Monday, July 21, 2014

गौतम बुध्द. भाग:४

बुद्ध हा युगप्रवर्तक मानला आहे. बुद्धपूर्व भारत व बुद्धोत्तर भारत ह्याची तुलना केली असताना ही गोष्ट स्पष्ट होते. त्याने आपले जीवन लोकानुकंपेमुळे ‘बहुजनहिताय, बहुजनसुखाय’ खर्च केले. सर्व प्राण्यांबद्दल मैत्रीभाव म्हणजे दया, मानवतावाद व सर्व माणसांबद्दल समा
नता हे त्याचे वैशिष्ट्य होय. त्याने वैदिक
कालातील यज्ञसंस्थेतील पशुहत्येला कडाडून विरोध केला. जन्मजात उच्च-नीचता अमान्य करून कर्मावरच उच्च-नीचता अवलंबून आहे, हे आग्रहाने
प्रतिपादन केले आणि ह्याचा परिणाम म्हणून महाभारत (शांतिपर्व अध्याय २५४; उद्योग ४३.२७.२९) व भागवत (१.८.५२; ७.११.३५; ९.२.२३) ह्यांसारख्या ग्रंथांतून
त्याची विचारसरणी ब्राह्मण वर्गालाही मान्य होऊ लागल्याचे स्पष्ट दिसते.
       हीच विचारसरणी मध्ययुगात ⇨ रामानंद , ⇨ चैतन्य महाप्रभू , ⇨ कबीर , सिद्ध संप्रदाय, ⇨ नाथ संप्रदाय , ⇨ एकनाथ, ⇨ तुकाराम, लिंगायत [⟶वीरशैव], ⇨महानुभाव ह्यांच्या वाङ्मयातून आजच्या ⇨ वारकरी पंथा पर्यंत येऊन पोहोचते. बुद्धाने पुरुषांप्रमाणेच स्त्रियांनाही संघटित धार्मिक जीवन जगण्याचा मार्ग खुला केला व त्यांनाही ⇨ अर्हत्पद प्राप्त होऊ शकते; तसेच त्याही पुरुषांप्रमाणेच प्रज्ञावान असू शकतात हे त्याच्या भिक्षुणीसंघातील खेमा (क्षेमा), पटाचारा, धम्मदिन्ना ह्या भिक्षुणींनी दाखवून।दिले.
          त्याने धर्माचे द्वार सर्व वर्णांना खुले केले. बुद्ध लोकानुवर्ती बहुजनानुवर्ती शासनाचा भोक्ता होता हे त्याच्या भिक्षु-भिक्षुणी संघांच्या विनय- नियमांवरून स्पष्ट दिसते. त्याच्या संघात सर्व विवाद्य प्रश्नांचा निकाल सभेत चर्चा होऊन बहुजनमताने होत असे. त्याने धार्मिक ग्रंथ व उपदेश लोकांना समजेल अशा त्यांच्या भाषांतच असावेत (सकाय निरुत्तिया) हे कटाक्षाने पाळले. त्याने निःस्वार्थी धार्मिक प्रचारक असण्याचे महत्त्व जाणून तशा प्रकारचे भिक्षू आपल्या संघांत तयार केले. ‘मा द्वे एकेन अगमित्थ’ (विनय १.२१) म्हणजे ‘दोन भिक्षूंनो एकाच मार्गाने जाऊ नका’ असे प्रतिपादन करून आपल्या धर्मांचा प्रचार बाहेर अनेक देशांत होण्याचा पाया घालून ठेवला. त्याच्या समकाली व नजीकच्या काही शतकांत
जरी त्याचे महत्त्व सर्वमान्य झाले नसले, तरी पुढे भारतीय द्रष्ट्यांनी त्याचे महत्त्व जाणून त्याला ⇨ दशावतारां त स्थान दिले, हीच त्याच्या महत्त्वाची जाणीव
भारतीयांना झाली असल्याची निदर्शक खूण आहे [वि, सू. : हा लेख बुद्ध हा मनुष्य योनीतील, पण असामान्य व्यक्ती होती, असे मानणाऱ्या स्थविरवादी पंथाच्या पालिग्रंथांतील माहितीवर आधारलेला आहे. त्यामुळे त्याला दैवी, लोकोत्तरवादी समजणाऱ्या महायान ग्रंथांचे आधार मुळीच घेतलेले नाहीत.]
पहा : बुद्धमूर्ति; बोधिसत्त्व; बौद्ध दर्शन; बौद्ध धर्म; बौद्ध धर्मपंथ; बौद्ध साहित्य.
संदर्भ : 1. Bapat, P. V. Ed. 2500 Years of Buddhism , Delhi, 1959.
2. Brewster, E. H. The Life of Gotama the Buddha , London, 1956.
3. Eliot, Sir Charles, Hinduism and Biddhism, Part I , London, 1954.
4. Oldenberg, Hermann, Buddha : His Life, His Doctrine, His Order , London, 1882.
5. Thomas, E. J. The Life of Buddha as Legend and History , London, 1949.
6. Vigier, Anil De Silva, The Life of Buddha , London, 1955.
७. कोसंबी, धर्मानंद, भगवान बुद्ध, २ भाग, नागपूर, १९४०-४१.
८. कोसंबी, धर्मानंद, बुद्धलीलासारसंग्रह,
१९१४.
९. राहुल सांकृत्यायन, बुद्धचर्य्या : भगवान
बुद्ध की जीवनी और उपदेश , बनारस, १९५२.
=============================================================================           जर तुमच्याकडे Hindi, english, किंवा marathi भाषेमध्ये काही article,  स्टोरी, किंवा कविता जी तुम्हाला share करायची आहे. तर कृपया ती माहिती आपल्या फोटोसोबत (फोटो नसला तरी चालेल) आम्हाला email करा  E-mail करा.
        आमचा email Id आहे : rohit.shelake7@gmail.com    आम्ही त्याला तुमच्या नाव व फोटोसहित या ब्लॉग वर PUBLISH करु.
Thanks !

No comments:

Post a Comment

माझे नवीन लेखन

खरा सुखी

 समाधान पैशावर अवलंबून नसतं, सुख पैशानं मोजता येत नसतं. पण, सुखासमाधानानं जगण्यासाठी पैशांची गरज पडत असतेच. फक्त ते पैसे किती असावेत ते आपल्...