हे भारतातच घडू शकतं... मृदुला बेळे
मी इटलीमधल्या तुरीन इथे बौद्धिक संपदा कायद्यात एलएलएम करत होते, तेंव्हाची गोष्ट आहे, 2013 सालामधली. दिवसवसभराच्या लेक्चर्सने डोकं आंबून गेलं होतं, तेंव्हा एलिझा- आमची प्रोग्राम डिरेक्टर -वर्गात आली. " माझ्याकडे इथं होणाऱ्या चित्रपट महोत्सवाचे काही फ्री पासेस आहेत, कुणाकुणाला यायचंय बोला पटकन", ती म्हणाली. मी अज्जिबात वेळ न दवडता हात वर केला, आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी एलिझा आणि आम्ही चार पाच जण या चित्रपट महोत्सवाला निघालो. जाऊन पोचलो तर समजलं की तिथं आज जे चित्रपट दाखवले जाणार होते त्यात एक भारतीय चित्रपट होता. डायलन मोहन ग्रे या दिग्दर्शकाचा 'फायर इन द ब्लड' या नावाचा.
हा चित्रपट पाहून बाहेर पडले तेंव्हा मी आंतरबाह्य हादरलेले होते. या हादरण्याच्या आड दडलेलं होतं एक कौतुक आणि एक शरम. जगात केवळ औषधं परवडत नसल्याने झालेल्या करोडो गरीब आफ्रिकी लोकांच्या मृत्यूने मी हादरून गेले होते. त्यांच्या मदतीला धावून गेलेल्या सिप्ला या भारतीय कंपनीच्या डोंगराएवढ्या कामाबद्दल एक भारतीय असूनही, आणि औषधनिर्माणशास्त्राची प्राध्यापिका असूनही मला काडीचीही माहिती नव्हती, याची मला प्रचंड लाज वाटली होती. पण त्याचवेळी कौतुक आणि आदराने मन भरून आलं होतं. हा आदर होता गरीब लोकांना स्वस्त दरात औषधं मिळावीत म्हणून सतत धडपडत आलेल्या, त्यासाठी योग्य धोरण, कायदे ठरवत आलेल्या भारत सरकारच्या दूरदर्शी धोरणाबद्दल, त्या दृष्टीने सतत प्रयत्नशील राह्यलेल्या भारतीय जनरिक औषध उद्योगाबद्दल, आणि त्यातल्या सिप्ला, डॉ. रेड्डीज, रॅनबॅक्सी या सारख्या औषध कंपन्यांबाबत.
त्या दिवशी महोत्सवाहून परत आले ती या विषायाचं भूत मानगुटीवर बसवून घेऊन. याबद्दल खोलात जाऊन वाचल्याशिवाय आणि माहिती करून घेतल्याशिवाय माझ्या जीवाला आता चैन पडणार नव्हती. सुदैवाने वाचण्यासारखं भरपूर काही उपलब्ध होतं. मुळात औषधनिर्माण आणि पेटंट हे दोन्ही माझ्या अभ्यासाचे विषय असल्याने वाचलेलं सगळं विनासायास समजत देखिल होतं. एक दिवस अचानक असं वाटायला लागलं की, " अरे आपल्या देशातल्या वाईट गोष्टींना नावं ठेवण्यात आपण सगळे किती हिरिरीने पुढाकार घेतो. आपल्या देशातला भ्रष्टाचार, इथली रहदारी, अस्वच्छता, गरिबी याबद्दल आपण किती सतत तक्रार करतो, टीका करतो. मग आपल्या देशाने जगासाठी केलेल्या चांगल्या गोष्टीचा धिंडोराही आपण त्याच उत्साहाने पिटायला हवा, नाही का? त्यात आपण मागे का? कुणी तरी करायलाच हवं हे काम". हा विचार डोक्याच्या एका कप्प्यात सतत सतत फेर धरून नाचत होता.
दरम्यान मी तुरीनहून भारतात परत आले, माझ्या दिनक्रमात अडकले, तरी हा विषय पिच्छा सोडत नव्हता. " कथा अकलेच्या कायद्याची" या बौद्धीक संपदेवरील माझ्या स्तंभाचं लोकसत्तेत लिखाण सुरू झालं. या स्तंभाला मिळालेला प्रतिसाद अत्यंत सुखावणारा तर होताच. एक दिवस ' फायर इन द ब्लड' पाहून बसलेला धक्का, वाटलेली शरम आणि जाणवलेला अभिमान, सगळे जणू कट करून गोळा झाले, आणि माझ्याभोवती फेर धरून नाचत सांगू लागले, "तूच सांग की ही कहाणी जगाला- तूच लिही" आणि माझ्याही नकळत मी आफ्रिकेत " औषध औषध" म्हणत प्राण सोडणाऱ्या लाखो करोडो आफ्रिकन माणसांना वचन देऊन बसले - " हो मी लिहीन".
