मित्रांनो! ही माझ्या जीवनातील सत्यकथा आहे. साधारणतः मी वीस-बावीस वर्षांचा असेन. मी मुंबईतील एका खासगी कंपनीत टेक्निकल रिप्रेजेंटेटिव्ह होतो. पगार बेताचाच होता. कंपनीने स्कूटरही दिली होती. एकदा असे झाले, मला पुण्याला कंपनीने पाठविले. तिथे कोथरूडला किर्लोस्कर कंपनीचे आर.एन.डी. रीसर्च आणि डेव्हलपमेंट सेंटरमध्ये काम होते. ते काम मी दिलेल्या वेळेत पूर्ण केले; परंतु किर्लोस्कर कंपनीकडे आणखी एक्स्ट्रा काम निघाले, ते काम अडीच ते तीन लाखांचे होते आणि ते काम पंचेचाळीस दिवसांत पूर्ण करावयाचे होते, कारण तिथे जर्मन इंजिनीअरचे शिष्टमंडळ येणार होते. किर्लोस्कर कंपनीने माझ्या कंपनीला विचारले, हे काम कराल का? पण माझी कंपनी म्हणाली, आम्ही काम करू, पण 45 दिवसांत नाही. त्याला कमीत कमी तीन महिने लागतील. किर्लोस्कर कंपनीच्या इंजिनीअरला काही सुचत नव्हते. त्यांनी मला सहज विचारले की, बोरकर, तुम्ही स्वतः हे काम करता का? मी त्यांना सांगितले, उद्या सांगतो. ते स्वतः काम करावयाचे झाल्यास मला माझ्या नोकरीचा प्रथम राजीनामा द्यावा लागणार होता. नंतरच मला स्वतःला काम करता आले असते. काय करावे हे समजत नव्हते, तरी पण घरातील वडीलधार्या माणसांचा व मित्रांचा सल्ला घ्यावा, असे मला वाटले. म्हणून मी माझ्या एक-दोन मित्रांना विचारले, काय करू? त्यांनी नोकरी सोडू नको, असे सांगितले. आमच्या परिवारातील एका सुशिक्षित प्राध्यापकाला विचारले, मी काय करू? त्यांनीही वरीलप्रमाणे सल्ला दिला. चांगली नोकरी आहे, कंपनीने स्कूटरही फिरण्यासाठी दिली आहे, पगारपण चांगला आहे, नोकरी का सोडतो? काय करावे हे समजत नव्हते. नवीन व्यवसाय करावा की नोकरी, हे माझ्यापुढे धर्मसंकट होते. मी पुण्यात डेक्कनला राहात होतो. संध्याकाळी कामावरून सुटल्यानंतर घरी आलो व हात-पाय धुऊन शांतपणे बसलो होतो. काय करावे हे समजत नव्हते. डेक्कनपासून जवळच जंगली महाराजांचा मठ एका टेकडीवर आहे. त्या ठिकाणी जावे असे मनात आले. स्कूटर घेतली व सरळ मठ गाठला. स्कूटर खाली रस्त्याच्या कडेला उभी केली. वर टेकडीवर असलेल्या जंगली महाराजांच्या मठातील मंदिरात गेलो. दर्शन घेतले व पुढील सभा मंडपात शांतपणे बसलो. मनात सारखे नोकरी सोडावी का सोडू नये, या विचारांचं भूत नाचत होतं. थोड्या वेळाने तेथील पुजारी माझ्या जवळ आले आणि मला विचारलं, काय, कसली चिंता करतोस? काय घरी वाद वगैरे झाला आहे का? मी त्या पुजार्याला सांगितलं नाही. महाराज, मी वेगळ्याच संकटात आहे. मला एक चांगली नोकरी आहे, पण मला एक चांगली संधीही आली आहे, व्यवसाय करावयाची. काय करावे ते समजत नाही. त्या पुजार्याला वरील सर्व घटना सांगितली. व्यवसायाची संधी आहे, पण घरातील सुशिक्षित माणसांचा व्यवसाय करावयाला विरोध आहे. तसेच माझे मित्रही माझ्या व्यवसायाला विरोध करतात. मी काय करू ते समजत नाही, असे मी म्हणताच सरळ पुजारी माझ्या समोरून उठला व मंदिरात गेला. थोड्या वेळात परत आला व त्याने माझ्या हातात एक नारळ, देवाचा हार व प्रसाद दिला व म्हणाला, “बाळ, तू जा. नोकरी सोड व व्यवसायाची आलेली संधी सोडू नकोस. व्यवसायात काय फायदा व तोटा होतो हे मला माहीत नाही, पण चांगले कर्म करून प्रामाणिकपणाने व्यवसाय केला तर देव त्याला फळ देतो. बाळ, तुला माहीत आहे का, भगवद्गीतेतही म्हटले आहे, कर्मण्येवाधिकारस्ते मः फलेषू कदाचनः कर्मफलेहेतूर भुर्मः ते संगोस्त्वकर्मानी॥ चांगले कर्म करण्याचा तुला अधिकार आहे, पण कर्मफळावर तुझा अधिकार नाही. तुझ्या कर्मफळास तू एक कारणीभूत आहेस, असे कधीही समजू नकोस व कर्तव्य न करण्यामध्येही तू कमी पडू नकोस. कर्माला परमेश्वर मान. कर्म हेच परमेश्वर, हे तू लक्षात ठेव. कर्मावर निष्ठा ठेव व काम करत राहा. तुला फळ मिळतच राहणार.” असा मोलाचा सल्ला त्या पुजार्याने दिला. मी मंदिरातून घरी आलो, जेवण करून झोपी गेलो. दुसर्या दिवशी सकाळी लवकरच उठलो व मी किर्लोस्कर कंपनीकडे निघालो. स्कूटर चालवत असताना माझ्या मनात अनंत विचार येत होते. रस्त्यातून येताना कोथरूड रोडला गरवारे कॉलेज लागले. नंतर एस.एन.डी.टी. कॉलेजनंतर रस्त्याच्या मधोमध गणपतीचे मंदिर होते. त्याच्या थोडं पुढे दगडाची मोठी खदान आणि त्या खदानी बर्याच दिवसांपासून बंद झालेल्या होत्या. त्या खोदलेल्या खदानात काळ्या दगडाचे भिंतीसारखे पाषाण होते आणि त्या दोन पाषाणांच्या फटीमध्ये हातभर असे पिंपळाचे रोपटे होते. लुसलुशीत असं लाल पान हलून जगाला सांगत आहे की, काय या पाषाणाच्या माथ्यावर पाय ठेवून त्या पाषाणाला सांगत होते की काय, हे पाषाणा, तू कितीही कणखर असलास तरी तुझ्या माथ्यावर पाय ठेवून या जगाला सांगतो आहे की, मला ताठ मानेने जगायचे आहे. मला जगाला माझी हिंमत व आत्मविश्वास दाखवायचा आहे. वायूसोबत हलायचे आहे, असे सांगत असावे, असा विचार माझ्या मनात आला. एक इवलेसे रोपटे या पाषाणाच्या फटीतून उभे राहून ताठ मानेने जगत आहे, मग आपणही का नको, असा विचार मनात आला. मी निश्चय केला की, आज नोकरी सोडायची व नवीन उद्योगाला सुरुवात करायची. हा विचार करत-करत किर्लोस्कर कंपनीच्या गेटमध्ये कधी आलो ते मला कळलेच नाही. माझ्याकडे पास असल्यामुळे मला गेटवर कोणी अडवले नव्हते. मी आत गेलो, पण किर्लोस्कर कंपनीचा एकही ऑफिस स्टाफ व इंजिनीअर आलेले नव्हते; कारण मी सकाळी ७.३० वाजताच पोहोचलो होतो. सर्व स्टाफ ९.०० वाजता येतो व मी माझ्या धुंदीत होतो. मला वेळेचे भानच नव्हते. बस्स्! विचार करता करता काम कसं आहे, ते पाहण्यासाठी मी रीसर्च अॅन्ड डेव्हल्प्मेंटच्या रूमकडे गेलो. तिथे सिव्हिल काम जोरात चालू होते. माझं काम त्या रीसर्च अॅण्ड डेव्हलपमेंटच्या केबिनमध्ये, मोठे किर्लोस्करचे नवीन इंजिन बसवत त्यावर वेगवेगळ्या चाचण्या घेत व नंतरच त्याला बाहेर मार्केटिंगसाठी पाठवीत. किर्लोस्करने नवीन पद्धतीचे मोठे इंजिन विकसीत केले होते आणि त्या रीसर्च अॅन्ड डेव्हल्प्मेंट सेंटरमध्ये चाचणीसाठी आणणार होते. ज्या ठिकाणी इंजिनची चाचणी करणार होते. त्या ठिकाणी मात्र साऊंडप्रूफ ग्लास गॅस्केटची केबिन बनवायची होती. मोठा आवाज बाहेर येऊ नये म्हणून