Sunday, March 4, 2018

नशीब-नशीब म्हणत बसले असते तर यांनी जग जिंकलं नसतं: भाग६ : मायकेल जॉर्डन

न्यूयॉर्कच्या ब्रूक्लीन प्रांतातल्या झोपडपट्टीत मायकेलचा जन्म झाला. त्याला 4 बहिणी होत्या आणि त्यांच्या वडिलांची कमाई संपूर्ण कुटुंबासाठी पुरेशी नव्हती. त्यांचे शेजारी पण खूप गरीब होते. तिथल्या वातावरणात मायकेल जॉर्डनला त्याचे भविष्य अंध:कारमय दिसत होते. आत्मचिंतनात हरवलेल्या मायकेलला त्याच्या वडिलांनी पाहिले आणि त्यांनी त्याच्यासाठी काहीतरी करण्याचा निर्णय घेतला
मग 13 वर्षाच्या जॉर्डनला वडिलांनी वापरलेल्या जुना एक कपडा दिला आणि त्याला विचारले, हा कपडा किती किंमतीचा असेल? जॉर्डन म्हणाला, असेल 1 डॉलरचा. वडील म्हणाले, याला तू कुणाला तरी 2 डॉलरला विकू शकशील का? हा जर 2 डॉलरला विकलास तर आपल्या कुटुंबासाठी ती खूप मोठी मदत होईल. जॉर्डनने डोके खाजवले आणि म्हणाला, मी प्रयत्न करतो पण यशाची खात्री देऊ शकत नाही.
जॉर्डनने कपडा स्वछ धुतला, उन्हात वाळवला. त्याच्याकडे इस्त्री नव्हती, म्हणून त्याने तो कपडा अंथरुणाखाली ठेवला. दुसर्‍या दिवशी एका गर्दीच्या ठिकाणी कपडा विकायला घेऊन गेला. 5-6 तासांच्या प्रतीक्षेनंतर एका गिर्‍हाईकाने तो कपडा जॉर्डनकडून 2 डॉलरला विकत घेतला. जॉर्डन आनंदाने धावतच घरी आला.
10-12 दिवसांनंतर त्याचे वडील म्हणाले, जे कापड तू 2 डॉलरला विकलेस त्याला 10 डॉलर किंमत येईल का रे? जॉर्डन म्हणाला कसं शक्य आहे? 2 डॉलर मिळताना नाकी नऊ आले वडील म्हणाले, प्रयत्न तरी करून बघ. खूप वेळ विचार केल्यानंतर जॉर्डनला एक आयडिया सुचली. त्याने त्याच्या चुलत भावाच्या मदतीने जुन्या धुतलेल्या कापडावर डोनाल्ड डक आणि मिकी माउसची चित्रे रंगवली आणि ज्या शाळेत श्रीमंत मुलं शिकतात अशा शाळेच्या बाहेर शाळा सुटण्याच्या वेळेत जाऊन कपडा विकायला उभा राहिला.
एका मुलाला तो चित्रे असलेला कपडा खूप आवडला. त्याने आईजवळ हट्ट करून तो कपडा जॉर्डन कडून 10 डॉलरला विकत घेतला. शिवाय आईने जॉर्डनचे कौतुक केले आणि अजून 10 डॉलर त्याला टीप दिली. 20 डॉलर ही मोठी रक्कम होती, जवळ-जवळ त्याच्या वडिलांच्या महिन्याच्या पगारा इतकी. जेव्हा जॉर्डनने वडिलांना 20 डॉलर दिले आणि ते त्याला कसे मिळाले याची कहाणी सांगितली तेव्हा वडीलांना खूप आनंद झाला आणि त्यांनी अजून एक वापरलेला कापडा जॉर्डनला दिला आणि म्हणाले, हा कपडा तू 200 डॉलरला विकू शकशील का? आता यावेळी जॉर्डनने वडिलांचे चॅलेंज कुठलेही आढेवेढे न घेता आत्मविश्‍वासाने स्वीकारले.
2-3 महिन्यानंतर सुप्रसिद्द चित्रपट “Charlie’s Angels” ची नायिका Farah Fawcett न्यूयॉर्क मध्ये तिच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आली. प्रेस कॉन्फरन्स नंतर जॉर्डन सुरक्षारक्षकां मार्फत तिच्यापर्यंत पोहोचला आणि त्याने तिला कापडावर सही करण्यासाठी विनंती केली. त्याचा निरपराध चेहरा पाहून तिने लगेचच कापडावर सही केली.
आता जॉर्डन मोठमोठ्याने ओरडू लागला, “Miss Farah Fawcett ने सही केलेले कापड घ्या, Miss Farah Fawcettने सही केलेले कापड घ्या” थोड्याच वेळात ते कापड त्याने 300 डॉलरला विकले. तो जेव्हा घरी आला आणि सर्व हकीकत वडिलांना सांगितली आणि 300 डॉलर त्यांच्या हातात दिले. तेव्हा वडिलांच्या डोळ्यात अश्रू आले. ते म्हणाले, “मला तुझा अभिमान आहे, तू करून दाखवलस”.
रात्री जेव्हा जॉर्डन वडिलांच्या शेजारी झोपला तेव्हा वडिलांनी जॉर्डनला विचारले, “बाळा, तीन जुने कपडे विकण्याच्या अनुभवातून तू काय शिकलास?” जॉर्डन म्हणाला, “जिथे प्रबळ इच्छा असेल तिथे मार्ग नक्की दिसतो”. वडिलांनी त्याला घट्ट जवळ घेतले आणि म्हणाले, “तू जे सांगतोस ते काही चूक नाही, पण माझा हेतू वेगळा होता. मला तुला दाखवून द्यायचं होतं की, ज्या जुन्या कपड्याची किंमत 1 डॉलर सुद्धा नाही त्याची किंमत आपण वाढवू शकतो. तर बोलणाऱ्या, चालणाऱ्या, विचार करणाऱ्या माणसांचं काय?” “आपण काळे सावळे असू किंवा गरीब असू, पण आपण आपली किंमत पण वाढवू शकतो” वडिलांच्या या वाक्याने जॉर्डन खूपच प्रभावित झाला.
वापरलेल्या जुन्या कापडाला जर मी प्रतिष्ठा देऊ शकतो, तर स्वतःला का नाही? स्वतःला कमी पणा घेण्यात काहीच हित नाही. त्यानंतर जॉर्डनला वाटू लागलं, की माझं भविष्य खूप सुंदर आणि उज्वल असेल. काही वर्षांनी मायकेल जॉर्डन उत्कृष्ट बास्केटबॉल खेळाडू बनला.

No comments:

Post a Comment

माझे नवीन लेखन

खरा सुखी

 समाधान पैशावर अवलंबून नसतं, सुख पैशानं मोजता येत नसतं. पण, सुखासमाधानानं जगण्यासाठी पैशांची गरज पडत असतेच. फक्त ते पैसे किती असावेत ते आपल्...