Wednesday, February 10, 2021

मान - अपमान

आमच्या मांजरीला शिकार करायला खूप आवडतं..

ही मांजर आमच्याकडे येऊन फार फार तर सहा महिने झाले असतील.. पण तेवढ्या कालावधीत तिने जवळपासच्या झाडावर एक खारूताई ठेवली नाही.. सरड्या ठेवला नाही.. घरात उंदीर ठेवला नाही.. किंवा भिंतीवर पाल ठेवली नाही..
ही मांजर सतत आपल्या शिकारीवर लक्ष ठेऊन असते.. आणि शिकार टप्प्यात येताच.. डोळ्यांची पापणी लवायच्या आत शिकारीवर झडप घालते... झाडावर तर अशी सरसर चढते की विचारूच नका...

पण काल एक गम्मत झाली..
एक उंदराचं पिटुकलं शेतातून कुठूनतरी रात्रीच्या वेळेला आमच्या घरात शिरलं.. आलं ते नेमकं माझ्याच अंथरूणाखाली... रात्रभर त्याने काही मला झोप येऊ दिली नाही... सारखी वळवळ... इकडून तिकडे तर तिकडून इकडे.. रात्रभर नुसता उच्छाद मांडला होता... माझ्यातर असा डोक्यात गेला म्हणता तो उंदेिरडा... झोपेचं खोबरं झालं..काय करावं तेच सुचत नव्हतं.

मग सकाळी योगायोगाने तोच उंदीर घराबाहेर पडायला आणि आमच्या मांजरीचं लक्ष त्याच्याकडे जायला एकच गाठ पडली..
उंदीर काही साधासुधा नव्हता.. विजेच्या चपळाईने तो एका फरशीच्या तुकड्याखाली जाऊन लपला.. आणि मांजर बसली हात चोळीत...

पण मांजरीने काही पिच्छा सोडला नाही.. उंदीर दगडाखालून बाहेर येण्याची वाट बघत मांजर तिथेच तळ ठोकून बसली.. टक लावून पाहत..
मांजर पाहात होती उंदराकडे.. आणि मी पाहात होतो मांजरीकडे.. आता पुढे काय होणार या उत्सुकतेने..

शेवटी एकदाचा तो उंदीर बाहेर आला आणि मांजरीने त्याच्यावर झडप घातली.. उंदीर सापडला याचा मांजरीपेक्षा मलाच जास्त आनंद झाला.. म्हटलं बरं झालं लेकाचा सापडला ते.. रात्रभर मला झोपू देत नाही काय?

पण झालं वेगळंच.. आमच्या मांजरीला एक फार वाईट खोड आहे.. शिकार हातात आल्यानंतर ती लगेच मटकावण्यापेक्षा तिच्यासोबत खेळायला तिला जास्त आवडतं.. तिला कंटाळा येत नाही तोपर्यंत ती आपल्या तावडीत सापडलेल्या शिकारीसोबत खेळत राहाते... त्याला आपल्या पंजाने हवेत उडवते.. पुन्हा निसटून ते पळायला लागलं की आपल्या पंजाखाली दाबून धरते... असा बराच वेळ तिचा हा क्रूर खेळ चालत राहातो...

मग तिच्या नेहमीच्या सवयीने आमची मांजर या उंदरासोबत खेळायला बघू लागली.. पण नेमकं आज मात्र विपरीत घडलं.. उंदीर एवढा चपळ होता.. की मांजरीने खेळण्यासाठी म्हणून त्याला आपल्या पंजाने हवेत उडवलं.. आणि नेमकी तीच संधी साधून हवेतल्या हवेत अत्यंत चपळाईने तो उंदीर कुठे गायब झाला ते मांजरालाही समजलं नाही...

पण अजून एक गम्मत झाली.. शिकार हातातून निसटल्यामुळे आमची मांजर एवढी खजील झाली की ती मान वर करून काही माझ्याकडे पाहिना.. दिवसभर अपराधीपणाच्या भावनेने एका कोपऱ्यात बसून राहीली.

त्यातून मी दोन गोष्टी शिकलो..
नंबर एक :- आलेली संधी तुमच्या मूर्खपणामुळे वाया घालवू नका..
आणि नंबर दोन :- मान - अपमान या भावना केवळ मनुष्यात नाही तर त्या प्राण्यांमध्येसुद्धा तेवढ्याच तीव्र असतात...


तानाजी तुकाराम शेजूळ
दिनांक ०५/०२/२०२१

No comments:

Post a Comment

माझे नवीन लेखन

खरा सुखी

 समाधान पैशावर अवलंबून नसतं, सुख पैशानं मोजता येत नसतं. पण, सुखासमाधानानं जगण्यासाठी पैशांची गरज पडत असतेच. फक्त ते पैसे किती असावेत ते आपल्...