Thursday, July 24, 2014

सुप्रसिद्ध लेणी व शिल्पे

नाशिक येथे असणार्या पांडवलेण्यात ‘लेण’ हा शब्द प्रथम
आलेला आहे. त्यापासूनच लेणी हा शब्द रूढ झाला.
लेणी म्हणजे डोंगरातील दगडांवर केलेले कोरीव काम होय.
लेणी निर्माण करण्यासाठी आवश्यक असणारा एकसंघ व
कणखर स्वरूपाचा दगड महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर
उपलब्ध आहे. याशिवाय प्राचीन काळापासून महाराष्ट्राने
धार्मिक सहिष्णुतेचेच धोरण स्वीकारलेले दिसते.
त्याचा परिणाम म्हणूनदेखील बौध्द, जैन, हिंदू या धर्मांच्या-
पंथांच्या विविध लेणी एकत्र किंवा वेगवेगळ्या स्वरूपात
बघायला मिळतात. केवळ भारतातच नाही तर संपूर्ण जगात
प्रसिद्ध असणार्या अजिंठा-वेरूळ येथील लेणी या महाराष्ट्रात
आहेत. या लेण्या म्हणजे महाराष्ट्राचे वैभवच आहेत. इ.स.पू.
दुसरे शतक ते इ.स. आठवे शतक या काळात औरंगाबादमधील
अजिंठा आणि वेरुळ येथे या लेणी निर्माण करण्यात आल्या.
सह्याद्री पर्वताजवळ वसलेल्या अजिंठा गावाच्या वायव्येस
एका डोंगरात अजिंठा लेणी कोरलेली आहे. या डोंगररांगेतील
बेसॉल्ट जातीचा एकसंघ दगड या लेणी निर्माण
करण्यासाठी खूप उपयोगी ठरला आहे. एकूण ३०
गुहांचा समावेश असणार्या या लेणीत हीनयान व महायान
अशा दोन बौध्दधर्मीय लेणींचा समावेश होतो. हीनयान पंथीय
लेणींची निर्मिती इ.स.पू. दुसरे शतक ते इ.स. पहिले शतक
या काळात झालेली आहे. त्यात लेणी क्रमांक
८,९,१०,१२,१३,१५ यांचा समावेश होतो. महायान पंथीय
लेणींची निर्मिती इ.स. ४ थे शतक ते इ.स. ८ वे शतक
या काळातील असल्याची शक्यता आहे. इ.स. ६०२ ते इ. स.
६६४ या काळात युऑन श्वॉंग हा चिनी प्रवासी बौद्ध
धर्माचा अभ्यास करण्यासाठी भारतात आला होता. त्याने
अजिंठ्याच्या लेणीला भेट दिल्याचा उल्लेख इतिहासात सापडत
नसला, तरी त्याने या लेणींविषयी जे लिहून ठेवले आहे, त्यावरून
या लेणींच्या तत्कालीन
वैभवाची आपल्याला कल्पना करता येऊ शकते. तो असे
लिहितो की, ‘या लेणींमधील गौतम बुद्धाची मूर्ती २० मीटर
उंचीची असून, त्यावर एकावर एक या प्रमाणे दगडाची सात
छत्रे आहेत. या छत्रांना कसलाच आधार नाही.
डोंगराच्या दरडींमध्ये कोरलेली या लेणींची दालने
आपल्या पाठीवर हे डोंगर तोलून धरत आहेत,
असा पाहणार्याला भास होतो.’ मध्ययुगात या लेणींकडे कोणाचे
फारसे लक्ष गेलेच नाही. १८१९ च्या एप्रिल महिन्यात स्मिथ
नावाच्या एका ब्रिटिशाने या लेण्यांचा शोध लावला.
काळाच्या ओघात या लेणींचा काही व्यक्तींनी, विविध
राजवटींतील सत्ताधीशंनी-मुद्दाम, या लेण्यांचे महत्त्व न
समजल्यामुळे - विध्वंस केला. मात्र तरीही आज या लेणींचे जे
काही अवशेष बाकी आहेत, त्यावर या लेण्या जगप्रसिद्ध
झाल्या आहेत. इतकेच नाही तर त्यांचा समावेश ‘जागतिक
वारसा’ - World Heritage या स्थळांच्या यादीमध्ये
देखील झाला आहे.
अजिंठा - वैशिष्ट्यपूर्ण लेणी :
अजिंठ्याच्या एकूण ३० लेणींपैकी काही लेणी खूपच अप्रतिम
आहेत. त्या लेणींची माहिती पुढीलप्रमाणे-
क्रमांक १ च्या लेणीमध्ये गौतम बुद्धाची मूर्ती आहे.
