Monday, July 21, 2014

गौतम बुद्ध. भाग:१

(गौतम बुद्ध, इ.
स. पू. सु. ६२३ — इ. स. पू.
सु. ५४३). बौद्ध धर्माचे
प्रवर्तक. इ. स. पू.
सातवे-सहावे शतक हे
भारतात अत्यंत वैचारिक खळबळीचे
होते. वैदिककालीन यज्ञसंस्थेला आव्हान
देणारे विचार प्रबळ होत होते. उपनिषद विचार,
पूर्ण काश्यप ह्याचा अक्रियावाद, गोशाल
मस्करिन (मंखलीपुत्र गोशाल)
ह्याचा निरनिराळ्या योनींतून संसरण
केल्यानेच दुःखाचा अंत होतो, असे
प्रतिपादन करणारा संसारशुद्धिवाद, अजित
केशकंबलीचा उच्छेदवाद, पकुध
कात्यायनाचा पृथ्वी, आप, तेज, वायू, सुख,
दुःख आणि जीव ह्या सात
गोष्टींचा शाश्वतवाद, निर्ग्रथ
जैनांचा चातुर्यामसंवरवाद, वैराटीपुत्र
संजय (संजय बेलठ्ठिपुत्र)
ह्याचा चतुष्कोटिविनिर्मुक्त (आहे, नाही,
आहे व नाही दोन्ही, आहे असेही नाही व
नाही असेही नाही) हा केवळ विक्षेप उत्पन्न
करणारा वाद अशा अनेक वैचारिक
लहरी समाजात प्रसृत झालेल्या होत्या.
यज्ञांतून
होणाऱ्या पशुहत्येच्या सार्थकतेबद्दल
शंका प्रदर्शित केल्या जात होत्या.
जन्मजात श्रेष्ठतेलाही आव्हान दिले जात
होते. अशा वेळी गौतम बुद्धाचा जन्म इ. स. पू.
सु. ६२३ मध्ये झाला. (यूरोपीय विद्वान गौतम
बुद्धाचा काल साठ वर्षे अलीकडे — इ. स. पू.
सु.५६३ — ४८३ — ओढतात).
कोसल देशात शाक्य
कुलात गौतम बुद्धाचा जन्म
वैशाखी पौर्णिमेस झाला.
त्याचा पिता शुद्धोदन
हा एका लहानशा महाजनसत्ताक
राज्याचा राजा होता. त्याच्या आईचे नाव
मायादेवी. ही आपल्या घरून माहेरी जात
असता वाटेत लुंबिनी उद्यानात प्रसूत
झाली अशी आख्यायिका आहे. हे
लुंबिनी ठिकाण नेपाळच्या तराई भागात
आहे. ह्या ठिकाणास सम्राट अशोकाने भेट
देऊन त्या ठिकाणी दगडी स्तंभ उभारून
त्याच्यावर लेख कोरला आहे ‘इध बुद्धे जाते
सक्यमुनि’ (ह्या ठिकाणी शाक्यमुनि बुद्ध
जन्मला) असे म्हणून
त्या ठिकाणच्या लोकांना सरकारी महसूलकराची सूट
दिली आहे (उबलिके कते).
गौतम बुद्धाचा जन्म
झाल्यानंतर लवकरच (आठ
दिवसांत) त्याची आई
मायादेवी ही निवर्तली व
त्याचे पालन-पोषण
त्याची मावशी व
सापत्नमाता ⇨
महाप्रजापती गौतमी (गोतमी) हिने केले.
त्याचे नाव सिद्धार्थ असे ठेवण्यात आले
होते. गौतम बुद्धाचे चरित्र संपूर्णपणे
सांगणारा असा ग्रंथ पाली किंवा संस्कृत
भाषेत नाही. पाली ग्रंथात
जातकट्ठकथे च्या प्रास्ताविक भागात
(निदान-कथेत) तशा प्रकारच्या प्रयत्नास
सुरुवात झालेली दिसते. तसेच
लोकोत्तरवादी पंथाच्या महावस्तु
ह्या ग्रंथात, सर्वास्तिवादींच्या
ललितविस्तर ह्या ग्रंथात,
अश्वघोषाच्या बुद्धचरितात
किंवा धर्मगुप्त पंथीयांच्या
अमिनिष्कणसूत्रांत असेच अर्धवट प्रयत्न झा
लेले दिसतात. पण ह्या अनेक ग्रंथांतून
चमत्कृतियुक्त काव्यात्मक वर्णने आढळतात.
सध्या उपलब्ध
असलेल्या बुद्धचरित्राविषयीसर्व साधनांत
जुनी, कमी अलौकिक, कमी चमत्कृतियुक्त व
कमी अविश्वसनीय अशी माहिती पाली ग्रंथां
तूनच विखुरलेली आढळते. अर्थात ही त्रोटक,
निरनिराळ्या काळांतील,
निरनिराळ्या प्रसंगांच्या अनुषंगाने
आलेली आहे व अपूर्णच आहे.
सिद्धांर्थाचा जन्म झाल्यावर असित देवल
ऋषीने भविष्य वर्तविले होते,
की हा गृस्थाश्रमातच राहिला, तर
चक्रवर्ती राजा होईल व घरदार सोडून गेला, तर
महान संबुद्ध होईल.
ह्या सिद्धार्थाकरिता त्याच्या पित्याने
मोठी बडदास्त ठेवली होती असे दिसते.
उन्हाळा, पावसाळा,
हिवाळा ह्या तिन्ही ऋतूंकरिता त्याने
त्याच्यासाठी तीन प्रासाद बांधले होते.
त्यांत तो मोठ्या ऐषारामाने राहत असे.
गाण्याबजावण्याच्या साहाय्याने
मनोविनोदन करण्याकरिता तरुण
स्त्रियाही त्याच्या सभोवती असत.
त्याचा विवाहही यशोधरा नावाच्या सुंदर
युवतीशी झाला.
=============================================================================           जर तुमच्याकडे Hindi, english, किंवा marathi भाषेमध्ये काही article,  स्टोरी, किंवा कविता जी तुम्हाला share करायची आहे. तर कृपया ती माहिती आपल्या फोटोसोबत (फोटो नसला तरी चालेल) आम्हाला email करा  E-mail करा.
        आमचा email Id आहे : rohit.shelake7@gmail.com    आम्ही त्याला तुमच्या नाव व फोटोसहित या ब्लॉग वर PUBLISH करु.
Thanks !

No comments:

Post a Comment

माझे नवीन लेखन

खरा सुखी

 समाधान पैशावर अवलंबून नसतं, सुख पैशानं मोजता येत नसतं. पण, सुखासमाधानानं जगण्यासाठी पैशांची गरज पडत असतेच. फक्त ते पैसे किती असावेत ते आपल्...