त्यामध्ये डबल ग्लास तिरप्या पद्धतीने बसवावे लागते. त्याला स्पेशल असे रबर गॅस्केट असते आणि त्यात असणारे ग्लेजिंग हे ट्यूब टाईप असते आणि त्यात मी तरबेज व निपुण होतो. माझं ते डाव्या हाताचं काम होतं. त्या वेळी माझं वय फक्त २०-२२ वर्षे होते. कामाच्या जिम्मेदारीत मी लहानपणीच प्रौढ कधी झालो हे मला समजलेच नाही. सिव्हिल काम पाहता-पाहता ९ कसे वाजले हे मला कळलेच नाही. कंपनीच्या ऑफिसमध्ये सर्व स्टाफ आला होता. त्यात प्रोजेक्ट मॅनेजर श्री. जोशी हेही आले होते. मी त्यांच्याकडे गेलो व त्यांना सांगितले की, आज मी नोकरी सोडत आहे. आपण मला तुमच्या कंपनीची वर्क ऑर्डर द्या. ते म्हणाले की, तुमच्या लेटरपॅडवर प्रथम टेंडरप्रमाणे कोटेशन द्या. ते मी आमच्या एम.डी.कडून पास करतो व नंतर तुम्हाला ऑर्डर देतो. मी हो म्हणालो व त्यांना पेमेंटबद्दल विचारले व त्यांनी मला सांगितले की, आम्ही अॅडव्हान्स कोणालाही देत नाही, पण मटेरियल येथे आल्यानंतर सत्तर टक्के अॅडव्हान्स देऊ. काम जवळ-जवळ अडीच ते तीन लाखांचे होते. त्यात आणखी एक्स्ट्रा काम निघणार होते. मी जोशींना काम करतो, मी आपणास कोटेशनही देतो, असे म्हणालो व तेथून कोटेशन टाईप करण्यासाठी डेक्कनला आलो. कंपनीचे नाव काय ठेवावे काही समजत नव्हते. डेक्कनला टाईपवाल्याकडे आलो. त्या ठिकाणी माझ्यापुढे दोन व्यक्ती उभ्या होत्या. मी त्या टाईपवाल्याला विचारले की, किती वेळ लागेल. तो म्हणाला की, आणखी २५ मिनिटे लागतील. मी त्याला माझे नाव दिले व चहा घेऊन येतो म्हणून जवळच असलेल्या इराणी हॉटेलमध्ये गेलो. चहाची ऑर्डर दिली व टेबलावर पडलेले वर्तमानपत्र चाळीत होतो. त्यात एक बातमी होती. एव्हरेस्ट शिखरावर भारताचा झेंडा फडकवला, असा एक फोटो होता. बस्स्! माझे काम फत्ते झाले. मी माझ्या कंपनीचे नाव एव्हरेस्ट इंजिनीअरिंग ठेवले व पटकन चहा घेऊन त्या टाईप करणार्या माणसाकडे गेलो. पहिल्या व्यक्तीचे टायपिंगचे काम संपले होते. मी टाईपराईटरला सांगितले की, माझ्या कंपनीचे नाव एव्हरेस्ट इंजिनीअरिंग आहे. मला कोटेशन टाईप करायचे आहे. त्यांनी मी सांगितल्याप्रमाणे फक्त पंधरा मिनिटांत टाईप करून माझ्या हातात दिले. मी लगेच तेथून निघालो व किर्लोस्कर कंपनी गाठली. कोटेशन जोशींच्या हातात दिले. त्यांनी ते वाचले. कोटेशनमध्ये आयटम रेट होता. त्यामुळे कमी-जास्त करावयाचा प्रश्नच नव्हता. तरी पण जोशी म्हणाले, रेट ठीक आहेत, पण ते तुमच्या कंपनीच्या लेटरहेडवर पाहिजेत. मला चिंता पडली, काय करावे? तितक्यात जोशी म्हणाले, मी एम.डींना विचारतो. ते म्हणाले चालेल, तर मग ठीक आहे. मग मी लगेच वर्क ऑर्डर देतो. ते एम.डींकडे गेले. थोड्याच वेळात केबिनच्या बाहेर आले. जोशी म्हणाले, चला, तुम्हाला आत बोलावले आहे. मी विचार करत होतो काय होईल ते. मी आत जाताच एम.डी. म्हणाले, अहो जोशी, एवढा लहान मुलगा अडीच-तीन लाखांचे काम कसा करणार? जोशींनी खात्रीने सांगितले, साहेब, हा मुलगा काम करेल याची मला खात्री आहे. मित्रहो, त्या वेळी मी जेमतेम २०-२२ वर्षांचा असेन. त्यावर एम.