Saturday, February 20, 2021

*हे सुंदर जग आहे*


*हे सुंदर जग आहे*

✍🏼 रवि वाळेकर

पहाटेपासूनच पाऊस कोसळतं होता. इतरत्र पाऊस फक्त पडतो, मुंबईत तो कोसळतो! 'रोमँटिक पाऊस' वगैरे शब्द मुंबईबाहेरचें. बाहेरचा येऊन कोणी मुंबईत पावसाला 'रोमँटिक' वगैरे म्हंटला, तर अस्सल मुंबईकर त्याला जोड्याने मारेल!

मी नऊलाच ऑफिसला पोहोचलो होतो. कामाचा बराचं व्याप होता. फोन्स, इमेल्स, मिटींग्ज करता करता, दिड वाजता जेवावे म्हंटलो, तेवढ्यात ऑफिसचेच एक 'अंतर्गत इमेल' येऊन थडकले.
'पाऊस जास्त असल्याने, आज सर्व कर्मचाऱ्यांनी लवकर घरी निघावे'
इतका वेळ ऑफिसमध्ये बसल्यामुळे बाहेर पावसाने काय कहर केलायं, या विषयी अनभिज्ञ होतो. बाहेर येऊन बघतो, तर विश्वास बसेना!

समोरचा नेहमीचा गजबजलेला रस्ता ओळखू येत नव्हता!
सोसाट्याचा वारा आणि वरून बादलीने ओतल्यासारखा तुफानी पाऊस. झाडांच्या फांद्या, अगणित पाने, कागदं, कचरा रस्त्यावर पडलेला. तुरळक रिक्षा धावतं होत्या. बस वा टॅक्सी नाहीचं. संपूर्ण रस्त्यावर घोट्याच्या वरपर्यंत वाहते पाणी.
सगळा रस्ताचं गटार झाला होता! त्याचं गढूळ पाण्यात शेकडो लोक पडतं, चाचपडंत चालतं होते. पाण्यात दिसेनासे झालेले खड्डे चुकवण्यासाठी रस्त्यातले पाय जमिनीवरून घसरवतं पुढचा पाय टाकायचा!
त्यातचं, पायी चालणाऱ्यांच्या अंगावर पाणी ऊडवतं ऊर्मटपणे वाहने धावत होते.
वरती पाणी, खाली पाणी. आभाळ काळे झालेले. सगळीकडे काळजी, भीती आणि एक भयावह अंधूकपणा भरलेला.
या अशा पावसातं लवकरात लवकर घरी पोहोचणेचं शहाणपणाचे. मी त्वरेने निघालो.
मला रिक्षाने घर ते ऑफिस आणि ऊलटं, अर्धा ते पाऊण तास लागतो. पण आज रिक्षाच मिळेना. एकतरं रिकाम्या रिक्षा नाहीतचं आणि ज्या होत्या, त्या थांबायला तयार नाही. पावसाचे पाणी वाऱ्यामुळे चहुबाजूंनी अंगावर येत होते. कसेबसे डोके कोरडे राहिले, बाकी नखशिखांत भिजलो. जवळपास तासाभराने एक रिक्षा मिळाली.
"सब तरफ पाणी भरेला है. सब जाम है साब" काहीतरी नवीन सांगितल्याप्रमाणे रिक्षावाला सांगत होता.

रस्त्यावर सगळीकडेचं पाणी. कासवाला लाजवील अशा संथगतीने वाहने चालतं होती. त्यात भर पाण्यात रस्ता ओलांडणाऱ्यां बेशिस्त पादचाऱ्यांची भर! सिग्नल बंद होते. वाहने दोन तिन फूट पुढे सरकायची आणि तिथेचं पाच दहा मिनिटे थांबायची. थांबण्याशिवाय दुसरा पर्यायचं नव्हता!
पुढे जाता येईना, मागे परतता येईना. मागेपुढे हजारो वाहने अडकलेली. दोन्ही बाजूला शेकडो लोक पाण्यात चालतायेत.कपडे भिजलेले, शरीर गारठलेले आणि चेहरे चिंताक्रांत. एवढे भिजलेले की आता वरून पडणाऱ्या पावसाचीही पर्वा नाही. छत्रीचेचं ओझे झालेले.
मुली, स्त्रिया सुद्धा आज भिजलेल्या कपड्यांनी बिनदिक्कत चालतं होत्या. बघायला, कोणाची विखारी नजरं त्यांच्याकडे जातेच कशाला? सगळेचं खाली बघतं, रस्ता पायाने चाचपडतं, जीव वाचवतं चालतायेत...

मला दुरवर गुडघ्याच्याही वरपर्यंत पाण्यात ऊभा असलेला विशीतला एक मुलगा दिसला. मुख्य रस्ता थोडा ऊंचावर होता. इथे बाजूपेक्षा थोडे कमी पाणी होते. रस्त्याच्या बाजूला, कडेपासून पाच-सहा फुटावर, तुफानी वेगाने पाणी वाहात होते. हा खाली त्या गुडघाभर पाण्यात आणि वरून कोसळणाऱ्या पावसात भिजत बावळटासारखा निव्वळ ऊभा होता!

