Thursday, March 1, 2018

नशीब-नशीब म्हणत बसले असते तर यांनी जग जिंकलं नसतं : भाग 4 : रमेश बाबू

           " लुळ्या पांगळ्या श्रीमंतीपेक्षा धट्टीकट्टी गरिबी बरी " मराठी मनाने पिढ्यानपिढ्या जोपासलेली असली दळभद्री विचारसरणी नवीन वर्षात फेकून द्या. आणि रमेश बाबूची कहाणी वाचा. 

                    रमेश बाबू

               १९७९ मध्ये वयाच्या ७ व्या वर्षी रमेशचे   वारले. घरात आणखी दोन धाकटी भावंडं होती. गरिबीच्या चटक्यांनी त्या तिघांचं बालपण होरपळून निघालं, वडील न्हावी होते. त्यांच सलून होतं. ते काकाने चालवायला घेतलं, त्यबदल्यत त्याच्याकडून रोज पाच रुपये मिळायचे. इतक्या तटपुंज्या रकमेत चौघांच पोट भरणं शक्यच नव्हतं. म्हणून आई चार घरात जाउन घरकाम करू लागली. पोरांचं शिक्षण, त्यांचे युनिफोर्म, बूट, वह्या-पुस्तक घेता घेता तिचा जीव मेटाकुटीला येई. त्यामुळे पोरांना एक वेळचे जेवण देणंच तिच्या नशिबी होतं. पोरांना मायेने अन्नाचा घास भरवताना त्या माउलीच्या डोळ्यातून अश्रूंची संततधार लागलेली असायची. आईच्या डोळ्यातील अश्रू पाहून छोट्या रमेश चं मन गलबलून येई. आईला हातभार म्हणून त्याने लोकांच्या घरी दुधाच्या बाटल्या आणि वर्तमानपत्र टाकायला सुरुवात केली. घरी येउन मग तो शाळेत जायला निघाला कि त्या माउलीच्या डोळ्यातून पुन्हा अश्रूंची संतत धार लागायची. आणखी थोडा मोठा झाल्यावर रमेश ऑफिस बॉय म्हणून कामाला लागला. त्याच वेळी तो इलेक्ट्रिशियनच कामही शिकला. वयात आल्यावर त्याने स्वतः सलून चालवायचा निर्णय घेतला. सकाळी सलून, दुपारी कॉलेज आणि संध्याकाळी पुन्हा सलून असा त्याचा दिनक्रम सुरु झाला. बारावीनंतर त्याला वेळे अभावी शिक्षण घेणं शक्यच नव्हतं. 


          बघता बघता आईचे दुःखाचे दिवस संपले. चार पैसे गाठीला मारल्यावर एक दिवस १९९३ मध्ये त्याने एक सेकंड ह्यांड मारुती गाडी खरेदी केली. ती गाडी म्हणजे त्याच्या आयुष्याचा टर्निंग पोईट ठरला. त्याची आई ज्या घरात स्वयंपाक करायला जायची त्या सुहृद महिलेने त्याला गाडी भाड्याने लावायचा सल्ला दिला. आणि आपल्याच ऑफिस मध्ये त्याची गाडी भाडे तत्वावर ठेऊन घेतली. आता " अपनी तो निकल पडी " म्हणायची रमेश ची वेळ होती. एका मागून एक गाड्या खरेदी करून तो भाड्याने देऊ लागला. २००४ मद्धे त्याच्याकडे ६ गाड्या झाल्या. " रमेश टुर ट्राव्हेल्स " उत्तम सेवेमुळे बंगलोर मध्ये खूप लोकप्रिय झाली होती. २०१० मध्ये त्याच्याकडे १०५ गाड्या होत्या. तोपर्यंत मारुती, सुमो, महिंद्रा गाड्या भाड्याने देणाऱ्यांची स्पर्धा वाढली होती. तेव्हा रमेशला एक सुंदर पण धोकादायक कल्पना सुचली. ती कल्पना होती मर्सिडीज, बी.एम.डब्ल्यू. ऑडी, रोल्स रॉयास अशा आलिशान गाड्या प्रवाशांच्या दिमतीला ठेवायची. अनेकांनी त्याला त्या कल्पनेपासून परावृत्त करायचा प्रयत्न केला. पण रमेशला स्वतः विषयी प्रचंड विश्वास होता. बंगलोरमध्ये त्याच्या आलिशान गाड्यांना प्रचंड प्रतिसाद मिळाला. बघता बघता त्याच्या ताफ्यामध्ये ७५ आलिशान गाड्या आल्या होत्या. आज तो साडे तीन कोटीच्या रोल्स रॉईसमधून फिरतो. रोल्स रॉईसच्या एका दिवसाचं भाडं ५० हजार हसत हसत देणारे सलमान खान, ऐश्वर्या रायसारखे असंख्य सेलेब्रिटीज बंगलोरमध्ये गेल्यावर रमेश कडूनच गाडी घेतात. 


   
               आज रमेशकडे २०० हून अधिक गाड्या आहेत. आज तो करोडपती आहे. तरीही तो आपल्या रोजी रोटी देणाऱ्या व्यवसायाला विसरलेला नाही. आज त्याच्याकडे तीन सलून आहेत. फावल्या वेळात तो हौशेने लोकांचे केस कापतो. त्यामुळे बंगलोरमध्ये लोक त्याला " करोडपती बार्बर " म्हणून ओळखतात. आपल्या मिठास वाणीने रमेशने सलून मध्ये परम नन्ट गिर्हाईक मिळवली तशीच ती त्याने आपल्या नव्या व्यवसायातही मिळवली. रमेश बाबूच यश तुम्हाला प्रेरणा दायी ठरो. 


        मित्रानो, मुंबईमध्ये दररोज ७५ लाख लोक ट्रेनमधील जीवघेणा प्रवास करून आपल्या कामाच्या ठिकाणी जातात. त्याच वेळी ५ लाख लोक जापल्या कारमधून आरामात आपल्या कामाच्या ठिकाणी जात असतात. तुम्ही त्या पाच लाखामध्ये का नाही ? कारण तुमच्याकडे कुठलंच स्वप्न नाही. एक दिवस तुम्ही सुद्धा त्या पाच लाखांमध्ये असाल. फक्त एकच निर्धार करा- " मी माझ्या विकासासाठी प्रचंड परिश्रम घेईन. त्यासाठी मी फेसबुकवर तासंतास आपला वेळ वाया घालवणार नाही. क्रिकेटचे लुटूपुटूचे सामने पाहायला दिवसभर टीवीसमोर बसणार नाही. मी फक्त आणि फक्त माझ्या उज्वल भावितव्याचाच विचार करीन. माझ्या आई वडिलांना माझ्या कर्तुत्वाचा अभिमान वाटेल असं काहीतरी करायला मी जीवाचं रान करीन. " मग बघा जगातील कोणतीही शक्ती तुम्हाला यशस्वी होण्यापासून रोखू शकणार नाही. 

No comments:

Post a Comment

माझे नवीन लेखन

खरा सुखी

 समाधान पैशावर अवलंबून नसतं, सुख पैशानं मोजता येत नसतं. पण, सुखासमाधानानं जगण्यासाठी पैशांची गरज पडत असतेच. फक्त ते पैसे किती असावेत ते आपल्...