डी. म्हणाले, त्याला वर्क ऑर्डर द्या. मी त्यांना थँक्यू म्हणालो व केबिनच्या बाहेर पडलो. मला खूप आनंद झाला होता. माझ्यामागून जोशी आले. ते मला त्यांच्या केबिनकडे घेऊन गेले व त्यांच्या स्टेनोला बोलावून वर्क ऑर्डर तयार करण्यास सांगितले. जोशींनी माझ्यासाठी चहा मागविला. आम्ही दोघे चहा घेत होतो तितक्यात ते म्हणाले, बोरकर, हे काम अर्जंट आहे. मला हे काम ४५ दिवसांच्या आत कोणत्याही परिस्थितीत हवे आहे. माझे नाव खराब होता कामा नये. मी त्यांना म्हणालो, साहेब, मी हे काम ४० दिवसांतच करून देतो. मी त्यांना थँक्यू म्हणून निघालो व स्कूटर घेऊन जंगली महाराजांचा मठ गाठला. दुपारचे १२.३० वाजले होते. तेथे पुजारीबुवा नव्हते. मी ती वर्क ऑर्डर मंदिरातील देवाच्या समोर ठेवली व त्यांना असाच आशीर्वाद द्यावा, अशी मनातच विनंती केली. तेथील पुजार्याची विचारपूस केली, पण ते तिथे नव्हते. मी लगेच तेथून निघालो व पुढे कामाला किती पैसे लागणार याचा घरी येऊन हिशोब करत बसलो. कच्च्या मालाला ७० ते ८० हजार रुपये लागणार होते. आता काय करावे सुचत नव्हते. माझ्याकडे फक्त १५ ते १६ हजारच रुपये होते. गळ्यात सोन्याची चैन व हाताच्या बोटात अंगठी होती. याचे किती पैसे येतील ते पाहण्यासाठी जवळच असलेल्या ज्वेलर्सकडे गेलो. त्याने सांगितले, १६,८०० रुपये येतील. मी त्यांना ती चैन व अंगठी दिली व पैसे घेतले. तरीपण मला ४० ते ५० हजार रुपये कमी पडत होते. काय करावे हे समजत नव्हते. घराकडची मंडळी मला एकही रुपया देणार नव्हती याची मला खात्री होती, कारण नोकरी सोडली होती. काय करावे या चिंतेत होतो. माझ्याबरोबर किर्लोस्कर कंपनीत काम करणारे चंद्रकांत शितोळेंचे वर्कशॉप कर्वे रोडला होते. मी त्यांच्याकडे गेलो व त्यांना वर्क ऑर्डर दाखविली. जवळ असलेले पैसे दाखविले व त्यांना सांगितले, मला पन्नास हजार रुपये हवेत. ते थोडे थांबले व म्हणाले की, चल माझ्याबरोबर. मी त्यांच्याच स्कूटरवर बसून डेक्कनच्या महाराष्ट्र बँकेत गेलो, त्यांनी तेथून ५० हजार रुपये काढून घेतले व माझ्या हातात दिले. मी त्यांना धन्यवाद दिले. शितोळे म्हणाले, अरे बोरकर, माणसाने माणसांवर विश्वास ठेवावा. तू फक्त पार्यापेक्षा चपळ, वार्यापेक्षा वेगवान अशा बेफाम मनावर फक्त नियंत्रण ठेव. मी मनात विचार करत होतो, हा आपल्याला परमेश्वर पावला आहे. मनुष्याच्या हातून होणारे कोणतेही कार्य अथवा निर्मिती किंवा आविष्कार हा नियमित मनाचा सुपरिणाम असावा. जगाची प्रचंड व विराट निर्मिती हीसुद्धा परमेश्वराच्या नियंत्रित मनाचाच चमत्कार असावा आणि या जगात शितोळेसारखी माणसं मिळाली हाही चमत्कार समजतो. मला कोणी तरी सांगितले होते की, माणसाच्या शरीरात आत्मा असतो. हा ईश्वरी शक्ती किंवा चैतन्य शक्तीचाच अंश असतो. मी माझ्या आत्म्यातील देवाला नमस्कार केला व पुढील मटेरियल आणण्यासाठी मुंबईकडे निघालो. संध्याकाळचे साधारणतः ४ वाजले होते. शिवाजीनगरहून एस.टी. पकडली व बोरिवली या ठिकाणी माझे मोठे बंधू राहत होते, त्यांच्याकडे संध्याकाळी ९.