Sunday, July 20, 2014

भ्रष्ट ज्वाळा!

झाडावर कावळा अडकला, तरी जिवाची बाजी लावून त्याची सुटका करणाऱ्या मुंबई अग्निशमन दलाच्या जवानांचे मुंबईकर नेहमी कौतुक करतो. मुंबईवरचा दहशतवादी हल्ला असो की आकाशदीप, पूनम चेंबर्स, मुसाफिरखाना अशा हाताळण्यास अत्यंत अवघड इमारत दुर्घटना, त्यात या जवानांनी केलेली कामगिरी नेहमीच लक्षणीय ठरली आहे. परंतु शुक्रवारी अंधेरीतील लोटस बिझनेस पार्कच्या आगीत मात्र याच दलाच्या जवानांना इतरांच्या सुटकेसाठी नव्हे, तर स्वतःचा प्राण वाचविण्यासाठी झगडावे लागले, ही लाजिरवाणी गोष्ट ठरली. एका उमद्या जवानाचाही त्यात अंत झाला. 
             या इमारतीत सुरक्षिततेच्या अनेक नियमांचे उल्लंघन करण्यात आले होते, अशी कबुलीच या घटनेनंतर खुद्द मुंबई महापालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी दिली आहे. इमारत भस्मसात झाल्यावर जी उल्लंघने कळतात, ती त्याच इमारतीला अग्निशमन दलाची एनओसी देताना पालिका यंत्रणेला 'वळत' नाहीत का? साधारण दहा वर्षांपूर्वी मुंबईची स्कायलाइन गगनचुंबी इमारतींनी व्यापू लागली, तेव्हा या उंच इमारतींनी त्यांच्या अग्निसुरक्षेची व्यवस्था स्वतःच करायची असते, असे अग्निशमन प्रमुख त्यावेळी सांगत. मग याच लोटस पार्कचेच उदाहरणच घ्यायचे, तर पहिली बचावाची यंत्रणा म्हणजे पाण्याचे स्प्रिंकलर्स का काम करीत नव्हते, याची जबाबदारी कुणाची?
            मनोरंजननगरीतील नामवंतांपासून ते ज्यांच्यावर कर्जबुडवेगिरीचे आरोप आहेत, अशा कुप्रसिध्दांपर्यंत सर्वांची कार्यालये या इमारतीत होती. आगीची कारणे शोधताना हा दुवा महत्त्वाचा राहीलच, त्याचप्रमाणे अशा बड्या धेंडांच्या इमारतीला अग्निशमनाची एनओसी किती सुलभपणे मिळते, तेही पालिकेने सांगून टाकावे. मुंबईच्या उष्ण तापमानात मुळात असे काचेचे फसवे 'फसाद' हवेत कशाला? वांद्रे-कुर्ला संकुलात दोन वर्षांपूर्वीच अशा काचेरी इमारतीत आग लागली होती, तेव्हा या देखाव्यातील पोकळपणा उघड झाला होता. आज मात्र वांद्रे- कुर्ला संकुलातील अर्ध्याअधिक चकाचक इमारती काचांचे फसादच मिरवत आहेत. प्रश्न उरतो तो अग्निशमन दलांचे प्रशिक्षण आणि साधनसामग्रीचा. मुंबई आणि ठाणे या दोन मोठ्या शहरांतील अलीकडच्या काही घटनांमध्ये अग्निशमनाचे प्रशिक्षण व सामग्री या दोन्हींविषयी प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. ठाण्यातील तारांगण संकुलात लागलेल्या आगीत अग्निशमन दलाच्या जवानांचा लिफ्टमध्ये श्वास कोंडून मृत्यू झाला होता.     
          आग किंवा दुर्घटनेत अग्निशमन दलाने कधीच लिफ्टचा वापर करायचा नाही, हा पहिला धडा असतो. दिवंगत नितीन इवलेकर यांनी अग्निरोधक सूट घातला होता, तरीही त्यांना प्राण गमवावा लागला, असे निष्पन्न झाले आहे. अग्निशमन दलासाठी हेलिकॉप्टर किंवा आधुनिकीकरण करण्याच्या योजना केवळ वल्गनाच ठरल्या आहेत. सर्वात गंभीर गोष्ट म्हणजे ज्या इमारतीत कोणी राहत नव्हते, तेथील आगीसाठी मुंबईतील सर्वच्या सर्व अग्निशमन केंद्रांना पाचारण करणारा ब्रिगेड कॉल देण्याची गरज होती का? दिवस पावसाळ्याचे आहेत व अशा वेळी इतरत्र कोणती दुर्घटना घडली असती, तर ती परिस्थिती आपण कशी हाताळली असती? कित्येक वर्षांपासून शिवसेना-भाजप युतीच्या हातात असलेल्या मुंबई व ठाणे या दोन्ही महापालिकांमध्ये झालेल्या या भ्रष्ट नियोजनाची जबाबदारी या पक्षांनाही टाळता येणार नाही. इमारतींच्या परवानग्यांमधील लोणी हे सर्वपक्षीय आणि अधिकारीवर्गाच्या खिशात झिरपते, हे तर खरेच. त्यामुळेच राज्य सरकार हस्तक्षेप करून परस्पर परवानग्या देते हे पालिकेतील सत्ताधाऱ्यांनी म्हणायचे आणि राज्य सरकारने पालिकेकडे चेंडू ढकलायचा, एवढेच सुरू राहते. कचकड्या इमल्यांमध्ये निरपराध मात्र हकनाक बळी ठरतात.
==============================================
From Editor's desk
जर तुमच्याकडे Hindi, english, किंवा marathi भाषेमध्ये काही article, स्टोरी, किंवा कविता असेल व जी तुम्हाला आमच्या सोबत share करायची आहे. तर कृपया ती माहिती आपल्या फोटोसोबत (फोटो नसला तरी चालेल) आम्हाला E-mail करा. आमचा email Id आहे : swapnwel@rediffmail.com    
       
आम्ही त्याला तुमच्या नाव व फोटोसहित या ब्लॉग वर PUBLISH करु.

तर मग आपले लेखन आम्हाला पाठवत आहात ना?आम्ही वाट पाहत आहोत. आम्ही सभ्य भाषेतील सर्व प्रतिसाद व लेखन या ब्लॉगवर प्रकाशित करतो प्रकाशित करतो.
. Thanks !

No comments:

Post a Comment

माझे नवीन लेखन

खरा सुखी

 समाधान पैशावर अवलंबून नसतं, सुख पैशानं मोजता येत नसतं. पण, सुखासमाधानानं जगण्यासाठी पैशांची गरज पडत असतेच. फक्त ते पैसे किती असावेत ते आपल्...