या लेणीच्या तुळईवर बुद्धजीवनातील प्रसंग, हत्तीच्या झुंजी,
शिकार असे विविध विषय कोरले आहेत. या लेणीमधील
अर्धस्तंभाच्या अगदी वर आकाशातून उडणारे गंधर्व दाखवले
आहेत. हे गंधर्व पाहतांना त्यांनी जणू वरचे छत तोलून धरले
आहे असा भास होतो. ही लेणी मुख्यत: आतील
चित्रकामासाठी प्रसिद्ध आहे. या लेणीच्या मुख्य गर्भगृहात
बुद्धाची एक भव्य अशी मूर्ती आहे. ही मूर्ती शांत व
ध्यानमग्न दिसते. या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे
या मूर्तीच्या चेहर्यावर समोरून उजेड टाकला, तर
चेहरा ध्यानमग्न दिसतो. उजव्या बाजूने प्रकाश टाकला, तर
ही मूर्ती स्मितहास्य करीत असल्याचा भास होतो.
डाव्या बाजूने प्रकाश टाकला, तर मूर्तीच्या चेहर्यावर खिन्न,
उदास भाव दिसतात. या लेणींमधील रंगकामाचे सुशोभीकरण
आणि बोधप्रद कथा अशा दोन विभागात विभाजन करता येईल.
सुशोभीकरणाच्या विभागात छत, स्तंभ, त्यावर असणारे हत्ती,
वाघ, मोर, हंस, बदके, तसेच कलाकुसर यासाठी रंगकाम केलेले
आहे.
उपदेशपर कथांच्या विभागात बौद्ध वाङ्मयातील कथांचे रेखाटन
असले, तरी काही हिंदू पुराणातील कथांची रेखाटनेदेखील यात
दिसतात. अलंकार व हाता-पायाच्या बोटांचे सूक्ष्म रेखाटन हे
येथील शिल्पकलेचे वैशिष्ट्य होय. अत्यंत नाजूकपणे व सजीव
वाटतील अशा पद्धतीने या शिल्पातील हाता-पायांच्या बोटांचे
रेखाटन केलेले आहे. जातककथांमधील शंखपाल
या जातकाची कथादेखील येथे पाहायला मिळते. त्यात नागराज
शंखपाल मगधच्या संन्यासी राजासमोर बसून प्रवचन ऐकत
असल्याचे दृश्य आहे. या दृश्यातच गुडघे मोडून एका हातावर
आपल्या पूर्ण शरीराचा भार देऊन
पाठमोरी बसलेल्या एका स्त्रीचे चित्र आहे. हे चित्र म्हणजे
‘मॉडेलिंगचा’ एक उत्कृष्ट नमुना आहे. याच लेणीमध्ये
एका भिंतीवर ‘श्रावस्तीचे विश्र्वरूप’ या नावाने प्रसिद्ध
असलेले चित्र आहे. ज्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णाने
अर्जुनाला आपले विश्वरूप दाखवले होते, त्याप्रमाणे गौतम
बुद्धानेदेखील काही विद्वान पंडितांना आपले विश्र्वरूप
दाखवले. या चित्रात जे अनेक बुद्ध प्रगट झाले आहेत,
त्या प्रत्येकाच्या वेशभूषा, रंग यांत फरक दाखवला आहे.
लेणी क्र.१ आणि २ यांच्या वास्तू आराखड्यात काहीच फरक
नाही. मात्र दोहोंच्या शिल्पकृती, त्यांची शैली यात फरक आहे.
या लेणीतील खांब उत्तमरीत्या सुशोभित केलेले आहेत.
गाभार्यात असणार्या बुद्धमूर्तीच्या बाजूस
हारिती आणि पाश्चिक या बौद्ध साहित्यातील पात्रांची चित्रे
आहेत. या लेणीतील छतावरील चित्रे आजही चांगल्या स्थितीत
आहेत. छत हे कमळाच्या चित्राने सजवलेले आहे. या लेणीत
बुद्धजन्म व बौद्ध साहित्यातील इतर काही कथाप्रसंग
रेखाटले आहेत.
लेणी क्र. ३ ते ५ चित्रशैलीच्या दृष्टीने विशेष
महत्त्वाच्या नसल्या, तरी तेथील
शिल्पकला बघण्यासारखी आहे.
सहाव्या क्रमांकाच्या लेणीमध्ये ‘श्रावस्तीचे विश्वरूप’
पुन्हा एकदा चित्रित केले आहे. गर्भगृहातदेखील बुद्धाची एक
मूर्ती असून त्या मूर्तीच्या आजूबाजूस अनेक
बुद्धमूर्ती रंगवल्या आहेत. सातवी गुहादेखील अशाच
प्रकारची आहे. आठव्या गुहेची अवस्था आज अत्यंत वाईट
आहे. नवव्या क्रमांकाची गुहा ही हीनयान पंथाची आहे. गुहेतील
शिल्पे व चित्रे पाहून ती महायान पंथीयांनी वापरली असे दिसते.
अजानबाहू बुद्धाच्या अनेक मूर्ती या गुहेत कोरलेल्या आहेत.
‘षडदंत’ नावाची जातककथा दहाव्या क्रमांकाच्या लेणीमध्ये
कोरलेली आहे. त्यात दिसणारे हत्तींचे कळप आणि बेशुद्ध
पडलेली राणी चुलसुभद्रा- ही दोन दृश्ये
रसिकांच्या भावनेला हात घालणारी आहेत.