०० वा. पोहोचलो. सकाळी लवकर उठलो, चहा व नाश्ता घेतला व मटेरियल घेण्यासाठी चर्नीरोडकडे निघालो. सोबत बोरिवलीचा माझा मित्र होता. मटेरियल खरेदी केलं, ते अॅल्युमिनियमचे हेवी चॅनेल होते. त्यांना फॅब्रिकेशन काळबादेवी या जवळ असलेल्या एका वर्कशॉपमध्ये केले व पॅकिंग गोणपाट आणून व्यवस्थित शिवलं. मी स्वतःच्या हाताने शहा ट्रान्सपोर्टने पुण्याला पाठविले. सोबत फक्त तीन हजार रुपये शिल्लक राहिले. कुंभारवाड्यावरून आम्ही पुढे निघालो. सोबत माझा मित्र होता. लोहार चाळीच्या पाठीमागे मारुतीचे मंदिर आहे आणि त्या दिवशी नेमका शनिवार होता. म्हणून दर्शन घेण्यासाठी मंदिराकडे निघालो. मारुतीचे दर्शन घेतले आणि समोर चालत असताना तिथे इलेक्ट्रिकची मोठमोठी दुकाने दिसली. त्यातील मी गोल अशा दोन गेट लाइट्स १५० रुपयांना घेतल्या. माझा मित्र म्हणाला, अरे बोरकर, या गेटच्या लाइट्स आहेत, त्या कशाला घेतल्यास? तुझा मुंबईमध्ये बंगला आहे की फॅक्टरी आहे, की या लाइट्स त्या गेटवर लावणार आहेस? मी त्याला म्हणालो, माझी मुंबईत स्वतःची एक झोपडीही नाही आणि फॅक्टरीही नाही, पण एके दिवशी मी फॅक्टरी उभी करणार आहे. त्या गेटवर लावणार आहे. माझा मित्र माझ्याकडे बघून मोठ्याने हसत राहिला व म्हणाला पाचशे रुपये पगार आणि मुंबईत फॅक्टरीचे स्वप्न बघतोस. मी त्याच्याकडे जास्त लक्ष दिले नाही. लाइटची पिशवी हातामध्ये घेतली व आम्ही बोरिवलीतल्या घराकडे निघालो. घरी गेलो गेट लाइट पोटमाळ्यावर ठेवून बॅग घेतली व परत पुण्याकडे निघालो. रात्री पुण्याला येण्यास मला ११.०० वाजले. दुसर्या दिवशी सकाळी लवकर उठलो. स्वारगेटला शहा ट्रान्सपोर्टकडे गेलो. तिथे मी पाठविलेले पार्सल आले होते. एका टेंपोत ते सर्व मटेरियल भरले व किर्लोस्कर कंपनीकडे गेलो. गेटवर एंट्री केली व स्टोअररूममध्ये ठेवले. जोशींकडे गेलो. त्यांना म्हणालो की, मी मटेरियल आणले आहे. ऑर्डरप्रमाणे अॅडव्हान्स द्या. जोशी म्हणाले, ठीक आहे. तुमचे बिल सबमिट करा. मी मंजुरी देतो. मी तेथीलच टाईपराईटरकडून बिल टाईप करून घेतले व जोशींकडे गेलो. ते बघताच जोशी म्हणाले, असे बिल चालणार नाही. ते लेटरपॅडवर किंवा बिलबुकावर टाईप करून द्या. माझ्याकडे लेटरपॅड नव्हते. मी लगेच पुण्यात आलो. मी बुधवार पेठच्या कॉर्नरला नाईक प्रेस, यांच्याकडे बिल बुक छापायला दिले. नाईक म्हणाले, कितीही अर्जंट मागितले तरी दोन दिवस लागतील. मी त्यांना विनंती केली, लवकर द्या म्हणून. ते म्हणाले, ठीक आहे, पण १५ रुपये जास्त द्यावे लागतील, उद्या दुपारी या आणि घेऊन जा. दुसरे दिवशी छापलेले बिलबुक घेतले व बिल बनवून त्यांनी स्टोअरमधील ट्रांसपोर्टची चलनाची कॉपी बघितली व ७० टक्के पेमेंट करावे, म्हणून अकाऊंट डिपार्टमेंटकडे मंजुरीसाठी पाठविले. अर्ध्या तासाने चेक मिळेल, तुम्ही थांबा, असे त्या क्लार्कने सांगितले. मी तेथेच बसून होतो. अर्धा तास झाला तरी चेक नाही आला. पाऊण तास झाला तरी नाही. काय करावे कळत नव्हते, कारण माझ्याकडे फक्त पन्नास रुपये शिल्लक होते आणि