खरे दोषी आपण आहोत .
आधी आसाराम ...
मग रामपाल ..
मग राधे माँ ...
आणि
आता राम रहीम ..
नावं बदलतायत ... प्रवृत्ती तीच ...
पण मी यातल्या कुणालाच दोष देणार नाही ,त्यांच्या पुढ्यात वाढलेलं ताट आलं - त्यांनी ओरपलं ..
प्रश्न हा आहे .. ताट वाढलं कुणी ..?
यांच्या पायांवर करोडोच्या राशी ओतल्या कुणी .. ?
यांच्या पुढ्यात आपल्या स्त्रीत्वाचा लिलाव मांडला कुणी .. ?
गादीची मस्ती आणि पैशाचा माज यावा .. इतकं मोठं यांना केलं कुणी .. ?
कुणी यांच्या भोंदू भाषणांना गर्दी केली ... ?
कुणी यांची पदकं गळ्यात मिरवली ... ?
कुणी यांच्या नावानं आरत्या आणि भजनं रचली ... ?
यांच्या विरोधात ब्र जरी काढला तरी धर्म बुडाल्याची आरोळी कुणी दिली?
ज्यांनी ज्यांनी हे केलं .. तो प्रत्येक जण दोषी आहे ..
अक्कल गहाण ठेवून ज्यांनी ज्यांनी यांच्या पायावर डोकी ठेवली ... तो प्रत्येक जण दोषी आहे ..
ज्यांनी या सैतानांमध्ये देव पहिला ... तो प्रत्येक जण दोषी आहे ..
शिकली सावरलेली ... जुनी जाणती माणसं ... नेटच्या जगात लीलया वावरणारी माणसं ... ती जेव्हा असल्या लोकांच्या नादी लागतात .. तेव्हा नेमकी काय मानसिकता असते त्यांची ?कसली भीती वाटत असते त्यांना ? कसलं फ्रस्ट्रेशन असतं ? कुठलं अपयश त्यांना या असल्या 'कुत्र्याच्या छत्र्यांना' खतपाणी घालून 'महावृक्ष' बनवण्याची बुद्धी देतं ?
बाजारात दहा रुपयांची कोथिंबीर घेताना काडी नि काडी तपासून पाहणारी सुशिक्षित नि समंजस बाई .. या बुवाबाबांसमोर लोटांगण घालताना त्याची किमान लायकी आणि नियत समजून घेत नाही ?
गाडी घेताना चार चारदा ट्रायल घेणारा आणि मोबाईल - लॅपटॉप ला रॅम / मेमरी / हार्डडिस्क पाहिल्याशिवाय हात न लावणारा आमचा सो कॉल्ड बुद्धीमान समाजपुरुष या बुवा आणि मातांच्या पायांवर पडताना किमान गॅरंटी तपासून पाहत नाही ... केवढा मोठा दैवदुर्विलास .. !
प्रॉब्लेम काय आहे माहितीय ?
आम्ही आमची भक्ती आणि श्रद्धा खूप स्वस्त करून टाकल्यात .. त्या कुणावरही उधळून देण्याचा मूर्खपणा आम्ही ठायी ठायी करतोय .. देवाचे ठेकेदार दुकानं मांडून बसलेयत .. धर्म नावाची अफू रोज नव्यानं आमच्या मेंदूत इंजेक्ट करतायत ..
आणि आम्ही ..
आम्ही बुद्धीला अर्धांग वायू झाल्यासारखे या भगव्या .. पांढऱ्या .. आणि हिरव्या कफन्या घातलेल्यांना शरण जातोय .. जोपर्यंत सर्वसामान्य माणूस सारासार विचार शिकत नाही .. बुवा .. बाबा .. मातांचा हा दुष्ट जागर असाच होत रहाणार .. स्वतःला कृष्णावतार म्हणवणारे 'दुःशासन' द्रौपदींची वस्त्रं फेडत रहाणार .. संत म्हणवणारे हे जंत समाज पोखरत रहाणार ..
आणि
त्यांच्याबद्दल तक्रार करण्याचा अधिकार कुणालाच असणार नाही .. कारण नादान भक्तांनी पोसलेली ही विषवल्ली आहे ..
हिचं विष पुढच्या दहा पिढ्या नासवणार आहे .. आणि हे हलाहल प्यायला महादेव येणार नाही ... कारण हे राक्षस त्याच्या वरदानानं नाही .. आमच्या सर्वस्व दानानं माजले आहेत .. ही आमची कर्म आहेत ..
आम्हाला देव कळला नाही .. संत कळला नाही .. मातीतल्या तुकारामाऐवजी आम्हाला डायसवरचा राम रहिम/आसाराम जवळचा वाटला .. आम्ही त्याची पालखी पुजली ..
आणि देवाशपथ .. तिथेच आम्ही माती खाल्ली .
याचा विचार तर कराल?
No comments:
Post a Comment