सतराव्या क्रमांकाच्या लेणीत गौतम बुद्ध
आणि त्यांचा मुलगा राहूल यांच्या भेटीचे चित्र आहे. त्यात
राहूल आपल्या पित्याकडून
आशीर्वादरूपी भिक्षेची मागणी करत आहे असे दृश्य चित्रित
केले आहे. या चित्रातील पात्रांच्या चेहर्यावर
ज्या भावभावना दाखवल्या आहेत, त्यामुळे हे शिल्प खूप
प्रसिद्ध झाले आहे. याशिवाय या लेणीतच एके
ठिकाणी आरशात पाहून शृंगार करणार्या तरुणीचे चित्र कोरलेले
आहे. या चित्रातील पात्राच्या चेहर्यावरील भाव विलक्षण
आकर्षक आहेत, आणि त्या पात्राच्या गळ्यातील
मोत्याच्या हारावर प्रकाश टाकला, तर तो हार खराच आहे असे
पाहणार्याला वाटते. १९ व्या क्रमांकाची महायान पंथीय
लेणी म्हणजे चैत्यगृहाचा एक उत्कृष्ट नमुना आहे. २६
व्या लेणीमध्ये गौतम बुद्धाची शयन करत
असलेली मूर्ती जवळपास सात मीटर लांबीची आहे.
या मूर्तीच्या चेहर्यावर दिसणार्या शांत भावनादर्शनामुळे
ही मूर्ती पर्यटकांना, अभ्यासकांना एक वेगळेच आध्यात्मिक,
आत्मिक समाधान देऊन जाते.
या जगप्रसिद्ध अजिंठा लेणींचा अध्यात्म हा विषय असल्याचे
एकदा मान्य केले की या लेणींमधून जाणवणारे दया, क्षमा,
शांती हे गुण अधिकच भव्य-दिव्य भासतात. या लेणींमधील
चित्रे काढण्यासाठी भिंतीवर प्रथम माती, शेण, तुस,
भाताचा भुस्सा किंवा ताग यांच्या वस्त्रगाळ करून
काढलेल्या मिश्रणाचा लेप चढवला गेला होता. त्यानंतर त्यावर
चुना किंवा संदल यांचा चकचकीत पातळ थर चढवला गेला,
आणि नंतर त्यावर गेरूने चित्रे काढून त्यात रंग भरले. यावरून
तत्कालीन रसायनशास्त्र, चित्रकला, वास्तुकला यांचे ज्ञान
किती प्रगत होते याची कल्पना करता येते. या लेणींमधील
चित्रांसाठी पांढरा, काळा, पिवळा, हिरवा, तांबडा, निळा हे रंग
वापरलेले आहेत. सध्या या लेणींचे वायू प्रदूषण व इतर
गोष्टीपासून संरक्षण व्हावे म्हणून या लेणींच्या परिसरात केवळ
नैसर्गिक वायुवर चालणार्या गाड्यांना प्रवेश दिला जातो.
तसेच, जपानच्या सहकार्यानेदेखील या लेणींच्या सुरक्षिततेचे
उपाय केले जात आहेत.
वेरूळ :
अजिंठा येथील लेणी ज्या चित्रकला व शिल्पकला यांमुळे
जगप्रसिद्ध आहेत त्याच कारणांमुळे वेरूळ येथील लेणीदेखील
प्रसिद्ध असून, त्यास मोठ्या प्रमाणावर
प्रसिद्धी मिळाली ती येथील ‘आधी कळस मग पाया’
ही नवी म्हण निर्माण करणार्या ‘कैलास मंदिरामुळे’.
औरंगाबादपासून वायव्येस सुमारे २१ कि.मी. अंतरावर
बालाघाटाच्या डोंगरात वेरूळच्या लेणी वसलेल्या आहेत.
पुण्यश्र्लोक अहिल्याबाई होळकर यांनी या कैलास
लेण्यांचा जिर्णोद्धार करून तेथील पूजाअर्चेसाठी वर्षासन
बांधून दिले. महानुभव पंथाचे संस्थापक श्री चक्रधर
स्वामी यांचेदेखील काही काळ येथील लेणींमध्ये वास्तव्य होते
असे उल्लेख इतिहासात आढळतात.
छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबादेखील वेरूळचे वतनदार-
पाटील होते. ‘एलापूर’ असे नाव असलेल्या गावाचे
काळाच्या ओघात अपभ्रंशित रूप म्हणजे वेरूळ होय,
असा काही तज्ज्ञांचा अंदाज आहे. या लेणींमधील १७
लेणी हिंदुधर्मीय आहेत. १२ लेणी या बौद्ध धर्मातील महायान
पंथाच्या असून पाच लेणी जैनधर्मीय आहेत.
वाकाटकांच्या राजवटीचा शेवट झाल्यावर चालुक्य
आणि कलचुरी या राजवटींच्या संघर्षमय काळात
या लेणींची निर्मिती झाली, असे काही तज्ज्ञ मानतात.
या लेणींमधील कला, वास्तुरचना पाहून दोन कालखंडांत
या लेणींच्या निर्मितीचा काळ विभागता येतो.
