मिटींग्स, टार्गेट्स, टेन्शन्स, कामाचे प्रेशर, सतत मोबाईल कानाला असे रुटीन रोजचेच.
रविवार...निवांत, आरामाचा दिवस...आळसावून बसलो होतो. काहीच करायची इच्छा होत नव्हती.
सवयीने मोबाईल ऑन केला, स्क्रीनवर मेसेज 'लो बॅटरी'..
चार्जिंगला लावण्यासाठी ताडकन उठलो, पण लाईट नव्हते. पॉवर बँक सुद्धा चार्ज नव्हती.
अरे बापरे...?? काय करावे तेच सुचेना...
मोबाईल बंद.. त्यामुळे वैतागलो, रेस्टलेस झालो, दोनतीनदा फॅनकडे, लाईट आले का म्हणून पाहिले. चकरा मारून कंटाळलो, नाईलाज म्हणून बसलो.
माझी अस्वस्थता पाहून वडील म्हणाले, “चिडणार नसशील तर, एक विचारू?”
“नाही चिडणार” .. हसत मी उत्तर दिले.
“मघापासून पाहतो आहे मोबाईल बंद आणी चार्जिंग करता येत नाही म्हणून खूप डिस्टर्ब आहेस. मोबाईलच्या चार्जिंगची एवढी काळजी घेतो. इतके त्याला जपतो.. मग दिवसभर वागणे-बोलणे, सगळ्या जबाबदाऱ्या यासाठी सदासर्वकाळ काम करणाऱ्या आपल्या मनाचा कधी विचार केला का?? त्या मनाच्या चार्जिंगचे काय..?”
पंच्याहत्तर पावसाळे पाहिलेले वडील बोलत होते.
“मनाचे चार्जिंग,हे काय नवीन..”
“नवीन नाही, जुनेच आहे. चार्जिंग, अपडेट हे तुमचे आजचे परवलीचे शब्द. प्रत्येकजण कपडे, राहणीमान, अँप्स सतत न चुकता अपडेट करीत असतो. परंतू, रोजच्या जगण्याच्या धांदलीत या सगळ्यात दुर्लक्ष होते ते मनाकडे.”
“भारी, इंटरेस्टिंग बोलत आहात” सहजपणे वडिलाच्या शेजारी बसलो.
लहान असताना बाबांची खूप सवय होती, सतत सोबत असायचो, त्यांची कॉपी करायचो. जसजसा मोठा होत गेलो तसे आमच्या दोघात नकळत अंतर पडत गेले, संवाद बंद झाला नाही.. पण, कमी मात्र झाला.
माझें धावपळीचे आयुष्य,टेन्शन यामुळे बाबा माझा मूड पाहून बोलत आणि आज खूप दिवासानंतर खरतरं वर्षानंतर असे शेजारी बसलो. बाबा इमोशनल झाले हे त्यांच्या भरल्या डोळ्यातून समजले.
मीच त्यांची पाठ थोपटली. त्यावेळी मलाही भरून आले. आईची खूप आठवण आली.
किती साधी गोष्ट ती सुद्धा इतक्या वर्षामध्ये मी केली नव्हती.
बाबांसोबत पुढचा तासभर गप्पा मारल्या.
एकदम फ्रेश, मस्त वाटलं.. !!
“मनाचे चार्जिंग सुरु झाले बघ, तासाभरात मोबाईलची आठवण तरी झाली का.. लाईट केव्हाच आली.. आज खूप खूप वर्षानंतर तुझ्याशी बोलल्यामुळे मी फुल्ल चार्ज झालो, दोस्ता..!!”
“दोस्ता...” बाबा मला लहान असताना हाक मारायचे. आज खूप खूप वर्षांनी बाबांच्या तोंडून ऐकले. बाबा आपल्या खोलीत गेले. मला भारी वाटत होते.
क्लास वरून नुकताच आलेला मुलगा म्हणाला, “बाबा, चेस खेळणार”
“नको..तू हरला तर मला बरे वाटणार नाही..”
“चॅलेंज..तू हरणार हे नक्की.. तेव्हा नो टेन्शन..”
बुद्धीबळाचा डाव चांगलाच रंगला आणि चक्क मी जिंकलो.
मुलाने स्पोर्टीगली घेतले. मित्राने बोलावले म्हणून तो खेळायला गेला.
आता काय करायचे...?
अचानक मनात आले.. घर आवरु या.. बायको आश्चर्याच्या सुखद धक्क्यात.. मला थांबायला सांगून, ती घराबाहेर गेली आणी लगेच परत आली.
“कसं शक्य आहे? आज सूर्य पूर्वेलाच उगवलाय..” बायकोचा टोमणा.