हा वेडा आहे का?
या असल्या जिवघेण्या पावसातं घरी निवांत बसायचे सोडून हा असा का ऊभा आहे? जर पावसाची गंमतचं बघायची असेल, तर कुठे आडोश्याला ऊभा रहा!
मी आता आजुबाजूची रहदारी बघण्याऐवजी खुळ्यागतं याच्याकडेचं बघतं बसलो!
विस एक मिनीटांनी माझी रिक्षा डाव्या बाजूला नेमकीचं याच्या समोर आली.
मी त्याच्याकडे बघून स्माईल दिले.
हा मख्ख!
"क्या कर रहा है?"
"कुच नही"
"अबे, बारीश मे कायको भिग रहा है?"
ऊत्तर नाही.
रिक्षा ऊभीचं होती. दहा मिनिटे तरी पुढे जाता यईल, असे वाटत नव्हते. हा ध्रूवबाळाप्रमाणे अढळपद मिळाल्यासारखा तिथेचं. एक इंचही जागेवरून हलतं नव्हता!
रस्त्याच्या बाजूने जाणाऱ्या प्रत्येक पादचाऱ्याला, दुचाकीस्वाराला याचा अडथळा होत होता. सगळ्यांना याला वळसा घालूनच जावे लागतं होते. काहीजण जाताजाता त्याला शेलक्या शिव्याही देतं होते.
त्याचे कपडे भिजलेले होते, असे म्हणणे मुर्खपणाचे होते. डोक्यावरच्या केसांमधूनही पाणी ठिबकतं होते. याला काही फरकचं पडत नव्हता! मध्येचं तोंडावर हात फिरवून पावसाचे पाणी पुसतं होता. कपड्यांची अजिबात काळजी नव्हती. ते इतके भिजले होते, की सुकायलाचं आठवडा लागणारं! खाली काळपट अर्धी चड्डी आणि वरती एकेकाळी पांढरा असावा, असा टिशर्ट. त्यावरच्या असंख्य काळ्या तेलकट डागांमुळे हा बहुधा 'गॅरेजवाला' मुलगा आहे, हे कळतं होते.
मला राहावले नाही. मी त्याला विचारले, "बांद्रा आने का है क्या रे? चलं बैठ ऑटो मे"
"नही साब" त्याच्या डाव्या बाजूला जमिनीकडे बोट दाखवतं तो म्हणाला,
"इधर निचे बडा पाईपलाईन है. ढक्कन निकल गयेला है"
तो त्या मॅनहोलमध्ये कोणी पडू नये, म्हणून तिथे ऊभा होता!
रस्त्याखालचा पाईप पुर्ण भरला असावा, अन्यथा पाणी चक्राकार आत घुसताना दिसले असते. फुटभर ऊंचीचे पाणी वरून वेगाने जात होते. पायी चालणाऱ्याला वा दुचाकीवरून जाणाऱ्या कोणाला जाणवलेही नसते, की खाली खोल सांडपाण्याचा पाईप आहे!
मी अवाक झालो! कोण होता हा? कोणासाठी हा असा पाण्यात ऊभा राहिलायं?
मी भरं पावसातं खाली ऊतरलो. त्याला म्हंटले, "बहोत बढिया, भाई!"
तो फक्त कसनूसं हसला आणि म्हणाला,
"बस, कोई गिरना नै मंगता इधर"
"कबसे खडा है?"
"दो बजे से"
घड्याळातं पाच वाजले होते!
३ तास तसेचं ऊभे राहून याला भुक लागली असणारं. दुदैवाने माझ्याकडे काहीच नव्हते. सगळी दुकानेही बंदं. हा भुक लागल्यामुळे जागा सोडेल, असे काहीच चिन्ह नव्हते!

कुठल्या प्रेरणेने तो हे करतं होता? त्या घाण गुडघाभर ऊंचीच्या पाण्यात उभे राहून तो तिन तासांपासून कोणाला वाचवतं होता? आणि का? दोन वाजल्यापासून त्याने कित्येक जणांना वाचवले असणार. कोणाला त्याची जाणीवही नव्हती. खुद्द याला तरी त्याची कुठे पर्वा होती?
ही अशी छोटी छोटी माणसें हे जग सुंदर करून जातात!

मागच्या डिसेंबरमध्ये दादरला फुटपाथवर एक आंधळा म्हातारा 'कालनिर्णय' विकतं बसलेला दिसला.
दुकानातून घेण्याऐवजी, याच्याकडून घेतलेले काय वाईट, असा विचार करून थबकलो.
"कालनिर्णय' केवढ्याला, काका?"
"फक्त बत्तीस रूपये, साहेब" केविलवाणे तो म्हणाला. सकाळपासून काहीचं विकल्या गेलेले दिसतं नव्हते. मी एक घेतले. पन्नासची नोट होती. ती त्याला दिली. हाताने चाचपडत तो ती नोट तपासतचं होता, की ऊंची कपडे घातलेला साठीतला एक देखणा गृहस्थ खाली वाकला.
"कितने का है ये?"
"बत्तीस रुपया"
"कितने है?"
"चौदा रहेंगे, साब"
ज्याला मराठी येतं नाही, असा हा माणूस मराठीतले कालनिर्णय कशासाठी विकत घेतोयं?
त्या माणसाने खिशातून साडेचारशे रुपये काढून त्याला दिले आणि ते सगळे कालनिर्णय बखोटीला मारले!