पहिल्या कालखंडातील लेणी या चैत्य किंवा बौद्ध मंदिर
यांच्या आकाराप्रमाणे तयार केलेल्या असून हा कालखंड इ. स.
५०० च्या आसपास सुरू झाला आहे. त्यातील सर्वात
आधी रामेश्वर तर सर्वात शेवटी दशावतार हे लेणे तयार
करण्यात आले. दशावतार या लेणींच्या निर्मितीचा काळ
साधारणत: सातव्या शतकाचा उत्तरार्ध मानला जातो. १७ व
१८ क्रमांकाच्या लेण्यांच्या निर्मितीपासून दुसरा कालखंड सुरू
झाल्याचे मानले जाते. या कालखंडातील ‘धुमार लेणे’ हे सर्वात
शेवटचे लेणे होय. नवव्या शतकाच्या आरंभी जैन लेणी (क्र.
३० ते ३४) निर्माण झाल्या. या लेणींमधील
दहाव्या क्रमांकाची लेणी बौद्धधर्मीय महायान पंथीय असून
ती वास्तुरचनेच्या दृष्टीने उत्तम आहे. या लेणीत प्राचीन
काष्ठशिल्पे दिसत असल्यामुळे या ‘विश्वकर्मा’ नामक
लेणीला ‘सुतार लेणे’ असेही म्हणतात. सिंहासनावर विराजमान
झालेली बुद्धमूर्ती येथे बघायला मिळते. तसेच वज्रपाणी,
अवलोकितेश्र्वर, तारादेवी यांच्याही मूर्ती पाहायला मिळतात.
बाराव्या क्रमांकाचे लेणे ‘तीनताला’ या नावाने प्रसिद्ध असून
ते चैत्यगृह आणि विहार अशा दुहेरी स्वरूपाचे आहे. ३५
x १२.५ चौ. मी. क्षेत्रफळ असणार्या या लेणीत गर्भगृह,
अंतराळ, सभामंडप समाविष्ट आहे. या लेणीनंतर हिंदुधर्मीय
लेणी सुरू होतात.
हिंदुधर्मीय लेणींमधील १४ व्या क्रमांकाचे लेणे ‘रावण
की खाई’ या नावाने प्रसिद्ध आहे. कैलास पर्वत उचलत
असलेल्या रावणाच्या शिल्पामुळे हे लेणे जगप्रसिद्ध झाले
आहे. याच लेण्यामध्ये कमलासनावर
बसलेल्या विष्णुपत्नी लक्ष्मीचे शिल्प कोरलेले आहे. त्यात
लक्ष्मीला आपल्या सोंडेने स्नान घालणारे हत्ती, तसेच
कासव, मासे, कमळाची फुले, चतुर्भुज सेवक हेदेखील
उत्तमरीत्या रेखाटलेले आहेत. त्यामुळे हे शिल्प
आपल्याला सजीव असल्याचा भास होतो. १५ व्या क्रमांकाचे
‘दशावतार’ हे लेणेदेखील तसेच प्रसिद्ध आहे. यातील सर्व
शिल्पकला भगवान
विष्णुंनी घेतलेल्या दहा अवतारांच्या कथांना समोर ठेवून साकार
केली आहे. या लेणींमधील भगवान नृसिंहाने
केलेला हिरण्यकश्यपूचा वध हे शिल्प पाहण्यासारखे आहे.
या शिल्पामध्ये भगवान नृसिंह जेवढे उग्र दाखवले आहेत,
तेवढाच भयभीत झालेला हिरण्यकश्यपूदेखील दाखवलेला आहे.
१६ व्या क्रमांकाचे लेणे हे ‘कैलास लेणे’ या नावाने
जगप्रसिद्ध आहे. कारण याच कैलास मंदिरामुळे ‘आधी कळस,
मग पाया’ ही नवी म्हण निर्माण झाली आहे असे म्हणता येईल.
कारण, कोणतीही वास्तू
उभी करतांना त्या वास्तूचा पाया आधी तयार होतो व मग
त्यावर सर्वांत शेवटी कळस चढवला जातो. पण हे कैलास
मंदिर मात्र त्या तत्त्वाला अपवाद ठरले आहे. हे संपूर्ण मंदिर
एकाच-एकसंघ अशा-दगडात कोरलेले आहे.
या मंदिराभोवती दगडांची नैसर्गिक भिंत आहे. त्यावर विविध
प्रकारची अर्धस्तंभांनी विभागलेली देवकोष्टे आहेत. ६० x ३०
चौ. मी. च्या पहाडातून
अगदी मध्यभागी या मंदिराची निर्मिती करण्यात आलेली आहे.
मंदिराची शिल्पशैली द्रविड पद्धतीची आहे.
मंदिराच्या भोवती पाच लहान लहान मंदिरे असून समोर नंदीमंडप
आहे. हे मंदिर एका उंच अशा जोत्यावर उभे असून
त्या जोत्यावरच हत्ती, सिंह हे प्राणी कोरलेले आहेत. दूरून
या मंदिराकडे पाहिले तर हे हत्ती, सिंह
या मंदिराला आपल्या पाठीवर उचलून धरत आहेत असे वाटते.