दोघेही मनापासून हसलो.अत्यंत उत्साहाने कामाला लागलो. सगळ्यात आधी कपाट आवरायला घेतले.बॅग मध्ये भरून ठेवलेली कागदपत्रे चेक करताना शाळेत,कॉलेजमध्ये असतानाच्या डायऱ्या, वह्या सापडल्या.त्यातील जुने हिशोब,जपून ठेवलेली पेपरची कात्रणे,पाहताना त्यावेळच्या आठवणी जाग्या झाल्या. खूप वर्षापूर्वी लिहून ठेवलेल्या कविता वाचताना गमंत वाटली. विसरल्या गेलेल्या कॉलेजमधील काही खास व्यक्ती आठवल्या.आठवणींचा पिटारा उघडत होता.
जुने फोटो अल्बम सापडले आणि मग काय..!!!
आजूबाजूला पसारा तसाच पडलेला आणि लहान मूल जसे खेळताना पसाऱ्यात बसून एखाद्या खेळण्यात हरवून जातात... अगदी तसेच जुने फोटो बघण्यात तसाच हरवून गेलो आणि मनाने त्याकाळात पोहचलो.सगळ्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या. लहानपणीचे फोटो पाहताना मजा आली.स्वताःचे तरुण रूप पाहताना हुरळून गेलो.
चटकन आरशात पाहिले.
“अरे..! फारसा फरक पडला नाही”
उगीचच स्वतःला समजावले. अल्बम पाहताना काही ठिकाणी नजर थांबली, स्थिरावली.तिथे हयात नसलेल्या आप्तांचे हसरे फोटो होते.बराच वेळ पाहत राहिलो.
मन गलबलून आले.खोल खोल कप्प्यात दडपलेल्या सगळ्या आठवणी सर्रकन समोर आल्या.डोळ्यातले थेंब फोटोवर कधी पडले समजले नाही.नंतरचे फोटो पाहताच आले नाही.
काही वेळ डोळे मिटून शांत बसलो.मनात विचार आले,'कसं असतं ना आपलं मन..?
अचानक आनंदून जाते..
क्षणात गहिवरते, हळवे होते..
एका आयुष्यात किती आठवणी जमा होत असतात त्याची गिनती नाही. आठवणींचे वेगवेगळे फोल्डर सेव्ह असतात.ती फक्त ओपन/ क्लोज करता येतात.. मात्र डिलीट करता येत नाही.'
या विचारात असताना पाठीवर थोपटत बायकोने काँफीचा कप हातात दिला. माझी अवस्था बरोब्बर तिच्या लक्षात आली.
“वा..! आज एकदम रेट्रो मूड मध्ये..”
“रोज न चुकता मोबाईलचे करतो, आज मनाचे चार्जिंग चालू आहे”
समोर पडलेले फोटो अल्बम पाहून ती म्हणाली,“अरे वा..!चला तर मग जोडीने, आपल्या लग्नाचे फोटो पाहू”
मग जोडीने आमच्या लग्नाचे फोटो पाहू लागलो त्यावेळी घडलेल्या गमती जमती, रुसवे फुगवे सगळे आठवले.
लग्न पुन्हा एन्जॉय केलं.
“आज खूप दिवसांनी तुला फ्रेश पाहिले, अगदी खेळकर, स्वच्छंदी पूर्वी असायचा तसा. रागावू नकोस.. पण.. काम, स्टेटस, रिस्पॉन्सिबिलीटी वाढल्या तसा तू हरवत गेलास. त्यातच गुरफटलास, एवढा की आमच्यासाठी तुझ्याकडे वेळ राहिला नाही. खूप मोठा झालास. पण, आमच्यापासून लांब गेला. उगीच वाद नको म्हणून आजवर बोलले नाही.. पण, आज पुन्हा पूर्वीचा वाटलास म्हणून हे बोलण्याचे धाडस केले.”
डोळ्यात आलेले पाणी पुसत बायको कुशीत शिरली. काही वेळ विलक्षण शांततेत गेले. दोघांचा मौनातून संवाद चालू होता.
“थँक्यू सो मच..! इतरवेळी असे बोलल्यावर मी चिडलो असतो.. पण, आज नाही. आजचा दिवस मस्त आहे. करियर, स्टेटस, अम्बीशन हे सगळं सांभाळताना स्वतःसाठी जगणं विसरलो होतो.
⏰⏰⏰⏰⏰⏰⏰
मन मारत राहतो.. त्याची इतकी सवय होते की आपली नेमकी आवड काय आहे हेच विसरलो होतो. रुटीनसोडून आज खूप दिवासांनी काही वेगळे केले. सगळ्यात महत्वाचे कशाततरी हरवून गेलो.आज खूप हलकं वाटतंय.”
“मग, मोबाईल ऑन करू की नको? कारण, कायम मोबाईलवर असणारा तू सकाळपासून एकदाही त्याला हात लावला नाही. खरंच आजचा दिवस मस्त आहे.”
“चल, आता मी तुला किचनमध्ये मदत करतो”
तेव्हा जोरात ठसका लागला.
“मन जरा जास्तच चार्ज झालंय वाटतंय” बायकोने चिमटा काढलाच.
.......आंतरजालावरून साभार
( संग्रहित पोस्ट )
No comments:
Post a Comment