नेहेमीप्रमाणे धावपळ करत मंदार वर्गात पोचला. सरांचा ड्रॉईंगचा तास सुरु झाला होता. त्यांच्या सारख्या दिग्गज चित्रकाराचे मार्गदर्शन मिळवणारी त्याची बॅच लकी होती. मंदार धापा टाकत मागच्या बाकावर बसला.
सर सांगत होते - “जिम कॉलिनस्' ने सांगितलेली ही शंभर सव्वाशे वर्षापूर्वीची ही घटना आहे. दोन ब्रिटीश गट उत्तर ध्रुवावर जाण्यास निघाले. शर्यतच होती दोन्ही गटांमध्ये, कोण आधी पोहोचतो ते! पहिला गट उत्तर ध्रुवावर पोहोचला, आणि ३० दिवसात सर्वजण सुखरूप परत आले. दुसरा गट उत्तर ध्रुवापर्यंत पोचला तर नाहीच पण दुर्दैवाने त्या गटातील सर्वजण मृत्यू पावले.
“या घटनेमागचे कारण शोधतांना असे लक्षात आले – पहिल्या गटाने ठरवले होते रोज २० मैल अंतर कापायचे. थंडी असो, वारा असो, वादळ असो. काहीही असो, रोजचे ठरलेले ध्येय गाठायचे.
दुसरा गट मात्र जमेल तेव्हा - जमेल तितके अंतर कापत होता. या गटातील एकाची दैनंदिनी मिळाली, त्यात लिहिले होते – आज पुन्हा वादळी वाऱ्यामुळे हलता आले नाही, आम्ही दोन दिवस एकाच जागी थांबून आहोत. आणि त्याच दिवसाची नोंद पहिल्या गटाने केली होती – आजही वादळ होते, त्यामुळे आजचे २० मैल कापायला जास्त कष्ट पडले.” गोष्ट संपली तसे फडके सर वर्गाला म्हणाले, ”या गोष्टीवरून वरून काय कळते?”
कोणी सांगितले – “ध्येयाच्या दिशेने एक पाऊल जरी टाकले तरी ती प्रगती आहे.”
कोणी सांगितले – “यश मिळणार की अपयश, हे रोजच्या सवयींवर ठरते.”
आणखी कोणी आणखीन काही सांगितले.
शेवटी, सर म्हणाले, “तुम्हाला त्या घटने मागाची कारणे नीट कळली आहेत! आता पुढचा प्रश्न: 'तुमची रोजची २० मैल यात्रा काय आहे ?”
इतका वेळ हिरहिरीने उत्तरे देणारा वर्ग, या प्रश्नाने अंतर्मुख झाला. मंदार विचार करत होता, खरंच आपण रोज ठरलेलं असं काय करतो? सरांनी सांगितलेली स्केचिंगची प्रॅक्टिस दुसऱ्या गटासारखी करतो. जमेल त्या दिवशी, जमेल तेव्हा आणि जमलं तर. मग मंदारने सरांनाच विचारले – “सर, तुमची रोजची २० मैल यात्रा काय आहे ?”
“रोज सकाळी ५ स्केचेस् काढल्याशिवाय मी सकाळचा चहा पीत नाही!”
पांढरी शुभ्र दाढी मिरवणारे सर अजूनही रोज सराव करतात? आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार असूनही रोज सराव करतात! सरांच्या उत्तराने वर्गात शांतता पसरली. तसे सर म्हणाले, “यालाच आजकाल Daily Ritual म्हणतात. रोजचा अभ्यास, रोजचा रियाझ, रोजचे स्केचिंग्स, रोजची प्रॅक्टिस, रोजची एक्सरसाईज झालीच पाहिजे!”
ज्ञानेश्वर यालाच *‘नित्ययज्ञ’* म्हणतात! जो नित्ययज्ञ करायला चुकला, तो सुखाला मुकला! त्याचे यशापयश, सुख-दु:ख परतंत्राने चालते.
हा लोकू कर्मे बांधिला |
तो परतंत्रा भूतला |
तो नित्ययज्ञाते चुकला |
म्हणोनिया || ३.८४ ||
तो परतंत्रा भूतला |
तो नित्ययज्ञाते चुकला |
म्हणोनिया || ३.८४ ||
No comments:
Post a Comment