कैलास पर्वत उचलणार्या रावणाची बरीच शिल्पे
या वेरूळच्या लेण्यांमध्ये आढळतात. पण या सर्वात कैलास
मंदिरातील शिल्प उत्कृष्ट आहे. याशिवाय गंगा, यमुना, सारीपाट
खेळणारे शिव-पार्वती, कार्तिकस्वामी, गणेश, नटराज
यांचीही शिल्पे येथे पाहण्यास मिळतात. या हिंदू लेणींमध्ये शैव-
वैष्णव असा भेदभाव फारसा दिसत नाही.

=============================================================================           जर तुमच्याकडे Hindi, english, किंवा marathi भाषेमध्ये काही article,  स्टोरी, किंवा कविता जी तुम्हाला share करायची आहे. तर कृपया ती माहिती आपल्या फोटोसोबत (फोटो नसला तरी चालेल) आम्हाला email करा  E-mail करा.
        आमचा email Id आहे : rohit.shelake7@gmail.com    आम्ही त्याला तुमच्या नाव व फोटोसहित या ब्लॉग वर PUBLISH करु.
Thanks !

..आणि नदी जिवंत झाली!

पाणीटंचाई, दुष्काळ यांनी त्रस्त
असलेल्या मराठवाड्यात आठ गावांतील
लोकांच्या सहभागातून लातूर, औसा तालुक्यातून
वाहणारी तावरजा नदी पुनरुज्जीवित करण्यात आली.
या कामात कोणीही पुढारी कर्ता नव्हता, तर गावातील
सामान्य माणसं, शेतकरी, राबणारे, हातावर पोट
असणारे, कर्ते आहेत.
पाणी हे जीवन आहे, पाण्यासाठी तिसरं महायुद्ध होईल,
जल है तो कल है असे घोषणावजा सुविचार वाचून
पाणीप्रश्नाचं गांभीर्य सामान्यांना थोडंफार जाणवतं.
परंतु आपल्या गावात, शेतात पाण्याचं नियोजन
कायमस्वरूपी कसं करता येईल या दृष्टीनं
कोणी फारसा विचार करत नाही. सामूहिक प्रयत्न तर
दूरच.
या सगळ्याला छेद देत प्रसिद्धीचा हव्यास न
धरता गेल्या दोन वर्षांपासून श्री श्री रविशंकर
यांच्या 'आर्ट ऑफ लिव्हिंग' या संस्थेच्या पुढाकारानं
आणि लोकसहभागानं लातूर जिल्ह्यात
जलजागृती अभियान यशस्वीपणे राबविलं आहे.
२०१३च्या उन्हाळ्यात या संस्थेने
घरणी नदीची खोली वाढवून तिचा प्रवाह सरळ रेषेत
वाहील अशी बांधणी करून ती नदी जिवंत केली होती.
यंदाच्या वर्षी संस्थेने लातूर, औसा तालुक्यातून
वाहणारी तावरजा नदी पुनरुज्जीवित केली आहे.
रामकिशन पंढरीनाथ सावंत या निवृत्त शिक्षकाने
सांगितलं की, 'मी माझ्या लहानपणी या नदीत
पोहायला जात असे. परंतु गेल्या वीस वर्षांत इथं
नदी होती असे सांगण्याची वेळ आली. आता यंदा मात्र
पुन्हा या नदीत पोहण्याचा आनंद घेऊ शकणार आहे.'
आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रकल्प समन्वयक मकरंद जाधव
यांनी या सांगितलं की, 'आम्ही लोकसहभागातून असं
काम होऊ शकतं हे लोकांना पटवून देण्यासाठी प्रथम
शिबीर घेतो. गावात बैठक घेतली जाते. गावकऱ्यांचं
एकमत झालं की, ते स्वतःहूनच पैसे गोळा करतात
आणि आम्ही काम सुरू करतो. वाहनाचा,
मशिनरीचा खर्च
आमचा असतो आणि त्या मशिनरीसाठी लागणाऱ्या डिझेलचा खर्च
गावकरी करतात. प्रकल्पाच्या पै न पैचा हिशोब
गावकरीच ठेवतात.' तावरजा नदीकाठच्या आठ गावांत
कैलास जगताप, बालाजी साळुंके या दोघांनी पुढाकार
घेतला होता.
तावरजा मध्यम प्रकल्पापासून
मांजरा नदीच्या पात्रातील संगमापर्यंत २५
किलोमीटरचं अंतर आहे. त्याला जोडून
ठिकठिकाणी ओढे-नाले आहेत. यंदाच्या उन्हाळ्यात
तावरजा नदीचे रुंदीकरण व खोलीकरणाचे काम शिरुर,
आलमला, गंगापूर, उंबडगा, पेठ बुधडा, बाभळगाव
भुसणी, या गावांतून पूर्ण झालं आहे. चार
महिन्यांपूर्वी या कामाला प्रारंभ
झाला होता आणि आता १३ किलोमीटर
अंतराचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. या कामावर
फक्त १ कोटी ८५ लाख रुपये खर्च झाला आहे. हेच
काम शासकीय दराने केलं असतं, तर किमान ७
कोटी रुपये लागले असते! विशेष म्हणजे
नदीकाठच्या शेतकऱ्यांनी यासाठी निधी दिलाच, परंतु
ज्यांना शेती नाही अशांनीही पैसा दिला आहे. याचं
उदाहरण सांगताना महादेव गोमारे म्हणाले की,
आलमला या गावच्या चहाच्या हॉटेलच्या मालकांनी त्याला या अभियानाची माहिती मिळाल्यानंतर
एकरकमी २५ हजार रुपये दिले.
