बनवुन जाईन का.? अहो चुकतात तीच पोरं असतात. माफ करतो तोच *"बाप"* असतो.

अहो, लहानपणापासुन प्रेम म्हणजे काय. माया म्हणजे काय, भक्ती म्हणजे काय, दया म्हणजे काय हे शिकवत आलो. त्यातुन तो किती शिकला माहिती नाही. बहुतेक नाहिच शिकला, नाहितर ही वेळ नसती आली माझ्यावर. असो.!
पण आता आयुष्याच्या शेवटच्या  वळणावर तरी
"क्षमा" म्हणजे काय हे मला त्याला शिकवु द्या डाॕक्टर.

आता जर तो हे शिकला नाही तर तो कधीच शिकणार नाही आणि कधीच कोणाला "क्षमा" करणार नाही.

काही नाही काही नाही तर जाता जाता एवढं तरी शिकवु द्या मला डाॕक्टर.

-संग्रहित पोस्ट

No comments:

Post a Comment

माझे नवीन लेखन

खरा सुखी

 समाधान पैशावर अवलंबून नसतं, सुख पैशानं मोजता येत नसतं. पण, सुखासमाधानानं जगण्यासाठी पैशांची गरज पडत असतेच. फक्त ते पैसे किती असावेत ते आपल्...