आणि मग सुरू झाला एक वेडं करणारा प्रवास. मिळेल तिथून, मिळेल त्या स्वरूपात, मिळेल ते वाचायला सुरुवात झाली. एक दिवस सिप्लाचे सर्वेसर्वा युसुफ हमीद यांचा ईमेल अॅड्रेस कुठून तरी मिळाला. तो बरोबर आहे की नाही हे सुद्धा मला माहित नव्हतं. आणि ते मुळीच उत्तर देणार नाहीत हे माहित असूनही " मला तुमच्या कामावर असं असं पुस्तक लिहायचंय" असं कळवणारा ईमेल मी त्यांना धाडून मोकळी झाले. दुसऱ्याच दिवशी त्यांचं उत्तर आलं. पुढच्याच महिन्यात ते लंडनहून भारतात येणार होते आणि तेंव्हा मला भेटायला ये असं त्यांनी मला कळवलं होतं. मी हे वाचून प्रचंड खूश झाले आणि जोमाने कामाला लागले. आणखीन झपाट्याने वाचू लागले.
दरम्यानच्या काळात ते मुंबईत आले. माझं दोन तीनदा त्यांच्याशी फोनवर बोलणं झालं. दिलेल्या वेळेला त्याना फोन करूनही ते जर उचलू शकले नाहीत तर ते आठवणीने परत फोन करत आणि " येस्स माय डिअर गर्ल ...टेल मी व्हॉट आय कॅन डू फॉर यू" असं प्रेमाने बोलायला लागून मला आश्चर्यचकीत करत असत.
शेवटी त्यांच्या भेटीचा दिवस ठरला. भेटीच्या वेळेच्या बरीच आधी पोचून मी मुंबई सेंट्रल स्टेशन वरून सिप्लाच्या जुन्या कार्यालयाकडे चालत निघाले तेंव्हा मनात प्रचंड उत्कंठा तर होतीच. पण मी प्रचंड बेचैन होते. डॉ युसुफ हमीद यांच्या सारखा केम्ब्रीज मधे शिकलेला ज्ञानवृद्ध, तपोवृद्ध माणूस... अब्जाधीश....सिप्ला या भल्या मोठ्ठ्या औषध कंपनीचा सर्वेसर्वा! तो माझ्यासारख्या एका किरकोळ प्राध्यापिकेला भेटायला तयार झाला होता. आणि मी त्यांच्याशी नीट बोलू शकेन का या विचाराने माझ्या तळहाताला घाम फुटला होता...पाय लटपटत होते...छाती धडधडत होती. एकदाची शेवटच्या मजल्यावरच्या त्यांच्या भव्य कार्यालयात जाऊन पोचले. त्यांच्या कार्यालयात होते ते स्वत: आणि एमके हमीद- त्यांचे बंधू. लालसर गोरापान रंग, पूर्ण चंदेरी झालेले केस, तीक्ष्ण नजर पण बोलण्यात अत्यंत मार्दव असलेले माझ्या आजोबांच्या वयाचे डॉ. युसुफ हमीद. त्यांच्या व्यक्तीमत्वाला एक वलय होतं...आणि त्यांच्यासमोर बसल्या बसल्या ते मला जाणवू लागलं. त्यानी मजेशीर बोलून माझी चिंता एकदम दूर पळवून लावली आणि मग आमच्या गप्पा सुरू झाल्या. मला हे का लिहावसं वाटतंय असं त्यानी आधी समजून घेतलं. मग मी किती पाण्यात आहे हे जोखण्यासाठी त्यानी मला माझं या विषयातलं ज्ञान तपासून पाहणारे काही प्रश्न विचारले. आणि मी बरोबर उत्तरं दिल्यावर मग मला म्हणाले, " हं...आता विचार". आणि मी त्यांची मुलाखत घेऊ लागले.
उत्तरं देताना प्रत्येक गोष्ट त्यांना अगदी लख्ख आठवत होती. किती तरी औषधांच्या रासायनिक संरचना ते समोरच्या वहीत झरझर काढत होते. मधनंच " रोझी sssरोझीssss" अश्या मोठमोठ्याने हाका मारत आपल्या सेक्रेटरीला कुठला तरी शोधनिबंध, वृत्तपत्रातला एखादा लेख, एखादं पुस्तक आणायला लावत होते. जेवायची वेळ झाली. त्या दिवशी प्रत्यक्ष डॉ. युसुफ हमीद याच्या पंगतीला बसून जेवण्याचा मान माझ्या नशिबात होता. जेवणं आटपून कॉफी पीत पीत आमची मुलाखत परत सुरू झाली. त्या दिवशी संपली नाही म्हणून दुसऱ्या दिवशीही चालू राह्यली. बोलण्याच्या ओघात मी ज्या लोकांशी बोलायला हवं अश्या किती तरी लोकांची नावं ते मला सांगत होते आणि मी लिहून घेत होते. मुलाखत संपवून मी नाशिकला परत आले तेंव्हा मी खरोखर थक्क झाले होते. डॉ. हमीद यांच्या ज्ञानी, मृदू हुशार व्यक्तीमत्वाने दीपून गेले होते.