गावातल्या लाँड्रीवाल्याने मदत दिली. ५० रुपयांपासून
ते ५० लाख रुपयांपर्यंत देणग्या मिळाल्या आहेत.
ज्यांना शेती नाही, जे भूमिहीन आहेत, मजूर आहेत
त्यांनी का देणगी दिली? तर नदीला पाणी आलं की,
आपल्या गावात पाणी येईल
आणि आपलीही रोजगाराची चिंता मिटेल
ही मजुराला आशा वाटते. या कामात
मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे
मार्गदर्शक आमदार दिलीपराव देशमुख यांनी सक्रिय
मदत केली. आज गौरवानं या कृतीला सहकारातील
लातूर पॅटर्न म्हटलं जातं.
आठ गावांतून वाहणाऱ्या या नदीचा लांबी ही ७५०
मीटरपासून ते ६ हजार मीटरपर्यंत वाढवलेली आहे.
प्रत्येक ठिकाणी खोली मात्र समान ६० मीटर
ठेवण्यात आली असून रुंदीसुद्धा २ मीटर कायम
ठेवली आहे. या कामावेळी तब्बल १५ लाख ३० हजार
क्युबिक मीटर गाळ काढण्यात आला. यातील
काही गाळ शेतकऱ्यांनी त्यांच्या मुरमाड जमिनीवर
टाकून शेती सुपीक बनविली आहे. बाकी गाळ
हा दोन्ही बाजूला रचण्यात आला आहे. या १३
किलोमीटरच्या नदीत आता २३० कोटी लिटर
पाणी साठणार आहे. आणि जमिनीखालील पाणीसाठ्यात
९१८ कोटी लिटरने वाढ होणार आहे.
तावरजा नदीशिवाय जिल्ह्यातील नागरसोगा, भादा,
गंगापूर, समासापूर, येथील नाला सरळीकरणाचे,
रुंदीकरणाचे खोलीकरणाचे ४० लाख रुपये खर्चाचे काम
झालं आहे. या परिसरातील पाण्याची पातळी वाढणार
आहे. पहिल्याच पावसाने
नागरसोग्याचा नाला दुथडी भरून वाहू लागला आहे.
पेठलाही पाणी आलं आहे. शेतकऱ्यांचा आनंद गगनात
मावेनासा झाला आहे. जिल्हा परिषदही या कामात
सहभागी झाली आहे. कामासाठीच तांत्रिक सहकार्य
देण्यासोबतच या नदीच्या पात्रात ४ गॅबीयन बंधारे, ३
कोल्हापुरी बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी त्यांनीही ५० लाख
रुपये खर्च केले आहेत.
गेल्या वर्षीच्या धरणी, कातपूर,
सावरगावच्या जलसंधारणाच्या कामामुळे जिल्ह्यातील
पाण्याच्या पातळीत १.०७ मीटरने वाढ
झाल्याचा अहवाल भूजल सर्वेक्षण विभागाने
दिला आहे. यंदाच्या उन्हाळ्यात त्यामुळे लातूर
जिल्ह्यात फक्त ७ टँकर सुरू होते. बाकी सर्व हातपंप,
खासगी विहिरी सरकारने अधिग्रहीत करून
पाणीपुरवठा केला आहे. आता तावरजा जिवंत झाल्यामुळे
शेतीच्या उत्पादनात वाढ होणार आहे. तावरजाचा काठ
भक्कम व्हावा, त्या परिसरातील माती वाहून जाऊ नये
यासाठी नदीच्या दोन्ही बाजूला ३६ हजार झाडं
लावण्यात येणार आहेत. त्यामध्ये १० हजार बांबू, १३
हजार लक्ष्मीतरू, ७ हजार लिंब, आणि ५ हजार
औषधी वनस्पतींच्या झाडांचा समावेश असेल.
'गाव करीत ते राव काय करील' असं म्हणतात, ते इथं
प्रत्यक्षात उतरलेलं दिसतं. या कामात
कोणीही पुढारी कर्ता नव्हता, तर गावातील सामान्य
माणसं, शेती करणारे, राबणारे, हातावर पोट असणारे,
कर्ते झाले आहेत हे निश्चितच उल्लेखनीय आहे.
=============================================================================           जर तुमच्याकडे Hindi, english, किंवा marathi भाषेमध्ये काही article,  स्टोरी, किंवा कविता जी तुम्हाला share करायची आहे. तर कृपया ती माहिती आपल्या फोटोसोबत (फोटो नसला तरी चालेल) आम्हाला email करा  E-mail करा.