मी आश्चर्यचकित! छापील किंमतीत विकतं घेतोय, म्हणजे पुनर्विक्रीसाठी निश्चितच घेतं नाहीये. तसाही, कपड्यांवरूनही हा असले किरकोळ धंदा करणाऱ्यातला वाटतं नव्हता.
तो गृहस्थ थोडा पुढे गेला असेल. मला राहवलेचं नाही. मी थांबवून त्यांना विचारलेच!
हे मुळचें लखनौचे महोदय एअरइंडियातल्या मोठ्या पदावरून नुकतेचं निवृत्त झाले होते. शिवाजीपार्कात स्वत:चे घर होते. एकुलता एक मुलगा अमेरीकेत स्थाईक झाला होता. लठ्ठ पेन्शन येत होती.
"वो बेचारा पंधरा कालनिर्णय बेचके कितना कमाता होगा? सौ, डेढसौ? वैसे भी बेचारे को सौ रुपये के लिए दिनभरं ऐसेही धुप मे बैठना पडता था. मैने ऊसका काम थोडा हलका करं दिया. बस इतनाही!"
मला काही बोलणेचं सुचले नाही! पण एवढ्या चौदा कालनिर्णयांचे तो करणारं काय होता?
"सोसायटी मे बहोत मराठी फ्रेंडस है, ऊनमे बांट दूंगा!"
मी दिग्मूढ!
"तु एक मिनीट लेट आता, तो तुझे भी फोकट मे देता!" मला डोळा मारतं, हसतं तो लखनवी देवदूत रस्ता पार करून गेला सुद्धा!

माणूसकी याहून काय वेगळी असते?

एखाद्या हॉस्पिटलबाहेर 'तत्काळ रक्त हवे' असा फलक वाचून, ऑफिसला वा घरात जायला ऊशीर होईल, याची तमा न बाळगतां रक्त देणारे कोण असतात? ते ही रांग लाऊन!
कोण असतात हे? कुठल्या जातीचे? कोणत्या धर्माचे? 'भैये' असतात की 'आपले' मराठी?
मुंबईत रस्त्यावर चहा विकणारे लाखो 'चायवाले' आहेत.
बहुतांश ऊत्तरेकडले. सकाळी चहा बनवल्यावर पहिला कपभरं चहा ते रस्त्यावर फेकतात.
दिवसाचा पहिला चहा रस्त्यावर न फेकता भिकाऱ्याला पाजणारा बांद्र्याचा एक 'चायवाला' मला माहिती आहे! सकाळी सकाळी भिकारी आलाचं नाही, तर एका भांड्यात तेवढा चहा बाजूला काढून, धंद्याला सुरूवात करतो!
"बर्कत आती है" एवढीचं कारणमिमांसा त्याने दिली होती.

डोळे ऊघडून पाहिले, तर असे असंख्य अज्ञात देवदूत आपल्याला ठायीठायी आढळतात, पण आपली नजरचं मेलेली असते.
परवा थायलंडमध्ये गुहेत अटकलेल्या मुलांना बाहेर काढण्यासाठी हजारो अनामिक हात मदतीस आले.
गुहेतले पाणी पंपाने बाहेर काढावे लागले. ते पाणी कुठे फेकले?

ज्याच्या शेतातं ते पाणी फेकावे लागले, त्या शेतातलें तीन एकरातले ऊभे पिक या पाण्याने अक्षरशः वाहून गेले. एका छोट्या शेतकऱ्यासाठी हे प्रचंड नुकसान.
एका पत्रकाराने त्या शेतकऱ्याला या नुकसानीविषयी खोदून खोदून विचारले.
"नुकसानीचे काय एवढं? मुले वाचली ना? पेरणी परतं करता येईल. मुलांचे प्राण परतं आणता आले असते का?"
हे ऊत्तर ऐकूनचं डोळ्यात पाणी आले!

हे जग सुंदर आहे. ते सुंदर करणारे अनामिक देवदूत आजही या जगात आहेत आणि राहतीलही.

फक्त तो तिरस्काराचा, आत्मकेंद्री स्वार्थाच्या काळ्या काचांचा गॉगल डोळ्यावरून काढला पाहिजे!
********
कॉपी पेस्ट

Show More Reactions

No comments:

Post a Comment

माझे नवीन लेखन

खरा सुखी

 समाधान पैशावर अवलंबून नसतं, सुख पैशानं मोजता येत नसतं. पण, सुखासमाधानानं जगण्यासाठी पैशांची गरज पडत असतेच. फक्त ते पैसे किती असावेत ते आपल्...