Friday, March 15, 2019

बालपणीचा काळ सुखाचा

शाळा सुटल्यावर चड्डीवर करदुडा चढवून या असल्या मग्रुर ऊन्हात भर बाराच्या ठोक्याला माळाच्या गाडीवाटेनं पायात चपल्या नं घालता बैलगाडीच्या चाकुर्यातनं फुफाटा ऊडवत चालायचो.

चालता चालता त्याच फुफाटयातला बाबळीचा निबरढोक जुन काटा काचदिशी पायात मोडून मस्तकात कळ जायची.

मोडलेला काटा काढायला काटयाची पांजर शोधत लंगडत भीरी भीरी हिंडायचो.

तिथंच  रस्त्याकडेला  मांडी घालुन पायाला थुका लावून काटा काढायला घ्यायचो.

काढलेला काटा तळहातावर घेवून पापणीचा केस खसकन तोडायचो.
तोडलेला पापणीचा केस काटयाला चिकटवून हळूहळू वर ऊचलायचो..
काटा ऊचलून वर यायचा...भारी वाटायचं.


तेव्हा पापणीच्या केसानेही वेदना हलकी व्हायची.काटयासारखी...
कारण तेव्हा व्यवहाराचा स्पर्श नं झालेली निरागस स्वप्नं होती डोळ्यात..

ऊन्ह तेव्हाही होतंच की..
आता डोक्याला कॅप , डोळ्यावर गौगल चढवूनही ऊन्ह लागतं.

भौतिकाची बाधा झाली की सावलीही सलू लागते.
ऊन्हाची तर गोष्टच वेगळी....

बालपणीचा काळ सुखाचा

संग्रहीत पोस्ट
( आंतरजालावरून  साभार )

No comments:

Post a Comment

माझे नवीन लेखन

खरा सुखी

 समाधान पैशावर अवलंबून नसतं, सुख पैशानं मोजता येत नसतं. पण, सुखासमाधानानं जगण्यासाठी पैशांची गरज पडत असतेच. फक्त ते पैसे किती असावेत ते आपल्...