        आमचा email Id आहे : rohit.shelake7@gmail.com    आम्ही त्याला तुमच्या नाव व फोटोसहित या ब्लॉग वर PUBLISH करु.
Thanks !

धनगर आरक्षणः वस्तुस्थिती व राजकारण

अनेक
प्रकारच्या संशोधनांअंती घटना समितीच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रात
धनगर या जातीचा समावेश भटक्या जमातींत
केला गेला आहे. अनुसूचित जमातींच्या यादीत
असलेल्या 'धनगड' या जातीची वैशिष्ट्ये 'धनगर'
या जातीशी जुळत नाहीत.
तरीही मुद्रणछपाईच्या चुकीचा मुद्दा उपस्थित करून
दिशाभूल करण्याचे काम सुरू आहे.
धनगर समाजाचा अनुसूचित जमातींच्या (आदिवासी)
यादीत समावेश
करण्यासंबंधीचा धुरळा पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकीय
पटलावर उडाला आहे. पार्श्वभूमी अर्थातच होऊ
घातलेल्या विधानसभा निवडणुकीची आहे.
याला प्रतिक्रिया म्हणून राज्यातील सर्व
आदिवासी आमदारांनी राज्यपालांची भेट घेऊन
यासंबंधीचा प्रस्ताव केंद्राकडे न पाठवण्यासंबंधीचे
निवेदन दिले.
प्रसंगी आपापल्या पदांचा राजीनामा देण्याची तयारी दर्शविली आहे.
वास्तविक भारतीय संविधानाच्या अनुच्छेद
३४२खाली महाराष्ट्र राज्य क्षेत्रासंबंधी सप्टेंबर
१९५० रोजीच्या राष्ट्रपतींच्या पहिल्या आदेशात
आणि त्यानंतर महाराष्ट्र राज्याच्या बाबतीत संसदेने
वेळोवेळी सुधारणा केलेल्या अनुसू​चित
जमातीच्या याद्या सूचिबद्ध केलेल्या आहेत. त्यामध्ये
धनगर अशी नोंद नाही. संविधान (अनुसूचित जमाती)
आदेश १९५० अन्वये मुंबई प्रांतासाठी प्रसिद्ध
करण्यात आलेल्या अनुसूचित जमातींच्या यादीत
ओरॉन, धनगड जमातीचा उल्लेख नाही. अनुसूचित
जाती व अनुसूचित जमातींच्या यादीत Oraon,
including Dhanka and Dhangad अशी नोंद
आहे. मुंबई राज्य पुनर्रचना कायदा, १९६०अन्वये
महाराष्ट्र राज्यासाठी प्रसिद्ध करण्यात
आलेल्या अनुसूचित जमातीच्या सूचीमध्ये Oraon,
including Dhanka and Dhangad अशी नोंद
केलेली होती, आणि यासाठी अमरावती जिल्ह्यातील
मेळघाट तहसली, चांदा जिल्ह्यातील
गडचिरोली आणि सिरोंचा तहसील, यवतमाळ
जिल्ह्यातील केळापूर, वणी आणि यवतमाळ तहसील हे
क्षेत्र निर्धारित करण्यात आलेले होते. अनुसूचित
जाती व अनुसूचित जमाती आदेश (सुधारणा) कायदा,
१९७६ अन्वये महाराष्ट्र राज्यासाठी प्रसिद्ध
करण्यात आलेल्या अनुसूचित जमातींच्या यादीत
धनगर, ओरॉन, धनगड अशी नोंद करण्यात आली आहे.
उपसचिव, समाजकल्याण यांनी १२ जून १९७९
रोजी धनगर जातीचा अनुसूचित जमातीच्या यादीत
समावेश करण्याकरिता केंद्र शासनास शिफारस
केलेली होती. तथापि एखाद्या जातीचा/ समाजाचा,
अनुसूचित जमातीत समावेश करण्याकरिता निकष
निर्धारीत केलेले आहेत. ते निकष धनगर जात पूर्ण
करीत नसल्याने समाजकल्याण विभागाने
केलेली शिफारस पुनर्विचाराअंती मागे घेण्यात
आली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या १९६७मधील निर्णयानुसार
धनगर या जातीचा समावेश महाराष्ट्राच्या इतर
मागासवर्गाच्या यादीत करण्यात आला. सद्यस्थितीत,
महाराष्ट्र राज्यातील धनगर ही एक प्रमुख जात आहे
आणि तिचा महाराष्ट्र
राज्याच्या भटक्या जमातीच्या यादीत समावेश असून
संबंधित लाभ अनुज्ञेय आहेत. तसेच, महाराष्ट्र
राज्यात भटक्या जमाती (क) (धनगर व तत्सम जमाती)
साठी ३.५ टक्के इतके आरक्षण सध्या देण्यात येते.
तर, १ कोटी ५ लाख
लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्राच्या अनुसूचित
जमातींच्या यादीत सद्यस्थितीत एकूण ४५ अनुसूचित
जमातींचा समावेश असून त्यांना एकूण ७ टक्के इतके
आरक्षण लागू आहे.
अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती आदेश (सुधारणा)
कायदा, १९७६ अन्वये महाराष्ट्र राज्यासाठी प्रसिद्ध
करण्यात आलेल्या अनुसू​चित जमातींच्या यादीत
धनगर, ओरॉन, धनगड अशी नोंद करण्यात आली आहे.
नामसदृश्याचा फायदा घेऊन अनुसूचित
जमातीसाठी शासनाने देऊ
केलेल्या सवलती घेणाऱ्या बोगस आदिवासींच्या संख्येत
१९७६ नंतर मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचे
जनगणनेच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.
महाराष्ट्रात ओरॉन, धनगड
या जमातींची संख्याही वरखाली झाली आहे.
महाराष्ट्रामधील धनगर ही 'भटक्या जमाती-
क'च्या यादीमध्ये समाविष्ट असलेली जात व ओरॉन,
धनगड ही अनुसू​चित जमातींच्या यादीमध्ये समाविष्ट
असलेली जमात या भिन्न जाती आहेत. त्यामुळे
अनुसूचित जाती जमाती सुधारीत आदेश, २००२
अन्वये महाराष्ट्र, मध्य प्रदेश व छत्तीसगड
राज्यासाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुसूचित
जमातींच्या यादीमध्ये Oraon (ओरॉन) ची तत्सम
जमात म्हणून नमूद केलेली Dhangad (धांगड) ही नोंद
बरोबर आहे. केंद्र शासनाच्या आदिवासी विकास
मंत्रालयाने महाराष्ट्रातील अनुसू​चित
जमातीच्या यादीत ३६ क्रमांकावर असलेली धांगड
ही ओरानची उपजमात असून शेती हा त्यांचा व्यवसाय
आहे, तर मेंढी व गुरांचे पालन हा धनगरांचा व्यवसाय
असल्याचे स्पष्ट केले आहे. महाराष्ट्रातील धनगर
समाजाचा समावेश भटक्या विमुक्त जातीत करण्यात
आल्याने ही प्रिंटिंग मिस्टेक नसल्याचे स्पष्ट केले
आहे.
जाती​, जमातींची नावे व त्यांच्या वैशिष्ट्यांबाबत
राज्यघटनेच्या मसुदा समितीमध्ये झालेल्या चर्चेत डॉ.
बाबासाहेब आंबेडकर असे स्पष्टपणे म्हणाले होते की,
'नामसदृश जाती किंवा जमातींना मूळ जाती-
जमातींच्या सवलती मिळणार नाहीत. त्याचप्रमाणे
एका राज्यातील लाभार्थी जात किंवा जमात
दुसऱ्या राज्यात लाभार्थी जात किंवा जमात असेलच
असे नाही, किंबहुना ती नसणारच.' म्हणून
शुद्धलेखनातील चुका काढणे म्हणजे भारतीय
राज्यघटना आणि घटनासमितीलाच आव्हान देणे आहे.
महाराष्ट्र शासनाच्या १२ जुलै २००५
रोजी झालेल्या बैठकीतील निर्णयान्वये कार्यान्वित
संशोधन पथकाने आपल्या सर्वेक्षण अहवालात असे
नमूद केले आहे की, महाराष्ट्र राज्यातील धनगर
(Dhangar) जातीच्या चालीरीती, रूढी, परंपरा,
देवदेवता व पारंपारिक व्यवसाय हा धांगड (Dhangad)
जमातीपेक्षा भिन्न असून
या दोन्ही जाती जमाती एकमेकांपेक्षा भिन्न आहेत.
अलाहाबाद उच्च न्यायालयानेही रिट क्र.
४०४६६२/२००९ मध्ये निकाल
देताना महाराष्ट्रातील धनगर समाजाचा अनुसूचित
जमातीमध्ये समावेश करण्याबबात सर्वंकष विचार
केला आहे.
महाराष्ट्र शासन विरुद्ध मिलिंद कटवारे व इतर
या विशेष अनुज्ञा याचिकेमध्ये सर्वोच्च न्यायालयाने
दिनांक २८ नोव्हेंबर २०००मध्ये अंतिम निर्णय
देताना राष्ट्रपतींनी जाहीर केलेल्या अनुसूचित
जमातींच्या यादीमध्ये शासनास कुठल्याही​ न्यायालयास
व इतर कोणत्याही प्राधिकाऱ्यास कोणताही बदल/
सुधारणा करण्याचे अधिकार नसल्याचे निरीक्षण केलेले
आहे. राज्यघटनेच्या कलम ३४२ (१) नुसार अनुसूचित
जमातींच्या यादीत एखाद्या जमातीचा समावेश करणे
किंवा वगळणे हा अधिकार फक्त संसदेला आहे.

माझे नवीन लेखन

खरा सुखी

 समाधान पैशावर अवलंबून नसतं, सुख पैशानं मोजता येत नसतं. पण, सुखासमाधानानं जगण्यासाठी पैशांची गरज पडत असतेच. फक्त ते पैसे किती असावेत ते आपल्...