स्कूटरमधील पेट्रोलही संपत आले होते. मी विचार करत होतोच, की एक चपराशी आला व तुम्हाला चीफ अकाऊंटंटने बोलावले आहे. मी लागलीच धावत गेलो. त्या साहेबांनी माझ्या एक-दोन सह्या घेतल्या व माझ्या हातात एक लाख पंचाहत्तर हजार रुपयांचा चेक दिला. त्या दिवशी एक रुपयाचाही चहा प्यायलो नाही, ना कुठे नाश्ता केला, कारण माझ्याकडे पन्नास रुपये शिल्लक होते आणि स्कूटरमधील पेट्रोलही संपत आले होते. मी हातात घेऊन तो चेक माथ्यावर लावला, कारण माझ्या आयुष्यातील स्वतःच्या कमाईचा पहिलाच चेक होता. मी तो चेक घेतला, पण हा कुठे भरावा? कारण माझे बँक अकाऊंट नव्हते. पुन्हा मी चंद्रकांत शितोळेंकडे गेलो व त्यांना तो चेक दाखवला. तेही खूप खूश झाले. त्यांना म्हणालो, माझं अकाऊंट नाही. काय करावयाचे? त्यांनी लगेच म्हटले, चल, माझ्या बँकेत खाते उघडू आणि डेक्कनला गेलो. तेथील महाराष्ट्र बँकेत खातं उघडलं व तो चेक जमा केला. त्याच बँकेत किर्लोस्कर कंपनीचेही खाते होते. माझा चेक लगेच पास झाला. बँकेच्या मॅनेजरसाहेबांनी आम्हाला चहा मागविला व म्हणाले. काही कॅश हवी आहे का? मी हो म्हटले. त्यांनी लगेच चेकबुक दिले. मी प्रथम १.२५ हजार रुपये काढले. त्यातील पन्नास हजार व वरती पाच हजार रुपये मी शितोळे यांच्याकडे दिले, पण त्यांनी फक्त पन्नास हजार रुपयेच घेतले. मी घरी आलो. मी पुण्यामध्ये डेक्कनला गरवारे कॉलेजच्या पाठीमागे भाड्याने राहात होतो. माझ्याकडे ७५ हजार रुपये होते व बँकेत ५० हजार रुपये होते. चेक नसता भेटला तर माझी पंचाईत झाली असती, पण देवाने साथ दिली आणि मला चेक मिळाला. मित्रहो, मी ते पंचाहत्तर हजार कमीत कमी पाच-सहा वेळा मोजले, कारण एवढी रक्कम स्वतःच्या कमाईची माझ्या आयुष्यात कधीच पाहिली नव्हती. त्या रात्री मी साडेतीन वाजता झोपलो. सकाळी सातला उठून मी किर्लोस्कर कंपनीच्या राहिलेल्या इरेक्शनसाठी गेलो. सोबत पुण्यातील दहा-पंधरा कामगार घेतले व ते हाती घेतलेले कण्ट्रोल रुमचे काम मी दिवसरात्र एक करून केवळ ३५ दिवसांत पूर्ण केले. तेथील इंजिनीअरने कंट्रोल केबिनची साऊंड टेस्ट घेतली. ती यशस्वी झाली. बस! माझे काम झाले. राहिलेले बिल व एक्स्ट्रा वर्क असे मिळून मला त्या कामात जवळजवळ दीड लाख रुपयांचा फायदा झाला. काम सुंदर आणि वेळेवर झालं होतं. काही दिवसांत रशियातील शिष्टमंडळांनी त्या आर.अॅण्ड.डी. सेंटरला भेट दिली. ते खूश झाले. किर्लोस्कर कंपनीचे प्रोजेक्ट इंजिनीअर श्री. जोशी यांनी माझं अभिनंदन केलं व त्यांनी मला सांगितले, बोरकर, तू उद्या सकाळी ठीक नऊ वाजता मला फर्ग्युसन कॉलेजच्या गेटसमोर भेट. एका ठिकाणी तुला मी घेऊन जाणार आहे. मी दुसर्या दिवशी फर्ग्युसन कॉलेजच्या गेटसमोर उभा राहिलो. नऊ वाजता जोशीसाहेब त्यांच्या गाडीने आले व म्हणाले, माझ्या मागे तुझी स्कूटर घे. मी त्यांच्या पाठीमागे स्कूटर चालवत होतो. शिवाजीनगरचा चौक आला. तेथून डाव्या बाजूला युनिव्हर्सिटीच्या रस्त्याने निघालो. काही अंतरावर डाव्या बाजूला त्यांनी गाडी उभी केली. मी माझी स्कूटर त्यांच्या