१९३० साली ओमाहा, नेब्रास्का येथे जन्माला आलेले बफे हे जागतिक पातळीवर तिसरे श्रीमंत गृहस्थ आहेत (फेब्रुवारी २०१८ च्या आकडय़ांनुसार).
वयाच्या ११व्या वर्षांपासून त्यांनी शेअर बाजारात गुंतवणूक करायला सुरुवात केली. व्यवसायाचा अनुभव ते लहानपणीच घेऊ लागले होते. स्वत:च्या आजोबांच्या किराणा मालाच्या दुकानात काम करणे, बबलगम – कोका कोला – साप्ताहिक पत्रिका दारोदारी जाऊन विकणे, रोजचा पेपर टाकणे अशी कामं त्यांनी केली. १९४४ साली जेव्हा ते १४ वर्षांचे होते तेव्हा त्यांनी स्वत:च्या बचतीतून ४० एकर शेतजमीन विकत घेतली होती, आणि आयकर विवरण पत्र भरले होते.
महाविद्यालयीन शिक्षण पुरे होईपर्यंत त्यांच्याकडे स्व-कमाईतून ९,८०० डॉलर इतकी बचत होती (आजचे साधारणपणे ६५ लाख रुपये). बर्कशायर हाथवे ही त्यांची नामांकित गुंतवणूक कंपनी त्यांनी थोडी थोडी करून १९६२-१९६७ या काळात विकत घेतली जिचा एक इक्विटी शेअर (क्लास ए) हा आज २९५,००० डॉलरचा (सुमारे रु १.९० कोटी) आहे. बफे यांनी ही कंपनी घेतल्यापासून, समभागधारकांना फक्त एकदाच लाभांश मिळाला आणि तोही १९६७ साली. बफे यांचं ध्येय एकच – समभागधारकांसाठी दीर्घकालीन गुंतवणूक परतावा! आणि तो दिलासुद्धा (१९६५ पासून वार्षिक पुस्तकी मूल्यात सरासरी १९ टक्के वाढ!)
२००६ साली त्यांनी त्यांची पुष्कळशी इस्टेट दान केली. २००८ साली फोर्ब्स या कंपनीने त्यांना जगातील सर्वात श्रीमंत माणूस म्हणून घोषित केले.