आमचं लग्न औरंगाबादला झालं . लग्नानंतर ३ दिवसांनी जालन्याला रिसेप्शन होते. दंडे कुटुंब म्हणजे मोठं खटल्याचं घर ! अनेक जवळ-दूरचे नातेवाईक ते तीनही दिवस जालन्याला घरी रहायलाच होते .
दंडे कुटुंबातली मी पहिलीच डॉक्टर सून . त्यात लव्ह-मॅरेजवाली आणि अगदीच लहान केसांमुळे इतरांपेक्षा जरा वेगळी दिसणारी . त्यामुळे माझ्याबद्दल खूप जणांना उगीचच कुतूहल वाटत होतं .
सगळ्यांच्या ह्या नवलाईने मी बावरून गेले .
वास्तविक काहीच काम न करता ,पूढचे २ दिवस, सर्वांच्या आपल्यावरच्या नजरा चुकवत बसून राहणे मला खूप अवघड वाटत होतं ,आणि त्यातल्या त्यात ' त्या ' बाईंना चुकवणं तर फारच !
मध्यम वयाच्या आणि मध्यम अंगकाठीच्या एक बाई ,संधी मिळाली कि सतत मला काहींना काही प्रश्न विचारून बेजार करत होत्या . त्या नात्याने माझ्या कोण लागत होत्या, नातेवाईकंच होत्या का शेजार-पाजारच्या कुणीतरी होत्या , मला माहित नव्हतं .
त्यांच्या कोणत्याच प्रश्नाचं उत्तर मला देववत नव्हतं कारण त्यांचे प्रश्नच खूप विचित्र होते .
'' तू आता केस वाढवणार आहेस का ?''
''आता ड्रेस घालणार की साड्या नेसणार ?''
''हि आत्ता नेसलेली साडी लग्नात तुला दिलेल्या पाच साड्यांना धरून आहे का ?''...................................... . .. . . .
सगळे प्रश्न हे असेच !
मला त्यांना उत्तर द्यावं वाटत नव्हतं कारण घरात सर्वत्र सोहळ्याचं गोड वातावरण होतं . उगीच काहीतरी बोलून, कुणाला दूखावून मला त्यात मीठाचा खडा टाकायचा नव्हता . त्यामुळे शक्यतो त्यांना टाळणे,किंवा उत्तर न देता गप्प बसणे , हा मधला मार्ग मी अवलंबला .
रिसेप्शनचा दिवस उजाडला .
लग्नात नेसलेला जड शालू मी आज पून्हा नेसायला काढला .
ह्यावेळी मला मदत करायला आई, बहीण नव्हती .
चार-चार वेळेला पिनअप केलेला पदर सोडून ,'' छी! आता तर पहिल्यापेक्षा घाण नेसवलाय ''' असं किती बिनदिक्कत मी बहिणीवर ओरडत होते !
'माहेर ' सुटणं म्हणजे काय ते आता साध्या साध्या गोष्टींतून प्रकर्षाने जाणवायला लागलं आणि डोळे परत परत भरून यायला लागले .
माझ्यावर कावळ्यासारखी नजर ठेऊन असलेल्या 'त्या ' बाईंच्या नजरेतून हे सुटलं नाही . फारच काळजी असल्यासारख्या त्या माझ्याजवळ आल्या ,'' का ग , कुणी काही बोललं का तुला ? सासूबाई ? चुलत सासूबाई ? ''
डोळे पुसत मी नकारार्थी मान हलवली आणि एकेक दागिना डब्यातून काढून अंगावर चढवायला लागले .
'' मंगळसूत्र कुणी केलं ग ? सासरच्यांनी कि माहेरच्यांनी ? का अर्धा अर्धा खर्च केला ? आणि हा गळ्याशीचा सेट ? आईकडचा का इकडून घेतला ? आणि बांगड्यांचं काय ? त्या तरी माहेरून आहेत का ? ''
'' चल लवकर, झालीस ना तयार ? आणि आबा येत नाहीयेत रिसेप्शनला . घरीच थांबणारेत . बरं वाटत नाहीये त्यांना . '' नवऱ्याने येऊन त्या बाईंच्या प्रश्नांच्या सरबत्तीतून माझी सुटका केली .
आबा म्हणजे माझे चुलत सासरे . ते स्वतः डॉक्टर होते आणि त्यांना माझं खूप कौतुक होतं . प्रवासामुळे म्हणा किंवा खाण्यातील बदलामुळे म्हणा , त्यांचे पोट बिघडले होते आणि उलट्या - जुलाबांनी ते त्रासून गेले होते .
रिसेप्शन चालू झाले . सर्व अनोळखी मंडळींना हसत,वाकून नमस्कार करत करत माझे गाल आणि पाय दोन्ही जाम दुखायला लागले .
आई बाबा ,भाऊ बहीणही रिसेप्शनला आले . आता मात्र माझी कळी खुलली .पण तेही जेवण करून परत जायला निघाले . ... . . . . . . . . . . . . . . . . . . . …………………………………………………………………………………………………….सगळं बदललं होतं ..... आता काहीच पहिल्यासारखं नसणार होतं ..... डोळे पून्हा भरून आले .
'' अकरा वाजलेत,येणारी मंडळी आटोपलीच आहेत. ' आबाचं ' जास्त झालंय म्हणे . मला वाटतं तुम्ही आता घरी जाऊन आबाला तपासावं '', भावाच्या काळजीने माझे सासरे म्हणाले .
आम्ही दोघं तेंव्हा एम . डी . च्या दुसऱ्या वर्षाला होतो . अजय तर मेडिसिन ' च शिकत होता . पटकन घरी जाऊन आम्ही आबांना ठेवलं होतं ती खोली गाठली . तोपर्यंत घरीच एक डॉक्टर बोलावून त्यांना सलाईन वगैरे लावण्यात आलं होतं
खोलीत आबांजवळ त्यांचा मुलगा आणि काही हवं नको बघायला ' त्या ' मावशी होत्या .
अजयने स्टेथोस्कोप आणि बी. पी. तपासायचं साधन मागवलं , आबांना तपासलं आणि स्टेथोस्कोप शेजारीच उभ्या असलेल्या माझ्या हातात दिला . अभावितपणे मी तो गळ्यात टाकला आणि आबांची पल्स मोजत उभी राहिले .
नवा कोरा शालू, दोन्ही हातात हिरवा चूडा , नाकपुडीवरून ओसंडणारी चापाची हौशी नथ , मळवट भरल्यासारखे कपाळ आणि ह्या सर्वांना विजोड म्हणजे मी आत्ताच गळ्यात अडकवलेला ' स्टेथो ' !
…. . ….. . ………………………………………………………………………!
आबांनी माझ्याकडे पाहिलं आणि तश्या परिस्थितीतही हसून मला म्हणाले ,''तुला हाच दागिना सर्वात जास्त शोभून दिसतो ''.
No comments:
Post a Comment