गाडीमागे उभी केली. समोर एक मोठा बंगला होता. त्याच्या गेटच्या बाजूला ‘लकाकी बंगला’ असे नाव होते. जोशीसाहेब मला आत घेऊन गेले आणि भव्य असं गार्डन व पांढर्या रंगाचा बंगला खूप छान दिसत होता. मी जोशीसाहेबांना विचारलं, साहेब, हा कुणाचा बंगला आहे? त्यावर ते म्हणाले की, हा बंगला किर्लोस्कर कंपनीच्या मालकांचा आहे आणि तू काम लवकर आणि चांगलं केलं म्हणून त्यांनी तुला बोलावलं आहे. मी घाबरलो. एवढ्या मोठ्या माणसाने मला बोलावले. त्यांच्याशी मी कसं आणि काय बोलू हे समजत नव्हते. आम्ही दोघे हॉलमध्ये बसलो. थोड्या वेळात गोरापान, कपाळ मोठे, साधारण सहा फूट उंचीचे, भव्य व्यक्तिमत्त्वाचे श्री. शंतनुराव किर्लोस्कर समोरून आले. आम्ही दोघे उभे राहिलो. त्यांनी बसा म्हटल्यावर आम्ही खाली बसलो. जोशीसाहेबांनी किर्लोस्करसाहेबांना माझी ओळख सांगितली, हे शंकरराव बोरकर, यांनी आपल्या आर.अॅण्ड डी. सेन्टरचे साऊंडप्रुफ केबिनचे काम चांगले व वेळेच्या दहा दिवस अगोदर पूर्ण केले आहे. परवा रशियाचे शिष्टमंडळही खूश झाले. शंतनुराव किर्लोस्करांनी माझ्या घरची माहिती घेतली व लगेच आपल्या खिशातील पारकर कंपनीचा पेन मला भेट म्हणून दिला व म्हणाले, बोरकर, या वयात एवढं सुंदर काम वेळेत केलंत. जर तुम्ही असेच मेहनत करत राहिलात तर तुम्ही फार मोठे व्हाल. मी लगेच उठलो, त्यांच्या पायाचे दर्शन घेतले व म्हणालो, सर, मी आपल्या कामासाठी नोकरी सोडली व माझ्या आयुष्यातील पहिलं कॉन्ट्रॅक्ट आपल्या कंपनीचं घेतलं. आपले आशीर्वाद आता माझ्या पाठी आहेत. मी पुढे खूप मेहनत करीन आणि आपण दिलेली ही भेट जपून ठेवीन. मित्रहो, ही आठवण लिहीत असताना माझ्या अंगावर काटे उभे राहत आहेत, कारण एवढ्या महान उद्योगपतीने माझ्यासारख्या माणसाचं कौतुक करावं, हे माझं भाग्य होय. जो माणूस काही दिवसांपूर्वी ५०० रुपयांची नोकरी करत होता तो आता लघू उद्योजक झाला होता आणि त्याचा सत्कार किर्लोस्करसारख्या उद्योगपतीने केला होता हे भाग्यच नाही का समजायचे! या घटनेनंतर मी पुन्हा जंगली महाराजांच्या मठात दर्शनासाठी गेलो, दर्शन घेतले व पुढे सतत मंदिरात जात होतो. पुढे सतत मोठमोठी टेंडर्स घेत राहिलो. किर्लोस्कर, टेल्को, बजाज, महाराष्ट्र बँक अशा किती तरी मोठ्या संस्थेची कामे केली. मित्रहो! आज आमच्याकडे ४०० ते ५०० कोटी रुपयांची सेंट्रल गव्हर्नमेंटची व स्टेट गव्हर्नमेंटची कामे आहेत आणि जी गेट लाइट मी पाचशे रुपयांची नोकरी करताना लोहार चाळ येथून विकत घेतली होती, त्या घटनेनंतर तब्बल नऊ वर्षांनी मी तारापूर एम.आय.डी.सी. येथे ग्रेनाइट्स ब्लॉक, कटिंग व पॉलिसिंगची फॅक्टरी टाकली. ती गेट लाइट त्या फॅक्टरीच्या गेटवर लावली व दुसरी गेट लाइट १४ वर्षांनी मी ९० कोटी रुपयांचा साखर कारखाना उभा केला त्या कारखान्याच्या गेटवर लावली. आपण परमेश्वरावर श्रद्धा ठेवा व काम करीत राहा! देव फळ नक्कीच देईल. आपल्या शरीरात आत्मा आहे आणि तो आत्माच देवाचा अंश आहे असं मला वाटतं. मी जंगली महाराजांच्या मठात गेलो, देवाचं दर्शन