दोनच दिवसात त्यांच्याकडून एक खोकं भरून पुस्तकं, सीडीज, वृत्तपत्रीय लेख माझ्या घरी येऊन पोचले. त्यानंतर त्यानी सांगितलेल्या या लढ्यातल्या शिलेदारांना शोधून काढून त्यांच्याशी संपर्क करण्याचा माझा उद्योग सुरू झाला. ही मंडळी जगभर पसरलेली होती.
मी राजहंसच्या दि. ग. माजगावकरांना पुस्तकाची कल्पना कानावर घातली आणि त्यांनीही पुस्तक करायला आनंदाने होकार दिला. देशोदेशी पसरलेल्या माझ्या कहाणीच्या नायकांचा शोध घेण्यात गुंतून गेले.
विशेष उल्लेख करीन तो न्यू यॉर्क टाइम्स वृत्तपत्रात आरोग्य विषयक लिखाण करणारे पत्रकार डोनाल्ड मॅकनील यांचा. डोनाल्डने मला आतोनात मदत केली. डॉ. हमीद यांचं काम सगळ्यात आधी जगाच्या नकाशावर जाहीरपणे आणलं ते डोनाल्डने- न्यू यॉर्क टाईम्समधे याबाबत लेख लिहून. मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यायला डोनाल्डने मला मोठमोठे ईमेल्स लिहिले, दुसऱ्याना फोनवर दिलेल्या मुलाखती मला पाठवल्या, स्वत: लिहिलेलं काही लिखाण पाठवलं...आणि इतर किमान पन्नास लोकांशी माझ्या ओळखी करून दिल्या. या सगळ्यांची मी आजन्म ऋणी राहीन.
तुरीनला असताना जी कहाणी ऐकून मी प्रचंड अस्वस्थ झाले होते, हलले होते, ती कहाणी या सगळ्या मंडळींबरोबर जणू पुन्हा एकदा जगले. त्या कहाणीचा एक भाग झाले. या सगळ्यांशी बोलताना, या बद्दल लिहिताना अनेकदा फार भावनिक व्हायला झालं. ही कहाणी लिहिताना औषधनिर्माणशास्त्राची एक प्राध्यापक आणि आजन्म विद्यार्थिनी म्हणून माझी सामाजिक बांधिलकी काय आहे याची लख्ख जाणीव मला झाली. ती जाणीव माझ्या विद्यार्थ्यांमधे यावी म्हणून मी फार विचारपूर्वक प्रयत्न करू लागले.
या विषयातली सगळी तांत्रिक माहिती लिहायची, पण ती सामान्य माणसाला समजली पाहिजे, त्यासाठी ती कादंबरीसारख्या फॉर्ममधे कशी लिहिता येईल, हे एक मोठंच आव्हान होतं.
सामान्य माणूस महाग औषधं घेत राहतो आणि पिळवटला जातो. हे थांबवण्यासाठी भारतीय पेटंट कायद्यात फार उत्तम सुविधा आहेत. त्यावर जगभरातून, विशेषतः अमेरिका आणि युरोपातून प्रचंड टिका होते, भारतावर प्रचंड दबाव आणला जातो. पण आपलं सरकार बधत नाही. आमच्या जनतेचं आरोग्य तुमच्या पेटंटसपेक्षा जास्त महत्वाचं आहे हे ठणकावून सांगत राहते. रेडक्रॉस, डॉक्टर्स विदाउट बॉर्डर्स सारख्या सेवाभावी संस्थांना गरीब देशात काम करण्यासाठी morning स्वस्त पण उत्तम दर्जाची औषधं भारत पुरवत राहतो. पण त्याचबरोबर अमेरिका आणि युरोपसारख्या दर्जाबाबत अत्यंत जागरूक असणाऱ्या देशांचाही सगळ्यात मोठा निर्यातदार बनतो. भारत हे कसं करू धजावतो हे जाणून घेण्यात इतर देशातल्या लोकांना प्रचंड रस असतो. आर्जेन्टिना, इंडोनेशियातले लोक जेंव्हा येऊन सांगतात की "सामान्य नागरिकांना औषधं स्वस्तात मिळावी म्हणून काय करायचं हे भारताने आम्हाला शिकवलंय आणि तुम्ही दाखवलेल्या रस्त्यावर आम्ही चालतोय", तेंव्हा ऊर अभिमानाने भरून येतो.
सगळ्या जगाची फार्मसी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारताच्या औषधनिर्माण उद्योगाचा आपण एक लहान बिंदू इतका छोटा भाग आहोत या विचाराने फार कृतार्थ वाटतं! आणि म्हणूनच हे ऋण फेडण्यासाठी माझ्यासारख्या या बिंदूने केलेला एक छोटासा प्रयत्न, उचललेला एक खारीचा वाटा, म्हणजे हे पुस्तक आहे. भारताबद्दल अभिमान वाटण्याचे आणखी एक कारण हे पुस्तक वाचकांना नक्की देईल याची मला नुसती आशा नव्हे तर खात्री वाटते!
-मृदुला बेळे
No comments:
Post a Comment