Thursday, January 18, 2018

गावाच्या छातीत पिढ्यांची कळ

गावाच्या छातीत पिढ्यांची कळ
...........................................................................   
           “बैल इकून बुलट घिवू” म्हणणाऱ्या इक्श्याला खंडोबानं जुपनी फेकून हानली.म्हातारा तडक पारावर येवून बसला..आणि भरल्या डोळ्याने आपलं खेडं पाहू लागला.. खेड्याची त्याच्याच भाषेत “पाsssक रंडकी झाली व्हती” कधीकाळी जमीन खेडनाऱ्या लोकांनी वसवलेली माणूसवस्ती होतं खेडं.. शेतीतल्या दाणा पाण्यावर जगणारी स्वयंपूर्ण व्यवस्था होती खेडं..पांढरीत गावठाण होतं आन काळीत शिवार...गावात खण आन शेतात फण हे जगण्याचं साधं सूत्र होतं.. काही वर्षापर्यंत हुबेहूब असंच होतं गाव..पांढरीच्या कणसाला जाती पाती लगडल्या होत्या..भरगच्च होतं गाव.. काळ्या मातीतून जोंधळ्याचं शुभ्र चांदणं पिकत होतं.. हिरवंकच्च होतं गाव..
    
       गाव केवळ माणूस वस्ती नव्हती..काळ्या मातीच्या आडोशाने उभी राहीलेली एक समृद्ध जीवन पद्धत होती.. बक्कळ शेती होती.. ती बक्कळ शेती कसायला दावनीवर चिक्कार गुरंढोरं होती.. बैलाच्या खांद्यावर जू होतं..आणि शेतकऱ्याचा खांद्यावर गावगाडा.. दोघं शेतात राब राब राबायची..
       
        मातीतून हिरवं सोनं उगवायचं..पाखराच्या चिमनचोचीतून निसटलेल्या दानापान्यावर गावगाडा जगायचा.. मातीतलं कधीच काही वाया गेलं नाही. खळं दळं होवून उरला सुरला बाटूक..कडबा, वाळकं साळक खावून जनावरं टम्म व्हायची...उन्ह उतरताना शेपटया उडवत सांजच्यापारी घराकडं यायची..घरात गोठा होता..गोठ्यात अख्खा गोवंश होता..वासरं म्हसरं,शेरड-करड होती.. दूध दुभती होती.. बाईमाणसाचा हात कासांडीला लागताच गुरांना पान्हा फुटायचा..लेकरा कोकराचा जीव निरश्या दुधासाठी तुटायचा.. एक सड वासरासाठी होता.एक गडू लेकरासाठी होता. घरात ओसरीला खेटून ऐसपैस गोठा होता. घरात शेणामुताचा दरवळ होता..त्याच शेणामुताचं खत होत होतं..तेच पुन्हा शेतात जात होतं.. मातीतून आलेलं असं फिरून मातीत जात होतं..
         
        घर केवळ घर नव्हतं..त्याला माणुसकीचं प्रशस्त अंगण होतं..नाती केवळ नाती नव्हती..त्यांना जिव्हाळ्याचं वंगण होतं.. आड्याला ज्वारीची कणसं होती..पाखरांचाही विचार करणारी कधीकाळी दिलदार माणसं होती..घराच्या दगडी चीर्याना जरी भेगा होत्या..माणसाला माणसाशी सांधणाऱ्या अनेक जागा होत्या..घरात एखादं दुभत झालं की घरातला खरवस गावभर जायचा..घरात बाई बाळंत झाली की गावातून शेर मापटयाचा तांदूळ यायचा..पोटाला पोटाशी या ना त्या कारणाने जोडणारे अनेक रस्ते होते.. डोंबारी..कोल्हाटी..कुडमुडे..नंदीबैलवाले..असे गावकुसात फिरस्ते होते.. कुण्या उपाशी पोटाने पसरावा कधी पसा..घास घश्यात अडावा..होता गावगाडा असा !
   
            कदाचित म्हणूनच फक्त माणसाशी नाही तर दगडाशीही माणसांचे नाते अभेद्य होते.. पिक पाणी पिकल्यावर गावाबाहेरच्या म्हसोबालाही नैवेद्य होते..
गाव म्हणून याहून काही वेगळं नव्हतं..देवळाला खेटून एक दगडी पार होता..म्हाताऱ्या जीवांना थोडा आधार होता..माथ्यावर पिंपळाची सळसळ होती...गावच्या छातीत अशी कित्येक पिढ्यांची कळ होती..ज्या पिढीनं हा पिंपळ लावला त्या पिढीचा शेवटचा साक्षीदार होता खंडेराव उर्फ खंडोबा.. पारावर बसून तो हरवलेला गाव शोधत रहायचा..
       
            या काही वर्षात गाव अंतर्बाह्य बदलला होता..पायवाट गेली सडका आल्या.. या सडकेनं गावच्या गावपनाला धडका दिल्या..बैलगाडी गेली.मोटारगाड्या आल्या..बैल गेले..ट्राकटर आले..मातीवर लोखंडी फाळाचे अत्याचार झाले. जोडीला जागातीकिकरणाचे गर्भसंस्कार झाले.. मातीत रासायनिक वीर्य ओतून ओतून माती गर्भार राहिली..आणि तिच्यातून निपजले हायब्रीड..हायब्रीड खाणारी पोकळ पिढी जन्माला आली..ती गावात जन्मली पण ग्लोबल गप्पा हाणत मोठी झाली..या पिढीला एका वेळी जस्टीन बिबर आणि दादा कोंडकेही आवडू लागला..आवडीनं वडापाव खाणारी ही पिढी कधी पिझ्झा बर्गर खाऊ लागली कळलंच नाही.. शेतीची माती झाली..नोकरी केवळ भाकरीसाठी झाली..

        ..आणि मग दावणीवरचे म्हातारे बैल अडगळ वाटू लागले.. रिकामे गोठे पाहून खंडोबाचे काळीज फाटू लागले..ही इक्श्याची पिढी आपल्यालाही कसायाला देणार ही घनघोर भीती घेवून खंडोबा फांद्या छाटलेल्या भुंड्या पिंपळाच्या पारावर बसून मुकुमुकू हरवलेला गाव बघू लागला..

                                             -निलेश महिगावकर

No comments:

Post a Comment

माझे नवीन लेखन

खरा सुखी

 समाधान पैशावर अवलंबून नसतं, सुख पैशानं मोजता येत नसतं. पण, सुखासमाधानानं जगण्यासाठी पैशांची गरज पडत असतेच. फक्त ते पैसे किती असावेत ते आपल्...