घेतलं, पुजार्याचं ऐकलं, नोकरी सोडली. पुजार्याचे शब्द म्हणजे डॉक्टर्सने दिलेल्या डोसापेक्षा शाब्दिक डोस महत्त्वाचा ठरला. व्यवसायात यश आलं, पण हे देवानेच केलं असं मी मानत नाही. मी माझ्या आयुष्यात कधीही उपवास करत नाही. वर्षात एकच उपवास करतो, तो आमच्या ग्रामदैवत नृसिंह जयंतीचा. हा एक उपवास करतो. मित्रांनो! देव हा चैतन्यशक्तीचा भाग आहे आणि ती चैतन्यशक्ती आपल्या शरीरातील आत्मा आहे. आपण जसे कर्म करतो तसे देव फळ देतो हेच खरे आहे. सांगायचं तात्पर्य म्हणजे, जर मी दररोज मंदिरात जाऊन दिवसभर आराधना करत बसलो असतो, तर देवाने मला कधीच साथ दिली नसती. कर्म हेच फळ, हे आपल्या मनात कोरलं पाहिजे. कर्माला अध्यात्माची साथ अवश्य आहे आणि अध्यात्म प्रत्येक व्यावसायिकाला सहजासहजी लाभत नाही. ते कर्मानेच प्राप्त करावे लागते. आपल्या शरीराला डोळे आहेत, पण नजर कोणी दिली तर ते सांगता येणार नाही. तसेच आपल्या मनाचा व आपल्या बुद्धीचा संबंध काय हेही सांगता येणार नाही. प्रथम कोणताही विचार मनात येतो की डोक्यात, हे कोणी सांगू शकणार नाही आणि हेच खरे अध्यात्म आहे. म्हणूनच कोणत्याही उद्योजकाला अध्यात्माची सांगड असणे जरुरी आहे. अध्यात्माने माणसाच्या निरीक्षणशक्तीचा विकास होतो. कोणते फायद्याचे आणि कोणते तोट्याचे हे समजण्यासाठी शक्ती निर्माण होते. अध्यात्माने माणसाची स्मरणशक्ती व विचारशक्तीचा विकास होतो. समोरचा माणूस पारखण्याची ताकद निर्माण होते. अध्यात्माने माणसाच्या निर्णयशक्तीचा विकास होतो. समोरचा माणूस पारखण्याची ताकद निर्माण होते. कोणताही निर्णय चांगला की वाईट ही पडताळण्याची ताकद निर्माण होते. म्हणजेच ईश्वर कणाकणात आहे हेच अध्यात्मातील तत्त्व आहे. आपण आत्मा हा चैतन्यशक्तीचा भाग आहे. त्याला जोपासणे हेच आपलं कर्तव्य आहे. मित्रहो! एकच सांगावंसं वाटतं, आपल्या मराठी तरुणांनी कोणताही जास्त विचार न करता उद्योगात पदार्पण केले पाहिजे, तर आणि तरच मराठी तरुण भविष्यात उद्योजक बनतील. मी जर नोकरी सोडायचं धाडस केलं नसतं, तर मी कधीच उद्योजक झालो नसतो. कोणतेही फळ प्राप्त करण्यासाठी स्वत:च्या आत्मविश्वासाने ५० टक्के पुढे चला. राहिलेले ५० टक्के प्रत्यक्ष परमेश्वर स्वर्गातून सर्व सुख, समृद्धी बरोबर घेऊन तुम्हाला शोधत पृथ्वीतलावर येईल आणि तुम्हाला अर्पण करील; पण तुम्ही कर्म हेच परमेश्वर मानले पाहिजे, तर आणि तरच…. – शंकरराव बोरकर
Subscribe to:
Post Comments (Atom)
माझे नवीन लेखन
खरा सुखी
समाधान पैशावर अवलंबून नसतं, सुख पैशानं मोजता येत नसतं. पण, सुखासमाधानानं जगण्यासाठी पैशांची गरज पडत असतेच. फक्त ते पैसे किती असावेत ते आपल्...
-
जागतिक ग्राहक हक्क दिन : ग्राहकांचे हक्क, जबाबदाऱ्या आणि कर्तव्य काय? आज जागतिक ग्राहक हक्क दिन. ग्राहक संरक्षण कायद्यामुळे ग्राहकांना...
-
’एक शुन्य मी’ धर्म, अंधश्रध्दा नि तुम्ही आम्ही -पु. ल. देशपांडे. भारतीय समाजप्रबोधनाच्या बाबतीत आपल्या देशातले नेते हे एक प्रकारच्या भ्र...
No comments:
Post a Comment